का उभे राहतात प्रश्न
आमच्या केत्तूर एकमधले माझ्या वर्गात जे होते त्यात चरणसिंग कनिचे होता. मला तो फार आवडायचा. त्याचे कुटुंब गरीब होते. दहावीत आम्ही एका वर्गात होतो. परीक्षेला आमचा एकापाठोपाठ नंबर आला. मी तसा थोडासा हुशार असल्यामुळे त्याला पेपर दाखवायचो. गणित की इंग्रजी आठवत नाही मात्र कुठल्यातरी पेपरला फारच कडक वातावरण झाले. त्याला काही दाखवत आले नाही आणि त्याचा एकच विषय गेला. तसा तो हुशार होता. पण तो नापास झाल्यावर मला इतके वाईट वाटले की आपण त्याला पास करू शकलो नाही, ही रुखरुख खूप दिवस मनात होती. तो नंतर पास झाला. कॉलेजला गेला. नंतर मुंबई गाठली. शेअर मार्केट की फायनान्स अशा कुठल्यातरी व्यवसायात काम करू लागला. दहावी सुटल्यावर अगदी दोन-चारदा मी त्याला भेटलो असेल. मुंबईत त्याने चांगला पैसा कमविला. घर घेतले. पण का कुणास ठाऊक त्याचा खून झाला. मला अजूनही त्याचा चेहरा आठवतो. त्याच्यात झालेला बदल मी टिपला होता. इतका सालस, कधी कुणाला काही न बोलणाऱ्या या मित्राचा असा दुर्दैवी अंत व्हावा, हे आठवले की मी हतबल होऊन जातो.
माझा हायस्कूलचा जिगरी दोस्त राजू गोसावीचे निधन मला चटका लावून गेले. त्याने बीपीएड केले होते. वडील पाटबंधारे विभागात नोकरीला होते. एक छोटा भाऊ. त्याने बीपीएड नंतर नोकरीचा बराच प्रयत्न केला, काही ठिकाणी पैसे दिले पण काही जमले नाही. नेताजी सुभाष विद्यालातच तो तासिका बेसीसवर काम करायचा. नंतर एक पान टपरी टाकली होती. नोकरीचे प्रयत्न चाचलेलेच असायचे पण काहीतरी करायला हवे म्हणून त्याचे काम सुरू होते. नंतर लग्न झाले. त्यानंतर काही दिवसातच वीजेचा धक्का लागून त्याचे निधन झाले. गावाकडे मी पॅसेंजरने गेलो, पारेवाडीत उतरलो की थेट त्याच्या टपरीवर जायचे. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या नंतर मी तिथून गावाकडे निघायचो पण या घटनेनंतर काही दिवस मी वाशिंबेलाच उतरायचो. तिथूनच गावाकडे जायचो. कारण केत्तूर दोनला जायचे माझ्या जीवावर यायचे. नको वाटायचे.
तसा प्रत्येकाच्या नावावर काहीना काही दुःखाचा वाटा असतोच. माझ्या वर्गात कोणकोण होते, याचा विचार करताना मला प्रकाश राऊतही आठवतो. त्याच्या बायकोचा झालेला खूनही लगेच समोर येतो. खून करणारा म्हणून ज्याला पकडले, तो मुलगाही ओळखीचा, गावातलाच. तशा प्रकारचा खून गावात पहिल्यांदाच झाला, असे म्हटले तर वावगे ठरू नये. हे असे का व्हावे, असा प्रश्न मी माझा मला विचारतो तेव्हा लक्षात येते की माणसाचे मन आणि मेंदू प्रचंड भरटकलेला आहे. सुखाच्या कल्पना काहीतरी अव्वाच्या सव्वा झालेल्या आहे. मानवी जगण्याचे मूळ काय, त्याचे प्रयोजन काय आपण किती दिवस इथे राहतो, याविषयी फार कुणीच सजग नसतो. कुठल्याच टप्प्यावर त्याविषयी माणसाला साक्षर केल जात नाही आणि मग अशा काहीतरी गोष्टी वाट्याला येतात. मानवी जीवनाच्या गौणत्वाविषयी महाराज मंडळी सांगतात, पण ते थेट वैराग्याचेच असते. धर्माकडे जाणारे असते. आपला धर्म आला की जात येते. जात म्हटले की मला जातीने आणि धर्माने माणसांच्या आयुष्याचा केलेला चुतडा दिसतो. त्यामुळे आपण माणूस असतो, आपल्याला राग, लोभ, मोह, वासना या गोष्टी असतातच. त्यांना घेऊन जगणे सुंदर करण्याचा काही विचार आणि कृती कार्यक्रम असालयला हवा, असे मला नेहमी वाटते. पृथ्वीवर पहिला माणूस जन्माला आला तेव्हा त्याचा धर्म कुठला असेल? जात कुठली असेल? निसर्ग आपण समजून घेत नाही, त्यामुळे मग प्रश्न उभे राहतात.
गुरुवार, १० डिसेंबर, २०१५
का उभे राहतात प्रश्न
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा