गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

दोन कविता

दोन कविता
मला वाटते त्यानुसार मी माझ्यापुरती गरवारेच्या होस्टेलवर मजा केली. पहिल्याच वर्षी एफआरची (म्हणजे फ्लोअर रिप्रेझेंटेटिव्ह, मजला प्रतिनिधी) निवड होती. इच्छुकांनी अर्ज टाकायचे. मी, माझ्याच वर्गातला सैद आणि जितेंद्र राक्षे असे दोघांनी अर्ज टाकले होते. जितू भाई आम्हाला सिनिअर होता. मला बारावीला चांगली मार्क असल्यामुळे आपल्याला ही संधी मिळू शकते, असे काहीतरी माझ्या मनात होते. तसे काही झाले नाही आणि ते योग्यही होते. तो अगोदरपासून होस्टेवर होता. निवड झाल्यावर मी त्यावरच एक विडंबन कविता लिहिली होती. रामदास फुटाणेंच्या कवितांचा मला त्यावेळी खूप नाद होता. चांगलभल कवितासंग्रहातल्या कविचा माझ्या तोंडपाठ होत्या. त्यामुळे आपण जे वाचतो. ते तशा अर्थाने आपल्यात झिरपते. त्यातून झालेल्या नवनिर्मीतीची बीजे त्यात असतात. मी लिहिले होते,
एका तळ्यात तीन बगळे
एकाच वेळी एकाच माशासाठी
टपून बसले होते
सिनिअर होता ज्युनिअरांपेक्षा प्रकृतीने लहान
कीर्तीही नव्हती त्याची महान
पण देवाने दिले त्यालाच दान
त्यालाच देण्यात आला दोन माशांचा प्राण
आणि एफआरपदाचा मानही...
या कवितेत कविता म्हणून फार दम आहे, असे मला आज अजिबात वाटत नाही. कारण मी खूप कविता वाचल्या आहेत. कविता कानावर पडली की तिची ताकद कळते. मला माझी समज आहे, त्यानुसार मुल्यमापन करता येते. ही कविता इतकी गाजली की होस्टेल डेच्या काव्यवाचन स्पर्धेत तिला तिसरा नंबर मिळाला. पोरांना फार आवडली कारण तिथे घडलेल्या घटनेवरच हे भाष्य होते. व्यासपीठ गाजविण्याची एक खुमखुमी माझ्यात त्यावेळी प्रचंड होती. कथा, कविता, कादंबऱ्या यांचे खूप वाचन त्यावेळी केले. विशेषतः कवितेच्या प्रांतात मला चांगला रस होता. होस्टेलच्याच काव्यवाचनात दुसऱ्या वर्षी मी एक कविता सादर केली होता. तिने अनेकांचा रोष मला पत्करावा लागला होता. ती कविता म्हणजे माझी काही नवनिर्मीती नव्हती. कवितांच्या ओळीची जोडाजोडी होती. होस्टेलचा पालवी नावाचे एक वार्षीकांक निघाला होता. त्यात आलेल्या सर्व कवींच्याच कवितांचा वापर करून मी एक कविता तयार केली होती, ओळी त्या कवितामधील. त्यात जोडाजोडी करण्यासाठीची ओळ फक्त माझी. ती कविता अशी होती...

नव ज्ञानासह ये नव वर्षा
ये वर्षा माझ्या वर्षालाही घेऊन ये ना (ही ओळ माझी)
सुंगध तिच्या बहराचा मला पाहू दे ना
त्या बहरात मला बहरुन जाऊ दे ना
बहरता बहरता (हे दोन माझे शब्द)
वाळूत बांधली घरटी प्रेमाची
लाटांनी किनारा वाहू नेला
यांचा मात्र प्रेमभंग झाला (ही ओळ माझी)
प्रेमभंग झाल्यावर
मी आणि माझे अश्रू
दोघेच होतो एकमेकांच्या सोबतीला
आपले आपले म्हणारांनी टाळले तेव्हा
अश्रूच धावले माझ्या मदतीला
अश्रूभरल्या नयनांनी मी म्हटले (ही माझी ओळ)
सूर्या तू कधी उगवूच नकोस
उदयाने तुझ्या दाखवितात नव्या आशा दिशा
निराशेने भरलेल्या काट्यांनी वेढलेल्या
थकलेल्या मनाला विसावू दे जरा
पण मन काही विसवेना (ही माझी ओळ)
मन धावे सैरा शब्दांना भान आहे
स्वरांतून विस्कटल्या उमटली ताण आहे
मृगजळाच्य तळ्यात विसावा नजरेला
ओठावर सुकली कोरडी तहान आहे
हि तहान बागविण्यसाठी (ही माझी ओळ)
मै एक भ्रमर
चाहता हूँ मधुरस
चाहत के मधुरससे जाता हूॅ फुलके पास
जान जाता हूँ मेरे पहले आया है कोई भॅंवरा
उसने चूस लिया है मधुरस सारा
पण तरीही शेवटी मी म्हटले (ही माझी ओळ)
एवढ्या मोठ्या दीपरागानंतर मेघमल्हार कोणी गाईल का
धरतीचा कलश आता श्रावणधारांनी कुणी भरेल का?
माझ्या आठवणीनुसार या कवितांच्या ओळी रजपूत, जितेंद्र राक्षे, कल्याणी तुंगारे, दीपक खेडकर, दत्ता कदम, सुपर्णा अष्टेकर, सूरज शहा यांच्या कवितेतील होत्या. काव्य वाचनात हि कविता इतकी जबरदस्त झाली, की मिळालेला प्रतिसाद बघितला की परिक्षकांना नंबर देण्यावाचून पर्यायच नसायचा. या होस्टेलवर असताना मी काही बोलायला, बक्षीस घ्यायला, स्पर्धेतील भाषणासाठी व्यासपीठाकडे निघालो की पोर जय भवानी जय शिवाजी असा गजर करायची. निखील गाडगीळ, लोकेश गुजराप्पा, शैलेश दाभोळे, प्रशांत तानवडे, महेश देशपांडे या मंडळींनी माझे नामकरणच शिवा असे करून टाकले. ते चांगले म्हणून, टर उडवायची म्हणून की खरेच त्याच्यामागे त्यांच्या माझ्या मित्रत्वातले आणखी काही धागेदोरे होते हे आता मला कळत नाही. पण आपण उठलो की आपले मित्र आपल्यासाठी घोषणा देतात ते फिलींगचे फार भारी अंगावर रोमांच आणणारे असायचे.

--------------------------------  

३ टिप्पण्या:

  1. छान लिहिलेय. होस्टेलवरचं जीवन हा अविस्मरणीय अनुभव.

    उत्तर द्याहटवा
  2. छान लिहिलेय. होस्टेलवरचं जीवन हा अविस्मरणीय अनुभव.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद... लिहिण्याने मनाचा निचरा होतो. दिवस बरा जातो. त्यात तुमच्यासारख्या जाणकाराचा प्रतिसाद म्हणजे तर आणखीच बरे वाटते.

      हटवा