शनिवार, ५ डिसेंबर, २०१५

न सरणाऱ्या आठवणी....

न सरणाऱ्या आठवणी....
गरवारे कॉलेज आणि होस्टेलसंबंधीच्या आठवणीचा हा शेवटचा लेख. किती आठवणार तरी? हा कालखंड साधारण 92 ते 95 हा होता. मुंबईत 1992 बॉंबस्फोट झाले होते. बाबरी मशीद पाडण्यात आली होती. ती पाडल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त होत होती मात्र तरीही या घटनेचे समर्थन करणारेही काहीजण होते, हे मला आजही आठवते. मी इतिहासाच्या तासालाच पटवर्धन मॅडमंना ही घटना झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुम्हाला काय वाटते, असे विचारले. त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात, "ऐतिहासिक वास्तू म्हणून ती उद्‌ध्वस्त करणे योग्य नाही. अर्क्‍युलॉजीकल मॉन्युमेंट म्हणून तिचे जतन करायला हवे,' असे सांगितले होते. या काळात कॉलेजमध्ये निवडणुका नव्हत्या. ज्याला जास्त गुण तो वर्गप्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली जात होता. त्यामुळे ती मजा काही मला अनुभवता आली नाही. सत्ताधाऱ्यांविषयी युवकांचा मनात जो एक नेहमी संतापाचा सूर असतो, तसा त्या कालखंडात आमच्याही मनात होता. तिथे भाजपला पूरक वातावरण होते. "अगर इस देशमे रहना होगा ते वंदे मातरम कहना होगा' ही घोषणा त्यावेळी जोरात होती. मुंबई दंगल, शरद पवारांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, हजारे आणि खैरनारांचे आंदोलन आणि गोपीनाथ मुंडेची संघर्ष यात्रा यामुळे महाराष्ट्रात 95 साली सत्तापरिवर्तन झाले. त्या काळात मी विद्यार्थी दशेत होतो. या सगळ्याचा मनावर एक परिणाम होत होता. राजकारणाविषयी आकर्षण असल्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख याच कॉलेजात शिकले. प्राध्यापक होते. त्यांनी काही काळ या होस्टेलमध्ये घालविला, याचे उगाचच भारी वाटायचे.
आता फेसबुकने फारच चांगली सोय केलीय. एक वर्षभरापूर्वी सुदीप दत्ताचा फोन आला. त्याने तो फेसबुकवरुन मिळविला होता. त्याच्याशी अनेक विषयांवर गप्पा झाल्या. मोहन यादव आणि सुदीप यांच्याविषयी मला नेहमी आदर वाटायचा. निखिल गाडगीळ मर्चंट नेव्हीत आहे. त्याच्याशीही कधीकधी बोलणे होते. प्रशांत तानवडेने मित्रांसाठी एक पार्टीच ठेवली होती. तोही जागतिक बॅंकेत कोणत्यातरी पदावर काहीतरी काम करीत आहे. हरिश सारडा मध्ये एकदा भेटला. अभिजित पिंपळेची सासरवाडी सोलापूर आहे. सपत्नीक तो काही दिवसांपूर्वी घरी येऊन गेला. छान वाटले. त्याची आणि माझी चांगली दोस्ती आहे. एकमेकांच्या आम्ही खूप खोड्या काढायचो, मला एक आठवण आठवते. एक असेच दुपारी मी झोपलो होतो. तो आला आणि मोठ्या दार वाजवून माझी झोपमोड केली. मी उठलो. खूप राग आला होता. त्याच्या खोलीत गेलो. त्याच्या बेडवर जो झोपला होता, त्याला एक लाथ घातली. पण गंमत अशी की तो तिथे नव्हताच. तिथे संजय जोशी झोपला होता. तो विव्हळायला लागला. मला इतके अपराध्यासारखे वाटले. मी दोन तीन वेळा तरी संज्याची माझी मागितली.
या होस्टेलमध्ये आर्टची मुले अथवा मुली यांचे प्रमाण कमी होते. पहिल्या वर्षाला होस्टेलवर बीए भाग एकचे आम्ही तिघे होतो. सैद म्हणून माझा रुमपार्टनर काही दिवस होता. तो कुठे आहे, याचा मला काही पत्ता नाही. संतोष केकाण म्हणून दौडजवळा एक मित्र तिसऱ्या वर्षाला होता. त्याचाही पुढे कधीच संपर्क झाला नाही. सुपर्णा अष्टेकर फेसबुकवर आहे. कल्याणी तुंगारे अतिशय हुशार मुलगी होती. तिच्याविषयीही कुणालाच माहिती नाही. कॉलजचे इतिहासाचे गणेश राऊतसर यांच्याशी गेल्या वीस वर्षात दोन तीन वेळा बोललो असेल. राजेश माचकरशी एकदा बोलणे झाले. बापू जागडे, गिरीश लवळेकर, राजा आरगे, जितेद्र पायगुडे यांच्याशी काहीदा संपर्क होतो. अशपाक मुजावर हा खरा प्रचंड हरहुन्नरी होता. परिस्थीती बोताची होती. खेड शिवापूरला राहायचा. परवा काही दिवसांपूर्वी सोलापुरात एका लग्नानिमित्त आला होता. घरी येऊन गेला. त्याच्याशी खूप गप्पा मारल्या. पण एक लक्षात आले की कितीही बोलले तर आठवणी सरत नाहीत...
या होस्टेलवर होस्टेल डे आणि गणेशोत्सवाच्या काळात धमाल यायची. विविध स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम, विविध गुणदर्शन असे असायचे. परीक्षा जवळ आली की रात्र रात्र जागून पोर अभ्यास करायची. ग्राउंडवर संध्याकाळी व्हॉलिबॉल खेळायचो. सकाळी काही दिवस पहाटे उठून पळायला फिरायला जायचो. पॅराडाईजमध्ये चहा प्यायचा. कॉलेज आणि होस्टेल अशा दोन विश्‍वात वारताना खूप चांगल्या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळाले, अनेक चांगले वक्ते ऐकायला मिळाले. ज्याच्याप्रती आपण कृतज्ञ रहावे, अशा बाबींमध्ये मी या होस्टेलचा, कॉलेजचा तिथल्या वातावरणाचा जरूर उल्लेख करीन. माझ्या आयुष्यातला तीन वर्षांच्या कालखंडाचा एक हळवा कोपरा या कॉलेज आणि होस्टेलच्या आठवणींनी भरून राहिला आहे. नुसत्या आठवणीतसुद्धा आनंद वाटावा, असे हे वातावरण होते. काहीदा त्यात सहभागी होऊन तर काहीदा तटस्थ रहात मी या सगळ्यांचा अनुभव घेतला......

---------------------------------  

२ टिप्पण्या:

  1. हॉस्टेलवरच्या आठवणी खूप वाचनीय आहेत. त्यांचं एकत्रित पुस्तक काढा. या दिवसांमधून तुमची वैचारिक बैठक कशी घडत गेली, त्याचं टिपण जोडलं तर अधिक उत्तम. अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा