फेसाळता उत्साह... राऊत सर
फेसाळता उत्साह... राऊत सर
गरवारे कॉलेजच्या या होस्टेलमध्ये मी तीन वर्ष
राहिलो. आयुष्यातल्या या बहारदार कालखंडाचे माझ्या दृष्टीने दोन टप्पे होते. पहिला
टप्पा एफवायचा. कॉलेजचा. प्रचंड जोश, दिवसेंदिवस वाढणारा जनसंपर्क, सोबत सतत
कॉलेजमध्ये दहा-पंधरा पोरांना ग्रुप. आपण कुणीतरी आहोत आणि आपल्याला काहीतरी करायचे
आहे म्हणून दाटलेली उर्मी. त्यातून इगल ग्रुप म्हणून विद्यार्थ्यांच्या गटाची
केलेली स्थापना. कॉलेजच्या गेटवर, ग्राऊंडवर, स्टेडियमध्ये आम्ही रोजच जमायचो.
काहीजण माझ्याकडे होस्टेलवर यायचे. रोज एक लिटर दूध मी घ्यायचो. काहीजण त्या
दुधावरही ताव मारायचे. मी एनसीसीत होतो. कॉलेजच्या लायब्ररीतही गाजलेली पुस्तके
शोधायचो. ती वाचून काढण्यासाठी रात्ररात्र जागायचो. राजेश माचकर, राजेश आरगे, बापू
जागडे, गिरीश लवळेकर, अश्पाक मुजावर, जितेंद्र पायगुडे, विनोद सोंडनवर, गिरीश
खळदकर, ठाकरे, अशी एक ना अनेक वर्गातली अनेक पोर रोजच बरोबर असायची. अनेक गंमती
जमती त्यातून घडायच्या.
पोरांत मिसळणारे मास्तर म्हणून इतिहासाचे गणेश राऊत आणि
इंग्रजीचे गिरीश पुंगलिया प्रसिद्ध होते. राऊत सर एक दिवस फ्रेंच राज्यक्रांती
शिकवित होते. तुटीची राणी ही चौदाव्या लुईची बायको होती. ती लोकांना भाकरी नाही तर
ब्रेड खा, असे काहीतरी सांगत होती. राऊत सरांनी बोलता बोलता एक उल्लेख चुकविला. मी
हे अगोदर वाचलेले होते. तसे राऊतसरही नुकतेच एमए होऊन शिकवायला आलेले. त्यांचे
लेक्चर संपल्यावर भर वर्गातच मी त्यांना म्हणालो, "तुटीच्या राणीविषयी जरा जादा
माहिती सांगा.' त्यांची दांडी गुल झाल्यासारखी झाली. त्यांनी तिच्याविषयी पाचसहा
वाक्य काहीतरी सांगितली, मात्र चुकविलेला उल्लेख त्यांच्या लक्षात आला. नंतर ते
आमचे खूप जवळचे मागदर्शक झाले. पण अनेकदा ते एक गोष्ट सांगायचे, "माझे आत्मचरित्र
मी जर लिहले तर राजाराम तुझा आणि मी घेतलेल्या पहिल्या तासाचा उल्लेख त्यात नक्की
असणार.' राऊसतसरांनी "जर्नलिझम'चा डिप्लोमा केला होता. ते दैनिक प्रभातमध्ये काम
करायचे. पत्रकारितेच्या क्षेत्रात मी यायला ज्या प्रमुख घटना कारणीभूत आहेत, त्यात
राऊतसर हे सुद्धा आहेत. आता हे फिल्ड नेमके कसे आहे, याबाबत लिहणे हा स्वतंत्र विषय
आहे, पण मला ते खूप आवडायचे. त्यांनी बरीच पुस्तके लिहली आहेत. आधुनिक
महाराष्ट्राचा इतिहास हे त्यांचे पुस्तक वाचल्यावर आपण त्यांना फोन करावा, असे मला
वाटले, पण नंबर नव्हता. मग एक दिवस पुण्याला त्यांच्या कॉलेजात गेलो. ते भेटले
नाही. मग एक दिवस त्यांना फोन केला. आमच्या खूप गप्पा झाल्या. आमचे कॉलेजचे पहिले
वर्ष आणि राऊतसर या अविभाज्य गोष्टी आहेत. आम्ही सगळेच तसे मध्यमवर्गीय किंवा
त्यापेक्षाही खालच्या उत्पन्नगटातले. राऊतसरही आम्हाला आमच्या फार जवळचे वाटायचे.
त्यामुळेच की काय पुढे मला फार रस नसतानाही आमच्या सगळ्या ग्रुपबरोबर मी इतिहास हा
स्पेशल विषय निवडला. आता राऊतसर सकाळच्या बुधवारपेठेतील कार्यालयालाच लागून
असलेल्या देसाई कॉलेजमध्ये आहेत. पुढे आमच्या वर्गातल्या हुशार म्हणून गणल्या
गेलेल्या ज्योती भोसलेशी त्यांचे लग्न झाले. ते आम्हाला सरांपेक्षा मित्र जास्त
वाटायचे. ते काय मित्रांनो, असा उल्लेखही करायचे. त्यांची चिकाटी, नव्या गोष्टी
समजून घेण्याची तयारी मला आता खूप महत्वाची मागदर्शक वाटते.
दुसरे राहुल
पुंगलिया सर. अत्यंत हुशार अशी इमेज. इंग्रजी शिकवायचे. टकाटक रहायचे. पोरांबरोबर
काहीदा चहाला यायचे. त्यांचे लव्ह मॅरेज झाले होते. त्यांना त्यावेळी एक छोटी मुलगी
होती. काहीदा ती त्यांच्याबरोबर यायची. ते शिकवायचेही फार मस्त. परवा पाचगणीजवळ
खिंगरला अक्षर मानव समाज संमेलनात पुण्याच्या प्रशांत कांबळे या तरुणाची भेट झाली.
माझ्यासारखाच तो त्यांचा विद्यार्थी. मी कंपल्सशीचा तर तो स्पेशल विषयाचा. तो सांगत
होता की मास्तर असावा तर पुंगलिया सरांसारखा. असे म्हणत तो त्यांच्या कौतुकाच्या
अनेक गोष्टी सांगत होता.
(अपूर्ण)
.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा