बुधवार, २ डिसेंबर, २०१५

मी बदललो कारण.....

मी बदललो कारण.....
कॉलेजचे पहिले वर्ष संपताना माझी बरीच ओढाताण झाली. परीक्षा होण्याच्या अगोदरच संक्रमणाचा कालखंड सुरू झाला होता. लग्न, कॉलेज, आपली स्वप्न, कॉलेजच्या देखण्या पोरी, आपल्याला काहीतरी करायचे तर कशाला लग्न असे अनेक विचार डोके भणभणून सोडायचे. त्यामुळे त्या एकूण धक्‍क्‍यात असताना परीक्षा दिली. सहाजिक कमी मार्क पडले. त्यानंतर दुसऱ्या वर्षी होस्टेलला ऍडमिशन घेताना त्रास झाला. किमान साठ टक्के मार्क हवेत, असा एक ऍडमिशनचा निकष होता. तिथे मी कमी पडलो होतो. त्यामुळे आर. व्ही. कुलकर्णींनी ताणून धरले होते. खरे तर त्यांच्यावर लिहिलेल्या लेखापलीकडे आता थोडे आर. व्ही. विषयी सांगायला हवे. त्यांची विविध संस्था, संघटनांच्या उपक्रमात स्वतःला झोकून देऊन काम करण्याची पद्धत मला आजही आवडते. त्यामुळे आता मी त्यांच्यावर लेख लिहिला. तो प्रसिद्ध झाल्यावर अनेकांनी कळविले. अनेकांना हा लेख आवडला. हा लेख कुणीतरी फेसबुकवर टाकला, त्यावरही अनेकांनी कॉमेंट लिहिल्या होत्या. लेख वाचला, आवडला असे जे कळवितात, ते कोण? ही गोष्ट सुद्धा अनेकदा पारखून घेण्यासारखी असते. कळविणारे बहुतेकजण आपल्या किंवा आपण ज्यांच्यावर लिहितो, त्याच्या ओळखीचे असतात. त्यात हेतू ठेवून कळविणारेही काहीजण असतात. मी एकदा लेख लिहल्यानंतर किमान दहा- पंधरा बातमीदार तरी पूर्वी मी जिल्ह्याचे काम करीत असताना कळवायचे. त्यानंतर मी जेव्हा शहर समन्वयक म्हणून काम करायला लागलो तेव्हा यात पाच सहा जणांचे सातत्य राहिले. सांगायचा मुद्दा असा की खरेच आपले लेखन आपण एखाद्याच्या ओळखीचे नसतानाही त्याच्या लक्षात रहात असेल तर ते वेगळे असे मला वाटते.
कॉलेजच्या सुरवातीच्या दिवसात हिंदू महासभा नावाच्या पक्षाच्या युवक शाखेचे आपण काम करू, असे गिरीश लवळेकर सांगायचा. त्यादृष्टीने आम्ही काही हालचालीही केल्या होत्या. त्यांनी एक पदही मला दिले होते. त्याचा बोर्डही आम्ही कॉलेजच्या एका मोठ्या फळ्यावर लावला होता. आम्ही संघाच्या दसरा संचलनाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्या वयात जे एक भावनिक, भडक असे काही असते ते पटायचे. आर. व्ही. संघाचे स्वयंसेवक होते. हे मला त्यांच्या दसरा संचलनावरुन कळले. तसे गरवारे कॉलेजच्या वातावरणात सगळ्या प्रकारची मुले आमच्या सहवासात येत होती. तरी भाजप, शिवसेना किंवा त्या प्रकारचे प्रस्थापितांविरुद्धचे विचार जवळचे वाटायचे. गोपीनाथ मुंडेचे आरोप, गो. रा. खैरनारांचे आरोप, आण्णा हजारेंचे आंदोलन असे सगळ्यांची कॉलेज कट्ट्यावर चर्चा व्हायची. त्याने व्यवस्थेविरुद्ध वातावरण निर्मिती केली होती. गोपीनाथ मुंडेच्या संघर्ष यात्रेचा समारोप पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात होता, तिथे मी खूप ताटकळत बराच वेळ बसलो होतो. गो. रा. खैरनारांचे भाषणही एकदा रमणाबाग प्रशालेत होते. खूप मोठा बंदोबस्त होता. आम्हाला आत सोडले नाही पण आम्ही नुसता आवाज एकला होता. या सगळ्यांनी पुढे किती भ्रमनिराश केला हे आपल्या सगळ्याला माहित आहेच. पुढे एकूणच वैचारिक अंगाने वाचन करताना मी जसा जसा खोलवर जात राहिलो, तसे तसे मला भाजप, आरएसएसच्या विचारांपासून दूर नेले. मी बदललो. पण माणूस जसा वयाने वाढत जातो, तसतसे नव्या गोष्टी शिकत गेला तर त्याच्या विचारात फरक पडू शकतो. पण शेवटी आपण सगळे माणस आहोत, देवाची वगैरे माहित नाही पण निसर्गाची लेकरे आहोत. पृथ्वीची उत्पत्ती आणि माणसाचा जन्म या गोष्टी निसर्गचक्रातून झालेल्या असल्याचे समोर आलेले आहेच. त्याशिवाय पृथ्वीवर पहिला माणूस जन्माला आला त्यावेळी कुठे भेदाभेद असणार? त्यामुळे परिस्थिती समजून घेत गेले पाहिजे, असे मला वाटते. माणूस महत्वाचा. ते बळ मला माझ्या कॉलेजने वाचनामुळे दिले. 

४ टिप्पण्या:

  1. राजाराम, तुमचा हा लेख छान आहे. इतरही लेख वाचले. तुकडोजी महाराजांचे, त्यांच्या ग्रामगीतेचे आकर्षण तुम्हाला कसे वाटले, त्याविषय़ी वाचायला आवडेल. तुमची लेखनशैली साधी, सोपी आणि वाचकाला भूरळ घालणारी आहे. या सगळ्या लेखांचे पुस्तक करावे. अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  2. राजाराम, तुमचा हा लेख छान आहे. इतरही लेख वाचले. तुकडोजी महाराजांचे, त्यांच्या ग्रामगीतेचे आकर्षण तुम्हाला कसे वाटले, त्याविषय़ी वाचायला आवडेल. तुमची लेखनशैली साधी, सोपी आणि वाचकाला भूरळ घालणारी आहे. या सगळ्या लेखांचे पुस्तक करावे. अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  3. लग्न चोरले, मी बदललो कारण....., लेख आवडले
    ----- केशव प करंदीकर.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद... लिहिण्याने मनाचा निचरा होतो. दिवस बरा जातो. त्यात तुमच्यासारख्या जाणकाराचा प्रतिसाद म्हणजे तर आणखीच बरे वाटते.

      हटवा