हरखून जाण्याचे, स्वत्व शोधण्याचे, उमेदपणा वाढविण्याचे, एकत्र माणूस म्हणून काही प्रशिक्षण घेण्याचे, आनंदाचा शोध घेण्याचे, हरले तरी पुन्हा तयारी करुन विजयी होण्यातला नवा आनंद मिळविण्याचे खेळ एक साधन आहे. प्रत्येकाने रोज काहीतरी खेळले पाहिजे. अंगातून घाम निघेस्तोवर मैदानाशी एकरुप झाले पाहिजे. त्याने व्याप, ताप, त्रास सगळा नाहीसा होतो... जगण सुकर होऊन जाते.
मी अकरावीत असताना गंगावेसेत साधारण तीन महिने राहिलो. बारावीच्या वर्षात ते काही जमले नाही, मग ते वर्ष संपल्यावर मी काही दिवस तिथे रहात होतो. कुस्तीचा नाद लागण्याचे कोल्हापूरला घरच्यांनी घालण्याची जी कारणे होती, पहिले कारण लहानपणी बाळूचे आणि आमच्या कारभाऱ्याचे बघून मी कुस्त्या खेळायचे हे आहेच. त्यापेक्षाही सातवीत असताना स्पर्धेत मी 35 किलोगटात तालुक्यात पहिला आलो होतो. पुढे त्याच स्पर्धेसाठी मी सोलापूरला आलो होतो. तिथेही तसा खरे तर माझा पहिला नंबर आला होता मात्र तुमचे आय कार्ड तुम्ही आणले नाही म्हणून माझा नंबर गेलो होता. दुसरा नंबर तिथे मला दिला होता. पुढे शाळेत कुस्त्या गाजवल्याच. बाहेरच्या स्पर्धेत म्हणून कुठे उतरता आले नाही. त्यानंतर थेट बारावीत असताना स्पर्धेत उतरलो. त्यावेळी कसबा बावड्याच्या केंद्रात त्यावेळी कुस्त्या झाल्या. राजाराम कॉलेजचे माळी सर त्यावेळी आमच्या संघाबरोबर होते. पहिले दोन राऊंड मी मारले. पण कोल्हापूरसारख्या ठिकाणी तसे स्पर्धेत उतरणारेसुद्धा दिग्गजच असतात. फडावर अनेक ठिकाणी कुस्त्या केल्या. काही ठिकाणी पडलोसुद्धा मात्र आमच्या गावाजवळच्या आगोतीत शेवटची कुस्ती मी केली. एखाद्या फडावर आपण शेवटच्या जोडीत बसतो गोष्टच भारदस्त असते. आगोतीत मी पहिली कुस्ती केल्यावर शेवटच्या कुस्तीला मी उठलो आणि तिसुद्धा कुस्ती मी केली. कवटळीचा माझ्यापेक्षा वायने कितीतरी जास्त असणार पैलवान माझ्याबरोबर कुस्ती खेळत होता. माझ्या अंगात रग होती. मी त्याला धरला, धातील दाबला, मोडला, थेट चितपट पाडला. तशीच कुस्ती मी बारावीत असताना त्याच वर्षी वजनी गटात केली होती. मी त्या पोराला तसा पाडल्यावर ते घडीभर तसेच पडून राहिले. मला समजेना काय झाले. पुढे मीच त्याला उठवले.
एखाद्या गोष्टीचा उपजत नाद हा आपल्या जीनमधूनही कुठूनतरी झिरपत आलेलो असतो. मला कुस्तीचा नाद तसा आहे. आमच्या कारभाऱ्याच्या पोराने कुस्त्या खेळाव्यात असे मला वाटायचे. मी पुण्याला असताना त्याला तात्याला तालमीसाठी नेले. तो लहान होता. त्याला स्टोव्ह घेऊन दिले. पेटी घेतली. कपडे घेतले. पण तो तिथे काही सेट होऊ शकला नाही. सातव्या आठव्या दिवसी घराकडे परतला. त्याचाच बारका भाऊ ठकसेनही काही कुस्त्या खेळला पण त्यालाही काही मर्यादा होत्या. तशी गावात एकापाठोपाठ एक खेळणारांची एक फळीच तयार होते मात्र त्यात चपकास, पकडीला चांगली पोर काही असतात. ते या खेळाकडे व्यापक दृष्टीने पहात नाहीत, असे मला काहीदा वाटते. गौतम कोकणेचा सागर इतक्या भारी कुस्त्या करायचा. उंची चांगली होती. शरीर पिळदार होते पण जिरला.
काही वर्ष बाहेरगावी ठेऊन निव्वळ त्याच्यासाठी सांभाळणे आपल्याकडे जमत नाही. त्यामुळे पोर जिरतात. ज्यांना त्यातले मर्म सापडते ते त्यातच करिअर करतात. त्यामुळेच दक्षिण सोलापूरमधील बोरामणीसारख्या छोट्या गावात एकाच कुटुंबात तीन महाराष्ट्र केसरी होतात. आप्पालाल, मुन्ना आणि आणखी एक असे शेख कुटुंबातील तिघे महाराष्ट्र केसरी झाले. आपली कुस्ती जागतिक स्तरावर जायची असेल तर गावागावात मॅटवर सराव सुरू झाला पाहिजे. गावागावातल्या पोरांना स्पर्धेत खेळायची संधी मिळाली पाहिजे, पण तसे होत नाही.
कुस्तीतले राजकारण, दादागिरी, वाद हा एक वेगळा पदरही या खेळाला आहे. त्याच्याही काही आठवणी माझ्या जवळ आहेत, मात्र त्यावर न बोललेले बरे.
सोलापूर जिल्ह्यात हजरत पटेल हे एकमेव हिंदकेसरी झालेले पैलवान होते. त्यांच्यावरच्या लेखाच्या निमित्ताने स्वतःला तपासताना स्मरणरंजनात गंमत आहे. कुस्त्या मला आवडतात. केवळ कुस्त्याच नव्हे तर कब्बडी, खोखो सारखे खेळही मी खेळलो. हरखून जाण्याचे, स्वत्व शोधण्याचे, उमेदपणा वाढविण्याचे, एकत्र माणूस म्हणून काही प्रशिक्षण घेण्याचे, आनंदाचा शोध घेण्याचे, हरले तरी पुन्हा तयारी करुन विजयी होण्यातला नवा आनंद मिळविण्याचे खेळ एक साधन आहे. जाता जाता फुकटचा सल्ला देतो, प्रत्येकाने रोज काहीतरी खेळले पाहिजे. अंगातून घाम निघेस्तोवर मैदानाशी एकरु झाले पाहिजे. त्याने व्याप, ताप, त्रास सगळा नाहीसा होतो... जगण सुकर होऊन जाते.
कुस्ती कथा पूर्ण
सोमवार, २८ डिसेंबर, २०१५
जगण सुकर होण्यासाठी....
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा