सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

जगण सुकर होण्यासाठी....

हरखून जाण्याचे, स्वत्व शोधण्याचे, उमेदपणा वाढविण्याचे, एकत्र माणूस म्हणून काही प्रशिक्षण घेण्याचे, आनंदाचा शोध घेण्याचे, हरले तरी पुन्हा तयारी करुन विजयी होण्यातला नवा आनंद मिळविण्याचे खेळ एक साधन आहे. प्रत्येकाने रोज काहीतरी खेळले पाहिजे. अंगातून घाम निघेस्तोवर मैदानाशी एकरुप झाले पाहिजे. त्याने व्याप, ताप, त्रास सगळा नाहीसा होतो... जगण सुकर होऊन जाते.

मी अकरावीत असताना गंगावेसेत साधारण तीन महिने राहिलो. बारावीच्या वर्षात ते काही जमले नाही, मग ते वर्ष संपल्यावर मी काही दिवस तिथे रहात होतो. कुस्तीचा नाद लागण्याचे कोल्हापूरला घरच्यांनी घालण्याची जी कारणे होती, पहिले कारण लहानपणी बाळूचे आणि आमच्या कारभाऱ्याचे बघून मी कुस्त्या खेळायचे हे आहेच. त्यापेक्षाही सातवीत असताना स्पर्धेत मी 35 किलोगटात तालुक्‍यात पहिला आलो होतो. पुढे त्याच स्पर्धेसाठी मी सोलापूरला आलो होतो. तिथेही तसा खरे तर माझा पहिला नंबर आला होता मात्र तुमचे आय कार्ड तुम्ही आणले नाही म्हणून माझा नंबर गेलो होता. दुसरा नंबर तिथे मला दिला होता. पुढे शाळेत कुस्त्या गाजवल्याच. बाहेरच्या स्पर्धेत म्हणून कुठे उतरता आले नाही. त्यानंतर थेट बारावीत असताना स्पर्धेत उतरलो. त्यावेळी कसबा बावड्याच्या केंद्रात त्यावेळी कुस्त्या झाल्या. राजाराम कॉलेजचे माळी सर त्यावेळी आमच्या संघाबरोबर होते. पहिले दोन राऊंड मी मारले. पण कोल्हापूरसारख्या ठिकाणी तसे स्पर्धेत उतरणारेसुद्धा दिग्गजच असतात. फडावर अनेक ठिकाणी कुस्त्या केल्या. काही ठिकाणी पडलोसुद्धा मात्र आमच्या गावाजवळच्या आगोतीत शेवटची कुस्ती मी केली. एखाद्या फडावर आपण शेवटच्या जोडीत बसतो गोष्टच भारदस्त असते. आगोतीत मी पहिली कुस्ती केल्यावर शेवटच्या कुस्तीला मी उठलो आणि तिसुद्धा कुस्ती मी केली. कवटळीचा माझ्यापेक्षा वायने कितीतरी जास्त असणार पैलवान माझ्याबरोबर कुस्ती खेळत होता. माझ्या अंगात रग होती. मी त्याला धरला, धातील दाबला, मोडला, थेट चितपट पाडला. तशीच कुस्ती मी बारावीत असताना त्याच वर्षी वजनी गटात केली होती. मी त्या पोराला तसा पाडल्यावर ते घडीभर तसेच पडून राहिले. मला समजेना काय झाले. पुढे मीच त्याला उठवले.
एखाद्या गोष्टीचा उपजत नाद हा आपल्या जीनमधूनही कुठूनतरी झिरपत आलेलो असतो. मला कुस्तीचा नाद तसा आहे. आमच्या कारभाऱ्याच्या पोराने कुस्त्या खेळाव्यात असे मला वाटायचे. मी पुण्याला असताना त्याला तात्याला तालमीसाठी नेले. तो लहान होता. त्याला स्टोव्ह घेऊन दिले. पेटी घेतली. कपडे घेतले. पण तो तिथे काही सेट होऊ शकला नाही. सातव्या आठव्या दिवसी घराकडे परतला. त्याचाच बारका भाऊ ठकसेनही काही कुस्त्या खेळला पण त्यालाही काही मर्यादा होत्या. तशी गावात एकापाठोपाठ एक खेळणारांची एक फळीच तयार होते मात्र त्यात चपकास, पकडीला चांगली पोर काही असतात. ते या खेळाकडे व्यापक दृष्टीने पहात नाहीत, असे मला काहीदा वाटते. गौतम कोकणेचा सागर इतक्‍या भारी कुस्त्या करायचा. उंची चांगली होती. शरीर पिळदार होते पण जिरला.
काही वर्ष बाहेरगावी ठेऊन निव्वळ त्याच्यासाठी सांभाळणे आपल्याकडे जमत नाही. त्यामुळे पोर जिरतात. ज्यांना त्यातले मर्म सापडते ते त्यातच करिअर करतात. त्यामुळेच दक्षिण सोलापूरमधील बोरामणीसारख्या छोट्या गावात एकाच कुटुंबात तीन महाराष्ट्र केसरी होतात. आप्पालाल, मुन्ना आणि आणखी एक असे शेख कुटुंबातील तिघे महाराष्ट्र केसरी झाले. आपली कुस्ती जागतिक स्तरावर जायची असेल तर गावागावात मॅटवर सराव सुरू झाला पाहिजे. गावागावातल्या पोरांना स्पर्धेत खेळायची संधी मिळाली पाहिजे, पण तसे होत नाही.
कुस्तीतले राजकारण, दादागिरी, वाद हा एक वेगळा पदरही या खेळाला आहे. त्याच्याही काही आठवणी माझ्या जवळ आहेत, मात्र त्यावर न बोललेले बरे.
सोलापूर जिल्ह्यात हजरत पटेल हे एकमेव हिंदकेसरी झालेले पैलवान होते. त्यांच्यावरच्या लेखाच्या निमित्ताने स्वतःला तपासताना स्मरणरंजनात गंमत आहे. कुस्त्या मला आवडतात. केवळ कुस्त्याच नव्हे तर कब्बडी, खोखो सारखे खेळही मी खेळलो. हरखून जाण्याचे, स्वत्व शोधण्याचे, उमेदपणा वाढविण्याचे, एकत्र माणूस म्हणून काही प्रशिक्षण घेण्याचे, आनंदाचा शोध घेण्याचे, हरले तरी पुन्हा तयारी करुन विजयी होण्यातला नवा आनंद मिळविण्याचे खेळ एक साधन आहे. जाता जाता फुकटचा सल्ला देतो, प्रत्येकाने रोज काहीतरी खेळले पाहिजे. अंगातून घाम निघेस्तोवर मैदानाशी एकरु झाले पाहिजे. त्याने व्याप, ताप, त्रास सगळा नाहीसा होतो... जगण सुकर होऊन जाते. 

कुस्ती कथा पूर्ण

सोमवार, २१ डिसेंबर, २०१५

रुस्तुम ए हिंद बिराजदार मामांची आठवण

रुस्तुम ए हिंद बिराजदार मामांची आठवण
एखाद्या माणसाशी आपला त्याची ओळख नसली तरी सांधा जुळतो. त्याचे कारण त्याचे आपले आवडीचे विषय काहीदा सारखे असतात. मूळ मुद्दा पैलवानांची हुशारी हा होता. नुसतीच हुशारी नाही तर काळाची पावले ओळखण्याचे कसब हुशार माणसात असते. याचेही एक उदाहरण सांगतो. रुस्तुम ए हिंद कै. हरिश्‍चंद्र बिराजदार यांना मी लहानपणापासून बघत आलो होतो. ते जेऊरच्या आखाड्यावर यायचे. या माणसाशी आपल्या कधी बोलायला मिळायला हवे, असे अनेकदा वाटायचे. ती संधी मला 1999 मध्ये मिळाली. प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून सकाळमध्ये काम करीत होतो. सकाळच्या संपादकीय पानावर एक सदर होते. त्यात ज्यांनी एखाद्या क्षेत्रात मोठे नाव कमावले, त्यांच्या जडणघडणीविषयी मांडले जात होते. मी आणि संजय शिंदे बिराजदारमामांच्या गोकुळवस्ताद तालमीत एकदा दुपारी गेलो होतो. त्यानंतर पुन्हा मग एकदा संध्याकाली गेलो होतो. साधारण साडेआठ नऊचा सुमार असेल. आम्ही तालमीतल्या पोरांकडेच चौकशी करीत होतो. तिथेच आम्हाला चंद्रहास निमगिरेची भेट झाली. तो त्यावेळी पोरसवदा होता. त्याने मी जेऊरचा असे सांगितल्यावर आपोआप एक जवळीक वाढते तशी बोलणे वाढायला लागले.
आम्ही बोलतोय, हे बिराजदार मामा थोडे लांबून बघत होते. त्यांना आपल्या तालमीतला पैलवान मुलगा कुणाशीतरी रस्त्यात बोलतोय हे रुचले नव्हते. त्यांना बगितल्यावर चंद्रहास घाबरला. तो लगेच निघायला लागला. आम्हा दोघांनाही कळेना असे काय झाले. मामा आमच्याजवळ आले, आम्हाला त्यांनी विचारले, "काय पाहिजे.' मी सकाळमधून आल्याचे सांगितल्यावर त्यांचा रागाचा पारा थोडा कमी झाला. पण त्यांनी तालमीला जी शिस्त लावली. त्यामुळे केवळ राज्य आणि राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही या तालमीचे अनेक मल्ल गाजले आहेत. त्यांनी त्यावेळी मी करमाळा तालुक्‍यातील आहे, असे म्हटल्यावर तेच स्वतःहून म्हणाले, "आता गेला त्या मुलाने जर चांगली मेहनत घेतली तर तो नक्की तुमच्या भागाचे नाव काढेल. यांच्यात मला काही वेगळेपण दसते.'
चंद्रहास पुढे पाच सहा वर्षांनी महाराष्ट्र केसरी झाला. माझा सांगायचा मुद्दा असा की पैलवान केवळ हुशारच असतात असे नाही तर काळाची पावले ओळखण्याचे कसबही ज्यांच्याकडे असते तेच गाजतात. बिराजदार मामा तसे होते. 

रविवार, २० डिसेंबर, २०१५

हिंदकेसरी दिनानाथ आण्णा ः प्रभावी वक्ते

हिंदकेसरी दिनानाथ आण्णा ः प्रभावी वक्ते
एखाद्याकडे पैसे नसले तरी काहीही खबढब करुन पोरांना तालमीत पाठवायची प्रथा आहे. करमाळा तालुक्‍यात मोठे पैलवान अनेक झाले. अजूनही होत आहेत, पण मला नारायण आबा पाटलांविषयी कायम आकर्षण वाटत आले आहे. पैलवानकी करणाऱ्या गड्याने तालुक्‍यात आमदारकीच्या निवडणुकीपर्यंत धडक मारणे ही साधी बाब नाही. दोन वेळा आमदारकीत हरल्यानंतर ते तिसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक आले. पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली. त्यानंतर जयवंतराव जगताप यांना आमदार करण्यात हातभार लावला आणि त्यानंतर जनसुराज्यकडून रिंगणात उतरले. 1999 ते 2014 असे लढत राहिल्यावर 2014 ला ते आमदार झाले. मधल्या काळात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती अशी पदे घेत स्वतःचा एक गट उभा केला. मी सोलापुरात पत्रकारिता सुरू केल्यावर तशी नारायण पाटील आणि माझी ओळख खूप दिवस नव्हती, मात्र तरीही हा विधानसभेची निवडणूक जिंकला पाहिजे, किंबहुना जिंकू शकतो, असे मला 2009 मध्ये वाटायचे. त्यांनी तशी खूप धडक मारली. दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. पैलवान असून हे करणे यात एक वेगळेपण आहे, असे मला नेहमी वाटते. त्यांच्याकडे नुसतेच बाहुबळ आहे, असे कुणी म्हणत असेल तर ते चुकीचे आहे, असे माझे मत आहे. तसे प्रत्येक नेत्याकडे बाहुबळ असतेच. त्याच्याशिवाय राजकारणच करता येत नाही. सामान्य माणसाला राजकारणी लोक कुठल्या कुठे फेकून देतात. पण बाहुबळाला संघटन कौशल्या आणि स्वतःच्या हिमतीवर काही गोष्टी करण्याची हुंबाडी लागते. कोल्हापूरच्या गंगावेस तालमीत मी राहिलो तिथेच नारायण पाटील यांनीही अनेक वर्ष पैलवानकीचे धडे गिरविले. अनेक मैदाने गाजविली. हुशारी असल्याशिवाय माणूस पुढे जात नाही, हे माझे मत आहे. तेच पैलवनाकीलासुद्धा लागू आहे, असे माझा अनुभव आहे.
गंगावेस तालमीत मी जे काही तीन चार महिने होतो, त्या काळात तिथे हिंदकेसरी दीनानाथ सिंह उर्फ आण्णा वस्ताद होते. सतीश मांडीया आणि (कै.) संजय पाटील यांच्या महाराष्ट्र केसरीच्या सोमीफायनलच्या कुस्तीत 91 साली वाद झाला. मांडीया आमच्या तालमीचा पैलवान होता. संजय पाटील शाहूपुरी होता. खासबाग मैदानात कुस्त्या होत्या. वाद झाल्यावर आता पुढे काय होईल, काही सांगता येत नव्हते. एक सैरभैर वातावरण सगळ्या तालमीभर पसरले होते. मी तर लहान होतोच पण आता काहीतरी करायला हवे, असे काहीबाही बोललो जात होत. संध्याकाळी साधारण साडे सात आठच्या दरम्यान दिनानाथ आण्णा तालमीत आले. सगळी पोर गोळा झालेली होती. आण्णांनी सगळ्यांना आखाड्याच्या बाजूने बसायला सांगितले. महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे हेही त्या काळात तिथे यायचे. त्यांनी त्यावेळी पोरांसमोर जे काही भाषण केले, ते ऐकून मी हरखून गेलो होतो. मला चांगली भाषणे ऐकायची आवड होतीच. आण्णा हिंदीत बोलले. सगळ्यांना शांत करणारे. मी जे काही दिवस तालमीत होतो, त्या काळात आण्णांशी माझे फार बोलणे झाले नाही, मात्र पुढे आयुष्यात आपण एकदातरी या माणसाशी चार शब्द बोलावेत, असे मला वाटायचे. त्यांचे दुसरे भाषण मी सांगोला तालुक्‍यातील जवळ्याला झालेल्या भारत आणि पाकिस्तानच्या मल्लांच्या झुंजीच्यावेळी ऐकले. त्यानंतर काही दिवसांनी "आस्क मी' हेल्पलाईला विचारुन त्यांचा कोल्हापूरातला नंबर मी मिळविला. त्यांच्याशी मी साधारण तीन चार मिनीटे बोललो असेल. त्यांना हिंदकेसरी हजरत पटेल यांच्यासंदर्भातील आठवणी विचारायच्या होत्या. त्यांनी त्याविषयी माहिती सांगितली. त्यानंतर त्यांना तुमचे भाषण मला आवडते, असे सांगितले. ते म्हणाले की माझे जवळ्याचे भाषण ऐकून मला पुढे पंढरपुरात व्याख्यानाचे निमंत्रण मिळाले. पत्रकार म्हणून अनेकांशी बोलणे नेहमीच होते पण आण्णांशी बोलल्यानंतर पुढचे दोन दिवस मी हवेत होतो. आयुष्यात असाही आनंदाचा काही प्रकार असतो, हे मला वेगळे समजून गेले. मूळ मुद्दा मी असा सांगत होतो की गाजणार पैलवान हा हुशारच असतो. कुठेच काही नोकरी लागत नाही म्हटल्यावर गावगन्ना जसे पत्रकार दिसतात, तसे पैलवानही गावन्ना असतात. मात्र त्यात जे गाजतात त्यात त्यांचे कष्ट, उर्मी, इतरांची साथ आणि एकाग्रता या गोष्टी महत्वाच्याच असतात. 

शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

तालमीतलं भांडण

  

                                पैलवानांचा आवडता देव बालब्रह्मचारी हनुमंत.
तालमीतल्या भांडणातही एक मजा असते. मी गावाबाहेर पडल्यावर फार कुणाशी भांडण केली नाहीत मात्र एकदा सदाशिवनगरकडच्या हनुमंत कोकाटेबरोबर झालेली भांडण काही माझ्या लक्षातून जात नाहीत. एका दिवशी सकाळी मी उठलो. लंगोट लावला होता. तसेच बसून राहिलो. पेटीवर बसलो होतो. तालमीत प्रत्येकाकडे पेट्या असतात. त्यात स्टोव्ह, रॉकेल, तूप, बदाम, पीठ, मीठ, तिखट, चटणी असे सगळे सामान भरलेले असते. पैसे कधीच कुणी फारसे पेटीत ठेवीत नसायचे. ते दुकानदाराकडे ठेवायचे. एक डायरी करायची. रोज त्याच्याकडून किती पैसे घेतले याची नोंद त्या डायरीत त्याच्याकडूनच करुन घ्यायची.
मी डोळे पुसत होतो. मग हनम्या म्हणाला, 'उठ की कशाला बसलाय. जा. तालमीत मेहनत कोण करणार?'
मी म्हटले, "जा तुला काय करायचे?'
तो काहीतरी बोलला. मी काहीतरी बोललो. मी अकरावीत. अगदी साठ - बासष्ट किलो वजन असेल. हनम्याची तब्बेत फार जबरदस्त होती. त्याचे वजन 85 किलोच्या घरात होते. साधारण सहाफुुटाच्या पुढे उंची होती. दिसायलाही स्मार्ट होता. मग मी त्याला चढाक काहीतरी बोललो. तो मला ढकलायला लागला. तसे हे सगळे मस्ती मस्तीत चालले होते. मीही तालमीत सेट झाल्यामुळे माझ्यात एक फुगीरीची वृत्ती आली होती. त्याशिवाय काही बॅकिंगही होते. मला राग आला आणि मी त्याला लाथ मारली. ती त्याच्या मांडीवर बसली. तो वैतागला. त्याने एकच बुक्की पोटात मारली. मला पाणीच मागायला लावले. सुरवातीला मला खरेच त्रास झाला होता. पुढे मी मकरीपणा केला. काहीवेळ तसा झोपून राहिलो. ही भांडणे पुढे रायचंद गावडेकडे गेली.
सकाळचीच घटना. मी त्यांना माझी बाजू सांगितली. त्याने हनम्याला शिव्या द्यायला सुरू केल्या. त्याला बोलावले. शिव्या देतच त्याला सांगितले, "पेटी उचलून गावापर्यंत ताणीत लावीन. समजलाच काय स्वतःला.'
हनम्या म्हटला, "नाय भाऊ, माझी काही चूक नाय.'
तो म्हणाला, "चूक असू नाय तर नसू. इथून पुढे जर असे काही केले बघ मग.' रायचंदला पोर घाबरायची. त्याचा मोठा भाऊही चांगला पैलवान म्हणून गाजला होता. ही भांडणे झाली. त्याने तालमीत आणखी वजन वाढल्यासारखे झाले.
हनम्याने ज्या प्रकारे बुक्की मारुन हुक भरली होती तशी हुक कुस्ती खेळताना अनेकदा भरल्याचे मला आठवते. मी लहान असताना बापू राउताबरोबर कुस्त्या खेळायचे. त्याने माझी अशी हूक अनेकदा भरविली. त्यावेळी केत्तुरात तालीम नवनाथ राऊत यांच्या घरामागे होती. हौद आणि वर छप्पर असे त्याचे स्वरुप होते. लाल माती आणून टाकली होती. पोरांत नाद निर्माण झाला पाहिजे, असे वाटणारी माणसं त्यावेळी होती. ती तालीम मोडखळीला आल्यावर भैरवनाथाच्या देवळाजवळ दुसरी तालीम बांधली. चांगली पक्की तालीम आहे. गावात विलास कोकणे, संभाजी खाटमोडे हे आमच्या आधीच्या वयातले पैलवान. आमचा कारभारीही कुस्त्या खेळायचा पण मी त्यावेळी खूपच लहान होतो. त्याचे लग्न झाले तेव्हा मी पहिली दुसरीत असेल. त्यामुळे त्याने केलेल्या कुस्त्या मला फार आठवत नाहीत. पुढे आमच्याआधी आमचाच बाळू महाराज म्हणजे माझा मोठा भाऊ, दत्तू कानतोडे यांची एक कुस्तीची थळी होती. पण गावात उसाचे पिक आले. उजनीच्या पाण्यामुळे शेती बागायती झाली. लोकांच्यात आर्थिक ताकद आली. त्यामुळे मग कोल्हापूरला अनेकांनी आपली पोर पाठविली. तसा हा एक नाद असतो. 

शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

महिन्यात वाढते दहा किलो वजन


         
                             गंगावेस तालमी
कोल्हापूरचे वातावरण चांगले आहेच पण तिथला तालमीतला आहार हाही तब्बेत चांगली होण्याला कारणीभूत असतो. एकादा गावाकडचा पोरगा कोल्हापुरात तालमीसाठी गेला तर पहिल्या महिन्यात त्याचे वजन साधारण आठ दहा किलो वाढते. त्याचे कारण आहारात झालेला फरक हे असते. तालमीतला आहार जबरदस्तच असतो. ज्याने त्याचा अनुभव घेतला त्याला त्याचे असाधारणपण आपोआप कळते. सकाळी पहाटे पाचला उठून व्यायाम, पकड केल्यानंतर साधारण सातच्या दरम्यान बदामाची थंडाई किंवा सरबत पहिल्यांदा घेतला जातो. त्यानंतर मग तुपातला शिरा खाल्ला जातो. पुढे शंभर किंवा दोनशे ग्रॅम लोण्याचा गोळा आणि त्याच्याबरोबर दोन तीन केळी खायची. त्यानंतर मग तीन चपात्या आणि भाजी असे जेवण करायचे. सगळ्या भाज्या तुपात केलेल्या असतात. दुध पिण्यासाठी कट्ट्यावर जायचे. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार मग एक लिटर, दीड लिटर असे दूध प्यायचे. येताना काही फळे आणायची. द्राक्षे असतील तर नुसता आतला रस खायचा. साल आणि चोथा फेकून द्यायचा. इतके सगळे उरकेस्तोवर साधारण अकरा साडेअकराचा सुमार झालेला असतो. डोळे झाकायला लागलेले असतात. दुपारी बाराला तर तालमी सगळी शांत होते. तीन साडे तीन पर्यंत सगळे झोप काढून पुन्हा उठतात. व्यायाम पकड आंघोळ झाल्यावर थंडाई किंवा लस्सी घ्यायची. आठवड्याचून चार दिवस मटण खायचे. झोपताना पुन्हा फळे आणि दूध प्यायचे. सकस खाणे आणि खच्चून व्यायम यामुळे शरीरावर तेज चढते. ताकद वाढती. पहिल्या महिन्यात जरी सात आठ किलो वजन बक्कीने वाढत असले तरी ही गती पुढे कायम रहात नाही. दुसऱ्या महिन्यात तीन चार किलो वाढते. मग पुढच्या महिन्यात आणखी थोडे कमी होते आणि मग पुढे वय वाढेल तसा शरीराला आकार येत रहातो.
कोल्हापुरात पहिल्यांदा मी राजारामपुरीतील गल्ली क्रमांक एकमधील व्यायाम शाळेत जात होतो. तिथेही लाल मातीचा आखाडा होता, परंतु तिथे लढती कुणी पकडी करीत नसायचे. सगळे व्यायामला यायचे. त्यानंतर मी गंगावेस तालमीत सहा महिने राहिले. मी अकरावीची पहिली सहा महिने गेल्यानंतर पुढच्या सहा महिन्यात गंगावेस तालमीत महादेव पांढरेला भेटायला गेलो. त्याला तुज्याबरोबर तालीमीत रहायचे असे सांगितले. माझे बोलणे बदलेले होते. त्यात एक प्रकारचा फॉर्मलपणा आला होता. त्याने ठीक आहे, ये म्हणून सांगितले. त्यानंतर मग गंगावेस तालमीत गेलो. मला चपात्या करता येत नव्हत्या. भाजी कशी करायची हे समजत नव्हते. मग मी पहिले साधारण पंधरा दिवस सकाळी भाजी, केळी आणायला जाणे, शेंगदाणे कुटून देणे असली कामे करायचो. तसे रॅंगिंग तालमीत जबरदस्त असते म्हणजे एकादे साधे पोरग असेल एकटे असेल त्याला पार कुणाचे बॅकींग नसेल तर त्याचे सगळे महिन्याचे सामान आठच दिवसात संपू शकते, अशी गंमत या वातावरणात असते. महादू पांढरेबरोबर बाळू नवलेही होता. आम्ही तिघे एकत्र करुन खायचो. तसा बाळूने आणि महादूने माझा त्रास सहन केला. या वातावरणात सेट व्हायला मोठी मदत केली. महिन्या दीड महिन्यात मी रुळलो. पुढे तालमीत जना कानतोडे, रामा कानतोडे, बाळू हवालदार अशी मंडळी आली. मग त्यांची आणि आमची जमाजमी झाली. माझा जेवणखाण करण्याचा त्रास वाढला. आमचा पाव्हणा रायचंद गावडे त्यावेळी तालमीत होता. तो खूप दिवसांपासून तिथे होता. त्यामुळे त्याचा तिथे जम बसला होता. 

गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

फड


सोलापूर सकाळच्या वर्धापनदिनानिमित्त पुरवणीसाठी लेख करायचा म्हणून हिंदकेसरींच्या आचेगावात गावात गेलो होतो. लेख तयार करुन दिल्यावर त्यासाठी जागा फारच कमी राहिली म्हणून लागला नाही. मात्र त्यानंतर मी माझ्या पद्धतीने तो लेख एका कुस्तीसाठी संपादकीय अंगाने काढलेल्या पुरवणीत प्रसिद्ध केला. सोलापूर जिल्ह्यातील कुस्तीसाठी झटणारी मंडळी. महाराष्ट्र केसरी झालेली मंडळी अशी ती पुरवणी काढली होती. त्या पुरवणीत रावसाहेब मगर, तानाजी बनकर, आप्पालाल शेख, मुन्ना शेख, चंद्रहास निमगिरे यांच्यासह कुस्ती संघटक निमगावचे मोठे रावसाहेब मगर, जेऊरचे नारायण आबा पाटील यांच्यासह विविध लोकांची दखल घेतली होती. ही पुरवणी फार मस्त झाली होती. कुस्तीचे काहीही असू द्या मला ते क्षेत्र फार आवडते.आताही कपडे काढून लांग लंगोट लावून आखाड्यात उतरेली पोरांची पिळदार शरीर बघितले की मला आतून काहीतरी ढुसण्या मारतंय असे वाटते. आपणही फडात उतरले पाहिजे, असे वाटायला लागते. माझ्यात या उर्मी लहानपणासूनच पेरल्या गेल्या आहेत. मी अगदी दुसरी तिसरीत असेन त्यावेळी पहिल्यांदा फडावर कुस्त्या बघायला गेलो. वाशिंबे, सोगाव, हिंगणी, कोर्टी, सावडी, आगोती, वीट, जेऊर, केम अशी जवळची गावे आम्ही कुस्त्यांच्या फडासाठी फिरायचो. त्यातून या नादाची बीज माझ्याच रोवली गेली. आजही मला हा नाद आपण पुरता पुरता करु शकलो नाही, याचे शल्य अनेकदा मनात बोचत राहते. घरच्यांनी मला तशी या नादात चमक दाखविण्यासाठी संधी दिली पण मी कमी पडलो, इतकाच त्याचा अर्थ आहे.गावाकडे लहानपणी फडावर हिडतांना हनुमंत नवले, जना कानतोडे, बाळू हवालदार ही मंडळी असायची. त्यात मीच एकटा लहान होतो. त्या काळात आमच्या ग्रुपमध्ये हनु नवले भारी कुस्त्या करायचा. बाळू हवालदारानेही कधी जमिनीला पाठ टेकविल नाही. ही दोघंही तशी फार गाजली नाहीत. त्याची कारणे काहीही असली तरी या वयात एक मस्ती असते ती माणसाला खाऊन टाकते. कुस्तीच्या नादासारखा दुसरा नाद लागला की कुस्ती संपते. या काळात वाशिंबेच्या भगवान डोंबाळेनेही अनेक कुस्त्या केल्या. तो कधी कुठे पाठ टेकवित नव्हता. तसे पैलवान अनेक होते. आमच्या कारभाऱ्यालाही कुस्त्यांचा नाद होता. त्याने मला कोल्हापूरला पाठविले. ते कुस्तीचे माहेघर आहे. त्याविषयी उद्या.....

बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

हिंदकेसरीच्या पत्नीला दोन हजार मानधन

हिंदकेसरीच्या पत्नीला 
दोन हजार मानधन 

हजरत पटेल यांच्या कुस्त्या बघितलेली पिढी आता उतरणीला लागलेली आहे. सांगलीच्या राजवाड्यात हिंदकेसरी मारुती माने आणि हजरत पटेल यांच्यात झालेली कुस्ती त्यावेळी खूप गाजली होती. मारुती माने यांना पटेल यांनी चितपट मारले होते. या कुस्तीचे साक्षीदार असणारे प्रख्यात कुस्ती निवेदक शंकरराव पुजारी सांगतात, ""ही आठवण अंगावर शहारे आणणारी आहे. परमेश्‍वराने दिलेल्या देणगीचे या पैलवानाने कष्टाने चीज केले. महाराष्ट्राचे नाव देशभर केले.''
हजरत पटेल यांची उंची पाच फूट साडेअकरा इंच, वजन 225 पौंड आणि छाती 48 इंच होती. अतिशय उंचापुऱ्या तगड्या असणाऱ्या या पैलवानाचे लग्न 1972 ला झाले. त्यानंतर बराच मोठा कालखंड त्यांचा आचेगावात गेला. ग्रामपंचायत सदस्यही ते होते. गावात अनेक पैलवान घडविण्यात त्यांचा वाटा होता. त्यांना पहिल्या तीन मुली झाल्या. त्यानंतर दोन जुळी मुले झाली. हसन आणि हुसेन अशी त्यांची नावे आहेत. हसन वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून कुस्तीचा सराव कोल्हापुरातील शाहूपुरी तालमीत करत आहे. आता कुटुंब विभक्‍त झाले आहे. वाट्याला आलेली जमीन बटईने देऊन कुटुंबाची गुजराण होते. आचेगावात पटेल कुटुंबाचा मोठा वाडा आहे. पण, त्याचा थाट कमी झाला आहे, हे त्यांच्या घराला भेट दिल्यावर जाणवत राहाते. त्यांच्या पत्नी तिथे भेटल्या. हिंदकेसरीची पत्नी म्हणून दोन हजार रुपये मानधन त्यांना मिळते. ही माऊली त्याचे काय करते? आणखी स्वतःचे थोडे पैसे टाकून कोल्हापूरच्या मुलाला खुराकासाठी देते. डोळ्यात पाणी आणून त्यांनी इतकेच सांगितले, ""आपल्या मुलांना आपण पैलवान म्हणून घडवावे, ही त्यांची (हिंदकेसरी पटेल) हौस होती. मुले उतारवयात झाली. ती केवळ तीन वर्षांची असताना हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने ते गेले. आता त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला जेवढे करता येईल तेवढे करायचे.''
आयुष्यभर लाल मातीशी इमान राखलेल्या या मल्लाने शेवटचा क्षण तालमीच्या पारावर मोजला. गावासाठी त्यांनी खूप काही केले. आता गाव त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी मोठे कुस्ती मैदान भरविते. हा माणूस किती मोठा आहे. याने पैसे नाही पण माणसं किती जोडली याची प्रचिती गावाने त्यांच्या निधनानंतर घेतली. कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचे वस्ताद दीनानाथसिंह त्यांच्याविषयी सांगताना म्हणाले, ""असा पैलवान पुन्हा होणे नाही. माझ्या अगोदर ते हिंदकेसरी झाले. चेहरा कायम हसरा असायचा. मुंबईला त्यांची आणि माझी कुस्ती झाली. पण, आमचे संबंध खूप चांगले होते. मनात कधी कटुता त्यांनी धरली नाही. माझ्यापेक्षा मोठे होते म्हणून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जेव्हा मी वाकायचो तेव्हा ते मला छातीशी धरायचे. अतिशय सज्जन आणि वेगळा असा हा पैलवान होता. त्यांचे वजन खूप होते. त्यांना तुम्ही वजन कमी करा, असे मी सांगितले. ते हो म्हणाले. पण, या वजनानेच त्यांचा घात केला. आमचे बोलणे झाल्यानंतर सहा महिन्याच्या आतच त्यांचे निधन झाले.''
सोलापूर जिल्ह्याचे नाव देशभर नेणाऱ्या या मल्लाला जिल्ह्याने काय दिले याचा विचार आपण कधीतरी करायलाच हवा.  

मंगळवार, १५ डिसेंबर, २०१५

हिंदकेसरीचा खुराक

हिंदकेसरीचा खुराक
एकेकाळी कुस्ती हा माझा श्‍वास होता. त्यामुळे या क्षेत्राविषयी, पैलवानांविषयी आणि कुस्ती संघटकांविषयी मला आकर्षण राहिले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील आचेगाव हे हिंदकेसरी हजरत पटेल यांचे गाव. त्याला एकदा भेट दिली आणि त्यांच्याविषयी जाणून घेतले. तो अनुभव तुमच्यासाठी दोन भागात....
सोलापूर जिल्ह्याचाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कुस्तीचा इतिहास बघितला जातो. त्यावेळी आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर)चे नाव वगळताच येत नाही. (कै.) हिंदकेसरी हजरत पटेल यांचे ते गाव आहे. सोलापूरपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावात 1938 मध्ये पटेल यांचा जन्म झाला. महाराष्ट्राचे आतापर्यंत एकूण आठ हिंदकेसरी झाले आहेत. त्यातले चौथे हिंदकेसरीपद 1967 मध्ये अहमदाबादमध्ये (गुजरात) हजरत पटेल यांनी मिळविले होते.
कुस्तीचा वारसा त्यांना वडिलांकडूनच मिळाला होता. त्यांचे काका चांगले पैलवान होते. त्यांचा छोटा भाऊही त्यांच्याबरोबर कुस्तीचा सराव करीत होता. एकत्र कुटुंब होते. शंभर-सव्वाशे एकर जमीन होती. त्यांचे मूळ गाव अक्कलकोट तालुक्‍यातील खानापूर होते. पण, मामाचे गाव असल्याने आचेगावात ते स्थायिक झाले होते. सराव करण्यासाठी बरोबरीचा पैलवान नाही, अशी स्थिती येताच त्यांनी कुस्ती पंढरीचा कोल्हापूरचा रस्ता धरला. शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या देशातील प्रसिद्ध शाहूपुरी तालमीत त्यांनी अनेक वर्ष सराव केला. श्रीपती खंचनाळे, महंमद हनीफ आदी अनेक प्रख्यात मल्ल त्यांच्याबरोबर या तालमीत होते. त्यांचे वस्ताद मलप्पा तडाके होते.
आपल्या कारकिर्दीत हजरत पटेल यांनी शेकडो कुस्त्या मारल्या. देशभरातील मैदाने गाजविली. त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले होते. हिंदकेसरी होण्याआधी 21 मार्च 1965 मध्ये हिंदकेसरी मास्तर चंदीग्राम यांच्याबरोबर सव्वातास ते लढले होते. ही कुस्ती बरोबरीत सुटली होती. इतके मोठे नाव कमविण्यासाठी घ्यावे लागणारे कष्टही तितकेच मोठे असतात. ते रोज सकाळी दोन हजार बैठका मारत. पाच मैल धावण्याचा सराव करीत. सलग पाच-सहा जणांशी लढतीचा सराव करीत. संध्याकाळी सुमारे बाराशे दंड मारत. दोरखंडावर चढण्यासारखे अन्य व्यायामही करत. एवढा व्यायाम म्हटल्यावर त्याला खुराकही तसाच असतो. कोल्हापुरातील कोणत्याही तालमीत ज्याने काही दिवस काढलेत त्याला पैलवानांचा खुराक किती सकस असतो, हे सांगायची गरज पडत नाही. त्या व्यक्‍तीच्या आयुष्यातील तो सोनेरी काळ असतो. हजरत पटेल पाच लिटर दूध, अर्धा किलो तूप, पंचवीस मोसंबीचा रस, बदामाची थंडाई, दीड किलो मटण असा सकस आहार घेत. जे कधी लंगोट लावत नाहीत. मैदानात उतरत नाहीत, असे काही जण वस्ताद म्हणून मिरवितात. काही जण अफवा पसरविण्यात माहीर असतात, अशी खंत त्यांनी त्यावेळी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त केली होती. ...........

सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

परिस्थितीच करते जडणघडण

परिस्थितीच करते जडणघडण
दोन दिवस गावी जाऊन आलो. त्यामुळे थोडे लेखन थांबले आता पुन्हा सुरू करतो. माझ्या वर्गात गावातले रामदास देवकर, भरत देवकर, बाळू भरणे, नामदेव उर्फ दादा येडे, गणपत भरणे, संभाजी ठणके, पोपट राऊत, नवनाथ ठोंबरे यांच्याबरोबरच मीरा खाटमोडे, सविता कोकणे, कमल राऊत या मुली होत्या. कदाचित यापेक्षा जास्त जण असतील आता मला इतकेचजण आठवतात. यातल्या कमल आणि मीराचे लग्न तशी लवकरच झाली. मला कौतुक वाटते ते सविताचे. तिचे आजोबा (कै.) तुकाराम बापू रेल्वे नोकरीला होते. त्यांनी सविताला शिकविले. तीही शिकली. स्वतःच्या पायावर उभी राहिली. त्यानंतर लग्न केले. एका छोट्या गावात, जिथे मुलींची लग्न झटापट उरकली जातात, तिथे सविताने थांबावे, तिला घरच्यांनी साथ द्यावी, हे तसे खूप वेगळेपण आहे. मला तिचा कायम आदर वाटत आला. आम्ही दहावीनंतर किंवा त्याआधीसुद्धा फार कधी बोलल्याचे मला आठवते नाही. पण बापू खूप गप्पा मारायचे. जग बघण्याची थोडीशी दृष्टी बदलली तर जगणे स्वतःच्या कष्टाने, बुद्धीने सुकर होऊ शकतो, याचे मला सविता हे उदाहरण वाटते.
आपल्याकडे महिलांचे मोठ्या प्रमाणावर शोषण का होते, त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना का तोंड द्यावे लागते, त्याचे कारण त्या आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण नसतात. सविता स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि नंतर लग्न केले. हे तिने ज्या काळाच आणि ज्या शेतकरी समाजात करून दाखविले, ते कौतुकास्पद आहे. गणपत आणि बाळू भरणे दोघे मोठे बागायतदार आहेत. दादा येडे माझा पाचवी सहावीत फार जीवाचा मित्र होता. त्याचा डबा मला फार आवडायचा. तो त्याच्या रानात असलेल्या झाडांचे पेरूही आणायचा. आता तो आमचा जवळचा पाहुणा झाला. त्याने त्याच्या माझ्या जुन्या संबंधांना काही प्रश्‍न उभे राहूनही कधी बाधा आली नाही. तो मला लहानपणापासूनच आवडतो. तसा रामा देवरकही मला खूप आवडतो. ठणकेच्या संभाजीनेही खूप चांगली उन्नती साधली आहे. मला नेहमी वाटते, माणसं पुढे जातात त्याला कारण त्यांच्याभोवताली परिस्थीती, त्यांना मिळालेली संधी याच गोष्टी कारणीभूत असतात. पुढे जातात म्हणजे त्यांच्या अनुभवाचा परिघ मोठा होतो इतकेच. दादा आणि रामासुद्धा पुढे गेले असते पण परिस्थिती माणसाला जखडून टाकते.
हे आबाच्या बरोबरीने त्याच्यामागे दडलेले माझे बालपणीचे वर्गमित्र. हायस्कूलच्या माझ्या वर्गात मी राहतो, त्या केत्तूर एकशिवाय पारेवाडी, हिंगणी, पोमलवाडी, वाशिंबे, याइतर गावातले अनेकजण होते. त्यातलेही लक्ष्मण दडस, कल्याण साळुंखे, टाकसर, बाबर, जाधव, गुलमर, माळशिकारे यांच्याबरोबर शहाजी पाटील, संजय आवटे अशी अनेक नावे आठवत राहतात. काळाच्या ओघात आम्ही इकडे तिकडे भरकटलो. आता यातल्या कुणी बोलावले तरी गावाकडे गेल्यावर त्यांच्या घरी जायला जमेलच असे नाही. माझ्या आयुष्यात मी काही धक्के खाल्ल्यानंतर मला गावी तर जावेसे वाटते. मी नेहमीच जातो पण घराच्या बाहेर कधी फारसे पडत नाही. कारण घरातच इतकी माणसं, लहान पोर आहेत आहेत, की त्या सगळ्यांशीच बोलून होत नाही. तोपर्यंत माघारी मला जायला निघावे लागते. त्यामुळे यातले काहीजण कधी भेटतात तर काहीजणांच्या भेटी होत नाहीत. आबा ठोंबरेने खरेच तसे स्वतःच्या हिमतीवर स्वतःला खूप बदलले. ते मला खूप भावते. त्याच्या बदलण्यात तो स्वतःची आर्थिक उन्नती करत राहिलाच पण त्याचे सामाजिक भान सुटलेले नाही, हे मला पुन्हा पुन्हा सांगितले पाहिजे. आपण काहीतरी करायला हवे, असे त्याला नेहमी वाटते. त्या उर्मीनेच तो सतत काहीतरी करत असतो. त्याचा माझा सतत संपर्क असतो. मला गावाची आठवण झाली की मी त्याला फोन करतो. ख्यालीखुशाली विचारतो. तोही काहीतरी सांगतो. एक चांगली वेव्हलेंथ जुळणे ज्याला म्हणता येईल तसे आमच्यादोघांत सतत टिकून आहे, त्यामुळेच चांगल्या गोष्टी, यशकथा शोधायच्या तर लांब कशाला जायला हवे, आपल्या आसपासच त्या सापडतात, या भावनेतून मी हा लेख लिहिला होता. 

गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

का उभे राहतात प्रश्‍न

का उभे राहतात प्रश्‍न
आमच्या केत्तूर एकमधले माझ्या वर्गात जे होते त्यात चरणसिंग कनिचे होता. मला तो फार आवडायचा. त्याचे कुटुंब गरीब होते. दहावीत आम्ही एका वर्गात होतो. परीक्षेला आमचा एकापाठोपाठ नंबर आला. मी तसा थोडासा हुशार असल्यामुळे त्याला पेपर दाखवायचो. गणित की इंग्रजी आठवत नाही मात्र कुठल्यातरी पेपरला फारच कडक वातावरण झाले. त्याला काही दाखवत आले नाही आणि त्याचा एकच विषय गेला. तसा तो हुशार होता. पण तो नापास झाल्यावर मला इतके वाईट वाटले की आपण त्याला पास करू शकलो नाही, ही रुखरुख खूप दिवस मनात होती. तो नंतर पास झाला. कॉलेजला गेला. नंतर मुंबई गाठली. शेअर मार्केट की फायनान्स अशा कुठल्यातरी व्यवसायात काम करू लागला. दहावी सुटल्यावर अगदी दोन-चारदा मी त्याला भेटलो असेल. मुंबईत त्याने चांगला पैसा कमविला. घर घेतले. पण का कुणास ठाऊक त्याचा खून झाला. मला अजूनही त्याचा चेहरा आठवतो. त्याच्यात झालेला बदल मी टिपला होता. इतका सालस, कधी कुणाला काही न बोलणाऱ्या या मित्राचा असा दुर्दैवी अंत व्हावा, हे आठवले की मी हतबल होऊन जातो.
माझा हायस्कूलचा जिगरी दोस्त राजू गोसावीचे निधन मला चटका लावून गेले. त्याने बीपीएड केले होते. वडील पाटबंधारे विभागात नोकरीला होते. एक छोटा भाऊ. त्याने बीपीएड नंतर नोकरीचा बराच प्रयत्न केला, काही ठिकाणी पैसे दिले पण काही जमले नाही. नेताजी सुभाष विद्यालातच तो तासिका बेसीसवर काम करायचा. नंतर एक पान टपरी टाकली होती. नोकरीचे प्रयत्न चाचलेलेच असायचे पण काहीतरी करायला हवे म्हणून त्याचे काम सुरू होते. नंतर लग्न झाले. त्यानंतर काही दिवसातच वीजेचा धक्का लागून त्याचे निधन झाले. गावाकडे मी पॅसेंजरने गेलो, पारेवाडीत उतरलो की थेट त्याच्या टपरीवर जायचे. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या नंतर मी तिथून गावाकडे निघायचो पण या घटनेनंतर काही दिवस मी वाशिंबेलाच उतरायचो. तिथूनच गावाकडे जायचो. कारण केत्तूर दोनला जायचे माझ्या जीवावर यायचे. नको वाटायचे.
तसा प्रत्येकाच्या नावावर काहीना काही दुःखाचा वाटा असतोच. माझ्या वर्गात कोणकोण होते, याचा विचार करताना मला प्रकाश राऊतही आठवतो. त्याच्या बायकोचा झालेला खूनही लगेच समोर येतो. खून करणारा म्हणून ज्याला पकडले, तो मुलगाही ओळखीचा, गावातलाच. तशा प्रकारचा खून गावात पहिल्यांदाच झाला, असे म्हटले तर वावगे ठरू नये. हे असे का व्हावे, असा प्रश्‍न मी माझा मला विचारतो तेव्हा लक्षात येते की माणसाचे मन आणि मेंदू प्रचंड भरटकलेला आहे. सुखाच्या कल्पना काहीतरी अव्वाच्या सव्वा झालेल्या आहे. मानवी जगण्याचे मूळ काय, त्याचे प्रयोजन काय आपण किती दिवस इथे राहतो, याविषयी फार कुणीच सजग नसतो. कुठल्याच टप्प्यावर त्याविषयी माणसाला साक्षर केल जात नाही आणि मग अशा काहीतरी गोष्टी वाट्याला येतात. मानवी जीवनाच्या गौणत्वाविषयी महाराज मंडळी सांगतात, पण ते थेट वैराग्याचेच असते. धर्माकडे जाणारे असते. आपला धर्म आला की जात येते. जात म्हटले की मला जातीने आणि धर्माने माणसांच्या आयुष्याचा केलेला चुतडा दिसतो. त्यामुळे आपण माणूस असतो, आपल्याला राग, लोभ, मोह, वासना या गोष्टी असतातच. त्यांना घेऊन जगणे सुंदर करण्याचा काही विचार आणि कृती कार्यक्रम असालयला हवा, असे मला नेहमी वाटते. पृथ्वीवर पहिला माणूस जन्माला आला तेव्हा त्याचा धर्म कुठला असेल? जात कुठली असेल? निसर्ग आपण समजून घेत नाही, त्यामुळे मग प्रश्‍न उभे राहतात. 

बुधवार, ९ डिसेंबर, २०१५

आमच्यावेळी असे नव्हते म्हणजे ......

आबा ठोंबरे म्हटले की त्याच्याबरोबर मला आठवतात गावातली त्याच्या सीनपाकी असणारी मंडळी म्हणजे सतीश ठणके, प्रकाश देवकर, छगन मिंड, कैलास राऊत, नामदेव देवकर, विलास बागल, सुभाष राऊत, बाळू देवकर, शब्बीर शेख, नबीलाल शेख यांच्यासह अनेकांची नावे घेता येतील. यात आबा ठोंबेर, सतीश ठणके, प्रकाश देवकर, महादेव देवकर, (कै.) चरणसिंग कनिचे आणि छगन मिंड असे आम्ही आमच्या लग्नाच्याआधी उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुटीत काही काळासाठी गावाकडे एकत्र असायचो. आबाच्या घरचे आई-वडील रानात रहायला गेले होते. त्यामुळे त्याच्या घरी आम्ही जमायचो. काहीदा टेप लावायचा. सगळ्यांनी मिळून नाचायचे. गंमत असायची. आता नाचणे हे प्रतिष्ठा घालविणारे वगैरे असे काही राहिलेले नाही. उलटपक्षी अनेक चॅनेल आणि काही गोष्टींमुळे त्याला मान्यता मिळाली आहे. मी ज्या 88ते 90 च्या कालखंडाची बाब सांगतोय, त्या काळात नाचण्यापेक्षा गावात लेझीम फेमस होता. लग्नाच्या वरातीत चुकून कुणी नाचायला लागलाच तर लेझीमची पोर त्याच्यावर चिडायची. त्या काळात लग्नात आमच्यापैकी कुणीही पोर नाचत नसायची. एखादा हौशी लग्नमालक असेल तर तो नाचण्यासाठी एकाव्वन, एकशेएक किंवा एकशेएकाव्वन अशी सुपारी देऊन नाचणारा मोरवाला बोलवायचा. तो मोरवाला मोरांचा पिसारा आणि त्या पद्धतीचा पोशाख करून नाचायचा. त्यात आम्ही वरातीपुढे कधी नाचल्याचे मला आठवत नाही. लेझीमवाल्यांना त्यावेळी डिमांड असायची. त्यांचा शब्द चालायचा. त्यामुळे आम्ही आमची हौस भागविण्यासाठी, उसळणाऱ्या उर्मी शांत करण्यासाठी घराची कडी लावून टेप लावायचो आणि नाचत रहायचो. काहीदा आम्ही पार्टीही केली. त्यात मटन करणे किंवा अंडी करुन खाणे हाच भाग असायचा. आज पार्टी म्हटले की पोरांना लगेच दारु आठवणार, पण त्यावेळी आमची दारू पिण्याची बिशाद नव्हती. ती आणायची कशी, पारध्याकडे कुणी जायचे इथपासून अनेक प्रश्‍न भोडसावले असते, पण मुळातच दारू पिणे हे निषिद्ध असल्याचे आमच्या मनावर बिबलेले होते. दारू पिणे चांगले की वाईट हे ज्याचे त्याने आपापल्या अकलेनुसार ठरवावे. उगाचच फालतू सल्ले मी देणार नाही. मी नाही त्यातली अन्‌ कडी लाव आतली असलेही मला काही सुचवायचे नाही. मांडायचेय इतकेच की गावाकडची एक गोष्ट आठवली की अनेक गोष्ट आठवत राहतात. खरे तर ते आमचे वय म्हणजे प्रेमप्रकरणावर चर्चा करण्याचे वय. पण तसेही आम्ही एकमेकांची प्रेमकरण कधी एकमेकांना सांगितल्याचे आठवत नाही. त्याचेही कारण कदाचित त्यावेळच्या वातावरणात असावे. काहीदा इतरांच्या मोट्या माणसांच्या काही लफड्यांवर आम्ही चवीने चर्चा करायचो पण स्वतःविषयी ग्रुपमध्ये आम्ही कधी काही शेअर केले असे आठवत नाही. पण काहीदिवस आम्ही एकत्र होतो. लाईटली काही गोष्टींवर चर्चा व्हायची पण प्रेमाने आंधळे होऊन एखाद्याने काही गैरकृत्य केल्याचे आठवत नाही. आता आबा चांगला शेतकरी झाला. सतीशराव सरकारी खात्यात इंजिनीअर आहे. प्रकाशराव गुरुजी झालेत. बीपीएडनंतर छगनराव शेती करतोय. कैलासरावला फौजदार व्हायची पार उर्मी होती. काही का असेना तो पोलिस खात्यात आहे. विलास, सुभाष कारखान्यावर जातात. नामदेव आपल्या व्यवसायात आहे. शब्बीर गावीच असतो. नबीलालने मुंबईत जम बसविला आहे. काहीजण शेती करतात.काळ बदलतो तशा अनेक गोष्टी बदलतात. गावही आता बदलली आहे. विशेषतः नव्या माहिती क्रांतीमुळे लोकांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. एके काळी समाजमान्य लेझीम असलेला लेझीम आता गावातल्या लग्नाच्या वरातीत दिसत नाही. बॅंजो आणि त्यावर नाचणारी पोर मात्र सगळीकडे सारखीच आहेत. अनेक लग्नांत उडत्या चालीची गाणी आणि तर्र होऊन झिंगलेली पोर नाचताणा बघितली की अस्वस्थ व्हायला होते. उगाचच आमच्यावेळी असे नव्हते, असे काहीतरी वाटत राहते. असे वाटू लागले की आपण काळाच्या मागे पडलो की काय असाही विचार मनात येतो......

मंगळवार, ८ डिसेंबर, २०१५

समाज कोण चालविते?

समाज कोण चालविते?
एखादा लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध होतो, त्यावेळी त्यामागे अनेक गोष्टी, माणसं आणि मुख्यतः लेखक दडलेला असतो. मी माझ्या केत्तूर नंबर एकच्या आबा ठोंबरे या मित्रावर "सकाळ'मध्ये लेख लिहिला. त्यानंतर त्यामागे दडलेल्या गोष्टी मला आठवत राहिल्या. मी मला उकलत राहिलो. स्वतःची सालपट काढताना त्यावरचे एकेकाळचे जिवाभावाचे धागे मोजत राहिलो. अनेक चेहरे माझ्यासमोर आले....
आबा ठोंबरे हा माझा गावाकडचा मित्र. त्याच्यावरचा लेख सकाळ सोलापूरच्या वर्धापनदिन पुरवणीत नोव्हेंबर 2011 मध्ये 10 तारखेला प्रसिद्ध झाला. गाव, गावाकडची माणसं, तिथली मित्रमंडळी, त्यांचे जगणे हा नेहमीच माझ्या कुतूहलाचा, आवडीचा विषय राहिलेला आहे. मी सोलापुरात गेले 14 वर्ष नोकरी करतो. थोडी वेगळ्या प्रकारची नोकरी आहे. लहानपणी आपल्याला कोण व्हावेसे वाटत होते तर मला शिक्षक होण्याची उबळ दहावीत असताना होती. आपण शिक्षक सहज होऊ शकतो, असे वाटायचे. मग त्याच्यासाठी काय करावे तर बीएड. करावे. तिथून कुठलीतरी संस्था गाठावी आणि शिक्षक म्हणून सतत पोरांत राहून उत्तम आयुष्य काढावे, असे वाटायचे. पण पुढे या सगळ्या गोष्टींत वेगळ्या मार्गाने मी पुढे पुढे सरकत राहिलो. डीएड्‌ला ऍडमिशन दहावीनंतर सहज मिळाले असते ते घेतले नाही. मग बारावीनंतर प्रयत्न केला तर ते मिळाले नाही. बीएड्‌लाही बीसीजे केल्यानंतर प्रयत्न केला पण तिथेही काही नंबर लागला नाही. मग पत्रकार झालो. खरे तर समाजात पत्रकारितेच्या पेशाला मान असला तरी त्यामागे काहीवेळा काहीतरी "इंटरेस्ट' असतात. संबंधातून काहीतरी साध्य करायचे असते किंवा नको ही कटकट म्हणूनही करा त्यांची व्यवस्था असा एक सूर असतो. पण तरीही एक गोष्ट नक्की आहे, लोक जरी पैशाच्या मागे धावत असले, प्रचंड संपत्ती जमवत असले, तरी समाजात आपली ठसा उमटवायचा असेल तर तुमच्याकडे काही विचार पाहिजे. समाज चालविण्याचे काम विचारी माणसं करतात, असे माझे मत आहे. कुणी असे म्हणेल की पैसेवाले, भांडवलदार सगळे निर्णय घेतात, विचारवंतांनी कुठे कोण विचारते? पण मला असे वाटते की भांडवलदारांकडेही त्यांच्या बाजूने विचार करणारे असतातच. त्यांच्याच विचारांच्या जोरावर ते त्यांच्यासाठीचे निर्णय घेतात. शब्द हे विचार व्यक्त करणाऱ्याचे माध्यम असते. त्या शब्दांना प्रचंड महत्व आहे. हजारो वर्ष शब्दांवर ठराविक वर्गाची कमांड होती. ती शब्दांची जी दुनिया आहे तिच्यात मी काम करतो. त्या दुनियेत खरे किती, खोट किती याचा जर धांडोळा घ्यायचे म्हटले तर अनेकदा ती दुनिया अर्धसत्य सांगते, असे मला वाटते. मला काही प्रमाणात थोडेसे आतवर माहित असलेले विषय ज्यावेळी कुठल्याही दैनिकात छापून येतात, टीव्हीच्या बातम्यांत दाखवितात त्यावेळी लक्षात असे येते की त्याला माहित झालेली किंवा त्याला हवी असलेली बाजू तो संबंधित माणूस मांडतोय. मी या मांडमांडीचा गेटकिपर आहे. उपसंपादकाचे काम गेटकिपरचे असते. कडीतला एक दुवा म्हणून त्याचे महत्व खूप असते. बाहेरच्या माणसांना संपादकानंतर उपसंपादकच असे वाटते. ते तसे नसते, उतरंडीत मध्येही काही कड्या असतात, पण उपसंपादकावर असलेल्या जबाबदाऱ्या जर बघितल्या तर तो तसा असतोच. एखाद्या बातमीला एखाद्या हेडिंगने तो जो झटका देऊ शकतो. एखादी बातमी अडवू शकतो, किंवा त्याला हव्या त्या पद्धतीने हवा तो विषय किल करत अनेकदा पाने भरत राहतो. त्यामुळे समाजात पसरणाऱ्या विचारांचा तो एका अर्थाने गेटकिपरच असतो. त्यामुळे मी माझ्या कामाकडे बघताना अत्यंत व्यापकपणे पाहतो, म्हणजे मला असे वाटते आपणाला एखाद्या शाळेवर शिक्षक होता आले नाही तरी आपण ज्या ठिकाणी काम करतो ते समाजशिक्षकाचे काम आहे. मग तिथे बसल्यावर आपल्या मित्रांचे, नातेवाइकांचे, कुटुंबीयांचे काहीही छापत रहा, अशी वृत्ती या व्यवसायात मोठ्या प्रमाणात आहे. त्यातून संबंधितांवर येणारी बंधनेही मोठी आहेत, असे अनेकदा दिसते. त्यामुळे हा लेख छापताना मी अनेक दिवस विचार केला होता.................... 

सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

मिरवावे असे दोस्ताचे कर्तृत्व...

मिरवावे असे दोस्ताचे कर्तृत्व...
तो माझा दोस्त आहे, यापेक्षा गेल्या दहा - पंधरा वर्षात त्याने जे कमावले ते कुणालाच पैशात मोजता येणार नाही. तो शेतीतून स्वावलंबी झाला, यापेक्षाही तो स्वाभिमानाने जगतो, हे महत्वाचे आहे. दुसऱ्यांच्या बांधाला जाणाऱ्या त्याच्या आई - भाऊला आज घरच्याच छोट्याशा शेतातले काम सरत नाही. केत्तूर (ता. करमाळा) गावात राहणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणाची कहाणी........
-------------
यश मोजण्याचा श्रीमंती हा एक मापदंड आहे, मात्र आपण आसपास बघितले तर श्रीमंतांना यशस्वी म्हणावे का, असा प्रश्‍न पडतो. माझ्याबरोबर शिकणारे अनेकजण आज मोठमोठ्या पदांवर आहे. आपापल्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्याने घडीभर मोहरुन जायला होते. पण माझ्या मनावर ठसा माझ्या केत्तूर गावातल्या आबासाहेब पांडुरंग ठोंबरे या तरुणाने उमटविला आहे. त्याला कारणही तसेच आहे. खेड्यातले आपले अभावग्रस्त आयुष्य माणूस श्रमाने कसे बदलू शकतो, याचे मला तो मूर्तीमंत उदाहरण वाटतो.
मोहोळच्या एका संस्थेतून आबा बीपीएड होऊन बाहेर पडला, त्यावेळी नोकरी करण्याची इच्छा त्याच्या मनात होती. पण वास्तव भीषण होते. कोर्ससाठी डोनेशन दिल्यावर पुन्हा नोकरीसाठी पैसे भरणे हि त्याच्या कुटुंबाच्या आवाक्‍याबाहेरची गोष्ट होती. नोकरीसाठी काही ठिकाणी प्रयत्न करुन बघितले पण अशक्‍य कोटीतल्या बाबी लक्षात आल्यावर शेतीकडे लक्ष द्यायचे त्याने ठरविले. साडेचार एकर जिरायत जमीनीचा तुकडा त्याच्याकडे होता. एक दिवस आईबरोबर रानात झाडाखाली बसल्यावर "आपण विहिर खोदू' अशी कल्पना त्याने बोलून दाखविली. "आपल्याला हे कसे शक्‍य आहे. रोजची चूल पेटविण्यासाठी आपल्याला दुसऱ्याच्या बांधाला जावे लागते,' असे आईने सांगितले. पण आबा लहानपासून हट्टी. एकुलता एक मुलगा असल्यामुळे आपल्या हट्टासाठी स्वतःला किंवा आईवडिलांना किती त्रास होतो, याची कधी तमा बाळगायचा नाही. आई म्हणाली, "तू म्हणातोस तर आपल्या शेळीचे एक पाटरु विक. त्याने खोरे, घमेले, टिकाव, पार असे साहित्य घेऊन ये. आपण विहिर खोदायला सुरवात करु.' आबाने मंगळवारी राशीनला (ता. कर्जत) जाऊन बाजारातून पाटरु विकून हत्यारे आणली. भूमिपूजन झाले. आई, पत्नी यांच्याबरोबरीने आबाने विहिर खोदण्यासाठी परिश्रम सुरु केले.
विहिर दीड परसावर गेल्यावर पाणी लागले. सगळे पाणी ओढ्यात सोडावे लागत होते. आबा ज्यांना मामा म्हणतो त्या बापूसाहेब पाटील यांनी सल्ला दिली कि जेवढ्या क्षेत्राला पाणी पुरेल तिथे भुईमूगाचे पिक घे. काही पाईप त्यांनी दिले. शेंगा चांगल्या आल्या. काही भांडवल उभे राहिले. पुढे कांदा केला. चांगला भाव मिळाला. विहिरीचे काम टप्प्या-टप्प्याने सुरूच होते.
आता शेती नीट केली पाहिजे, असे त्याच्या मनाने घेतले. तीन ठिकाणी मोठ्या वगळी होत्या. तिथे बांधबंधीस्ती केली. पुढे ऊसाचे पिक लावले. स्थिती आणखी सुधारत गेली. तो रानात छप्पर बांधून रहात होता. आता आपल्या डोक्‍यावर चांगला निवारा असला पाहिजे, या दृष्टीने त्याने घर बांधले. जनावरांसाठी गोठा बांधला. शेतात आंबा, रामफळ, नारळ अशी झाडे शेतात लावली. या सगळ्या गोष्टी पुढे नातेवाईकांसह अनेकांनी मदतीचा हात दिला. त्याचबरोबर वडिलांनी काढलेले कर्ज फेडतानाही त्याला मोठा मानसिक त्रास त्याला सहन करावा लागला.
शेतीला पूरक उद्योग सुरू केल्याचे त्याचे साधारण पन्नास लिटर दूध डेअरीला जाते. त्याने गावात बचत गटात सहभाग घेऊन त्याच्या वाढीसाठी प्रयत्न केला. गावात नवी पाणी योजना झाली. बचत गटाच्या माध्यामातून त्यासाठी सरकारी पाठपुराव्यासाठीचा खारीचा वाटा आबानेही उचलला. जेऊरच्या लोकविकास संस्थेचे आनंद कोठडिया यांच्या मागदर्शनाखाली काही दिवस "सर्वात आधी शिक्षण' चळवळीचे परिसरातील गावांत सायकलवर फिरुन काम केले. माजी सरपंच अशोक पाटील यांच्या पुढाकारने स्थापन झालेल्या किर्तेश्‍वर पतसंस्थेचा संस्थापक व्यवस्थापक आहे. व्यवहार आणि परस्परसंबंध यांच्यात गल्लत करायची नाही, या अटीवर त्याने हे काम घेतले. आज अनेक पतसंस्था बंद पडत असताना या पतसंस्थेचे व्यवहार वाखाणण्याजोगे आहेत. स्वतःच्या जीवनाला आकार देताना त्याने जपलेले सार्वजनिक भानही नजरेत भरेल, असे आहे.
जमीन आपण पुढच्या पिढ्यांकडे हस्तांतरित करीत असतो. तिचा पोत नीट सांभाळण्यासाठी आपण पिकांची फेरपालट करण्याबरोबरच रसायनिक खतांचा अतिवापर टाळायला हवा. काळ्या आईची सेवा केली तर ती काही कमी पडू देत नाही, असा अनुभव तो आवर्जुन नमूद करतो. गेल्या दहा-बारा वर्षांत त्याने आपल्या जीवनात परिश्रम, ज्ञान आणि स्वाभिमान या माध्यमातून केलेले परिवर्तन अनेकांना दिशा देणारे आहे. श्रमावर श्रद्धा वाढविणारे आहे.
(ताजा कलम ः हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर 2012 मध्ये आबाने स्वतःच्या अगदी छोट्या शेतीसाठी छोटा टॅक्‍टर घेतला. केळीचे ठिबक सिंचनावर पिक घेतले, त्यामुळे त्याचा कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करमाळ्यात पत्रकार संघाने गौरव केला. त्याशिवाय बारामतीत एक फ्लॅट विकत घेतला आहे.)
------------------
त्याचे यश....
----------
स्वतः विहिरीसाठी राबून जमीन बागायत केली.
शेतीची बांधबंधीस्ती केली.
चोपण जमिनीचा पोत सुधारला.
वडिलांनी काढलेले कर्ज फेडले.
दूध उत्पादनासाठी गोपालन.
सध्या 50 लिटर दूधाचे उत्पादन.
घर बांधले, दुचाकी घेतली.
पतसंस्थेत पारदर्शी कारभारासाठी मदत
एक ट्रॅक्‍टर घेतला
बारामतीत फ्लॅट घेतला
तिथे मुलीला आणि दोन्ही मुलांना शिक्षणासाठी ठेवले. 

शनिवार, ५ डिसेंबर, २०१५

न सरणाऱ्या आठवणी....

न सरणाऱ्या आठवणी....
गरवारे कॉलेज आणि होस्टेलसंबंधीच्या आठवणीचा हा शेवटचा लेख. किती आठवणार तरी? हा कालखंड साधारण 92 ते 95 हा होता. मुंबईत 1992 बॉंबस्फोट झाले होते. बाबरी मशीद पाडण्यात आली होती. ती पाडल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त होत होती मात्र तरीही या घटनेचे समर्थन करणारेही काहीजण होते, हे मला आजही आठवते. मी इतिहासाच्या तासालाच पटवर्धन मॅडमंना ही घटना झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुम्हाला काय वाटते, असे विचारले. त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात, "ऐतिहासिक वास्तू म्हणून ती उद्‌ध्वस्त करणे योग्य नाही. अर्क्‍युलॉजीकल मॉन्युमेंट म्हणून तिचे जतन करायला हवे,' असे सांगितले होते. या काळात कॉलेजमध्ये निवडणुका नव्हत्या. ज्याला जास्त गुण तो वर्गप्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली जात होता. त्यामुळे ती मजा काही मला अनुभवता आली नाही. सत्ताधाऱ्यांविषयी युवकांचा मनात जो एक नेहमी संतापाचा सूर असतो, तसा त्या कालखंडात आमच्याही मनात होता. तिथे भाजपला पूरक वातावरण होते. "अगर इस देशमे रहना होगा ते वंदे मातरम कहना होगा' ही घोषणा त्यावेळी जोरात होती. मुंबई दंगल, शरद पवारांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, हजारे आणि खैरनारांचे आंदोलन आणि गोपीनाथ मुंडेची संघर्ष यात्रा यामुळे महाराष्ट्रात 95 साली सत्तापरिवर्तन झाले. त्या काळात मी विद्यार्थी दशेत होतो. या सगळ्याचा मनावर एक परिणाम होत होता. राजकारणाविषयी आकर्षण असल्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख याच कॉलेजात शिकले. प्राध्यापक होते. त्यांनी काही काळ या होस्टेलमध्ये घालविला, याचे उगाचच भारी वाटायचे.
आता फेसबुकने फारच चांगली सोय केलीय. एक वर्षभरापूर्वी सुदीप दत्ताचा फोन आला. त्याने तो फेसबुकवरुन मिळविला होता. त्याच्याशी अनेक विषयांवर गप्पा झाल्या. मोहन यादव आणि सुदीप यांच्याविषयी मला नेहमी आदर वाटायचा. निखिल गाडगीळ मर्चंट नेव्हीत आहे. त्याच्याशीही कधीकधी बोलणे होते. प्रशांत तानवडेने मित्रांसाठी एक पार्टीच ठेवली होती. तोही जागतिक बॅंकेत कोणत्यातरी पदावर काहीतरी काम करीत आहे. हरिश सारडा मध्ये एकदा भेटला. अभिजित पिंपळेची सासरवाडी सोलापूर आहे. सपत्नीक तो काही दिवसांपूर्वी घरी येऊन गेला. छान वाटले. त्याची आणि माझी चांगली दोस्ती आहे. एकमेकांच्या आम्ही खूप खोड्या काढायचो, मला एक आठवण आठवते. एक असेच दुपारी मी झोपलो होतो. तो आला आणि मोठ्या दार वाजवून माझी झोपमोड केली. मी उठलो. खूप राग आला होता. त्याच्या खोलीत गेलो. त्याच्या बेडवर जो झोपला होता, त्याला एक लाथ घातली. पण गंमत अशी की तो तिथे नव्हताच. तिथे संजय जोशी झोपला होता. तो विव्हळायला लागला. मला इतके अपराध्यासारखे वाटले. मी दोन तीन वेळा तरी संज्याची माझी मागितली.
या होस्टेलमध्ये आर्टची मुले अथवा मुली यांचे प्रमाण कमी होते. पहिल्या वर्षाला होस्टेलवर बीए भाग एकचे आम्ही तिघे होतो. सैद म्हणून माझा रुमपार्टनर काही दिवस होता. तो कुठे आहे, याचा मला काही पत्ता नाही. संतोष केकाण म्हणून दौडजवळा एक मित्र तिसऱ्या वर्षाला होता. त्याचाही पुढे कधीच संपर्क झाला नाही. सुपर्णा अष्टेकर फेसबुकवर आहे. कल्याणी तुंगारे अतिशय हुशार मुलगी होती. तिच्याविषयीही कुणालाच माहिती नाही. कॉलजचे इतिहासाचे गणेश राऊतसर यांच्याशी गेल्या वीस वर्षात दोन तीन वेळा बोललो असेल. राजेश माचकरशी एकदा बोलणे झाले. बापू जागडे, गिरीश लवळेकर, राजा आरगे, जितेद्र पायगुडे यांच्याशी काहीदा संपर्क होतो. अशपाक मुजावर हा खरा प्रचंड हरहुन्नरी होता. परिस्थीती बोताची होती. खेड शिवापूरला राहायचा. परवा काही दिवसांपूर्वी सोलापुरात एका लग्नानिमित्त आला होता. घरी येऊन गेला. त्याच्याशी खूप गप्पा मारल्या. पण एक लक्षात आले की कितीही बोलले तर आठवणी सरत नाहीत...
या होस्टेलवर होस्टेल डे आणि गणेशोत्सवाच्या काळात धमाल यायची. विविध स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम, विविध गुणदर्शन असे असायचे. परीक्षा जवळ आली की रात्र रात्र जागून पोर अभ्यास करायची. ग्राउंडवर संध्याकाळी व्हॉलिबॉल खेळायचो. सकाळी काही दिवस पहाटे उठून पळायला फिरायला जायचो. पॅराडाईजमध्ये चहा प्यायचा. कॉलेज आणि होस्टेल अशा दोन विश्‍वात वारताना खूप चांगल्या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळाले, अनेक चांगले वक्ते ऐकायला मिळाले. ज्याच्याप्रती आपण कृतज्ञ रहावे, अशा बाबींमध्ये मी या होस्टेलचा, कॉलेजचा तिथल्या वातावरणाचा जरूर उल्लेख करीन. माझ्या आयुष्यातला तीन वर्षांच्या कालखंडाचा एक हळवा कोपरा या कॉलेज आणि होस्टेलच्या आठवणींनी भरून राहिला आहे. नुसत्या आठवणीतसुद्धा आनंद वाटावा, असे हे वातावरण होते. काहीदा त्यात सहभागी होऊन तर काहीदा तटस्थ रहात मी या सगळ्यांचा अनुभव घेतला......

---------------------------------  

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

अन्‌ पडदा खाली आला

अन्‌ पडदा खाली आला
व्यासपीठावर गेले की अनेकदा घडीभर काय बोलावे, हे कळत नसायचे. मग भ्रष्टाचाराचा मुद्दा असला की आपल्या लांब कशाला आपल्या जवळपासच बघा, असे मी एकदा म्हणालो. ते तसे किती नुसते भावनिक, अपरिपक्व असायचे. टाळ्या मिळायच्या. पण त्याने काहीजण दुखवायचेही. होस्टेल डेच्यावेळी पोरी-पोर मिळून डान्स बसवायची. हे काम आपल्याला कधी जमले नाही. पोरींबरोबर डान्स ही बातच आपल्या आवाक्‍यातली नसायची. मी गावाकडून आलेलो. शैलेश दाभोळे, प्रशांत तानवडे, निखील गाडगीळ, महेश देशपांडे यांनी त्यावेळी डान्स केला होता. वातावरण खूप खेळीमेळीचे असायचे. या होस्टेलने मला अनेक गोष्टी दिल्या. आता हि सगळी मंडळी मला सोशल साईट्‌च्या कट्ट्यावर भेटतात. पहिल्यांदा ऑर्कुटवर अनेकजण भेटले. आता फेसबुकवर भेटतात. आता त्याच्या पुढे स्थिती गेली आहे. व्हॉट्‌स ऍपवर या होस्टेलचे दोन ग्रुप आहे. एक आमच्या बॅचचा. दुसरा एकूण होस्टेलचा. होस्टेलवर मोहन यादव, राजेंद्र पोळ, राजेंद्र खारुळ, सुदीप दत्ता, नरेंद्र डोंगरे, चकोर बाविस्कर, मुक्ता आपटे, प्रतिमा बिल्डीकर हे सिनीअर तर रवींद्र भारदे, परिक्षीत कुलकर्णी, महावीर अब्बड, मराठे असे अनेकजण ज्युनिअर होते. जगाच्या कानाकोपऱ्यात सगळ्या क्षेत्रात ही सगळी पोर वेगवेगळ्या निमित्ताने गेल्याचे आज दिसते. सगळेजण आपपल्या व्यापात व्यस्त आहेत. प्रशांत तानवडेने भारतातल्या निडणुकीविषयी अमेरिकेत राहताना मला काय वाटते, याचे एक टिपण मी इमेल केल्यानंतर पाठविले होते. ते आम्ही सकाळच्या सोलापूर आवृत्तीत त्याच्या आणि आण्णा हजारे यांच्या फोटोसह प्रसिद्ध केले होते. आर. व्ही कुलकर्णींच्या किंवा प्रशांत तानवडेच्या लेखाला फेसबुक आणि ऑर्कुटवर खूप प्रतिक्रीया पडल्या होत्या. प्रतिक्रीया देणारी बहुतेक मंडळी मंडळी या होस्टेलशी संबंधीत होती. त्यांचे परत भेटणे मोठे आनंददायक वाटते. त्यातही निखील गाडगीळ हा माझा त्यावेली अत्यंत जवळचा मित्र होता. आम्ही दोघंही काहीदा लकडी पुलावर किंवा त्याच्या अलीकडच्या पुना हॉस्पीटलच्या पुलावर जायचो. एकमेकांच्या गोष्टी सगळ्यांदेखत ज्या इतरांना सांगता येणार नाहीत त्या शेअर करायचो. एक-दोनदा आम्ही एकमेकांजवळ मुसमुसून रडलेलोसुद्धा मला आठवते. त्याचे विषय तसे प्रेमबिम असेच काहीतरी असायचे. मी माझं लग्न झाल्याचे मात्र त्यालाही सांगितले नव्हते. तो एनसीसीत सिनीअर अंडर ऑफिसरपर्यंत गेला होता. मीही सार्जंट झालो होतो. एकदा मला नॅशनला कॅंप करण्याची संधी होती, मात्र ती मी गावी गेल्यामुळे हुकल्याचे त्याने मला सांगितले होते. तीन एटीसी कॅंप मी केले होते. एनसीसी कॅंपमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात नाना पाटील यांचा पोवाडा म्हटलो होतो.
कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये भाग घेऊन आपल्याला धमाल करता आली पाहिजे, असे मला नेहमी वाटायचे. ते शेवटच्या वर्षाला असताना साध्य झाले झाले. मी मंगशे पाडगावकर यांची प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते ही कविता सादर केली. गॅदरिंगच्या कार्यक्रमांची निवड होणार होती, त्यावेळी मी ही कविता सादर केली. निवड समितीने ही कविता मान्य केली. कार्यक्रमाचा दिवस आला. मी चांगलाच सराव केला होता. विशेष म्हणजे माझी ही कविता शेवटची ठेवली होती. ऍम्फी थिएटरमध्ये कार्यक्रम होता. याचा वेळी गिरीश लवळेकरने ग साजणी हे गाणे म्हटले होते. त्या गाण्याला कोरस द्यायला आम्ही तिघी चौघे होते. कविता सादरीकरणाराचा शेवटचा कार्यक्रम. कविता सुरू झाली. सराव आणि शब्दांचा चढउतार यामुळे पोरा पोरींना ही कविता बेहद आवडली. सगळे सभागृह भरलेले होते. कवितेला वन्स मोअर मिळाला. तो तिथल्या सरांनी मान्य केला, पण मी ऐनवेळी अगाऊपणा केला. मी म्हटले वन्स मोअर नाही, वन मोअर कविता म्हणतो. मी सुरू केली मंगशे पाडगावकरांचीच.
त्याने प्रेम केल तिने प्रेम केल
तुमच्या काय बापाचे गेले
तो तिला बागेत भेटला,
नको तितके जवळ जाऊन खेटला
लाल लाल गुलाबाचे फूल होऊ पेटला
भेटला तर भेटू दे पेटला पेटू दे
तुमचे का डोस्क एवढे गरम झाले
असे या कवितेचे शब्द होते. मास्तर चक्रावले. हा काय वेगळ बराळाय लागलाय, असे त्यांचा भाव होता. पहिले कडवे झाले की मास्तरांनी पडदा खाली घ्यायला सांगितला. त्यानंतर त्यांनी मला झापले, पण पोरांनी केलेला आरडोओरडा अजूनही माझ्या कानात खुमतो आहे. पुढे दुसऱ्या दिवशी खास ही कविता सादर करण्याची संधी मिळाली. त्याला प्रतिसादही मिळाला पण कुठे काय झाले माहित नाही पण तिसऱ्या दिवशी मात्र मला हे काव्यवाचन अर्ध्यावर म्हणजे एक कविता झाल्यावर लगेच थांबवावे लागले होते. पोर तुम्हाला जशी डोक्‍यावर घेतात, तशी तुमचे तोंडही गप्प करतात, हे मी तिथे शिकलो. पण या एका गोष्टीने माझ्याशी कॉलेजमधील अनेकांनी ओळखी करुन घेतल्या..... 

गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

दोन कविता

दोन कविता
मला वाटते त्यानुसार मी माझ्यापुरती गरवारेच्या होस्टेलवर मजा केली. पहिल्याच वर्षी एफआरची (म्हणजे फ्लोअर रिप्रेझेंटेटिव्ह, मजला प्रतिनिधी) निवड होती. इच्छुकांनी अर्ज टाकायचे. मी, माझ्याच वर्गातला सैद आणि जितेंद्र राक्षे असे दोघांनी अर्ज टाकले होते. जितू भाई आम्हाला सिनिअर होता. मला बारावीला चांगली मार्क असल्यामुळे आपल्याला ही संधी मिळू शकते, असे काहीतरी माझ्या मनात होते. तसे काही झाले नाही आणि ते योग्यही होते. तो अगोदरपासून होस्टेवर होता. निवड झाल्यावर मी त्यावरच एक विडंबन कविता लिहिली होती. रामदास फुटाणेंच्या कवितांचा मला त्यावेळी खूप नाद होता. चांगलभल कवितासंग्रहातल्या कविचा माझ्या तोंडपाठ होत्या. त्यामुळे आपण जे वाचतो. ते तशा अर्थाने आपल्यात झिरपते. त्यातून झालेल्या नवनिर्मीतीची बीजे त्यात असतात. मी लिहिले होते,
एका तळ्यात तीन बगळे
एकाच वेळी एकाच माशासाठी
टपून बसले होते
सिनिअर होता ज्युनिअरांपेक्षा प्रकृतीने लहान
कीर्तीही नव्हती त्याची महान
पण देवाने दिले त्यालाच दान
त्यालाच देण्यात आला दोन माशांचा प्राण
आणि एफआरपदाचा मानही...
या कवितेत कविता म्हणून फार दम आहे, असे मला आज अजिबात वाटत नाही. कारण मी खूप कविता वाचल्या आहेत. कविता कानावर पडली की तिची ताकद कळते. मला माझी समज आहे, त्यानुसार मुल्यमापन करता येते. ही कविता इतकी गाजली की होस्टेल डेच्या काव्यवाचन स्पर्धेत तिला तिसरा नंबर मिळाला. पोरांना फार आवडली कारण तिथे घडलेल्या घटनेवरच हे भाष्य होते. व्यासपीठ गाजविण्याची एक खुमखुमी माझ्यात त्यावेळी प्रचंड होती. कथा, कविता, कादंबऱ्या यांचे खूप वाचन त्यावेळी केले. विशेषतः कवितेच्या प्रांतात मला चांगला रस होता. होस्टेलच्याच काव्यवाचनात दुसऱ्या वर्षी मी एक कविता सादर केली होता. तिने अनेकांचा रोष मला पत्करावा लागला होता. ती कविता म्हणजे माझी काही नवनिर्मीती नव्हती. कवितांच्या ओळीची जोडाजोडी होती. होस्टेलचा पालवी नावाचे एक वार्षीकांक निघाला होता. त्यात आलेल्या सर्व कवींच्याच कवितांचा वापर करून मी एक कविता तयार केली होती, ओळी त्या कवितामधील. त्यात जोडाजोडी करण्यासाठीची ओळ फक्त माझी. ती कविता अशी होती...

नव ज्ञानासह ये नव वर्षा
ये वर्षा माझ्या वर्षालाही घेऊन ये ना (ही ओळ माझी)
सुंगध तिच्या बहराचा मला पाहू दे ना
त्या बहरात मला बहरुन जाऊ दे ना
बहरता बहरता (हे दोन माझे शब्द)
वाळूत बांधली घरटी प्रेमाची
लाटांनी किनारा वाहू नेला
यांचा मात्र प्रेमभंग झाला (ही ओळ माझी)
प्रेमभंग झाल्यावर
मी आणि माझे अश्रू
दोघेच होतो एकमेकांच्या सोबतीला
आपले आपले म्हणारांनी टाळले तेव्हा
अश्रूच धावले माझ्या मदतीला
अश्रूभरल्या नयनांनी मी म्हटले (ही माझी ओळ)
सूर्या तू कधी उगवूच नकोस
उदयाने तुझ्या दाखवितात नव्या आशा दिशा
निराशेने भरलेल्या काट्यांनी वेढलेल्या
थकलेल्या मनाला विसावू दे जरा
पण मन काही विसवेना (ही माझी ओळ)
मन धावे सैरा शब्दांना भान आहे
स्वरांतून विस्कटल्या उमटली ताण आहे
मृगजळाच्य तळ्यात विसावा नजरेला
ओठावर सुकली कोरडी तहान आहे
हि तहान बागविण्यसाठी (ही माझी ओळ)
मै एक भ्रमर
चाहता हूँ मधुरस
चाहत के मधुरससे जाता हूॅ फुलके पास
जान जाता हूँ मेरे पहले आया है कोई भॅंवरा
उसने चूस लिया है मधुरस सारा
पण तरीही शेवटी मी म्हटले (ही माझी ओळ)
एवढ्या मोठ्या दीपरागानंतर मेघमल्हार कोणी गाईल का
धरतीचा कलश आता श्रावणधारांनी कुणी भरेल का?
माझ्या आठवणीनुसार या कवितांच्या ओळी रजपूत, जितेंद्र राक्षे, कल्याणी तुंगारे, दीपक खेडकर, दत्ता कदम, सुपर्णा अष्टेकर, सूरज शहा यांच्या कवितेतील होत्या. काव्य वाचनात हि कविता इतकी जबरदस्त झाली, की मिळालेला प्रतिसाद बघितला की परिक्षकांना नंबर देण्यावाचून पर्यायच नसायचा. या होस्टेलवर असताना मी काही बोलायला, बक्षीस घ्यायला, स्पर्धेतील भाषणासाठी व्यासपीठाकडे निघालो की पोर जय भवानी जय शिवाजी असा गजर करायची. निखील गाडगीळ, लोकेश गुजराप्पा, शैलेश दाभोळे, प्रशांत तानवडे, महेश देशपांडे या मंडळींनी माझे नामकरणच शिवा असे करून टाकले. ते चांगले म्हणून, टर उडवायची म्हणून की खरेच त्याच्यामागे त्यांच्या माझ्या मित्रत्वातले आणखी काही धागेदोरे होते हे आता मला कळत नाही. पण आपण उठलो की आपले मित्र आपल्यासाठी घोषणा देतात ते फिलींगचे फार भारी अंगावर रोमांच आणणारे असायचे.

--------------------------------  

बुधवार, २ डिसेंबर, २०१५

मी बदललो कारण.....

मी बदललो कारण.....
कॉलेजचे पहिले वर्ष संपताना माझी बरीच ओढाताण झाली. परीक्षा होण्याच्या अगोदरच संक्रमणाचा कालखंड सुरू झाला होता. लग्न, कॉलेज, आपली स्वप्न, कॉलेजच्या देखण्या पोरी, आपल्याला काहीतरी करायचे तर कशाला लग्न असे अनेक विचार डोके भणभणून सोडायचे. त्यामुळे त्या एकूण धक्‍क्‍यात असताना परीक्षा दिली. सहाजिक कमी मार्क पडले. त्यानंतर दुसऱ्या वर्षी होस्टेलला ऍडमिशन घेताना त्रास झाला. किमान साठ टक्के मार्क हवेत, असा एक ऍडमिशनचा निकष होता. तिथे मी कमी पडलो होतो. त्यामुळे आर. व्ही. कुलकर्णींनी ताणून धरले होते. खरे तर त्यांच्यावर लिहिलेल्या लेखापलीकडे आता थोडे आर. व्ही. विषयी सांगायला हवे. त्यांची विविध संस्था, संघटनांच्या उपक्रमात स्वतःला झोकून देऊन काम करण्याची पद्धत मला आजही आवडते. त्यामुळे आता मी त्यांच्यावर लेख लिहिला. तो प्रसिद्ध झाल्यावर अनेकांनी कळविले. अनेकांना हा लेख आवडला. हा लेख कुणीतरी फेसबुकवर टाकला, त्यावरही अनेकांनी कॉमेंट लिहिल्या होत्या. लेख वाचला, आवडला असे जे कळवितात, ते कोण? ही गोष्ट सुद्धा अनेकदा पारखून घेण्यासारखी असते. कळविणारे बहुतेकजण आपल्या किंवा आपण ज्यांच्यावर लिहितो, त्याच्या ओळखीचे असतात. त्यात हेतू ठेवून कळविणारेही काहीजण असतात. मी एकदा लेख लिहल्यानंतर किमान दहा- पंधरा बातमीदार तरी पूर्वी मी जिल्ह्याचे काम करीत असताना कळवायचे. त्यानंतर मी जेव्हा शहर समन्वयक म्हणून काम करायला लागलो तेव्हा यात पाच सहा जणांचे सातत्य राहिले. सांगायचा मुद्दा असा की खरेच आपले लेखन आपण एखाद्याच्या ओळखीचे नसतानाही त्याच्या लक्षात रहात असेल तर ते वेगळे असे मला वाटते.
कॉलेजच्या सुरवातीच्या दिवसात हिंदू महासभा नावाच्या पक्षाच्या युवक शाखेचे आपण काम करू, असे गिरीश लवळेकर सांगायचा. त्यादृष्टीने आम्ही काही हालचालीही केल्या होत्या. त्यांनी एक पदही मला दिले होते. त्याचा बोर्डही आम्ही कॉलेजच्या एका मोठ्या फळ्यावर लावला होता. आम्ही संघाच्या दसरा संचलनाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्या वयात जे एक भावनिक, भडक असे काही असते ते पटायचे. आर. व्ही. संघाचे स्वयंसेवक होते. हे मला त्यांच्या दसरा संचलनावरुन कळले. तसे गरवारे कॉलेजच्या वातावरणात सगळ्या प्रकारची मुले आमच्या सहवासात येत होती. तरी भाजप, शिवसेना किंवा त्या प्रकारचे प्रस्थापितांविरुद्धचे विचार जवळचे वाटायचे. गोपीनाथ मुंडेचे आरोप, गो. रा. खैरनारांचे आरोप, आण्णा हजारेंचे आंदोलन असे सगळ्यांची कॉलेज कट्ट्यावर चर्चा व्हायची. त्याने व्यवस्थेविरुद्ध वातावरण निर्मिती केली होती. गोपीनाथ मुंडेच्या संघर्ष यात्रेचा समारोप पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात होता, तिथे मी खूप ताटकळत बराच वेळ बसलो होतो. गो. रा. खैरनारांचे भाषणही एकदा रमणाबाग प्रशालेत होते. खूप मोठा बंदोबस्त होता. आम्हाला आत सोडले नाही पण आम्ही नुसता आवाज एकला होता. या सगळ्यांनी पुढे किती भ्रमनिराश केला हे आपल्या सगळ्याला माहित आहेच. पुढे एकूणच वैचारिक अंगाने वाचन करताना मी जसा जसा खोलवर जात राहिलो, तसे तसे मला भाजप, आरएसएसच्या विचारांपासून दूर नेले. मी बदललो. पण माणूस जसा वयाने वाढत जातो, तसतसे नव्या गोष्टी शिकत गेला तर त्याच्या विचारात फरक पडू शकतो. पण शेवटी आपण सगळे माणस आहोत, देवाची वगैरे माहित नाही पण निसर्गाची लेकरे आहोत. पृथ्वीची उत्पत्ती आणि माणसाचा जन्म या गोष्टी निसर्गचक्रातून झालेल्या असल्याचे समोर आलेले आहेच. त्याशिवाय पृथ्वीवर पहिला माणूस जन्माला आला त्यावेळी कुठे भेदाभेद असणार? त्यामुळे परिस्थिती समजून घेत गेले पाहिजे, असे मला वाटते. माणूस महत्वाचा. ते बळ मला माझ्या कॉलेजने वाचनामुळे दिले. 

मंगळवार, १ डिसेंबर, २०१५

एसटीडी बुधवरचे घोळ.... ऑफर

एसटीडी बुधवरचे घोळ.... ऑफर
पुढची दोन वर्ष कॉलेजमध्ये मी अतिशय नाकापुढे काढली. होस्टेलवर असताना नोकरीही करता येत नव्हती. पण तरीही तीन चार महिने मी एके ठिकाणी नोकरी केली. चंदन टेली शॉपी म्हणून एका माणसाचे नऊ एसटीडी बुथ होते. गुड लक चौक, जंगली महाराज रस्ता, सातारा रोड अशा ठिकाणी हे बूथ होते. या बुधवार मी चार तास थांबायचो. हि सगळी ड्यूटी दिवसा म्हणजे बारानंतर पुढे आणि रात्री दहाच्या आधी असेल असा माझा कटाक्ष असायचा. कारण रात्री दहानंतर होस्टेलचे दार बंद व्हायची. सकाळी बारापर्यंत कॉलेज असायचे. या मधल्या काळात चार तास काम केले तर महिन्यानंतर चारशे रुपये मिळायचे. तसा हा सौदा बरा होता मात्र माझे मन इथेही रमले नाही. त्याचे कारण असे की इथे काम करण्यात एक चोरटेपणा होता. मी पहिलीच एक गोष्ट लपवीत होतो ती म्हणजे माझ्या लग्नाची. त्यानंतर पुन्हा अशा काही होस्टेलच्या लोकांपासून तोंड दडवून काम करायचे म्हणजे अवघड व्हायचे. एकदा निखिल गाडगीळने मला सांगितले, आर. व्ही. विचारत होते की तू बाहेर काम करतोस का? याचा अर्थ त्यांनी मला कुठेतरी बूथवर बघितले असणार, पण त्यांनी कधीच विचारले नाही. मलाही या सगळ्या बाबींचे फार वाटत नव्हते. आपण होस्टेलचा नियम मोडतो, एवढे मात्र मला माहित होते. मात्र तशा समाजात अनेक गोष्टी चालतात. आपणच आपल्यासाटी काही केले तर बिघडले कुठे असे मला वाटायचे. मी या बुधवरची नोकरी सोडली. त्याला कारण तिथे ज्या पद्धतीने काम चालायचे, त्याने आपण कधीतरी अडचणीत येऊ असे वाटायचे. एसटीडी, आयएसडी कॉलचे जितके पैसे व्हायचे, त्याच्या दीडपट किंवा दुप्पट रक्कम आम्ही संबंधित गिऱ्हाईकाकडून वसूल करायचो. हे सगळे अतिशय बेमामूल चाललेले असायचे. आपले पैसे जादा गेले हे फोन करावयास येणाऱ्याला कळायचं मात्र रकमेचा डिस्प्ले तशीच रक्कम दाखवायचा. त्यासाठी मशिनधील फंक्‍शन आम्ही बदलायचो. म्हणजे त्यावेळी पुणे- मुंबई एसटीडी कॉलचा दर आठ सेंकदाला एक पल्स म्हणजे सव्वा रुपया इतका होता. आम्ही फंक्‍शन बदलून सहा किंवा चारच सेकंदाला एक पल्स पडेल, असे सेटिंग करायचो. उरलेली रक्कम काढाण्यासाठीचे सेटिंगही आम्ही शिकून घेतलेले होते. आयएसडी कॉलवाला आला की फारच मजा यायची. साधारण एक किंवा सव्वा सेकंदाला अमेरिकेला एक पल्स पडायचा. आम्ही तो अर्ध्या सेंकदावर आणून सोडायचो. धडाधडा एक मिनीट फोनवर बोलले की त्याचे बिल शंभर दोनशेकडे जायचे. त्यामुळे मिळणारी रक्कमही बरीच असायची. समजा एखाद्याने त्यात बिल मागितले तर आम्ही मशिनवरचे बिल देत नसायचो. त्यासाठी स्वतंत्र बिल बुक होती. त्यातले बिल आम्ही द्यायचो. त्यात किती वेळ बोलणे झाले आणि किती पल्स झाले असा तपशील नसायचा. फक्त नंबर आणि त्यावर बिल असे अडचणीत न येणारे आम्ही लिहून द्यायचो. रोज निदान पाच सहा लोकांना तरी जादा बिल झाले म्हणून तोंडाला तोंड द्यावे लागायचे. पूर्णवेळ हे काम करणारे त्यावेळी दोन तीनशे रुपये तरी असे वरचे काढायचे. मला हे पटत नव्हते, तरीही जास्त पैसे मिळतात तर ते कशाला सोडा या पद्धतीने मी काम करायचो. हे काम मी साधारण चार महिने केले. या बुथच्या मालकाचा काम सोडणाऱ्या मुलाचा शेवटच्या महिन्याचा पगार द्यायचा नाही, असा एक प्रघात होता. माझा शेवटच्या महिन्याचा दोनशे रुपये पगार मी फार भारी पद्धतीने मिळविला. सावरकर भवनच्या पुढे महापालिकेच्या शेजारी त्यांचे ऑफिस होते. मी गेलो.
ते म्हणाले, "कशाला आला?' काम का सोडले?
मी म्हणालो, " माझा पगार राहिलाय?
ते म्हणाले, "आता कुठे मिळणार तो? पैसे देऊ नंतर.
मी म्हणालो, "मला पैशाची गरज आहे. आत्ताच पाहिजे.'
ते म्हणाले, ""काम का सोडतो? काम सोडणाऱ्यांना आम्ही पगार देत नसतो, हे तुला माहित नाही का?
मी म्हणालो, "तुमच्याकडे काम करुन काय मार खाऊ का? पोर काय करतात ते तुम्हाला माहित नाही का?'
ते म्हणाले काय करतात. मी काहीबाही बोलत राहिलो. त्यांनी त्यांच्या पीएला कार्ड काढायला सांगितले. माजी हजेरी बघितली. माझा बेडरपणा बघून ते म्हणाले, "चल आता तुला पाहिजे तेवढे पैसे देतो, उद्यापासून तुला सुपवायझर म्हणून काम करायचे.'
मी म्हणालो, "मला जमणार नाही.'
तुम्ही असेच रे, काही करणार नाही आयुष्यात. कुठेतरी सरकारी नोकरीत खर्चेघाशी करत राहणार. मी म्हणालो, "तुम्ही बघा दहा वर्षांनी मी बरेच कायकाय केलेले असेल.' बघतो रे जा,' असे म्हणून त्यांनी माझे सव्वादोनशे रुपये हजेरी बघून दिले.
हे पैसे मी ज्या पद्धतीने मिळविले ते बघून बुधवरची त्यावेळची पोर म्हणायचे, "तुला मानले राव, तू थेट चंदनशीच टक्कर घेऊन तुझे काम करुन घेतले.' 

सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

लॉटरीची झिंग

लॉटरीची झिंग 
पुन्हा मूळ विषयाकडे येतो, पहिले वर्ष संपले. त्यानंतर मी कॉलेजमधला संपर्क थोडा कमी केला. आपण पैसे कमविण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, हि जाणीव त्यावेळी आमच्यातल्या अनेकांकडे होती. मग कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना मी, राजा आरगे, बापू जागडे आणि राजेश माचकर असे चौघे एकत्र आलो. प्रत्येकी एक हजार रुपये असे चार हजार जमा केले. लॉटरी स्टॉल आपण टाकू, असे आमचे ठरले. त्यानुसार वाटचाल सुरू झाली.
मला होस्टेलवरुन सायकलवर कोथरूडला जावे लागायचे. वनाज कॉर्नरच्या बाजूला हा स्टॉल टाकला. त्यासाठी एक टेबल, खुर्ची, तिकीट ठेवण्यासाठीची अन्य सामग्री आम्ही राजा आरगेच्या घरून आणली. त्याचे अण्णा म्हणजे वडील मदतीला यायचे. साधारण तीन हजारांची तिकिटे आम्ही घ्यायचो. यात दोन रुपये किंमतीच्या तिकिटांची संख्या जास्त असायची. एखाद्या माणसाने दहा तिकिटे 20 रुपयांची घेतली आणि त्यांचा शेवटचा नंबर जर शून्य ते नऊ असा असेल तर त्या माणसाला वीस रुपये भरून सोळा रुपये लागायचेच लागायचे. खेळणारे त्यावेळी सोबत तक्ता ठेवायचे. काल आठ नंबर आला आज अमकातमाका येणारच, असे म्हणून चर्चा चालायची. खूपच वेगळे विश्‍व मी जवळून बघत होतो. नंबर आला तर जग जिंकल्याचा आनंद आणि नाही आला तर सिगारेट, विडीच्या झुरक्‍यात चहाबरोबर अपयश पचविणारी मंडळी बघायला मिळाली. त्या लॉटरीचे सगळे नियोजन वीस टक्कायत चालायचे. शंभर रुपयांची तिकिटे विकली तर तर त्यातले 80 रुपये हे बक्षीस म्हणून द्यावेच लागायचे. त्यात आमची तिकिटे विकणाऱ्यांचीही अनेकदा गोची व्हायची म्हणजे तिकिटे माघारी न घेण्याच्या बोलीवरील असतील आणि लागणारे नंबर फक्त गेले. बिगर लागणारे राहिले तर ती तिकिटे अंगावर पडायची. त्यावेळी म्हणजे साधारण 93-94 साली या प्रकारच्या लॉटरीचे मोठे बूम आले होते. मी साधारण पंधरा दिवस हा सगळा प्रकार जवळून बघितला. पुढच्या पंधरा दिवसात हे आपल्याला जमेल का याचा विचार केला आणि महिना संपत असताना शांतपणाने मला जमणार नाही. मी बाहेर निघतो, असे म्हणून हजाराला काही शेपाचशे लागून आले तेवढे घेऊन या धंद्याला रामराम केला. माझ्यानंतर साधारण सहा महिने ते आठ महिने राजेश माचकर या सगळ्यांबरोबर राहिला. त्यानेही त्यांच्यातून कल्टी मारली. उरले शेवटी फक्त दोघे. बापू जागडे आणि राजा आरगे. काहीदिवस गिरीश लवळेकरनेही त्यांचे बघून या धंद्यात शिकत असतानाच नशीब अजमविण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही ते काही जमले नाही. त्या दोघांनी तो धंदा वाढविला. राजाने होलसेल तिकीट विक्रीची एजन्सी घेतली. त्यांची पार्टनरशीप पुढे साधारण सहा-सात वर्ष चालली. त्यानंतर आता राजाने पूर्ण व्यवसायात लक्ष केंद्रित केले आहे. त्याचा पिंडच तसा होता. पोलिसांनी त्रास द्यायला सुरवात केल्यावर त्याने लॉटरी बंद केली. त्यानंतर काही गाड्या घेतल्या. तो व्यावसाय केला. आता तो ट्रीप ऍरेंज करतो. कोथरूडला एक फ्लॅट दोन दुकाने, त्याशिवाय बालेवाडीजवळ चार एकर जमीन घेतल्याचे तो मध्ये काही दिवसांपूर्वी सांगत होता. त्याचे आणि माझे अजूनही चांगले संबंध आहेत. त्याच्या सगळ्या धंद्याचे रोपटे आम्ही एकत्रित लावले होते. हे तोही मान्य करतो.
या धंद्यातून बाजूला झाल्यावर राजा, बापू इतके जवळचे संबंध माझे माचकरशी राहिले नाहीत. आम्ही एसवायला फार जानी दोस्त होतो. मला त्यांच्या व्यवसायात पुढे काय झाले माहित नाही मात्र त्याने सायकॉलॉजी विषय निवडला. आम्ही वेगळ्या मार्गाने पुढे गेलो. तसे प्रत्येकाचे कुठे ना कुठे मन गेलेले असायचे. माचकर त्याची प्रेमकरण सांगायचा. बापूलाही कुठली तरी मुलगी आवडायची. राजाने पुढे बीएड्‌ करताना लव्ह मॅरेजच केले. त्याच्या लग्नाला मी गेलो होतो. माझी मात्र गोची व्हायची. स्वतःविषयी काही गोष्टी लपवून ठेवाव्या लागायच्या. त्यामुळे मी कॉलेजच्या पोरांच्या ग्रुपमध्ये मिसळणे कमी केले.  

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

मी चोरले माझे लग्न


  1. मी चोरले माझे लग्न
    खरे तर माझे लग्न म्हटले की माझ्या अंगावर आजही काटा उभा रहातो. माझे आयुष्य उत्तम चालले आहे. तशी कशाची फार अडचण आहे, अशातलाही भाग नाही. नाही म्हटले तरी घरचे मदतीला येतात. नोकरी आहे पण तरीही लग्न इतक्‍या लवकर झाले त्याने माझा चोळामोळा झाला. एफवाय संपले की माझे लग्न झाले. त्या लग्नाला राजा आरगे आणि राजेश माचकर असे दोघे आले होते. पुढे मी पाच वर्ष शिकलो पण एकूणच स्पर्धेत धावण्यासाठी जी एक मानसिक उर्मी लागते ती कमी झाली होती. पण एकदा लग्न झाले की पोरींशी बोलताना काही वाटत नाही. दडपण येत नाही. गरजेपुरता निरामय संवाद होतो. गरज नसेल तर काही संबंधच रहात नाही. मी माझे लग्न झाले आहे हे कुठेही उघड होऊ दिले नाही. माझे हे मित्रही इतके जिवाभावाचे की त्यांनी ते कधी सांगितले नाही. त्याचे एक प्रमुख कारण असे होते की मी ज्या होस्टेलवर रहात होतो तिथे तुमचे लग्न झाले असेल तर ऍडमिशन नाही, असा एक नियमच होता. तो नियम मी मोडला. नुसताच मोडला नाही त्यानंतर लग्न झाल्यावरही मी कसे शिक्षण घेतले हे मी लिहले. ते मी एमएला असताना सकाळमध्ये तरुणांचे जे पान होते तिथे लेख स्वरुपात छापून आले. जर्नालिझमचा माझा जवळचा मित्र अनिल घोळवेकडे मी हा मजकूर दिला होता. त्यानंतर होस्टेलवर माजी विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम होता. आर. व्ही. कुलकर्णींनी मला बघितले आणि क्षणभर त्यांना कळेना की या पोराला काय म्हणावे. इनामदार त्यावेळी प्राचार्य गरवारे कॉलेजचे होते.आपण इतके व्यवस्थेवर कमांड करणारे पण आपल्याला यानेही काही कळू दिले नाही, याची एक सल त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. खरे तर मी या होस्टेलवर रुढार्थाने तयार केलेला नियम मोडून रहाणे यात काही गैर होते, असे मला आजही वाटत नाही. याचे कारण असे की मी काही चुकीचे, अनैतिक, व्यवस्थेला बाधा येणारे वागत होतो, असे कधी झाल्याचे मला आठवत नाही. उलटपक्षी हजारो वर्ष इथल्या सगळ्याच व्यवस्थेवर कमांड असणाऱ्या समाजाला मला जवळून बघता आले. त्यांचे डावपेच जसे समजून घेता आले तसे त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकताही आल्या. पुण्यात मुळातच ब्राह्मण समाजाचे वर्चस्व आहे. आमच्या गावात एकही ब्राह्मणाचे घर नव्हते. मुस्लिम समाजाचे एकच घर आहे. त्यामुळे या दोन्ही समाजघटकांविषयमी माझ्या मनात त्या वयात कुतूहल असायचे. त्यामुळेच की काय या घटकांना मी ब्राह्मण समाजाला समजावून घेतले तेव्हा मी टर्न झालो. मला वाटायला लागले की माणूस म्हणून आपण जास्त पुढे गेले पाहिजे, माणसाला माणूस म्हणून ओळखायला हवे. त्याच्या जातीने, धर्माने त्याला मिळणारी ओळख हि समाजात फूट पाडणारी आहे. समाजाच्या स्वस्थाबरोबरच एकूण प्रगतीसाठी सुद्धा ते गरजेचे आहे. या बाबींचा इथे उल्लेख करायचे कारण असे की मला पोरांकडून आणि एकदा तरा एकी पोरीने विचारले "तू देशस्थ का रे?' मला घडीभर समजेना. पोरांना मी सांगायचो, ""माझी जात कोणती हे 1992 पर्यंत मलाही माहीत नव्हते. पण मी शेती करणाऱ्या शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. जगाचे भरणपोषण करणाऱ्या जमातीतला मी आहे. मी माणूस असणे इतके पुरेसे नाही का?'" पण त्यामुळेच की काय पुढे मला तरुण वयात ज्याज्या ठिकाणी बोलायची संधी मिळायची त्या त्या वेळी मी माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळाली पाहिजे, मुद्‌द्‌यावर फारच जोर द्यायचो. पोरीला मात्र मी देशस्थ असल्याचे सांगितले होते. त्यामुळे माझी जात कोणती याबाबत इथे गोची व्हायची. त्यात दुसरी बाब अशी की आडनावावरुन पोरांच्या काही लक्षातही येत नव्हते की याची नाळ नेमकी कुठली? पण त्याने फार फरक पडला नाही. असे मला आज प्रामाणिपणे वाटते. माणूस जसा जास्त खोलात जातो. इतिहासाची काही पाने शिकतो, त्यावेळी त्यातल्या गमतीजमती त्याच्या लक्षात येतात. (अपूर्ण)  

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०१५

फेसाळता उत्साह... राऊत सर

फेसाळता उत्साह... राऊत सर
गरवारे कॉलेजच्या या होस्टेलमध्ये मी तीन वर्ष राहिलो. आयुष्यातल्या या बहारदार कालखंडाचे माझ्या दृष्टीने दोन टप्पे होते. पहिला टप्पा एफवायचा. कॉलेजचा. प्रचंड जोश, दिवसेंदिवस वाढणारा जनसंपर्क, सोबत सतत कॉलेजमध्ये दहा-पंधरा पोरांना ग्रुप. आपण कुणीतरी आहोत आणि आपल्याला काहीतरी करायचे आहे म्हणून दाटलेली उर्मी. त्यातून इगल ग्रुप म्हणून विद्यार्थ्यांच्या गटाची केलेली स्थापना. कॉलेजच्या गेटवर, ग्राऊंडवर, स्टेडियमध्ये आम्ही रोजच जमायचो. काहीजण माझ्याकडे होस्टेलवर यायचे. रोज एक लिटर दूध मी घ्यायचो. काहीजण त्या दुधावरही ताव मारायचे. मी एनसीसीत होतो. कॉलेजच्या लायब्ररीतही गाजलेली पुस्तके शोधायचो. ती वाचून काढण्यासाठी रात्ररात्र जागायचो. राजेश माचकर, राजेश आरगे, बापू जागडे, गिरीश लवळेकर, अश्‍पाक मुजावर, जितेंद्र पायगुडे, विनोद सोंडनवर, गिरीश खळदकर, ठाकरे, अशी एक ना अनेक वर्गातली अनेक पोर रोजच बरोबर असायची. अनेक गंमती जमती त्यातून घडायच्या.
पोरांत मिसळणारे मास्तर म्हणून इतिहासाचे गणेश राऊत आणि इंग्रजीचे गिरीश पुंगलिया प्रसिद्ध होते. राऊत सर एक दिवस फ्रेंच राज्यक्रांती शिकवित होते. तुटीची राणी ही चौदाव्या लुईची बायको होती. ती लोकांना भाकरी नाही तर ब्रेड खा, असे काहीतरी सांगत होती. राऊत सरांनी बोलता बोलता एक उल्लेख चुकविला. मी हे अगोदर वाचलेले होते. तसे राऊतसरही नुकतेच एमए होऊन शिकवायला आलेले. त्यांचे लेक्‍चर संपल्यावर भर वर्गातच मी त्यांना म्हणालो, "तुटीच्या राणीविषयी जरा जादा माहिती सांगा.' त्यांची दांडी गुल झाल्यासारखी झाली. त्यांनी तिच्याविषयी पाचसहा वाक्‍य काहीतरी सांगितली, मात्र चुकविलेला उल्लेख त्यांच्या लक्षात आला. नंतर ते आमचे खूप जवळचे मागदर्शक झाले. पण अनेकदा ते एक गोष्ट सांगायचे, "माझे आत्मचरित्र मी जर लिहले तर राजाराम तुझा आणि मी घेतलेल्या पहिल्या तासाचा उल्लेख त्यात नक्की असणार.' राऊसतसरांनी "जर्नलिझम'चा डिप्लोमा केला होता. ते दैनिक प्रभातमध्ये काम करायचे. पत्रकारितेच्या क्षेत्रात मी यायला ज्या प्रमुख घटना कारणीभूत आहेत, त्यात राऊतसर हे सुद्धा आहेत. आता हे फिल्ड नेमके कसे आहे, याबाबत लिहणे हा स्वतंत्र विषय आहे, पण मला ते खूप आवडायचे. त्यांनी बरीच पुस्तके लिहली आहेत. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे त्यांचे पुस्तक वाचल्यावर आपण त्यांना फोन करावा, असे मला वाटले, पण नंबर नव्हता. मग एक दिवस पुण्याला त्यांच्या कॉलेजात गेलो. ते भेटले नाही. मग एक दिवस त्यांना फोन केला. आमच्या खूप गप्पा झाल्या. आमचे कॉलेजचे पहिले वर्ष आणि राऊतसर या अविभाज्य गोष्टी आहेत. आम्ही सगळेच तसे मध्यमवर्गीय किंवा त्यापेक्षाही खालच्या उत्पन्नगटातले. राऊतसरही आम्हाला आमच्या फार जवळचे वाटायचे. त्यामुळेच की काय पुढे मला फार रस नसतानाही आमच्या सगळ्या ग्रुपबरोबर मी इतिहास हा स्पेशल विषय निवडला. आता राऊतसर सकाळच्या बुधवारपेठेतील कार्यालयालाच लागून असलेल्या देसाई कॉलेजमध्ये आहेत. पुढे आमच्या वर्गातल्या हुशार म्हणून गणल्या गेलेल्या ज्योती भोसलेशी त्यांचे लग्न झाले. ते आम्हाला सरांपेक्षा मित्र जास्त वाटायचे. ते काय मित्रांनो, असा उल्लेखही करायचे. त्यांची चिकाटी, नव्या गोष्टी समजून घेण्याची तयारी मला आता खूप महत्वाची मागदर्शक वाटते.
दुसरे राहुल पुंगलिया सर. अत्यंत हुशार अशी इमेज. इंग्रजी शिकवायचे. टकाटक रहायचे. पोरांबरोबर काहीदा चहाला यायचे. त्यांचे लव्ह मॅरेज झाले होते. त्यांना त्यावेळी एक छोटी मुलगी होती. काहीदा ती त्यांच्याबरोबर यायची. ते शिकवायचेही फार मस्त. परवा पाचगणीजवळ खिंगरला अक्षर मानव समाज संमेलनात पुण्याच्या प्रशांत कांबळे या तरुणाची भेट झाली. माझ्यासारखाच तो त्यांचा विद्यार्थी. मी कंपल्सशीचा तर तो स्पेशल विषयाचा. तो सांगत होता की मास्तर असावा तर पुंगलिया सरांसारखा. असे म्हणत तो त्यांच्या कौतुकाच्या अनेक गोष्टी सांगत होता.
              (अपूर्ण)
 .....

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५

रिटायरमेंट आणि गेट टुगेदर


आर. व्ही कुलकर्णींवरील हा लेख चार फेब्रुवारी 2011 या तारखेला सोलापूर सकाळमध्ये पान 11 वर तर त्यानंतर तीन दिवसांनी सात तारखेला पुणे सकाळमध्ये टुडे पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे. ज्या दिवशी सोलापुरात प्रसिद्ध झाला खरे तर त्याच दिवशी तो तिकडेही प्रसिद्ध व्हायला हवा होता. पण वर्तमानपत्राच्या मोठ्‌या गंमती असतात. त्याच्याविषयी काही लिहायचे म्हटले तर तो एक स्वतंत्र खूप "इंटरेस्टिंग' विषय आहे. अचानकच काहीतरी उद्‌भवते आणि ठरविलेली गोष्ट काढून अन्य विषय पुढे न्यावे लागतात. सहसंपादक चंद्रशेखर पटवर्धन यांच्याकडे मी हा लेख दिला होता. ज्यादिवशी तो येणे अपेक्षित होते त्याच्या आदल्यादिवशी मी त्यांना फोन केला. मी म्हणालो, "लेख लागला नाही.'
ते म्हणाले, "मी लावूनच आलोय. काहीतरी गडबड झालेली दिसतेय. ठीक आहे मी उद्या गोल्यावर बघतो.'
त्यानंतर त्यांना मी म्हणालो, "माझा आमका तमका मजकूर छापा असा आग्रह मी कधीच धरत नाही. हा लेख नाही छापला तरी माझे काही मत नाही, मात्र येणार नाही, असे सांगितले असते तर बरे झाले असते. आपण वर्तमानपत्रात जे देतो, त्या चौकटीत हा लेख बसणारा आहे, असे माझे मत आहे.'
"होय राजाराम, तु काय मला लांबचा आहेस का? माझासुद्धा त्या कॉलेजशी संबंध आहे. आर. व्ही कुलकर्णी मला माहित आहेत. तुला मी खोट बोलतोय, असे वाटतंय का? खरेच काहीतरी अडचण आली असेल,' असे त्यांनी माझे सांत्वन केले. त्यानंतर मी त्यांच्याकडे या लेखाचा फॉलोअप घेतला नाही, मात्र तो दोन दिवसांनी प्रसिद्ध झाला.
हा लेख आल्यानंतर त्यादिवशी सकाळी सकाळी पहिली प्रतिक्रीया आली ती करमाळा तालुक्‍यातील जेऊरहून. डॉ. महावीर अब्बड यांनी एसएमएस केला होता. त्यांनी अभिनंदन करीत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या होत्या. माझ्या संपर्कात असतानाही ते या होस्टेलचे विद्यार्थी असल्याचे मी विसरलो होतो. जेऊरला चांगले मोठे हॉस्पीटल त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर बांधले आहे. माझ्या मागच्या बॅचमध्ये ते होते. प्रकृती किडकीडीत, कॉलेजमध्ये असतानाच डोळ्याला चष्मा लागलेला. करमाळा तालुक्‍यातीलच सावडी त्यांचे गाव. मला माहित असते तर या कार्यक्रमाला मी आलो असतो, असे ते म्हणाले. त्यानंतर दादा मराठेचाही फोन आला. कुर्डुवाडीत पंचायत समितीत तो काम करीत आहे. गाव त्याचे माढा तालुक्‍यातील निमगाव. घरच्यांचा एकुलता एक. फौजदारच व्हायचे म्हणून त्याने एनसीसीसह अनेक गोष्टी केल्या. आरडी परेडसाठी कष्ट घेऊन दिल्लीला राजपथावर संचलन करुन आला. पण प्रश्‍नपत्रिका फुटणे आणि अन्य झपाट्यात त्याला फौजदारची परीक्षा पास होणे काही जमले नाही. जिल्हा परिषदेकडे तो लागला. त्यादिवशी आपण जाऊ म्हणून त्याने फोन केला. मी कुर्डुवाडीत उतरलो. त्याच्या घरच्यांना भेटलो. त्याच्या आईचे दर्शन घेतले. रेल्वे चुकेल म्हणून पटकन स्टेशनवर येऊन जेवण केले. तिथून आम्ही पुण्याला मिळून गेलो. तिथे अनेकजण भेटले. त्यात दत्ता कदम, निखील गाडगीळ, अभिजित पिंपळे, मोनिका गांधी, होस्टेलचे मामा अशा अनेकांचा समावेश होता. हे होस्टेल मी एकदा पाहून घेतले आणि माझ्या अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यात मी एका अर्थाने परिचित होत होतो. त्याचे कारण त्या ठिकाणी होस्टेलविषयी महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला आणि "सकाळ'ने आर. व्ही विषयी लिहलेल्या लेखांची कात्रणे झेरॉक्‍स करुन सगळ्यांना दिली जात होती. त्यातला लेख तिथे आलाय म्हटल्यावर तरुण पोरांना वेगळे कौतुक वाटायचे. पण त्यातही एकदोघजण म्हणाले, "आर. व्ही. किती खडूस आणि त्यांच्यावर इतके काय लिहले रे?' त्याच्या चेष्टेच्या स्वराकडे मी फार लक्ष दिले नाही. तो दिवस मस्त गेला. यानिमित्ताने आर. व्हीशीं गप्पा झाल्या. कॉलेजचे प्राचार्य आणि आणखी काही मंडळी भेटली.
(अपूर्ण)  

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

मैत्र जीवाचे.... : छळ पुरुषांचाही.....

मैत्र जीवाचे.... : छळ पुरुषांचाही.....: छळ पुरुषांचाही..... जागतिक महिलादिन धुमधडाक्‍यात साजरा करण्यात येतो. महिलांवर होणाऱ्या अन्यायाची या निमित्ताने चर्चा होते. पण आता पुरुषा...

छळ पुरुषांचाही.....

छळ पुरुषांचाही.....

जागतिक महिलादिन धुमधडाक्‍यात साजरा करण्यात येतो. महिलांवर होणाऱ्या अन्यायाची या निमित्ताने चर्चा होते. पण आता पुरुषांचाही छळ होतो. त्याविषयी आपण काहीच बोलणार नाही का? आज साजरा होत असलेल्या पुरूषदिनानिमित्त एका संस्थेच्या माध्यमातून या प्रश्‍नाचा घेतलेला वेध...
------------------------------------------
महिलांचा छळ हा इथल्या पुरुषप्रधान व्यवस्थेतला सनातन प्रश्‍न आहे. महिलांनी आणि समाजसुधारकांनी त्याविरुद्ध आवाज उठविला. देशात 19 व्या शतकात ज्या चळवळी झाल्या त्या सगळ्या महिलांची स्थिती बदलली पाहिजे, या निष्कर्षाप्रत येऊन ठेपतात. "युनो'ने 1975 हे आंतरराष्ट्रीय स्त्री-मुक्ती वर्ष म्हणून साजरे केले. याबाबत प्रत्येक टप्प्यावर मंथन घडले आहे. काळानुरूप महिलांचे प्रश्‍न बदलत गेले. पण आता समाजाच्या पोटात पुरुषांच्या छळाची खदखदही सुरू आहे. हा कल्पनाविलास नाही. एका संस्थेची कागदपत्रे चाळल्यानंतर दिसलेली ही स्थिती आहे. "माझा काहीच दोष नाही. हे माझ्यासमोर नेमके काय वाढून ठेवले आहे. माझी यातून सुटका कशी होईल,' अशी आर्त हाक अनेक जण देत आहेत.
- - - - - - - -
"कौटुंबिक सल्ला - सेवा व मार्गदर्शन केंद्र' ही ती संस्था होय. तिच्या महाराष्ट्रात 66 तर देशात सहाशेपेक्षा जास्त शाखा कार्यरत आहेत. दिल्लीच्या समाजकल्याण मंडळाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य कल्याण मंडळ मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली ही केंद्र राज्यात चालविली जातात. सोलापुरात गेल्या 15 वर्षांपासून अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी हे केंद्र चालवीत आहे. जनजागृती आणि अन्य माध्यमातून लोकांना कौटुंबिक आधार देणाऱ्या केंद्राबाबत माहिती दिली जाते. पहिल्यांदा केंद्रात येणाऱ्या महिलेचे किंवा पुरुषाचे म्हणणे ऐकून घेतले जाते. बोलते करून त्यांना घुसमटीतून मोकळे केले जाते. त्यानंतर माहिती लिहून घेतली जाते. संबंधितांना बोलविले जाते. त्यांना समजावून या प्रश्‍नावर तोडग्याचे विविध पर्याय चोखळले जातात. प्रश्‍न सुटल्यानंतर पुढे सहा महिने फॉलोअप ठेवला जातो. प्रश्‍न मार्गी लागला तर फाईल बंद होते. काहींच्या बाबतीत कायदेशीर कार्यवाहीसाठी न्यायालयाकडे वर्ग केली जाते. एखाद्याबाबत पुन्हा जुनाच प्रश्‍न उद्‌भवला, तर ती "रिओपन' होते....
----------------------------------------------------------------
सोलापुरातील केंद्राकडे गेल्या वर्षभरात 154 तक्रारी आल्या आहेत. त्यात सर्वाधिक 41 अर्ज सासरी होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाबाबत आहेत. त्यानंतर 35 अर्ज पुरुषांचे आहेत. मुलींना वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळाल्यानंतर तो मागणाऱ्या महिलांचे प्रमाणही वाढले आहे. त्या प्रकारचे 17 अर्ज आहेत. वृद्धापकालीन समस्यांबाबत 14 अर्ज आले आहेत. याशिवाय लैंगिक छळ, विवाहबाह्य संबंध, गुप्तरोग, लग्नाआधीचे समुपदेशन अशा विविध प्रकारचे अर्ज आले आहेत. कौटुंबिक स्वास्थ्य टिकावे म्हणून झटणाऱ्या या संस्थेचा उद्देश महिलांना मानसिकदृष्ट्या मुक्त, स्वाभिमानी, स्वावलंबी करणे हा आहे. पण अनेकदा आपल्या नवऱ्याविरुद्ध अथवा सासू-सासऱ्याविरुद्ध अर्ज करणारी महिलाच सगळ्यांना हैराण करीत असल्याचे उघड होते. हे प्रमाणही मोठे आहे. "झाकली मूठ सव्वा लाखाची' या म्हणीप्रमाणे अनेक जण इभ्रतीला घाबरून काही बोलत नाहीत, असे कागदपत्र सांगतात.
- - - - - - - -
ती नोकरी करणारी मुंबईतील. बी.कॉम झालेली. तो बी.एस्सी. सातारा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील. दोघांचे लग्न झाले. तिला खेडेगावात करमेना. लग्नानंतरही तिने तिच्या मुंबईतील मित्राशी नवऱ्याला न कळता संपर्क ठेवलेला. तो तिला "नवऱ्याला घटस्फोट दे' म्हणून फूस लावायचा. ती दोनदा पळून गेली. तिच्या सांगण्यावरून नवरा तिला घेऊन शहरात राहायचे म्हणून सोलापुरात आला. ती एक दिवस केंद्रात आली. नवरा छळ करतो. मला घटस्फोट हवा, अशी तक्रार तिने केली. तिला एक मुलगी होती. तिच्या आईवडिलांना बोलवण्यात आले. त्यांनी सांगितले, की मुलाविषयी आमची काही तक्रार नाही. तिने त्याच्यावर पोलिस केस केली. तो व्यवसाय करायचा ती कागदपत्रे जाळली. अखेर तिला तिच्या आईवडिलांकडे सोडण्यात आले. ती गेली. त्याने तिच्यासाठी कितीतरी सोसले. पण तरीही आता तो आणि त्याचे अकरा महिन्यांचे बाळ दिशाहीन झाले आहे.... अशी अनेक प्रकरणे सांगता येतील. महिलांच्या हट्टीपणाची, दुराग्रहाची आणि अहंकाराची...
---------------------------------------------------------------------
सोलापुरातील केंद्रात अगदी सुरवातीपासून सुमित्रा आगरखेडकर समुपदेशक म्हणून काम करतात. समाजजीवनातील बदलत्या स्थितीविषयी त्या म्हणाल्या, ""आतापर्यंत आम्ही अनेक महिलांना न्याय मिळवून दिला. महिन्याला साधारण पंधरा-वीस जण आमच्याकडे मदतीसाठी येतात. पण मदतीच्या मागणीसाठी येणारी महिला अथवा मुलगीच दोषी आहे, असे ज्या वेळी आढळून येते त्या वेळी वाईट वाटते. अलीकडच्या काळात असे खूपदा आढळून येते. शिकलेल्या मुलींची महत्त्वाकांक्षा मोठी असते. मात्र त्यासाठी आपण आपल्याच माणसाला त्रास देतोय, हे अनेकदा त्यांच्या लक्षातही येत नाही. फार टोकाचे निर्णय घ्यायला त्या तयार होतात. त्यामुळे सध्या अनेक प्रकरणांमध्ये प्रश्‍नांची गुंतागुंत वाढत गेल्याचे जाणवते.
""सध्याचे कायदे समाजोपयोगी आहेत. मात्र त्याचा अनेकदा गैरवापर केल्याचे दिसून येते. असेच घडत राहिले, तर पुरुष अत्याचार निवारण केंद्राचीही उभारणी करावी लागेल. संस्कृतीची महती आपण नेहमी सांगत असतो पण बदलत्या जमान्यात आपण नेमके कुठे आहोत, याचाही विचार करावा लागणार आहे. कायद्याची माहिती न घेताच अनेकजणी भावाच्या संपत्तीत हक्क हवा म्हणून आमच्याकडे येतात. त्यातून कोर्टाचे खेटे सुरू होतात. पण आतापर्यंत अनेकांना न्याय मिळवून दिल्याचे समाधान आम्हाला आहे.''

पत्ता- कौटुंबिक सल्ला- सेवा व मार्गदर्शन केंद्र. 701, थोबडेवाडा. उत्तर कसबा. मल्लिकार्जुन मंदिराशेजारी. सोलापूर.
दूरध्वनी- 0217 2726311.


(हा माझा लेख 27 मार्च 2006 ला सकाळच्या मधुरा पुरवणीत प्रसिद्ध झाला होता ः राजाराम ल. कानतोडे) 

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

विद्यार्थी घडविणारे होस्टेलपीठ

सात फेब्रुवारी 2011
विद्यार्थी घडविणारे होस्टेलपीठ
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त पुण्यातील गरवारे महाविद्यालयाच्या होस्टेलमधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवारी पाच फेब्रुवारीला होत आहे. होस्टेलचे प्रदीर्घ काळ रेक्‍टर राहिलेले प्रा. आर. व्ही. कुलकर्णी हेही आपल्या जबाबदारीतून मुक्त होत आहेत. त्यानिमित्त या होस्टेल आणि त्यांच्या वेगळेपणाविषयी....
राजाराम ल. कानतोडे
-----------------------------
प्रेमाने जवळ न घेता अथवा शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांत कटू भावना निर्माण होईल, असे न वागता अनेक शिक्षक आपल्या वागण्यातून विद्यार्थ्यांत स्फूर्ती जागवत असतात. न सांगताही मग विद्यार्थी त्यांच्यामागे चालू लागतात आणि आयुष्याला आकार येतो. असे हजारो विद्यार्थी घडविणारे गरवारे महाविद्यालयाचे निवृत्त प्रभारी प्राचार्य आर. व्ही. कुलकर्णी हे एक चालतेबोलते होस्टेलपीठ आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. गेल्या दोन तपांपेक्षा जास्त काळ आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे होस्टेल आणि आर. व्ही. सर हे एक अतूट नाते आहे. त्यातले केवळ तीन वर्षे मी या वसतिगृहात राहिलो. मी माझ्या आयुष्याकडे बघतो त्या वेळी केत्तूर (ता. करमाळा) सारख्या आडगावातून आलेल्या माझ्यासारख्याला या होस्टेलने जे दिले ते शब्दात व्यक्तच करता येत नाही. असे बरेच आहेत ज्यांना आर. व्ही. सरांनी घडवले. वॉर्डन मोहन यादव रशियात, प्रशांत तानवडे, महेश देशपांडे अमेरिकेत आहेत. निखिल गाडगीळच्या लंडनला सारख्या वाऱ्या सुरू असतात. विद्येश गोवंडे संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे. अभिजित पिंपळे सी.ए. झाला. लोकेश गुजराप्पा, शैलेश दाभोळे, संजय जोशी, सुपर्णा अष्टेकर, हरीश सारडा हेही आपापल्या फील्डमध्ये आघाडीवर आहेत. जॉन व्हिक्‍टर, चकोर बाविस्कर, हरीश मेहता, दत्ता कदम, जितेंद्र राक्षे, सूरज शहा, दीपक लोहार, रवींद्र भारदे अशी मागेपुढे असणाऱ्यांची ही यादी लांबवायची म्हटले तर खूप मोठी होईल. आयुष्याच्या अतिशय महत्त्वाच्या कालखंडात होस्टेलचे कुटुंबप्रमुख म्हणून आर. व्ही. सरांनी भरलेली ऊर्जा त्याला कारणीभूत आहे. ती आयुष्यात अनेक ठिकाणी उपयोगी पडते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, ते ठरवून काही करत नव्हते. होस्टेलच्या व्यवस्थेचा भाग म्हणून सगळ्यांना ते वाटत गेले. नवे उपक्रम राबवीत गेले. त्याने हजारो जण आपोआप घडत गेले.
विद्यार्थ्यांच्या लेखनाला स्थान देणारा पालवीसारखा वार्षिकांक काढणारे गरवारे कॉलेजचे होस्टेल हे एकमेव असावे. विद्यार्थी असताना दीपा बेंदूर, शैलेश दाभोळ, प्रांजली दाऊदखाने यांना 1994 मध्ये सुभाष घई यांच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकाची व्यासपीठावर थेट मुलाखत घेता येते. या गोष्टी स्वप्नवत वाटत असल्या तरी त्या सत्यात आर. व्ही. सर उतरवीत होते. संधी मिळतेय म्हटल्यावर भावनेच्या भरात अनेक जण वक्तृत्व स्पर्धेत, काव्यवाचनात, व्यासपीठावर काहीबाही बोलल्यावरही ज्या-त्या गोष्टी जिथे-तिथे विद्यार्थ्यांना सांगून अनेकांना त्यांनी लाइनवर आणले. मुला-मुलींचे होस्टेल एकमेकांना लागून आहे, पण त्या सगळ्या वातावरणात आर. व्हीं.चा धाक भरून राहिलेला असायचा. मुला-मुलींचे परस्परसंबंध कसे निकोप ठेवता येऊ शकतात, याचे हे होस्टेल एक मूर्तिमंत उदाहरण आहे. मुलांनी सगळ्या कार्यक्रमात भाग घेऊन आपले व्यक्तिमत्त्व फुलवत असताना त्याचा अभ्यासावर परिणाम होणार नाही, यावरही त्यांचे लक्ष असायचे. कुणाचा कुठे उपयोग करून घ्यायचा याबाबतही त्यांचा दांडगा हातखंडा आहे.
केवळ होस्टेलचे रेक्‍टर म्हणून नव्हे, तर इतर अनेक संस्थांतही आर. व्ही. कुलकर्णी सर कार्यरत होते, आहेत. एन. सी. सी., रेड क्रॉस, विज्ञान भारती, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अशा विविध ठिकाणी ते काम करीत असल्यामुळे अनेक संधींची माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्यामुळे मिळायची. एनसीसीमध्ये आर. डी. परेड (प्रजासत्ताक दिन संचलन) साठी पूर्वी सहा किलोमीटर धावावे लागत होते. दादा मराठे, मोहन यादव याच्यासह अनेकांची त्यांनी तयारी करून घेतल्याने ते राजपथावर संचलन करू शकले. रेड क्रॉसला मदत मिळावी म्हणून गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत लावलेल्या स्टॉलमध्ये सामाजिक कामातही धमाल अनुभवता यायची. ते कुठलेही काम स्वतः करतात, त्यानंतर विद्यार्थ्यांना त्याबाबत सांगतात. स्वतः त्यांनी 48 वेळा रक्तदान केले आहे. सतत तीन वर्षे सर्वाधिक रक्तसंकलन केल्याबद्दल त्यांना पुरस्कार मिळाला. सेवाभावी कार्याबद्दल राज्यपालांकडून गौरव करण्यात आला. त्यांना अनेक सन्मान मिळाले. आपल्या मोठेपणाबाबत ते नेहमी मौन बाळगतात. आपल्या मोठेपणापेक्षा आपले काम महत्त्वाचे, ही त्यांची धारणा घडोघडी दिसते. त्यांच्यासारख्या शिक्षकांची आज गरज आहे. सगळा समाज मौज-मस्तीच्या मागे धावत आहे. नैतिकतेचा अभाव ही समाजाची जणू ओळख होऊ पाहत आहे. अशा कालखंडात आर. व्ही. सरांसारखे जीवनशिक्षण देणारे शिक्षक गरजेचे आहेत. 

सोमवार, २ नोव्हेंबर, २०१५

ऋणानुबंधाच्या गाठी

एसटीने आपण एक गावाहून दुसऱ्या गावाला प्रवास करावा. त्यात अनेकांशी मैत्री व्हावी. आपापला थांबा आली की प्रत्येकाने आपापल्या मार्गाने पुढे निघावे, तशी ही कॉलेजची वर्ष असता. या ऋणानुबंधाच्या गाठी मनात कायमच रुंजी घालतात.
----------
मैतर जिवाचे लेखाविषयी अनेक प्रतिक्रिया आल्याच. त्या कुणी दिल्या, काय दिल्या, ही मोठी जंत्री होईल. त्यातल्या दोन सांगतो. एक म्हणजे त्याच वेळी एका रविवारी संजय आवटे याने फोन करुन मैत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आवटे माझा मित्र आहे. तरीही आमच्यात एक अंतर आहे. पाचवी ते दहावी आम्ही एका वर्गात होतो. पुढे आमचे मार्ग वेगळे झाले. पुणे विद्यापीठात पुन्हा आम्ही होस्टेवर एकाच वेळी एक वर्षभर होतो. विद्यापीठात आम्ही तशा अनेक रात्री गप्पा मारत जागवत काढल्या. आम्ही गप्पा मारायचो, रात्रीचे दोन, तीन, चार, पाच वाजायचे. रुम पार्टनरच्या झोपेचे खोबरे झालेले असायचे. तो वैतागयचा. आमच्या गप्पांचा विषय कायम राजकारण, समाजकारण हाच असायचा. आपल्याला काय करता येईल, याचे आराखडे आम्ही बांधत रहायचो. पण पुढे त्याचे काहीच झाले नाही. पण त्याने पत्राकारितेत जी धडक मारली ती कुणीही कौतुक करावं अशीच आहे. मी पत्रकारितेचा कोर्स त्याच्याआधी एक वर्ष केला मात्र तो "सकाळ'मध्ये माझ्याआधी साधारण सहा महिने लागला. कायम होण्याच्यादिवशीच त्याने सकाळ सोडला. सोलापूरला संचारमध्ये वृत्तसंपादक म्हणून रुजू झाला. त्यावेळी त्याचे वय जेमतेम 23-24 असेल. इतक्‍या कमी वयात त्याने सोलापूरलासुद्धा ज्या पद्धतीने काम केले, एक त्याचा चाहता वर्ग इथे तयार झाला आहे. खरे तर पत्रकारितेत वरच्या पदावर काम करणे म्हणजे तसे अवघड असते कारण इथे सगळेच हुशार असतात. तुम्हाला तुम्ही कायम त्यांच्या चार पावले पुढे आहे, हे दाखवता आले नाही तर गडबड होते. सोलापूर, अकोला, पुणे, अलिबाग आता मुंबई, असे प्रत्येक ठिकाणी त्याने संपादक, वृत्तसंपादक अशा प्रमुख पदांवरच काम केले. सगळीकडे मालकांनी, व्यवस्थापनाने संपादकांना, संपादकीय विभागातील वरिष्ठांना काढून टाकण्याच्या दिवसांच्या कालखंडात त्यांना घुमवणारा, तुमच्याशी जमत नाही, मीच आता सोडतो, असे म्हणणारा एखाद्या तरुण पोरगा असावा, याला तोडच नव्हती. काही पुस्तकेही त्याच्या नावार आहेत. पण त्याची एक गोष्ट मला कायम भुरळ घालत आली आहे त्याला जे म्हणायचे आहे त्याच्याशी तो कधीच तडजोड करीत नाहीत. तो हुशार आहे का तर मी म्हणेन हुशार अनेकजण असतात, पण स्वतःला प्रेझेंट करण्याचे, स्वतःच्या मतावर ठाम राहण्याचे आणि हे सगळे कटुता न येऊ देता समोरच्याला न दुखवता करण्याचे त्याचे स्कील वादातीत आहे.
दुसरी प्रतिक्रिया अगदी अलीकडे मिळाली. ती ऐकल्यामुळेच आपण हा लेखामागचा लेख लिहिला पाहिजे, असे मला वाटले. केंद्र सरकारकडे प्रादेशिक माहिती अधिकारी अंकुश चव्हाणबरोबर मी सोलापूरचे सहायक पोलिस आयुक्त पी. आर. पाटील यांच्याकडे गेलो होतो. त्यांची आणि अंकुशची कोल्हापूरची ओळख होती. अंकुशने माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. ते घडीभर थांबले. मी तुम्हाला ओळखतो. मला कळेना आमची ओळख कुठे झाली. मी कोल्हापुरात होतो. पण माझी त्यांच्याशी कधी थेट ओळख झाल्याचे मला आठवत नव्हते. ते म्हणाले, "तुमचा युवा सकाळचा लेख माझ्या अजून लक्षात आहे. तुम्ही त्या तीन मित्रांची नावे का लिहिली नव्हती हो.' मला घडीभर काय बोलावे हे कळेना. मी काहीतरी म्हणून वेळ मारुन नेली आणि पुढे आपण या तिघांबरोबर कोल्हापुरात संपर्कात आलेल्या काही मित्रांविषयी लिहायचे, असा मी ठरविले.

तसे हे राजाराम कॉलेजचे दिवस फार भारी होते. किती गोष्टी सांगाव्यात याला पारावार राहणार नाही. माझे गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यातील केत्तूर. मी इतक्‍या लांब आणि तेही आर्ट शिकायला कसे गेलो, असे अजूनही मला अनेकजण विचारतात. तसे कारण काहीच नव्हते पण चांगले मार्क पडले होते, पैलवानांचे गाव म्हणून कोल्हापूरचे आकर्षण होतेच. तसे हे गाव दिलदार आहेच. त्यात राजाराम कॉलेज, शिवाजी विद्यापीठ, ऍग्रिकल्चर कॉलेज, गव्हर्मेंट पॉलिटेक्‍निक आणि शाहू इन्टिट्युट म्हणजे सायबर हा सगळा हजार-दीड हजार एकराचा परिसर विद्यार्थ्यांनी फुलेला असतो. या परिसरात रहायला मिळणे हा तसा एक मोठा संधीचा भाग असतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर या भागात इतके मस्त वातावरण असते की ते सांगायला कवीची प्रतिभा पाहिजे. कोणत्याही आई वडिलांना आपला मुलगा चांगला शिकावा, असे वाटतेच. पण त्यापलीकडे माझ्या दोन नंबरच्या भावाला म्हणजे कारभाऱ्याला गावात शंकाप्पा म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि घरात सगळेजण बापू म्हणतात त्याला मी पैलवानकीत नाव कमवावे, असे वाटायचे. त्याचे काय झाले पुढे सांगेन. पण माझा दुसरा भाऊ तुकाराम बुवालाही माझ्या शिक्षणाचे कौतुक होते. तोच पहिल्यांदा माझ्याबरोबर ऍडमिशन घ्यायला आला. सोडवायला कारभारी आला. पुढचा शिक्षणाचा सगळा प्रवास माझा मी एकट्याने केला.
जाता जाता दोघांची नोंद करायला पाहिजे. तिथे कुणी गावाकडचे किंवा गावाजवळचे भेटले की चांगले वाटायचे. एकदा भाऊ कानतोडे माझ्याकडे आला होता. आम्ही दोघ त्यावेळीही कोल्हापूर खूप फिरलो. भरपूर गप्पा मारल्या. त्यानंतर एकदा पोमलवाडीचा हनुमंत पाटीलही भेटला होता. तो राजाराम कॉलेजचाच विद्यार्थी होता. राजकुमार लोटके त्याचा जवळचा मित्र होता. त्याच्याशी अनेक विषयांवर गप्पा मारल्या होत्या. भाऊ आणि हनुमंत हे दोघेही तसे खूप चांगले होते, पण काळाने दोघांवरही अकाली झडप घातली. दोघांचेही वेगवेगळ्या घटनांमध्ये खून झाले. जेव्हा जेव्हा या दोघांचा कुठे बोलताना विषय येतो त्यावेळी मला मी अनुभवलेला त्यांच्यातला उमेदपणा दिलदारपणा विसरता येत नाही. पण सगळ्या गोष्टींवर काळ हेच औषध असते. एखाद्या एसटीने आपण एक गावाहून दुसऱ्या गावाला प्रवास करावा. त्यात अनेकांशी मैत्री व्हावी. आपापला थांबा आली की प्रत्येकाने आपापल्या मार्गाने पुढे निघावे, तशी ही कॉलेजची दोन वर्ष होती. सांगण्यासारखे आणखी खूप आहे पण या लेखाच्या निमित्ताने एवढेच पुरेसे आहे... या ऋणानुबंधाच्या गाठी मनात कायमच रुंजी घालतात. तसा प्रत्येकाचा हा वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षाचा काळ जडणघडणीचा असतो. तुम्हाला तुमचे दिवस आठवले. मैत्रभाव जागा झाला तर या लेखाचे सार्थक झाले असे मी म्हणेन.....
----------------------

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

राजाराम कॉलेजचे सवंगडी...

राजाराम कॉलेजचे सवंगडी... 
चांगले असणारे अनेकजण राजाराम कॉलेजच्या होस्टेलमध्ये मला सिनिअर म्हणून भेटले. कुंभारगाव (ता. करमाळा)चे राजकुमार लोटके, कोळेगाव (माळशिरस)चे धनंजय दुपडे, पवारवाडी (ता. फलटण)चे संजय पवार, भाऊसाहेब चव्हाण, आसूचे अनिल पवार, एम. टी. कोथळी अशी कितीतरी नावे घेता येतील. एमटी कोथळीकडे गाडी असायची. मला त्याच्या मागे बसायला मिळायचे हेच फार भारी वाटायचे. माझा मोठा भाऊ माझ्याकडे एकदा आला. त्यावेळी गोकुळ प्रकल्प बघायला शिरगावला आम्ही तिघे त्याच्या गाडीवर गेलो होतो. दादा कोंडकेचा पिक्‍चर बघितला होता. वर्गात आमचा सहा-सातजणांचा ग्रुप फार घट्ट होता. त्यात शांतराज मारुडा, जे. जे. शिंदे. विजय मोहिते, शरद मुळीक, प्रशांत शेंडे आणि मी असे आम्ही रोजच एकमेकांना भेटायचो. त्यात शांतराजसह सगळ्यांचा अजून संपर्क आहे मात्र एकमेकांना वेळ देणे होत नाही. सगळ्यांनी आयुष्यात अनेक धक्के पचविले. त्यावेळी आम्ही तसे एकमेकांच्या मदतीला जाऊ शकलो नाही. सुरवातीला प्रशांत शेंडेची दोनतीन वर्ष दिवाळी शुभेच्छांची पत्रे आली. पण परत जसेच्या तसे सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले. शांतराज मला जबरदस्त वाटायचा. गॅदरिंगच्यावेळी त्याने माझ्याशी एक पैज लावली. कार्यक्रम सुरू होणार होते, तो म्हणाला, "टेबलवर जो तांब्या ठेवला आहे, त्याच्यातले पाणी पिऊन यायचे. मी सगळ्यांना नास्ता देणार. सभागृह तुंबाड भरले होते. मी थेट व्यासपीठावर गेलो. पाणी पिण्याचे माझे धाडस झाले नाही मात्र तिथे उभ्या असलेल्या सरांना म्हणालो, "सर पाणी प्यायचे.' ते म्हणाले, "जा की बाहेर. इथे कुठे आहे पाणी?'' मी आलो उतरून खाली. त्याने नाश्‍ता नाही मात्र चहा दिला. शांतराजने मला एक शर्टचे कापड दिले होते. इतके भारी होते ते की त्याचा पांढरा रंग शर्ट जसाजसा धुतला जाईल तसातसा आणखी शुभ्र होत जाई. आता तो माझ्यावर नेहमी वैतागतो. एकदा तर "का रे, लय शहाणा झालास का?' म्हणून मला दमही टाकला. पण खरेच मला कामाच्या या सगळ्या धबडग्यातून वेळच होत नाही. काय करणार? 
माझा होस्टेवरचा रुमपार्टनर मनोहर चव्हाणविषयी माझे मन अजूनही भरून येते. माणसाने सज्जन असावे, पण इतके? परिस्थीती थोडी बेताचीच होती पण कधी बाबा कुणापुढे कशालाच हात पसरत नव्हता. बहिणीकडे जाऊन जेवण करायचा. तिला काही व्यवसायात मदत करायचा. त्यातून आपल्या सगळ्या फिया भागवायचा. बारावी संपल्यावर माझी जुनी घेतलेली सायकल मी त्याला शंभर दीडशेला विकली. सहाजिकच त्याच्याकडे मला द्यायला पैसे नव्हते मग त्याने ते पैसे मनिऑर्डर करून पाठविले. मला ते पुण्यातल्या गरवारे कॉलेज होस्टेलमध्ये उपयोगाला आले. त्याची आर्थिक स्थिती नव्हती पण त्याला सलाम करावा, असा प्रामाणिकपणा त्याच्याकडे होता. 
या होस्टेवर हिंदीतला आर. माधवन हा सध्याचा आघाडीचा नटसुद्धा त्याच दरम्यानच होता. तोही विश्‍वास नांगरे पाटील यांच्या बॅचचा होता. इंग्लिश स्पोकनचा क्‍लास घेण्याचा प्रयोग त्याने होस्टेलवर एकदा केला. मी एक दिवस त्याचा विद्यार्थी होतो. एकदा मी तोंड धुतले आणि लुंगी गुंडाळून थेट तो क्‍लास घ्यायचा त्या रीडिंग रुमध्ये जाऊन बसलो. त्याने मला उठवले. पॅंट घालूनच क्‍लासमध्ये यायचे, असे सांगितले. त्यानंतर मी काही क्‍लासला गेलो नाही आणि त्यानेही काही दिवसांनी तो गुंडाळला. तो एनसीसीत होता. त्याने आरडी परेड केली. त्यामुळे त्याची एकूण बॉडीलेग्वेज आजही एकदम सावधान अशी दिसते. 
या लेखाविषयी अनेक प्रतिक्रिया आल्याच. त्या कुणी दिल्या, काय दिल्या, ही मोठी जंत्री होईल. त्यातल्या दोन सांगतो. एक म्हणजे त्याच वेळी एका रविवारी संजय आवटे याने फोन करुन मैत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मी म्हणालो, आज मैत्र दिन आहे काय? तो म्हणाला तुम्ही लेख लिहिणार आणि मैत्र दिन आम्हाला विचारणार. मला खरेच त्यावेळी मैत्र दिन त्याच दरम्यान असल्याचे कळले. लेख लिहिताना हा संदर्भ माझ्या डोक्‍यात अजिबातच नव्हता. आवटे माझे आणि मी त्याचे कायम चांगले चिंतणारा जवळचा मित्र आहे. तरीही आमच्यात एक अंतर आहे. पाचवी ते दहावी आम्ही एका वर्गात होतो. पुढे आमचे मार्ग वेगळे झाले. पुणे विद्यापीठात पुन्हा आम्ही होस्टेवर एकाच वेळी एक वर्षभर होतो. विद्यापीठात आम्ही तशा अनेक रात्री गप्पा मारत जागवत काढल्या. आम्ही गप्पा मारायचो, रात्रीचे दोन, तीन, चार, पाच वाजायचे. रुम पार्टनरच्या झोपेचे खोबरे झालेले असायचे. तो वैतागयचा. आमच्या गप्पांचा विषय कायम राजकारण, समाजकारण हाच असायचा. आपल्याला काय करता येईल, याचे आराखडे आम्ही बांधत रहायचो. पण पुढे त्याचे काहीच झाले नाही. पण त्याने पत्रकारितेत जी धडक मारली तिचा मला कायम अभिमान वाटत आला आहे. मी पत्रकारितेचा कोर्स त्याच्याआधी एक वर्ष केला मात्र तो "सकाळ'मध्ये माझ्याआधी साधारण सहा महिने लागला. कायम होण्याच्यादिवशीच त्याने सकाळ सोडला. सोलापूरला संचारमध्ये वृत्तसंपादक म्हणून रुजू झाला. त्यावेळी त्याचे वय जेमतेम 23-24 असेल. इतक्‍या कमी वयात त्याने सोलापूरलासुद्धा ज्या पद्धतीने काम केले, एक त्याचा चाहता वर्ग इथे तयार झाला आहे. खरे तर पत्रकारितेत वरच्या पदावर काम करणे म्हणजे तसे अवघड असते कारण इथे सगळेच हुशार असतात. तुम्हाला तुम्ही कायम त्यांच्या चार पावले पुढे आहे, हे दाखवता आले नाही तर गडबड होते. सोलापूर, अकोला, पुणे, नवी मुंबई, आता अलिबाग, पुणे आणि मुंबई असे प्रत्येक ठिकाणी त्याने संपादक, वृत्तसंपादक अशा प्रमुख पदांवरच काम केले. आता साम वाहिनीवर आवाज महाराष्ट्राचा गाजवतोय. कार्यक्रम सगळीकडे मालकांनी, व्यवस्थापनाने संपादकांना, संपादकीय विभागातील वरिष्ठांना काढून टाकण्याच्या दिवसांच्या कालखंडात त्यांना घुमवणारा, तुमच्याशी जमत नाही, मीच आता सोडतो, असे म्हणणारा एखाद्या तरुण पोरगा असावा, याला तोडच नाही. काही पुस्तकेही त्याच्या नावार आहेत. पण त्याची एक गोष्ट मला कायम भुरळ घालत आली आहे त्याला जे म्हणायचे आहे त्याच्याशी तो कधीच तडजोड करीत नाहीत. तो हुशार आहे का तर मी म्हणेन हुशार अनेकजण असतात, पण स्वतःला प्रेझेंट करण्याचे, स्वतःच्या मतावर ठाम राहण्याचे आणि हे सगळे कटूता न येऊ देता, समोरच्याला न दुखवता करण्याचे त्याचे स्कील वादातीत आहे. त्यामुळे त्याने लेखावर दिलेली प्रतिक्रीया मला महत्वाचीच वाटते. 
दुसरी प्रतिक्रिया अगदी नुकतीच मिळाली. ती ऐकल्यामुळेच आपण हा लेखामागचा लेख लिहला पाहिजे, असे मला वाटले. केंद्र सरकारकडे प्रादेशिक माहिती अधिकारी अंकुश चव्हाणबरोबर मी सोलापूरचे सहायक पोलिस आयुक्त पी. आर. पाटील यांच्याकडे गेलो होतो. त्यांची आणि अंकुशची कोल्हापूरची ओळख होती. अंकुशने माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. ते घडीभर थांबले. मी तुम्हाला ओळखतो. मला कळेना आमची ओळख कुठे झाली. मी कोल्हापुरात होतो. पण माझी त्यांच्याशी कधी थेट ओळख झाल्याचे मला आठवत नव्हते. ते म्हणाले, "तुमचा युवा सकाळचा लेख माझ्या अजून लक्षात आहे. तुम्ही त्या तीन मित्रांची नावे का लिहिली नव्हती हो.' मला घडीभर काय बोलावे हे कळेना. मी काहीतरी म्हणून वेळ मारुन नेली आणि पुढे आपण या तिघांबरोबच कोल्हापुरात संपर्कात आलेल्या काही मित्रांविषयी लिहायचे, असा मी ठरविले. 
(अपूर्ण)