आर. व्ही कुलकर्णींवरील हा लेख चार फेब्रुवारी 2011 या तारखेला सोलापूर सकाळमध्ये पान 11 वर तर त्यानंतर तीन दिवसांनी सात तारखेला पुणे सकाळमध्ये टुडे पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे. ज्या दिवशी सोलापुरात प्रसिद्ध झाला खरे तर त्याच दिवशी तो तिकडेही प्रसिद्ध व्हायला हवा होता. पण वर्तमानपत्राच्या मोठ्या गंमती असतात. त्याच्याविषयी काही लिहायचे म्हटले तर तो एक स्वतंत्र खूप "इंटरेस्टिंग' विषय आहे. अचानकच काहीतरी उद्भवते आणि ठरविलेली गोष्ट काढून अन्य विषय पुढे न्यावे लागतात. सहसंपादक चंद्रशेखर पटवर्धन यांच्याकडे मी हा लेख दिला होता. ज्यादिवशी तो येणे अपेक्षित होते त्याच्या आदल्यादिवशी मी त्यांना फोन केला. मी म्हणालो, "लेख लागला नाही.'
ते म्हणाले, "मी लावूनच आलोय. काहीतरी गडबड झालेली दिसतेय. ठीक आहे मी उद्या गोल्यावर बघतो.'
त्यानंतर त्यांना मी म्हणालो, "माझा आमका तमका मजकूर छापा असा आग्रह मी कधीच धरत नाही. हा लेख नाही छापला तरी माझे काही मत नाही, मात्र येणार नाही, असे सांगितले असते तर बरे झाले असते. आपण वर्तमानपत्रात जे देतो, त्या चौकटीत हा लेख बसणारा आहे, असे माझे मत आहे.'
"होय राजाराम, तु काय मला लांबचा आहेस का? माझासुद्धा त्या कॉलेजशी संबंध आहे. आर. व्ही कुलकर्णी मला माहित आहेत. तुला मी खोट बोलतोय, असे वाटतंय का? खरेच काहीतरी अडचण आली असेल,' असे त्यांनी माझे सांत्वन केले. त्यानंतर मी त्यांच्याकडे या लेखाचा फॉलोअप घेतला नाही, मात्र तो दोन दिवसांनी प्रसिद्ध झाला.
हा लेख आल्यानंतर त्यादिवशी सकाळी सकाळी पहिली प्रतिक्रीया आली ती करमाळा तालुक्यातील जेऊरहून. डॉ. महावीर अब्बड यांनी एसएमएस केला होता. त्यांनी अभिनंदन करीत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या होत्या. माझ्या संपर्कात असतानाही ते या होस्टेलचे विद्यार्थी असल्याचे मी विसरलो होतो. जेऊरला चांगले मोठे हॉस्पीटल त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर बांधले आहे. माझ्या मागच्या बॅचमध्ये ते होते. प्रकृती किडकीडीत, कॉलेजमध्ये असतानाच डोळ्याला चष्मा लागलेला. करमाळा तालुक्यातीलच सावडी त्यांचे गाव. मला माहित असते तर या कार्यक्रमाला मी आलो असतो, असे ते म्हणाले. त्यानंतर दादा मराठेचाही फोन आला. कुर्डुवाडीत पंचायत समितीत तो काम करीत आहे. गाव त्याचे माढा तालुक्यातील निमगाव. घरच्यांचा एकुलता एक. फौजदारच व्हायचे म्हणून त्याने एनसीसीसह अनेक गोष्टी केल्या. आरडी परेडसाठी कष्ट घेऊन दिल्लीला राजपथावर संचलन करुन आला. पण प्रश्नपत्रिका फुटणे आणि अन्य झपाट्यात त्याला फौजदारची परीक्षा पास होणे काही जमले नाही. जिल्हा परिषदेकडे तो लागला. त्यादिवशी आपण जाऊ म्हणून त्याने फोन केला. मी कुर्डुवाडीत उतरलो. त्याच्या घरच्यांना भेटलो. त्याच्या आईचे दर्शन घेतले. रेल्वे चुकेल म्हणून पटकन स्टेशनवर येऊन जेवण केले. तिथून आम्ही पुण्याला मिळून गेलो. तिथे अनेकजण भेटले. त्यात दत्ता कदम, निखील गाडगीळ, अभिजित पिंपळे, मोनिका गांधी, होस्टेलचे मामा अशा अनेकांचा समावेश होता. हे होस्टेल मी एकदा पाहून घेतले आणि माझ्या अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यात मी एका अर्थाने परिचित होत होतो. त्याचे कारण त्या ठिकाणी होस्टेलविषयी महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला आणि "सकाळ'ने आर. व्ही विषयी लिहलेल्या लेखांची कात्रणे झेरॉक्स करुन सगळ्यांना दिली जात होती. त्यातला लेख तिथे आलाय म्हटल्यावर तरुण पोरांना वेगळे कौतुक वाटायचे. पण त्यातही एकदोघजण म्हणाले, "आर. व्ही. किती खडूस आणि त्यांच्यावर इतके काय लिहले रे?' त्याच्या चेष्टेच्या स्वराकडे मी फार लक्ष दिले नाही. तो दिवस मस्त गेला. यानिमित्ताने आर. व्हीशीं गप्पा झाल्या. कॉलेजचे प्राचार्य आणि आणखी काही मंडळी भेटली.
(अपूर्ण)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा