हिंदकेसरीच्या पत्नीला दोन हजार मानधन
हिंदकेसरीच्या पत्नीला
दोन हजार मानधन
हजरत पटेल यांच्या कुस्त्या बघितलेली
पिढी आता उतरणीला लागलेली आहे. सांगलीच्या राजवाड्यात हिंदकेसरी मारुती माने आणि
हजरत पटेल यांच्यात झालेली कुस्ती त्यावेळी खूप गाजली होती. मारुती माने यांना पटेल
यांनी चितपट मारले होते. या कुस्तीचे साक्षीदार असणारे प्रख्यात कुस्ती निवेदक
शंकरराव पुजारी सांगतात, ""ही आठवण अंगावर शहारे आणणारी आहे. परमेश्वराने दिलेल्या
देणगीचे या पैलवानाने कष्टाने चीज केले. महाराष्ट्राचे नाव देशभर केले.''
हजरत
पटेल यांची उंची पाच फूट साडेअकरा इंच, वजन 225 पौंड आणि छाती 48 इंच होती. अतिशय
उंचापुऱ्या तगड्या असणाऱ्या या पैलवानाचे लग्न 1972 ला झाले. त्यानंतर बराच मोठा
कालखंड त्यांचा आचेगावात गेला. ग्रामपंचायत सदस्यही ते होते. गावात अनेक पैलवान
घडविण्यात त्यांचा वाटा होता. त्यांना पहिल्या तीन मुली झाल्या. त्यानंतर दोन जुळी
मुले झाली. हसन आणि हुसेन अशी त्यांची नावे आहेत. हसन वडिलांच्याच पावलावर पाऊल
ठेवून कुस्तीचा सराव कोल्हापुरातील शाहूपुरी तालमीत करत आहे. आता कुटुंब विभक्त
झाले आहे. वाट्याला आलेली जमीन बटईने देऊन कुटुंबाची गुजराण होते. आचेगावात पटेल
कुटुंबाचा मोठा वाडा आहे. पण, त्याचा थाट कमी झाला आहे, हे त्यांच्या घराला भेट
दिल्यावर जाणवत राहाते. त्यांच्या पत्नी तिथे भेटल्या. हिंदकेसरीची पत्नी म्हणून
दोन हजार रुपये मानधन त्यांना मिळते. ही माऊली त्याचे काय करते? आणखी स्वतःचे थोडे
पैसे टाकून कोल्हापूरच्या मुलाला खुराकासाठी देते. डोळ्यात पाणी आणून त्यांनी इतकेच
सांगितले, ""आपल्या मुलांना आपण पैलवान म्हणून घडवावे, ही त्यांची (हिंदकेसरी पटेल)
हौस होती. मुले उतारवयात झाली. ती केवळ तीन वर्षांची असताना हृदयविकाराच्या
धक्क्याने ते गेले. आता त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला जेवढे करता
येईल तेवढे करायचे.''
आयुष्यभर लाल मातीशी इमान राखलेल्या या मल्लाने शेवटचा
क्षण तालमीच्या पारावर मोजला. गावासाठी त्यांनी खूप काही केले. आता गाव त्यांच्या
स्मरणार्थ दरवर्षी मोठे कुस्ती मैदान भरविते. हा माणूस किती मोठा आहे. याने पैसे
नाही पण माणसं किती जोडली याची प्रचिती गावाने त्यांच्या निधनानंतर घेतली.
कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचे वस्ताद दीनानाथसिंह त्यांच्याविषयी सांगताना
म्हणाले, ""असा पैलवान पुन्हा होणे नाही. माझ्या अगोदर ते हिंदकेसरी झाले. चेहरा
कायम हसरा असायचा. मुंबईला त्यांची आणि माझी कुस्ती झाली. पण, आमचे संबंध खूप
चांगले होते. मनात कधी कटुता त्यांनी धरली नाही. माझ्यापेक्षा मोठे होते म्हणून
त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जेव्हा मी वाकायचो तेव्हा ते मला छातीशी धरायचे. अतिशय
सज्जन आणि वेगळा असा हा पैलवान होता. त्यांचे वजन खूप होते. त्यांना तुम्ही वजन कमी
करा, असे मी सांगितले. ते हो म्हणाले. पण, या वजनानेच त्यांचा घात केला. आमचे बोलणे
झाल्यानंतर सहा महिन्याच्या आतच त्यांचे निधन झाले.''
सोलापूर जिल्ह्याचे नाव
देशभर नेणाऱ्या या मल्लाला जिल्ह्याने काय दिले याचा विचार आपण कधीतरी करायलाच हवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा