लॉटरीची झिंगपुन्हा मूळ विषयाकडे येतो, पहिले वर्ष संपले. त्यानंतर मी कॉलेजमधला संपर्क थोडा कमी केला. आपण पैसे कमविण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, हि जाणीव त्यावेळी आमच्यातल्या अनेकांकडे होती. मग कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना मी, राजा आरगे, बापू जागडे आणि राजेश माचकर असे चौघे एकत्र आलो. प्रत्येकी एक हजार रुपये असे चार हजार जमा केले. लॉटरी स्टॉल आपण टाकू, असे आमचे ठरले. त्यानुसार वाटचाल सुरू झाली.
मला होस्टेलवरुन सायकलवर कोथरूडला जावे लागायचे. वनाज कॉर्नरच्या बाजूला हा स्टॉल टाकला. त्यासाठी एक टेबल, खुर्ची, तिकीट ठेवण्यासाठीची अन्य सामग्री आम्ही राजा आरगेच्या घरून आणली. त्याचे अण्णा म्हणजे वडील मदतीला यायचे. साधारण तीन हजारांची तिकिटे आम्ही घ्यायचो. यात दोन रुपये किंमतीच्या तिकिटांची संख्या जास्त असायची. एखाद्या माणसाने दहा तिकिटे 20 रुपयांची घेतली आणि त्यांचा शेवटचा नंबर जर शून्य ते नऊ असा असेल तर त्या माणसाला वीस रुपये भरून सोळा रुपये लागायचेच लागायचे. खेळणारे त्यावेळी सोबत तक्ता ठेवायचे. काल आठ नंबर आला आज अमकातमाका येणारच, असे म्हणून चर्चा चालायची. खूपच वेगळे विश्व मी जवळून बघत होतो. नंबर आला तर जग जिंकल्याचा आनंद आणि नाही आला तर सिगारेट, विडीच्या झुरक्यात चहाबरोबर अपयश पचविणारी मंडळी बघायला मिळाली. त्या लॉटरीचे सगळे नियोजन वीस टक्कायत चालायचे. शंभर रुपयांची तिकिटे विकली तर तर त्यातले 80 रुपये हे बक्षीस म्हणून द्यावेच लागायचे. त्यात आमची तिकिटे विकणाऱ्यांचीही अनेकदा गोची व्हायची म्हणजे तिकिटे माघारी न घेण्याच्या बोलीवरील असतील आणि लागणारे नंबर फक्त गेले. बिगर लागणारे राहिले तर ती तिकिटे अंगावर पडायची. त्यावेळी म्हणजे साधारण 93-94 साली या प्रकारच्या लॉटरीचे मोठे बूम आले होते. मी साधारण पंधरा दिवस हा सगळा प्रकार जवळून बघितला. पुढच्या पंधरा दिवसात हे आपल्याला जमेल का याचा विचार केला आणि महिना संपत असताना शांतपणाने मला जमणार नाही. मी बाहेर निघतो, असे म्हणून हजाराला काही शेपाचशे लागून आले तेवढे घेऊन या धंद्याला रामराम केला. माझ्यानंतर साधारण सहा महिने ते आठ महिने राजेश माचकर या सगळ्यांबरोबर राहिला. त्यानेही त्यांच्यातून कल्टी मारली. उरले शेवटी फक्त दोघे. बापू जागडे आणि राजा आरगे. काहीदिवस गिरीश लवळेकरनेही त्यांचे बघून या धंद्यात शिकत असतानाच नशीब अजमविण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही ते काही जमले नाही. त्या दोघांनी तो धंदा वाढविला. राजाने होलसेल तिकीट विक्रीची एजन्सी घेतली. त्यांची पार्टनरशीप पुढे साधारण सहा-सात वर्ष चालली. त्यानंतर आता राजाने पूर्ण व्यवसायात लक्ष केंद्रित केले आहे. त्याचा पिंडच तसा होता. पोलिसांनी त्रास द्यायला सुरवात केल्यावर त्याने लॉटरी बंद केली. त्यानंतर काही गाड्या घेतल्या. तो व्यावसाय केला. आता तो ट्रीप ऍरेंज करतो. कोथरूडला एक फ्लॅट दोन दुकाने, त्याशिवाय बालेवाडीजवळ चार एकर जमीन घेतल्याचे तो मध्ये काही दिवसांपूर्वी सांगत होता. त्याचे आणि माझे अजूनही चांगले संबंध आहेत. त्याच्या सगळ्या धंद्याचे रोपटे आम्ही एकत्रित लावले होते. हे तोही मान्य करतो.
या धंद्यातून बाजूला झाल्यावर राजा, बापू इतके जवळचे संबंध माझे माचकरशी राहिले नाहीत. आम्ही एसवायला फार जानी दोस्त होतो. मला त्यांच्या व्यवसायात पुढे काय झाले माहित नाही मात्र त्याने सायकॉलॉजी विषय निवडला. आम्ही वेगळ्या मार्गाने पुढे गेलो. तसे प्रत्येकाचे कुठे ना कुठे मन गेलेले असायचे. माचकर त्याची प्रेमकरण सांगायचा. बापूलाही कुठली तरी मुलगी आवडायची. राजाने पुढे बीएड् करताना लव्ह मॅरेजच केले. त्याच्या लग्नाला मी गेलो होतो. माझी मात्र गोची व्हायची. स्वतःविषयी काही गोष्टी लपवून ठेवाव्या लागायच्या. त्यामुळे मी कॉलेजच्या पोरांच्या ग्रुपमध्ये मिसळणे कमी केले.
सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५
लॉटरीची झिंग
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा