मंगळवार, ८ डिसेंबर, २०१५

समाज कोण चालविते?

समाज कोण चालविते?
एखादा लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध होतो, त्यावेळी त्यामागे अनेक गोष्टी, माणसं आणि मुख्यतः लेखक दडलेला असतो. मी माझ्या केत्तूर नंबर एकच्या आबा ठोंबरे या मित्रावर "सकाळ'मध्ये लेख लिहिला. त्यानंतर त्यामागे दडलेल्या गोष्टी मला आठवत राहिल्या. मी मला उकलत राहिलो. स्वतःची सालपट काढताना त्यावरचे एकेकाळचे जिवाभावाचे धागे मोजत राहिलो. अनेक चेहरे माझ्यासमोर आले....
आबा ठोंबरे हा माझा गावाकडचा मित्र. त्याच्यावरचा लेख सकाळ सोलापूरच्या वर्धापनदिन पुरवणीत नोव्हेंबर 2011 मध्ये 10 तारखेला प्रसिद्ध झाला. गाव, गावाकडची माणसं, तिथली मित्रमंडळी, त्यांचे जगणे हा नेहमीच माझ्या कुतूहलाचा, आवडीचा विषय राहिलेला आहे. मी सोलापुरात गेले 14 वर्ष नोकरी करतो. थोडी वेगळ्या प्रकारची नोकरी आहे. लहानपणी आपल्याला कोण व्हावेसे वाटत होते तर मला शिक्षक होण्याची उबळ दहावीत असताना होती. आपण शिक्षक सहज होऊ शकतो, असे वाटायचे. मग त्याच्यासाठी काय करावे तर बीएड. करावे. तिथून कुठलीतरी संस्था गाठावी आणि शिक्षक म्हणून सतत पोरांत राहून उत्तम आयुष्य काढावे, असे वाटायचे. पण पुढे या सगळ्या गोष्टींत वेगळ्या मार्गाने मी पुढे पुढे सरकत राहिलो. डीएड्‌ला ऍडमिशन दहावीनंतर सहज मिळाले असते ते घेतले नाही. मग बारावीनंतर प्रयत्न केला तर ते मिळाले नाही. बीएड्‌लाही बीसीजे केल्यानंतर प्रयत्न केला पण तिथेही काही नंबर लागला नाही. मग पत्रकार झालो. खरे तर समाजात पत्रकारितेच्या पेशाला मान असला तरी त्यामागे काहीवेळा काहीतरी "इंटरेस्ट' असतात. संबंधातून काहीतरी साध्य करायचे असते किंवा नको ही कटकट म्हणूनही करा त्यांची व्यवस्था असा एक सूर असतो. पण तरीही एक गोष्ट नक्की आहे, लोक जरी पैशाच्या मागे धावत असले, प्रचंड संपत्ती जमवत असले, तरी समाजात आपली ठसा उमटवायचा असेल तर तुमच्याकडे काही विचार पाहिजे. समाज चालविण्याचे काम विचारी माणसं करतात, असे माझे मत आहे. कुणी असे म्हणेल की पैसेवाले, भांडवलदार सगळे निर्णय घेतात, विचारवंतांनी कुठे कोण विचारते? पण मला असे वाटते की भांडवलदारांकडेही त्यांच्या बाजूने विचार करणारे असतातच. त्यांच्याच विचारांच्या जोरावर ते त्यांच्यासाठीचे निर्णय घेतात. शब्द हे विचार व्यक्त करणाऱ्याचे माध्यम असते. त्या शब्दांना प्रचंड महत्व आहे. हजारो वर्ष शब्दांवर ठराविक वर्गाची कमांड होती. ती शब्दांची जी दुनिया आहे तिच्यात मी काम करतो. त्या दुनियेत खरे किती, खोट किती याचा जर धांडोळा घ्यायचे म्हटले तर अनेकदा ती दुनिया अर्धसत्य सांगते, असे मला वाटते. मला काही प्रमाणात थोडेसे आतवर माहित असलेले विषय ज्यावेळी कुठल्याही दैनिकात छापून येतात, टीव्हीच्या बातम्यांत दाखवितात त्यावेळी लक्षात असे येते की त्याला माहित झालेली किंवा त्याला हवी असलेली बाजू तो संबंधित माणूस मांडतोय. मी या मांडमांडीचा गेटकिपर आहे. उपसंपादकाचे काम गेटकिपरचे असते. कडीतला एक दुवा म्हणून त्याचे महत्व खूप असते. बाहेरच्या माणसांना संपादकानंतर उपसंपादकच असे वाटते. ते तसे नसते, उतरंडीत मध्येही काही कड्या असतात, पण उपसंपादकावर असलेल्या जबाबदाऱ्या जर बघितल्या तर तो तसा असतोच. एखाद्या बातमीला एखाद्या हेडिंगने तो जो झटका देऊ शकतो. एखादी बातमी अडवू शकतो, किंवा त्याला हव्या त्या पद्धतीने हवा तो विषय किल करत अनेकदा पाने भरत राहतो. त्यामुळे समाजात पसरणाऱ्या विचारांचा तो एका अर्थाने गेटकिपरच असतो. त्यामुळे मी माझ्या कामाकडे बघताना अत्यंत व्यापकपणे पाहतो, म्हणजे मला असे वाटते आपणाला एखाद्या शाळेवर शिक्षक होता आले नाही तरी आपण ज्या ठिकाणी काम करतो ते समाजशिक्षकाचे काम आहे. मग तिथे बसल्यावर आपल्या मित्रांचे, नातेवाइकांचे, कुटुंबीयांचे काहीही छापत रहा, अशी वृत्ती या व्यवसायात मोठ्या प्रमाणात आहे. त्यातून संबंधितांवर येणारी बंधनेही मोठी आहेत, असे अनेकदा दिसते. त्यामुळे हा लेख छापताना मी अनेक दिवस विचार केला होता.................... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा