शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

मी चोरले माझे लग्न


  1. मी चोरले माझे लग्न
    खरे तर माझे लग्न म्हटले की माझ्या अंगावर आजही काटा उभा रहातो. माझे आयुष्य उत्तम चालले आहे. तशी कशाची फार अडचण आहे, अशातलाही भाग नाही. नाही म्हटले तरी घरचे मदतीला येतात. नोकरी आहे पण तरीही लग्न इतक्‍या लवकर झाले त्याने माझा चोळामोळा झाला. एफवाय संपले की माझे लग्न झाले. त्या लग्नाला राजा आरगे आणि राजेश माचकर असे दोघे आले होते. पुढे मी पाच वर्ष शिकलो पण एकूणच स्पर्धेत धावण्यासाठी जी एक मानसिक उर्मी लागते ती कमी झाली होती. पण एकदा लग्न झाले की पोरींशी बोलताना काही वाटत नाही. दडपण येत नाही. गरजेपुरता निरामय संवाद होतो. गरज नसेल तर काही संबंधच रहात नाही. मी माझे लग्न झाले आहे हे कुठेही उघड होऊ दिले नाही. माझे हे मित्रही इतके जिवाभावाचे की त्यांनी ते कधी सांगितले नाही. त्याचे एक प्रमुख कारण असे होते की मी ज्या होस्टेलवर रहात होतो तिथे तुमचे लग्न झाले असेल तर ऍडमिशन नाही, असा एक नियमच होता. तो नियम मी मोडला. नुसताच मोडला नाही त्यानंतर लग्न झाल्यावरही मी कसे शिक्षण घेतले हे मी लिहले. ते मी एमएला असताना सकाळमध्ये तरुणांचे जे पान होते तिथे लेख स्वरुपात छापून आले. जर्नालिझमचा माझा जवळचा मित्र अनिल घोळवेकडे मी हा मजकूर दिला होता. त्यानंतर होस्टेलवर माजी विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम होता. आर. व्ही. कुलकर्णींनी मला बघितले आणि क्षणभर त्यांना कळेना की या पोराला काय म्हणावे. इनामदार त्यावेळी प्राचार्य गरवारे कॉलेजचे होते.आपण इतके व्यवस्थेवर कमांड करणारे पण आपल्याला यानेही काही कळू दिले नाही, याची एक सल त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. खरे तर मी या होस्टेलवर रुढार्थाने तयार केलेला नियम मोडून रहाणे यात काही गैर होते, असे मला आजही वाटत नाही. याचे कारण असे की मी काही चुकीचे, अनैतिक, व्यवस्थेला बाधा येणारे वागत होतो, असे कधी झाल्याचे मला आठवत नाही. उलटपक्षी हजारो वर्ष इथल्या सगळ्याच व्यवस्थेवर कमांड असणाऱ्या समाजाला मला जवळून बघता आले. त्यांचे डावपेच जसे समजून घेता आले तसे त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकताही आल्या. पुण्यात मुळातच ब्राह्मण समाजाचे वर्चस्व आहे. आमच्या गावात एकही ब्राह्मणाचे घर नव्हते. मुस्लिम समाजाचे एकच घर आहे. त्यामुळे या दोन्ही समाजघटकांविषयमी माझ्या मनात त्या वयात कुतूहल असायचे. त्यामुळेच की काय या घटकांना मी ब्राह्मण समाजाला समजावून घेतले तेव्हा मी टर्न झालो. मला वाटायला लागले की माणूस म्हणून आपण जास्त पुढे गेले पाहिजे, माणसाला माणूस म्हणून ओळखायला हवे. त्याच्या जातीने, धर्माने त्याला मिळणारी ओळख हि समाजात फूट पाडणारी आहे. समाजाच्या स्वस्थाबरोबरच एकूण प्रगतीसाठी सुद्धा ते गरजेचे आहे. या बाबींचा इथे उल्लेख करायचे कारण असे की मला पोरांकडून आणि एकदा तरा एकी पोरीने विचारले "तू देशस्थ का रे?' मला घडीभर समजेना. पोरांना मी सांगायचो, ""माझी जात कोणती हे 1992 पर्यंत मलाही माहीत नव्हते. पण मी शेती करणाऱ्या शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. जगाचे भरणपोषण करणाऱ्या जमातीतला मी आहे. मी माणूस असणे इतके पुरेसे नाही का?'" पण त्यामुळेच की काय पुढे मला तरुण वयात ज्याज्या ठिकाणी बोलायची संधी मिळायची त्या त्या वेळी मी माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळाली पाहिजे, मुद्‌द्‌यावर फारच जोर द्यायचो. पोरीला मात्र मी देशस्थ असल्याचे सांगितले होते. त्यामुळे माझी जात कोणती याबाबत इथे गोची व्हायची. त्यात दुसरी बाब अशी की आडनावावरुन पोरांच्या काही लक्षातही येत नव्हते की याची नाळ नेमकी कुठली? पण त्याने फार फरक पडला नाही. असे मला आज प्रामाणिपणे वाटते. माणूस जसा जास्त खोलात जातो. इतिहासाची काही पाने शिकतो, त्यावेळी त्यातल्या गमतीजमती त्याच्या लक्षात येतात. (अपूर्ण)  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा