रुस्तुम ए हिंद बिराजदार मामांची आठवण
एखाद्या माणसाशी आपला त्याची ओळख नसली तरी सांधा जुळतो. त्याचे कारण त्याचे आपले आवडीचे विषय काहीदा सारखे असतात. मूळ मुद्दा पैलवानांची हुशारी हा होता. नुसतीच हुशारी नाही तर काळाची पावले ओळखण्याचे कसब हुशार माणसात असते. याचेही एक उदाहरण सांगतो. रुस्तुम ए हिंद कै. हरिश्चंद्र बिराजदार यांना मी लहानपणापासून बघत आलो होतो. ते जेऊरच्या आखाड्यावर यायचे. या माणसाशी आपल्या कधी बोलायला मिळायला हवे, असे अनेकदा वाटायचे. ती संधी मला 1999 मध्ये मिळाली. प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून सकाळमध्ये काम करीत होतो. सकाळच्या संपादकीय पानावर एक सदर होते. त्यात ज्यांनी एखाद्या क्षेत्रात मोठे नाव कमावले, त्यांच्या जडणघडणीविषयी मांडले जात होते. मी आणि संजय शिंदे बिराजदारमामांच्या गोकुळवस्ताद तालमीत एकदा दुपारी गेलो होतो. त्यानंतर पुन्हा मग एकदा संध्याकाली गेलो होतो. साधारण साडेआठ नऊचा सुमार असेल. आम्ही तालमीतल्या पोरांकडेच चौकशी करीत होतो. तिथेच आम्हाला चंद्रहास निमगिरेची भेट झाली. तो त्यावेळी पोरसवदा होता. त्याने मी जेऊरचा असे सांगितल्यावर आपोआप एक जवळीक वाढते तशी बोलणे वाढायला लागले.
आम्ही बोलतोय, हे बिराजदार मामा थोडे लांबून बघत होते. त्यांना आपल्या तालमीतला पैलवान मुलगा कुणाशीतरी रस्त्यात बोलतोय हे रुचले नव्हते. त्यांना बगितल्यावर चंद्रहास घाबरला. तो लगेच निघायला लागला. आम्हा दोघांनाही कळेना असे काय झाले. मामा आमच्याजवळ आले, आम्हाला त्यांनी विचारले, "काय पाहिजे.' मी सकाळमधून आल्याचे सांगितल्यावर त्यांचा रागाचा पारा थोडा कमी झाला. पण त्यांनी तालमीला जी शिस्त लावली. त्यामुळे केवळ राज्य आणि राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही या तालमीचे अनेक मल्ल गाजले आहेत. त्यांनी त्यावेळी मी करमाळा तालुक्यातील आहे, असे म्हटल्यावर तेच स्वतःहून म्हणाले, "आता गेला त्या मुलाने जर चांगली मेहनत घेतली तर तो नक्की तुमच्या भागाचे नाव काढेल. यांच्यात मला काही वेगळेपण दसते.'
चंद्रहास पुढे पाच सहा वर्षांनी महाराष्ट्र केसरी झाला. माझा सांगायचा मुद्दा असा की पैलवान केवळ हुशारच असतात असे नाही तर काळाची पावले ओळखण्याचे कसबही ज्यांच्याकडे असते तेच गाजतात. बिराजदार मामा तसे होते.
सोमवार, २१ डिसेंबर, २०१५
रुस्तुम ए हिंद बिराजदार मामांची आठवण
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा