हिंदकेसरी दिनानाथ आण्णा ः प्रभावी वक्ते
एखाद्याकडे पैसे नसले तरी काहीही खबढब करुन पोरांना तालमीत पाठवायची प्रथा आहे. करमाळा तालुक्यात मोठे पैलवान अनेक झाले. अजूनही होत आहेत, पण मला नारायण आबा पाटलांविषयी कायम आकर्षण वाटत आले आहे. पैलवानकी करणाऱ्या गड्याने तालुक्यात आमदारकीच्या निवडणुकीपर्यंत धडक मारणे ही साधी बाब नाही. दोन वेळा आमदारकीत हरल्यानंतर ते तिसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक आले. पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली. त्यानंतर जयवंतराव जगताप यांना आमदार करण्यात हातभार लावला आणि त्यानंतर जनसुराज्यकडून रिंगणात उतरले. 1999 ते 2014 असे लढत राहिल्यावर 2014 ला ते आमदार झाले. मधल्या काळात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती अशी पदे घेत स्वतःचा एक गट उभा केला. मी सोलापुरात पत्रकारिता सुरू केल्यावर तशी नारायण पाटील आणि माझी ओळख खूप दिवस नव्हती, मात्र तरीही हा विधानसभेची निवडणूक जिंकला पाहिजे, किंबहुना जिंकू शकतो, असे मला 2009 मध्ये वाटायचे. त्यांनी तशी खूप धडक मारली. दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. पैलवान असून हे करणे यात एक वेगळेपण आहे, असे मला नेहमी वाटते. त्यांच्याकडे नुसतेच बाहुबळ आहे, असे कुणी म्हणत असेल तर ते चुकीचे आहे, असे माझे मत आहे. तसे प्रत्येक नेत्याकडे बाहुबळ असतेच. त्याच्याशिवाय राजकारणच करता येत नाही. सामान्य माणसाला राजकारणी लोक कुठल्या कुठे फेकून देतात. पण बाहुबळाला संघटन कौशल्या आणि स्वतःच्या हिमतीवर काही गोष्टी करण्याची हुंबाडी लागते. कोल्हापूरच्या गंगावेस तालमीत मी राहिलो तिथेच नारायण पाटील यांनीही अनेक वर्ष पैलवानकीचे धडे गिरविले. अनेक मैदाने गाजविली. हुशारी असल्याशिवाय माणूस पुढे जात नाही, हे माझे मत आहे. तेच पैलवनाकीलासुद्धा लागू आहे, असे माझा अनुभव आहे.
गंगावेस तालमीत मी जे काही तीन चार महिने होतो, त्या काळात तिथे हिंदकेसरी दीनानाथ सिंह उर्फ आण्णा वस्ताद होते. सतीश मांडीया आणि (कै.) संजय पाटील यांच्या महाराष्ट्र केसरीच्या सोमीफायनलच्या कुस्तीत 91 साली वाद झाला. मांडीया आमच्या तालमीचा पैलवान होता. संजय पाटील शाहूपुरी होता. खासबाग मैदानात कुस्त्या होत्या. वाद झाल्यावर आता पुढे काय होईल, काही सांगता येत नव्हते. एक सैरभैर वातावरण सगळ्या तालमीभर पसरले होते. मी तर लहान होतोच पण आता काहीतरी करायला हवे, असे काहीबाही बोललो जात होत. संध्याकाळी साधारण साडे सात आठच्या दरम्यान दिनानाथ आण्णा तालमीत आले. सगळी पोर गोळा झालेली होती. आण्णांनी सगळ्यांना आखाड्याच्या बाजूने बसायला सांगितले. महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे हेही त्या काळात तिथे यायचे. त्यांनी त्यावेळी पोरांसमोर जे काही भाषण केले, ते ऐकून मी हरखून गेलो होतो. मला चांगली भाषणे ऐकायची आवड होतीच. आण्णा हिंदीत बोलले. सगळ्यांना शांत करणारे. मी जे काही दिवस तालमीत होतो, त्या काळात आण्णांशी माझे फार बोलणे झाले नाही, मात्र पुढे आयुष्यात आपण एकदातरी या माणसाशी चार शब्द बोलावेत, असे मला वाटायचे. त्यांचे दुसरे भाषण मी सांगोला तालुक्यातील जवळ्याला झालेल्या भारत आणि पाकिस्तानच्या मल्लांच्या झुंजीच्यावेळी ऐकले. त्यानंतर काही दिवसांनी "आस्क मी' हेल्पलाईला विचारुन त्यांचा कोल्हापूरातला नंबर मी मिळविला. त्यांच्याशी मी साधारण तीन चार मिनीटे बोललो असेल. त्यांना हिंदकेसरी हजरत पटेल यांच्यासंदर्भातील आठवणी विचारायच्या होत्या. त्यांनी त्याविषयी माहिती सांगितली. त्यानंतर त्यांना तुमचे भाषण मला आवडते, असे सांगितले. ते म्हणाले की माझे जवळ्याचे भाषण ऐकून मला पुढे पंढरपुरात व्याख्यानाचे निमंत्रण मिळाले. पत्रकार म्हणून अनेकांशी बोलणे नेहमीच होते पण आण्णांशी बोलल्यानंतर पुढचे दोन दिवस मी हवेत होतो. आयुष्यात असाही आनंदाचा काही प्रकार असतो, हे मला वेगळे समजून गेले. मूळ मुद्दा मी असा सांगत होतो की गाजणार पैलवान हा हुशारच असतो. कुठेच काही नोकरी लागत नाही म्हटल्यावर गावगन्ना जसे पत्रकार दिसतात, तसे पैलवानही गावन्ना असतात. मात्र त्यात जे गाजतात त्यात त्यांचे कष्ट, उर्मी, इतरांची साथ आणि एकाग्रता या गोष्टी महत्वाच्याच असतात.
रविवार, २० डिसेंबर, २०१५
हिंदकेसरी दिनानाथ आण्णा ः प्रभावी वक्ते
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा