शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६
मैत्र जीवाचे.... : पोमलवाडीकरांनीही केले मोठे काम
मैत्र जीवाचे.... : पोमलवाडीकरांनीही केले मोठे काम: मी साधारण 1999 मध्ये प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर वृत्तमालिका लिहिली. ती सोलापूर सकाळमध्ये प्रसिद्ध झाली. त्यावेळी मी पुण्यात होतो. ...
पोमलवाडीकरांनीही केले मोठे काम
मी साधारण 1999 मध्ये प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर वृत्तमालिका लिहिली. ती सोलापूर सकाळमध्ये प्रसिद्ध झाली. त्यावेळी मी पुण्यात होतो. विजय साळुंखे सर त्यावेळी सोलापूर आवृत्तीचे पुण्यातून काम पहात होते. या मालिकेत प्रामुख्याने मी दळवळणासाठी रस्त्यांचा अभाव, इतकी वर्ष झाली तरी प्लॉट न मिळणे, रखडलेले प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अशी तीन भागांची हि मालिका होती. त्या काळात होडी बुडाल्याची घटना कळाली की अंगावर थरकाप उडायचा. अशा काही घटना या भागात झाल्या पण या गावात अशी दुर्घटना कधी घडली नाही. होडी एकदा बुडाली, पण वेगळ्या ठिकाणी. पैलवान पोर होडी घेऊन आगोतीला गेली होती. तिथे फड होता. या होडीत पाणी येत होते. तिकडून यायला अंधार झाला. बुडालेली होडी गांजीवळण येथे सापडली. तशी होडी बुडाली तरी तिचा घोडा वरच राहतो. होडी कधी तळाला जात नाही. तिच्यात जर काही वजन असेल तर मात्र ती वर रहात नाही. पाणी आले की बुडायला लागते. त्यानंतर 2001 मध्ये मी सोलापुरात आल्यावर अनेकदा हे विषय येत गेले. सकाळमध्ये साधारण 2008 च्या दरम्यान लोक लोकवर्गणीतून काम करणार असेही छापून आले होते. बातम्या येत गेल्या. पुण्यात असताना दोनदा मी रात्री एकटाच होडी घेऊन केत्तूर दोनवरुन केत्तूर एकला आलो होतो. एकदा नदीच्या काठालाच रात्रभर बसलो होतो. आता जशी मोटारींची गर्दी आणि सतत नदीच्या काठाने लोकांचा वावर असतो, तितका त्या काळात नसायचा. त्यामुळे एकट्यादुखट्याने जाणे म्हणजे अंगावर काटा यायचा. तसे पारेवाडी रेल्वे स्टेशन हे चोऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण केत्तूर एकच्या लोकांना फार कधी अशा चोऱ्यांचा खूप त्रास झालेला मला आठवत नाही.
केत्तूरच्या गावकऱ्यांनी केलेल्या या कामानंतर पुढच्या उन्हाळ्यात म्हणजे 2013 मध्ये केत्तूर पोमलवाडी जोडणाऱ्या रस्त्याचे काम केत्तूर दोन आणि पोमलवाडी ग्रामस्थांनी सुरू केले. त्याला विरोध हिंगणी ग्रामस्थांनी केला. त्याला पारेवाडी ग्रामस्थांचा पाठिंबा होता. विरोधाचे कारण असे होते की आमचे पाणी तुम्ही अडवत आहात. त्याला मग पुढे राजकारणाचे स्वरुप आले. त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. याबाबत पाहणी करुन पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल द्यावा, असा आदेश न्यायालयाने केला. त्याची मग एक अशी आवई उटली की काम बंद करायला सांगितले आहे. त्यावेळी मी अशोक पाटील, सूर्यकांत पाटील, अजित विघ्ने या मंडळींशी बोलून प्रतिक्रियांची एक बातमी दिली. आम्ही एक छोटा पूल बांधत आहोत, कुणाचे पाणी अडवत नाही. न्यायालयाची याचिकार्त्यांनी दिशाभूल केल्याची चर्चा असा बातमीचा पोटमथळा होता. त्यानंतर मग दोन सुनावण्या न्यायालयापुढे झाल्या. याचिका डिसमीस झाली. ही बातमी मला आवडण्याचे कारण आपण एखादी बाजू घेऊन काही लिहिणे हा भाग जरी त्यात असला तरी लोक आपल्या दळणवळणाच्या सुविधेसाठी काहीतरी बघत असताना त्याला खोडा घालून ते सगळे तसेच पडू देणे हे काही बरोबर नाही, असे माझे मत होते.
याचिका निकालात निघाल्यानंतर पोमलवाडीकर नेटाने कामाला लागले. त्यांनी तर खूपच मोठे काम केले आहे. आता या दोन्ही ठिकाणची गरज अशी आहे की पक्का डांबरी रस्ता होऊन ही गाव भिगवणशी जोडली जाणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा परिषद, राज्य सरकार हे काम करणे गरजेचे आहे. एका पिढी समस्याग्रस्त जगत गेली आता प्रकल्पग्रस्तांच्या दुसऱ्या पिढीसाठी झालेल्या कामांचे मोल मोठे आहे.
बुधवार, २० जानेवारी, २०१६
दात्यांची कमतरता नाही
केत्तूरच्या पुलासाठी इतके पैसे कसे जमविले? असा प्रश्न अनेकजण विचारतात. खरे तर आज जमाना घ्यायचा आहे. द्यायला तयार असणाऱ्यांचे प्रमाण कमीच दिसते. पण गावात देणाऱ्यांची कमतरता नाही, हे यावेळी दिसून आले. त्यात "उजनी धरणाने गावाला काही दुःख जरूर दिली. अनेक मूलभुत सुविधा अजून प्रकल्पग्रस्त भागात नाहीत पण तरीही एक गोष्ट मात्र नक्की दिली. पाणी. त्याच्या जिवावर या भागात सगळा ऊस पिकतो. शेतकरी कर्जात असले तरी त्यांच्या हातात पैसा खेळतो आहे. या आर्थिक ताकदीच्या बळावर हे काम झाले. जिराईत भागात असे काम करायचे म्हटले तरी ते ज्यांच्या हातात पैसाच नाही, त्यांना जमणार कसे? दुसरी गोष्ट दानतही लागते. एखाद्या कुठल्याही सार्वजनिक उत्सवाला गावात हाक दिली तर लाखदोन लाख सहज गोळा होतात. त्यामुळे एक बैठक घेतली आणि ठरविले प्रत्येकाने वर्गणी द्यायची. ज्यांना ऊस जात नाही, त्यांनी आपल्या ऐपतीप्रमाणे जितका वाटा उचलता येईल तितका उचलायचा. गावातल्या लोकांत स्वाभिमान जागा झाला. शेजारपाजारच्या गावांनीही मदत केली. केत्तूरची दोन्ही गावातील गावकरी मदतीला धावले. गोयेगावकरांना वाटले, त्यांनी काही मदत दिली. पारेवाडीसह परिसरातील अन्य गावातील काही माणस मदत केली. दात्यांची कमतरता या भूमीत कधीच नव्हती आणि नाहीसुद्धा, फक्त विश्वाहार्य माणस लागतात. या कामासाठी सगळेच पुढे आले. त्यांच्यातल्या चांगुलपणाविषयी लोकांना विश्वास वाटला म्हणून काम झाले आहे. पन्नास हजार देऊ शकतील अशीच एक यादी झाली. मग कामाला सुरवात झाली.
जागा झाला स्वाभिमान
गावाच्या मनात कोणत्याही नेत्याविषयी अथवा पुढाऱ्याविषयी कटुतेची भावना नाही. आश्वासने देणे पुढाऱ्यांचे काम आहे, असे ते मानतात. त्यामुळे त्यांनी काम सुरू केले. गावकऱ्यांची मदत मिळत गेली. बघता बघता काम उरकत आले. सुरवातीला अगदी बातम्या येण्याअगोदर हे काम नेमके काय हे बघण्यासाठी आसपासच्या परिसरातील दोन चारशे लोक रोजच काम बघायला यायचे. लोकांत जागा झालेला स्वाभिमान पाहून लोकांना खूप बरे वाटायचे. आपणही काहीतरी करू शकू, अशी भावना लोकांत जागी व्हायची. हे काहीतरी वेगळे आहे. लोकांना व्यक्त होण्याचे हे माध्यम आहे, असे लोकाना वाटायचे. मग जेव्हा पुन्हा वर्तमानपत्रात त्याच्या बातम्या येऊ लागल्या. पुन्हा दूरचित्रवाणी वाहिन्यांचे लोक यायला लागले. कामाची प्रसिद्धी सर्वदूर होत गेली. लोकांना बरे वाटायला लागले.
यांनी घेतला पुढाकार
या पुलाच्या बापूसाहेब पाटील यांच्याबरोबरच बंडू पाटील, माधवराव खाटमोडे, शंकर कानतोडे, डिगांबर नाझरकर, आबा ठोंबरे, रामा कोकणे, लालासाहेब कोकणे, हनुमंत राऊत, नवनाथ राऊत, भीमराव येडे यांच्याबरोबरच केत्तूर दोनमध्ये राहणारे माजी सरपंच अशोक पाटील, उदयसिंह मोरे पाटील, दादासाहेब निकम, पंडित माने, राजाराम माने, अजित विघ्ने यांच्यासह गावातल्या प्रत्येकाचाच पुढाकार घेतला. इथे नाव राहिल तरी मुळात नावासाठी कुणी कामच करत नव्हते. यातल्या अनेकांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून अगदी मुंबई, दिल्लीपर्यंत भेटीगाठी घेतल्या. मग स्वतःच कामाला सुरवात केली. ते पूर्णत्वास नेले. रामराव पाटील यांनी मागदर्शकाची भूमिका निभावली. आमच्या काळात काही होऊ शकले नाही आता तुम्ही करत रहा, असा त्यांचा सल्ला असायचा, असे गावातील तरुण मंडळी सांगतात.
या कामाबाबत करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती बापूसाहेब पाटील म्हणतात, ""राजकीय व्यवस्थेवरचा लोकांचा उडत चाललेला विश्वास ही चिंतेची बाब आहे. पूर्णवेळ राजकारण करणाऱ्या सगळ्याच पक्षातल्या लोकांनी याचा विचार करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट आम्ही केलेले काम हा एक प्रयोग आहे. त्याची लोकचळवळ होणे ही आजची, काळाची गरज आहे. सरकार तुमच्या सगळ्याच गोष्टीला पुरे पडू शकत नाही. त्यामुळे लोकांनी एकत्र येऊन आपली कामे मार्गी लावणे हा संदेश यातून सर्वदूर जायला हवा.'' (क्रमशः)
मंगळवार, १९ जानेवारी, २०१६
सारेच पुढारी कुचकामी
केत्तूरची दखल विविध वाहिन्यांनी घेण्यासाठी एक बातमी कारणीभूत ठरली. "शिक्षणाची वाट जाते, मरणाच्या दारातून,' ही केत्तूरची बातमी 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली. त्याला फोटो जबरदस्त प्रसिद्ध झाला होता. रेल्वे पुलावरून मुले शाळेला जातायत आणि समोरुन रेल्वे आली, असा तो फोटो होता. राजाराम माने यांनी दिलेल्या फोटो बातमीने हा विषय एकदम क्लीक झाला. त्यानंतर अनेक वाहिन्या तिकडे धावल्या. मराठी वाहिन्यांबरोबरच हिंदी वाहिन्यांचाही त्यात समावेश होता. वेगवेगळ्या पातळ्यांवर या बातमीची दखल घेतली गेली. त्यात त्यावेळचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा विषय आपण सोडवू, एक पायवाट होईल एवढा पूल तयार करून देऊ. अशी घोषणा केली. एक शिष्टमंडळ तेव्हाचे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना भेटायला गेले. त्यांनी हा विषयात लक्ष घालून राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री छगन भुजबळ यांना फोन करून प्रश्न मार्गी लावा, असे सांगितले. पुन्हा जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनीही या पुलासाठी निधी मंजूर झाल्याची घोषणा केली. त्यावेळच्या स्थानिक आमदार श्यामल बागल यांनीही त्याबाबत निधी मंजूर झाल्याचे सांगितले. प्रत्यक्षात या गावची तरुण मंडळी सरकारी कार्यालयांत फेऱ्या मारायची तेव्हा लक्षात यायचे की कुठेच काही सरकारी पातळीवर काही हलायला तयार नाही. हे काही खरे नाही, असेही खासगीत काही मंडळी गावकऱ्यांना सांगायची. त्यामुळे गावकरी निराश झाले. आता आपणच काहीतरी केले पाहिजे, हा विडा त्यांनी उचलला.
पार्श्वभूमी
खरे तर या विषयाला तसा फार जुना संदर्भ आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आता समोर आली आहे. नगर आणि कोल्हापूरला मागे टाकत गेल्या हंगामात 28 तर या हंगामात 34 साखर कारखाने उसाचे गाळप करत आहेत. ही ताकद या जिल्ह्यात कुठून आली, याचा शोध घेतला उजनी धरण हीच एक बाब समोर येते. या धरणाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी सात मार्च 1966 मध्ये केले. या धरणासाठी एकूण 51 गावे उठवावी लागली. त्यात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील 19, माढा तालुक्यातील चार, पुणे जिल्ह्यातील 25 तर नगर जिल्ह्यातील एका गावाचा समावेश होता. या 51 गावांपैकी एक म्हणजे करमाळा तालुक्यातील केत्तूर. या पुनर्वसित गावांचे अनेक प्रश्न होते आणि आहेत. मुलभूत सुविधांपासून अगदी स्मशानभूमीपर्यंत अनेक प्रश्नांची यादी करता येईल. केत्तूरसह काही गावांची गत तर वेगळीच झाली होती. एका गावाची दोन गावे झाली. केत्तूर नंबर एकच्या तीन बाजूंनी पाणी आली. रस्त्याने केत्तूर एकहून दोनला जायचे म्हटले तर किमान 13 किलोमीटर अंतर कापावे लागत होते. दोन्ही गावांना जोडणारा मधला मार्ग होडी. त्यातून लोक प्रवास करीत होते. हा कायम जिवावरचा प्रवास होता. या ठिकाणी पूल झाला पाहिजे, यासाठी गावकऱ्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. मात्र अशी कामे होण्यासाठी जो एक राजकीय आवाज लागतो, तो गावांत नव्हता. त्यामुळे हा प्रश्न राजकारणाच्या दृष्टीने ऐरणीवर आला नाही. जागतिक बॅंकेच्या मदतीतून प्रकल्पग्रस्त भागात काही कामे झाली. त्यावेळी देवराव नवले, नवनाथ राऊत यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी निविदा निघण्याअगोदरच काही काम केले. पण पुढे या कामाकडे कुणी सरकारी यंत्रणेतल्या कुणी ढुंकूनही बघितले नाही. पुढे बातम्या येत गेल्या. कधी लोकवर्गणीतून काम होणार अशा तर कधी सरकारने काम मंजूर केले असे छापून येऊ लागले. बोलले जाऊ लागले. त्यातून एक गोष्ट होत राहिली. गावकऱ्यांच्या मनात या कामाविषयी एक धगधगती भावना कायम राहिली. हे काम झाले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे प्रत्येकाने या कामात आपला खारीचा वाटा उचलला.
आपणच काम करावे, हि कल्पना कशी सुचली, यावर गावकरी सांगतात, "एक दिवसात गावाला सुचलेली ही कल्पना नाही. गेली तीस चाळीस वर्ष केत्तूर नंबर एक हे गाव बेटासारखे जगत होते. उजनी धरण झाले, गावात पाणी आले. नव्या गावात, शिवारात गावकरी येऊन विसावलो. तिथेही पाण्याने त्यांची पाठ सोडली नाही. केत्तूर एकच्या लोकांना रोज तळहातावर जीव घेऊन होडीतून प्रवास करावा लागायचा. गावची पोर शाळेसाठी रोजच मृत्युच्या दारातून प्रवास करायची. आम्हाला रस्ता हवा, छोटासा पूल हवा म्हणून गावकरी गाऱ्हाणी घेऊन फिरायचे. निर्दयी, थंड शासन त्यांच्यासाठी हलत नव्हते, फक्त पुढारी बातम्या आल्यावर बोलत होते. लोक इथे -तिथे धावत होते. आमच्या लक्षात आले व्यवस्थेपुढे कितीही डोके आपटले तरी आपलेच डोके फुटायची शक्यता आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. सगळ्या गावाचा हा निर्णय आहे.'
सोमवार, १८ जानेवारी, २०१६
चिमूटभर गावाची मूठभर ऊर्जा
करमाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्त केत्तूरमध्ये लोकवर्गणी आणि ग्रामस्थांचे श्रमदान यातून रस्ता आणि पुलाचे काम झाले. दीडशे पावणेदोनशेचा उंबरा असलेल्या चिमुटभर गावाने उभारलेले हे काम अनेकांना थक्क करते. तरुण मुलांत, शेतकऱ्यांत ही ऊर्जा कुठून आली? त्यांनी पैसे कसे जमविले? या सगळ्याची नेमकी पार्श्वभूमी काय?
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात प्रकल्पग्रस्त केत्तूर एक ते दोनला जोडणाऱ्या पुलाचे लोकवर्गणीतून झालेले काम ही तशी एक छोटी तरीही क्रांतिकारक घटना आहे. शेती करणाऱ्या तरुण पोरांनी, शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून, श्रमदानातून विकासकामे या संकल्पनेचा केलेला हा एक छोटासा प्रयोग आहे. व्यवस्थेने कायम ज्यांची लुबाडणूक केली त्या शेतकऱ्यांच्या आणि गावात राहणाऱ्या तरुण पोरांच्या हातात काही रक्कम आली तर ते किती उदार होऊन आपल्या सोईसाठी खर्च शकतात, याचे हे उदाहरण आहे. दीड-दोनशे उंबरा असणाऱ्या चिमूटभर गावाने निर्माण केलेली ही मूठभर ऊर्जा व्यवस्थेला विचार करायला लावणारी आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना विधायक बळ देणारी आहे. शहरी, स्वकेंद्रीत सरकारच्या नावाने कायम खडे फोडणाऱ्यांना मार्ग दाखविणारी आहे. सरकार नावाच्या डोळे झाकून बसलेल्या यंत्रणेला जागे करणारी आहे. आपण लोकांना कायम भुलवू शकत नाही. गाव छोटे असले तरी आपली लक्तरे वेशीवर टांगू शकते, असा संदेश पुढाऱ्यांना देणारी ही घटना आहे. अशी कामे जिथे होतात तिथे एक गोष्ट दिसते, ती अशी की त्याठिकाणचे नेतृत्व नेतेगिरी करणारे नसते. लोकांच्या आशाआकांक्षांना विधायक वळण देताना त्यांना विश्वास वाटेल अशा म्होरक्यांची गरज असते. तसा जो कुणी म्होरक्या असतो तो म्हणजे आपणच आहोत, इतका विश्वास निर्माण झाला की लोक त्याच्या खांद्यावर मान टाकायला तयार होतात. या कामातही तेच झाले, जे पाच सहाजण पहिल्यापासून या कामासाठी धडपडत होते, त्यांनीच पुढेही पुढाकार घेऊन हे काम तडीला नेले. काम किती चांगले झाले? किती दिवस टिकेल? नियोजनाने प्लॅनइस्टीमेट तयार केले होते का? अशा प्रश्नांना उत्तर देण्याची गरज नाही. कारण हे या कामात गावकऱ्यांचा जीव एकवटला होतो. जिथे जीव ऐकवटतो, ते काम चांगले होतेच. जिथे जीव एकवटतो तिथे नवनिर्माणाची प्रक्रिया घडते. साधी जेवणासाठी भाजी करायची म्हटले तर ती जर मनापासून केलेली असेल तर तिला फार मसाला नसला अगदी चटणी, मीठ टाकूनच केली तर तिला भुकेल्यापोटासाठी चव येते. तसे या कामाचे आहे. हे गाव या कामासाठी साधारण 30-35 वर्ष धडपडत होते. आख्खे गाव या कामासाठी एक झाले होते. त्यामुळे त्याला निर्माण झालेली नवनिर्मीती ही अनेकांना थक्क करायला लावणारी आहे. त्यामुळे नुसतीच मुद्रीत माध्यमे नव्हे तर विविध मराठी, हिंदी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी या कामाची दखल घेतली. देशभर हा विषय गेला. (अपूर्ण)
गुरुवार, १४ जानेवारी, २०१६
आरक्षण
महाबळेश्वरच्या अक्षर मानव संमेलनानंतर सोलापुरात आल्यावर हयात पठाण, भरत यादवच्या पुढाकारने आम्ही चौघांनी प्रत्येकी काही रक्कम घालत हत्तरसंग कुडलला सोलापुरातील दहा कॉलेजांमधील साठ तरुण मुलामुलींचे संमेलन घेतले. ते सुद्धा खुल्या चर्चेचे. तिथेही झालेली आरक्षणावर चर्चा तरुणांच्या मनात खदखदत असलेल्या असंतोषावर प्रकाश टाकत गेली. आरक्षण कशासाठी याची समाजात खोलवर जाणीव करुन देण्यात आपली व्यवस्था समाजकारण करणारी मंडळी किती तोकडी पडतात, याचे दर्शन झाले. या संमेलनात कॉम्रेड तानाजी ठोंबरे, दत्ता गायकवाड, चित्रकार धोत्रे यांची भाषणे खूप चांगली झाली होती. दत्ता गायकवाड यांनी आरक्षणासंबंधी मांडलेली भूमिका अनेकांना नव्यानेच दृष्टी देऊन जाणारी होती. ते म्हणाले, "आरक्षण कुणाला मिळते. ते फक्त शिक्षण घेणाऱ्या गरीब मुलांना मिळते, असा आपला समज आहे. पण तसे नाही. सहकारी साखर कारखाने उभारणारे साखर सम्राट, शैक्षणिक संस्था काढून सरकारी फायदे लाटणारे शिक्षणसम्राट यांना ज्या मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्या जातात, त्यांना आपण आरक्षण म्हणणार नाही का? आरक्षण पहिले कुणी दिले. मनु नावाच्या ऋषीने. समाजातील प्रबळांना शंभर टक्के. शेती आणि संपत्तीत. आरक्षण हा काही दारिद्रय निमुर्लनाचा कार्यक्रम नाही. हजारो वर्ष पिचलेल्या पिचलेल्या वर्गाला सगळ्यांच्याबरोबर आणण्यासाठीचा तो सामाजिक विषय आहे. नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण घेणारी आणि आरक्षण न घेणारी मुले ज्यावेळी समान पातळीवर येतील, तेव्हा आरक्षण आपोआप संपेल. आपण गोष्टी खोलवर समजून घेतल्या पाहिजे.'
सगळ्या मुली-मुलांना बोलते केल्यानंतर तिथून निघताना आपण नवे काहीतरी शिकलोय, या जाणिवेबरोबरच मुलांना व्यक्त होऊ दिल्यानंतर त्यांचे फुलून जाणे पुन्हा पुन्हा आपण भेटत राहू असे म्हणणे हे सगळे तसे आनंददायक होते. त्याच रात्री रात्रभर राजन खान यांच्याबरोबर मारलेल्या गप्पा म्हणजे खूप वेगळा अनुभव होता. रात्री साधारण आम्ही आठला सोलापुरात आलो. पुढे मी व्यक्तीगतरित्या या मुलांशी संबंध ठेवला नाही. पुढे वेळ मिळेल तशा विविध गोष्टी करत राहिलो.
पाचगणीला 2013 लाही पुन्हा जाऊन आलो. संमेलनाचा विषय माणूस होता. या संमेलनातून आपल्याला फार काही मिळाले नाही, असे वाटत राहिले. या संमेलनात खरे तर मला बोलायला मिळाले. मी मला भेटलेल्या, माझ्यावर ठसा उमटविणाऱ्या माणसांविषयी बोललो. लोकांनी दाद दिली. या संघटेकडून आपण काय मागतो तर काहीच नाही. पण तरीही तसा या संघटनेशी संपर्क राहिला नाही.
माणूस केंद्रस्थानी ठेऊन आपण जसा विचार करतो, तसा विचार समाजात रुजणे हे कितीही महत्वाचे असले तरी सगळीच माणसं तसा विचार करतात, असे नाही. कट्टरपणा सगळीकडेच आहे. कट्टरपणाला कट्टरपणा हे काही उत्तर नाही, असे मला नेहमी वाटते. त्यामुळे जिथे माणसाच्या मनात माणसांप्रती दुजाभाव दिसतो, तिथे आपले जमत नाही. मन रमत नाही. एखादा चुकत असेल, चुकला असेल तर त्याला आईच्या ममतेने दोन रट्टे देणे वेगळे आणि त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करुन शत्रू मानणे वेगळे. माणसाने माणसाचा शत्रू कधी होऊ नये असे मला वाटते. आयुष्याच्या अगदी चाळीशीत मला ही गोष्ट निदान वाचेच्या पातळीवर कळाली आणि आकलनाच्या पातळीवर मांडता येऊ लागली, असे मला वाटते.
गावात आपण काहीतरी करावे, ही उमीसुद्धा एके काळी माझ्या मनात फार उफाळून आली होती. अनेक पोरांशी त्याविषयी गप्पा मारायचो. पण त्या अनुभवातून मी इतकेच शिकलो की आपण आपल्या गावात काही करण्यापेक्षा बाहेर बरेच काही करु शकतो. बाहेर काही हातपाय मारायचे प्रयत्न करायला जमले नाही. खरे तर हे सगळे अनुभव या मुलींच्या सामाजिक कार्याच्या अनुभवाच्या निमित्ताने मांडणे एवढेच त्याचे प्रयोजन आहे. या मुलींबरोबर आम्ही पुढे एक नोहार्ड नावाची सेवाभावी संस्था धर्मदाय आयुक्तांकडे रजिस्टर केली. नोकरीत असल्या कामाला कधीच वेळ देता येत नाही. त्या संस्थेचे पुढे काय झाले, मला माहित नाही मात्र दोन तीन बैठकांनंतर मी या संस्थेच्या कामात काही लक्ष घातले नाही. आता या टप्प्यावरसुद्धा मला असे वाटते की आपण सामाजिक कामात उतरावे. काहीतरी वेगळे करता आले तर पहावे. मला आता समाजातील वृद्धांचे प्रश्न फार भीषण झाल्याचे दिसते. त्यांच्यासाठी आपल्या काय करता येईल याची मी खरेच मनोमन चाचपणी करीत आहे. काही गोष्टींचे आराखडे मनात बांधले जात आहेत. आणखीही काही मनात आहे. ते आकाराला येईल तेव्हा त्यातले अनुभव खरेपणाने शेअर करता आले तर बरे होईल. पण त्यासाठी जुने काही पाश तोडावे लागतील. ते कधी तुटणार असा मी मला प्रश्न विचारतोय?
सगळ्या मुली-मुलांना बोलते केल्यानंतर तिथून निघताना आपण नवे काहीतरी शिकलोय, या जाणिवेबरोबरच मुलांना व्यक्त होऊ दिल्यानंतर त्यांचे फुलून जाणे पुन्हा पुन्हा आपण भेटत राहू असे म्हणणे हे सगळे तसे आनंददायक होते. त्याच रात्री रात्रभर राजन खान यांच्याबरोबर मारलेल्या गप्पा म्हणजे खूप वेगळा अनुभव होता. रात्री साधारण आम्ही आठला सोलापुरात आलो. पुढे मी व्यक्तीगतरित्या या मुलांशी संबंध ठेवला नाही. पुढे वेळ मिळेल तशा विविध गोष्टी करत राहिलो.
पाचगणीला 2013 लाही पुन्हा जाऊन आलो. संमेलनाचा विषय माणूस होता. या संमेलनातून आपल्याला फार काही मिळाले नाही, असे वाटत राहिले. या संमेलनात खरे तर मला बोलायला मिळाले. मी मला भेटलेल्या, माझ्यावर ठसा उमटविणाऱ्या माणसांविषयी बोललो. लोकांनी दाद दिली. या संघटेकडून आपण काय मागतो तर काहीच नाही. पण तरीही तसा या संघटनेशी संपर्क राहिला नाही.
माणूस केंद्रस्थानी ठेऊन आपण जसा विचार करतो, तसा विचार समाजात रुजणे हे कितीही महत्वाचे असले तरी सगळीच माणसं तसा विचार करतात, असे नाही. कट्टरपणा सगळीकडेच आहे. कट्टरपणाला कट्टरपणा हे काही उत्तर नाही, असे मला नेहमी वाटते. त्यामुळे जिथे माणसाच्या मनात माणसांप्रती दुजाभाव दिसतो, तिथे आपले जमत नाही. मन रमत नाही. एखादा चुकत असेल, चुकला असेल तर त्याला आईच्या ममतेने दोन रट्टे देणे वेगळे आणि त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करुन शत्रू मानणे वेगळे. माणसाने माणसाचा शत्रू कधी होऊ नये असे मला वाटते. आयुष्याच्या अगदी चाळीशीत मला ही गोष्ट निदान वाचेच्या पातळीवर कळाली आणि आकलनाच्या पातळीवर मांडता येऊ लागली, असे मला वाटते.
गावात आपण काहीतरी करावे, ही उमीसुद्धा एके काळी माझ्या मनात फार उफाळून आली होती. अनेक पोरांशी त्याविषयी गप्पा मारायचो. पण त्या अनुभवातून मी इतकेच शिकलो की आपण आपल्या गावात काही करण्यापेक्षा बाहेर बरेच काही करु शकतो. बाहेर काही हातपाय मारायचे प्रयत्न करायला जमले नाही. खरे तर हे सगळे अनुभव या मुलींच्या सामाजिक कार्याच्या अनुभवाच्या निमित्ताने मांडणे एवढेच त्याचे प्रयोजन आहे. या मुलींबरोबर आम्ही पुढे एक नोहार्ड नावाची सेवाभावी संस्था धर्मदाय आयुक्तांकडे रजिस्टर केली. नोकरीत असल्या कामाला कधीच वेळ देता येत नाही. त्या संस्थेचे पुढे काय झाले, मला माहित नाही मात्र दोन तीन बैठकांनंतर मी या संस्थेच्या कामात काही लक्ष घातले नाही. आता या टप्प्यावरसुद्धा मला असे वाटते की आपण सामाजिक कामात उतरावे. काहीतरी वेगळे करता आले तर पहावे. मला आता समाजातील वृद्धांचे प्रश्न फार भीषण झाल्याचे दिसते. त्यांच्यासाठी आपल्या काय करता येईल याची मी खरेच मनोमन चाचपणी करीत आहे. काही गोष्टींचे आराखडे मनात बांधले जात आहेत. आणखीही काही मनात आहे. ते आकाराला येईल तेव्हा त्यातले अनुभव खरेपणाने शेअर करता आले तर बरे होईल. पण त्यासाठी जुने काही पाश तोडावे लागतील. ते कधी तुटणार असा मी मला प्रश्न विचारतोय?
बुधवार, १३ जानेवारी, २०१६
मनात रुतलेले वाक्य
मनात रुतलेले वाक्य
आपला विचार, आपण, समाजतील विषमता, देवधर्म, आपले महापुरुष आणि व्यवस्थेवर वर्चस्व गाजविणाऱ्या माणसांचे गरीबांना गांजणे, व्यवस्था घट्ट व्हावी म्हणून पेरला जाणारा विचार अशा बारीक सारीक गोष्टींवर गप्पा मारण्यात एक वैचारिक आनंद मिळतो. त्यातून आपल्याला आपलेपण अनेकदा सापडते. अशा गप्पा मारताना भरत यादवने एक दिवस अक्षर मानव संमेलनाच्या पत्रकाची माहिती दिली. महाबळेश्वरजवळ खिंगरला होणारे संमेलनाविषयीची भूमिका भारी होती. आपण जाऊ तिकडे अशी आम्ही चर्चा केली. पुढे बरेच दिवस त्या विषयावर काही चर्चा झाली नाही, मग संमेलन अगदी तोडांवर आल्यावर मी पुण्यात विचारून त्यांचा आजीव सभासद झालो. माझ्याअगोदरच भरतने त्याच्यासह हयातमहंमद पठाण, सिद्धाराम वाघ, राकेश कदमला आजीव सभासद करुन घेत आपली जागा फिक्स केली. त्यानंतर मात्र मग प्रत्यक्ष खिंगरला सिद्धाराम, मी आणि भरत पुढे गेलो होतो. तीन दिवस आणि चार रात्री तिथे राहिलो. पाऊस छपाछपा कोसळत होता. जेवणाची सोय उत्तम पद्धतीने केलेली होती. महाराष्ट्रातून आलेली निवडक माणसं व्यासपीठावर बोलत होती. कोण बोलणार हे काही ठरलेले नसते, असे निदान सांगितले जाते. वैचारिक वादात भांडणे करायची नाहीत आणि दारु पिणाऱ्यास हाकलून दिले जाईल, असा तिथला नियमच होता. बोलणाऱ्याचे बोलणे संपल्यावर त्याला प्रश्न विचारणे, त्याच्या माहितीत काही भर घालणे अशी प्रत्येकाला व्यासपीठावर नाही निदान प्रेक्षकांतून तरी बोलायला संधी तिथे असते. तीन दिवसात अनेक चांगले वक्ते ऐकले. सकाळी दहानंतर चहा नास्ता झाल्यावर चर्चेला सुरवात होते. ती संध्याकाळपर्यंत चालायची. त्यानंतर रात्री शेकोटी पेटवायची, त्याच्यासमोर गप्पा मारत बसायचे. तीन रात्री आम्ही इतक्या तुफान गप्पा मारल्या की त्याने रात्री झोप न येणे किंवा आपल्यात काहीतरी बदल होतोय, याची जाणिव करुन देणारी ती प्रक्रिया होती. समाज हा 2012 च्या संमेलनाचा विषय होता. त्यात महिलांच्या प्रश्नावर चर्चा झाली. त्यातले एक वाक्य मला अजूनही काही केल्या मनातून जात नाही. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरहून ज्येष्ठ कवियत्री सुमती लांडे संमेलनाला आल्या होत्या. त्या बोलल्या. त्यांचे भाषण झाले चांगले मात्र नंतर चर्चेत त्या पुढे आल्या. बायकांच्या प्रश्नावर चर्चा होती. बायका आपल्यावर घरातून आणि बाहेरही अन्यायवर झाल्यावर बोलत नाही. त्यांनी बोलायला हवे, असे कुणीतरी सांगत होते. सुमतीबाई पुढे गेल्या त्यांनी सविस्तर मांडणी केली, मात्र त्या म्हणाल्या, "बायका बोलत नाहीत, हे तसे बरे आहे. त्या जर बोलायला लागल्या आणि खरे बोलायला लागल्या तर आपल्याकडील कुटुंबव्यवस्थाच मोडखळीस येईल. सगळ्याच गोष्टी त्यांना कुठे सांगायची संधी असते.' हे वाक्य माझ्या मनात रुतून बसले आहे. या संमेलनासाठी अनेक मान्यवर आले होते मात्र संमेलन गाजविले ते हरी नरके यांनी. त्यांनी मराठी अभिजात भाषा असल्याचे खूप जोरदारपणे मांडले होते. यवतमाळचे डॉ, अशोक राणा, कवियित्री नीरजा, विद्या बाळ, अश्विनी धोंगडे, रंगनाथ पाठारे अशा एक ना अनेकांशी यानिमित्ताने गप्पा मारण्याची संधी मिळाली. पुण्याच्या अक्षरमानवच्या टीममधील अभिजीत सोनवणे, कविता दातीर, प्रशांत कांबळे, कोल्हापूरच्या सुषमा शितोळे यांच्यासह अनेकांशी गप्पा झाल्या. कविता दातीर आणि अमृता देसरडा यांनी मांडलेली भूमिकाही नव्या पिढीच्या मुलींच्या ठाव घेणारी होती. (अपूर्ण....)
मंगळवार, १२ जानेवारी, २०१६
धरणग्रस्तांचा मेळावा
पुणे विद्यापीठात असताना 1996-97 मध्ये राजा कांदळकर यांच्याबरोबर चांगली ओळख झाली. मग पुना हॉस्पीटलजवळ एका बैठकीला गेलो होतो. तो त्यावेळी समाजवादी जन परिषदेचे काम करीत होता. भाई वैद्य आणि अन्य समाजवादी मंडळीनी काढलेला या पक्षाची युवा शाखा सुरू करायची होती. या बैठकीला सुगंध देशमुख आणि अन्य बरीच मंडळी आली होती. यावेळी विविध पदांवर नेमणुका झाल्या, मात्र या युवा शाखेने आणि या पक्षानेही काही फार बाळसे धरले नाही. पण यानिमित्ताने काही वाचन झाले. वेगवेगळ्या भेटीगाठी होत राहिल्या.
याचा कालखंडात माझ्या गावात एक धरणग्रस्तांचा मेळावा झाला होता. माझं केत्तूर गाव. त्यावेळी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, नेते आणि आयुष्यभर ज्यांनी दिनदुबळ्यांसाठी काही करुन ठेवले आहे, ते बाबा आढाव आमच्या गावात आले होते. बाबांचे एक गाव एक पाणवठा हे पुस्तक मी वाटले होते. त्यांचे पुण्यातील हमालांसाठी केलेले काम, पुण्यात काढलेली झुणका भाकर केंद्र मला माहिती होती. अनेक दिनदुबळ्यांचा ही झुणका भाकर केंद्र आधार आहे. बाबा आढाव यांच्याबरोबर विभागीय आयुक्त जोशी होते. लोकांनी समास्या मांडाव्यत यासाठी धरणग्रस्तांना बोलण्याची संधी दिली जात होती. कुणी शेती मिळाली नाही. कुणी प्लॉट मिळाला नाही. कुणी विनाकारणच आमच्या जमिनीच्या सातबारावर प्रकल्पग्रस्तांसाठी संपादीत म्हणून नोंद झाल्याचे सांगत होते. प्रश्न खूप होते. लोक बोलत होते. सरकारी यंत्रणा जशी ढिम्म असते तसे अधिकारी होते. मी उठलो. एकजण बोलत असताना मध्ये बोलायला लागलो. काही प्रश्न मांडले. शेवटी आयुक्तांना म्हणालो, "तुम्ही सरकारने आतापर्यंत धरणग्रस्तांसाठी काय केले आहे, ते सांगा. माझ्या बोलण्यात शेवटी मी "एक्सलेनेशन द्या' हा शब्द वापरला. ते सुपर क्लासवन अधिकारी. वैतागले आणि माझ्यावर भडकले. मला इंग्रजीत "शट् अप' असे म्हणाले. त्यावेळी आता गोंधळ उडणार की काय अशी परिस्थीती निर्माण झाली. बाबा आढाव त्यानंतर बोलायला उभे राहिले. ते आयुक्तांना म्हणाले, तो मुलगा काय म्हणतोय, याकडे शब्दशः लक्ष न देता. या भागातल्या तरुणांची मानसिकता तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर त्यांनी मला जवळ बोलवून असे इतके आक्रमक व्हायचे नसते. आपली भाषाही तोलून मापून वापरली पाहिजे, असे सांगितले होते.
त्यावेळी एक तरुण पोरगा एक अधिकाऱ्याला वैतागायला लावतोय. त्यांचे संतुलन त्याने ढळतंय, याचे फक्त एकाच माणसाला कौतुक वाटले. ते म्हणजे जेऊरचे आनंद कोठडिया. पण माझ्या घरचे या गोष्टींनी इतके वैतागले की हा कोण शहाणा गेला, मोठ्या अधिकाऱ्याला असे बोलणारा, असा त्यांचा भाव होता. मी त्यावेळी म्हणजे 1994 मध्ये जो प्रश्न मांडत होतो तो अजूनही सुटलेला नाही. ते प्रश्न असा की आमच्या आण्णांनी तीन एकर जमीन विकत घेतलेली आहे. ती माझ्या भावाच्या नावावर केली. ती जमीन उजनी धरणाच्या बॅकवॉटरपासून साधारण तीन चार किलोमीटर लांब आणि उंचावर आहे. त्या जमीनीत उजनीचे पाणी कधीच येऊ शकत नाही. त्या जमीनीवर उजनीसाठी संपादित म्हणून नोंद झाली आहे. अनेक प्रयत्न करुनही ती नोंद काही निघाली नाही. आमच्याबरोबर अनेक दोघाचौघांचे असेच झाले आहे. त्या जमीनीचा मोबदला मिळालेला नाही. तिच्यावर पिक कर्ज अथवा अन्य कुठले कर्ज निघत नाही. सातबाराला झालेली नोंद मोठी अडचणीत टाकणारी आहे. पुढे मी प्रकल्पग्रस्तांच्या जमीन नोंदीचे प्रश्न अशी एक वृत्तमालिकाच "सकाळ'मध्ये लिहली. इतर काही प्रश्न मार्गी लागले पण हा प्रश्न काही सुटला नाही. मला धरणग्रस्तांसाठीही आपण काहीतरी करावे, असे मला नेहमी वाटायचे. यासंबंधातील चळवळीच्या किंवा अन्य काही बातम्या आल्या की त्या प्राधान्याने लावून घ्याव्यात, अशी माझी भूमिका असायची.
या भागातले अनेक प्रश्न अजूनही तसेच आहेत, पण लोकांनी काही गोष्टींवर मार्ग शोधले आहेत. त्यासंबंधी पुढे बघू. पण माझे सिंहावलोकन करताना मला हा धरणग्रस्तांचा मेळावा नेहमीच आठवत राहतो. सरकारी यंत्रणेतील चूक तुम्ही काढली तर अनेकदा कुणी लक्ष देत नाही. वरिष्ठातील वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर जरी तुम्ही खरंखुरं गाऱ्हाणं मांडल तरी त्यांची अनेकदा भूमिका तुम्हाला गप करण्याची असते, हा धडा यानिमित्ताने मला मिळाला.
शनिवार, ९ जानेवारी, २०१६
आणीबाणी
आपण काहीतरी प्रश्न विचारुन उगाच लोकांना भंडावून सोडावे, आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधून घ्यावे, असे अनेकजण आपण करत असतो. कॉलेजात माझ्याही स्वभावाचा तो भाग बनला होता. मी एसवायला असताना छात्रभारतीचे संस्थापक ना. य. डोळे सर एकदा केत्तूरला आले होते. छात्रभारतीचे शिबिर संजय आवटे, डॉक्टर प्रदीप आवटे मंडळींनी केत्तूरमध्ये घेतले होते. याला जिल्हाभरातून विद्यार्थी आले होते. डोळे सरांचे व्याख्यान संपले. त्यानंतर त्यांनी प्रश्न विचारा, असे सांगितले. त्यांनी भारताची राज्यघटना या विषयावर मुलांना माहिती सांगितली होती. मी एफवायला राज्यशास्त्र विषय शिकलो होतो. आम्हाला शिकविणारे गरवारेचे वझे सर छान शिकवायचे. त्यांची शिकविण्याची पद्धत विषय लक्षात राहिल अशी होती. ते हळू शिकवायचे आणि त्यासोबत विद्यार्थ्यांना नोट्स लिहून घ्यायला सांगायचे. त्यामुळे विषय पटकन लक्षात रहायचा. ते आरएसएसचे समर्थक असावेत, असे त्यांच्या शिकविण्यावरुन आत्ता वाटते.त्यांनी आणिबाणीचे प्रकरण खूप मस्त शिकविले होते. जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन, इंदिरा गांधी यांनी त्यांची अलाहाबाद न्यायालयाने निवड रद्द केल्यानंतर तातडीने रात्रीच आणिबाणी जाहीक करणे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरूंगात टाकणे. दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्याला अनुमती घेणे. त्यानंतर त्यांनी आपला विजय होणार असा गुप्तचर विभागाचा अहवाल आल्यावर पुन्हा निवडणुका जाहीर करणे, आणिबाणीच्या काळातला वीस कलमी कार्यक्रम, कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी तरुणांच्याही शस्त्रक्रिया करणे अशा अनेक बाबी त्यावेळी लक्षात आल्या होत्या. त्याने कॉंग्रेसविषयी मनात एक विरोधाची भावना निर्माण होत होती.
शिबीरात मी डोळे सरांना प्रश्न विचारला, "भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता हा शब्द 1977 मध्ये इंदिरा गांधी यांनी जी 42 वी घटना दुरूस्ती केली, त्यावेळी घातला. तो घालणे योग्य होते का? आपण आपले हिंदु राष्ट म्हणतो मग तो शब्द कशाला घालायचा होता.' त्यांनी त्यावेळी मला खूप समजून सांगितले पण भडक, भावनिक असे काहीतरी त्या वयात आवडत असते. त्यामुळे मोठ्या लोकांना असे प्रश्न विचारुन आपण त्यांना अडचणीत आणतो, असा काहीतरी समज मनात व्हायचा.
आणिबाणीविषयी पुढे मी माहित घेत गेलो, तेव्हा देशाच्या लष्काराला सत्ताधाऱ्यांचे आदेश पाळू नका, असे विरोधकांनी आवाहन केल्याचे वाचनात आले. त्यावेळची जागतिक स्थिती आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी घडवून आणलेला रेल्वेचा संप आणि देशाला शिस्त लावण्यासाठी आणिबाणी महत्वाची होती, असेही माझ्या वाचनात आले. आणिबाणीच्या इतिहासाचे पुनर्रलेखन अशी एक लेखमालाच कुमार केतकर यांनी लिहिली होती. त्यामुळे आपण कुठलाही विषय घेतला तरी त्याला दोन बाजू असतात. हे आता लक्षात येते. पण त्यावेळी तीर मारल्यासारखे आपण काही फार भारी केले, अशे वाटत राहते. गोरबगरीब मुलांसाठी लढणारी हीच छात्रभारती संघटना मला पुढे जवळची वाटू लागली. एकदा छात्रभारतीच्या मोर्चासाठी मी मुंबईलाही गेलो होतो. उस्मानाबादचे जाधव सर, पुढे आमदार झालेले कपिल पाटील अशी मंडळी त्यावेळी नेतृत्व करीत होती. पुढे दिलीप वाघमारे छात्रभारतीचा प्रदेशाध्यक्ष झाला. त्यानंतर तो आणि मी दोन वर्ष पुण्यात एका खोलीत रहात होते. त्याचे वैशिष्ट असे की त्याने "सकाळ'ची नोकरी सोडली आणि संघटनेचे पूर्णवेळ काम करायला लागला. आपल्याकडे असे फार कमी वेळा कुणीतरी सगळे उत्तम चाललेले असताना अशी वेगळी उडी घेतो. त्याने दोन वर्ष संघटनेचे काम केले. त्यानंतर मग तो औरंगाबादमध्ये कुठल्यातरी दैनिकात कमा करायला लागला. पुढे चॅनेलचे काम सुरू केले. हा फापटपसारा मी सांगतोय, त्याचे कारण असे अशा चळवळी चालविणे आता अवघड झाले असले तरी त्यात चळवळीत असण्याची एक झिंग असते. ती चढली की मग आपण काहीतरी केले पाहिजे, असे वाटते. या उर्मीतूनच या तिघींनी काही काम केले. त्यामुळे मला हा लेख अनेकदा आपल्या आयुष्यातल्या घटना आठवत राहतात आणि मी स्वतःला भूतकाळात ढकलून देतो.
शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६
वीजेचे लोळ
समाजासाठी काहीतरी काम करायला हवे, असे प्रत्येकाला वाटत आहे. या मुलींसारखे कुणी काही करत असले की त्याचे कौतुक वाटते. तसे सामाजिक कामांत आता कुठे व्यक्तीगत बाबी आहेत, कुठे नुसते निधी मिळविण्यासाठीची धडपड आहे, कुठे निखळ आनंदाचा शोध घेण्यासाठीची तळमळ आहे, कुठे खरोखरचा निरागसपणा आहे आणि कुठे बनेलपणा आहे, याचा अंदाज अनेकदा आपल्याला येतो. या तीन मुली जे काम करीत होत्या, त्यात त्यावेळी निरागपण, खरेपणा होता. मी माझ्यासंबंधीच्या बाबींचा विचार करतो, शोध घ्यायला लागतो, त्यावेळी जरा खोलवर विचार केला तर लक्षात येते की आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग ज्यात आपल्याला असे वाटायचे की आपण काहीतरी करावे, पण आपली धाव वेगळी होती. पण कुठे काही जमत नाही. अनेकांचे असे होते. ते आपले क्षेत्र नाही, असे कुणी सांगत नसले तरी सगळ्यांचे वागणे तसेच असते. आपण आपले शिकावे, एखादी नोकरी पकडावी, त्यानंतर बायको करावी, दोन अपत्यांना जन्म द्यावा. त्यात शक्यतो एक पोरगा असावा. त्यानंतर घरच्यांना मदत करावी, जमेल तसा चिक्कार पैसा कमवावा, अशी एक मध्यमवर्गीय माणसाचे जगण्याची सर्वसाधारण धारणा असते. त्यामुळे मोठ्या झेप घेण्याच्या गोष्टी होत नाहीत. त्या तशा पद्धतीने झाल्या तर नक्की काहीतरी कधीतरी हातात पडतेच.
आपल्याकडे आपण नुसतेच हेलपाडत जातो. जे समोर येईल ते जगत राहतो. त्याने बायको, पोरबाळ, एकाद्या दुसरे घर यापलिकडे फार काही हातात रहात नाही. परंतु मला असे वाटते की प्रत्येक माणसाला कुठल्यातरी टप्प्यावर वीजसारखे लोळ खुणावत राहतात. तो त्याच्याकडे लक्ष देत नाही. ते हातातून निसते. माझा काही चळवळींशी अगदी किरकोळ संबंध आला. पहिला कोल्हापुरात असताना एबीव्हीपीशी संबंध आला. ती विद्यार्थी चळवळ त्यावेळी जोरात होती. त्यानंतर पुण्यात आल्यावर हिंदुत्ववादी वातावरणातील एका मित्राच्या सहवासाने मी विद्यार्थ्यांच्या संघटनेचा नावाला पदाधिकारी झालो. पुढे गरवारे कॉलेज सुटल्यावर माझ्यात वैचारिक अंगाने खरे परिवर्तन झाले, असे मला वाटते. पत्रकारितेच्या कोर्सला मी प्रवेश घेतला. तिथे मला अनेक चांगले वक्ते ऐकायला मिळाले.
काही आठवणी त्यावेळच्या सांगायलाच हव्या. एक ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांची. त्यांचे एक व्याख्यान त्यावेळचे विभागप्रमुख अरुण साधू यांनी आयोजित केले होते. मी त्यांना व्याख्यानंतर एक प्रश्न विचारला, "तुम्ही 1985 मध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघातून उभे होतात. त्यापूर्वी तुम्ही त्या भागासाठी कोणते काम केले होते?' या माझ्या प्रश्नाने तसे ते थोडेसे वैतागले. कारण त्यांनी उत्तर दिले होते, "महाराष्ट्रातील अत्यंत वाईट अशा तालुक्यांची एक यादी काढली तर त्यात करमाळ्याचा उल्लेख येईल. तुला किशोर शांताबाई काळे माहित आहे का? तो कुणाचा आहे. अशा तालुक्यासाठी मी काय काम करावे, असे तुला वाटते?' त्यानंतर मग त्यांनी करमाळ्यात झालेला खून आणि काढलेला मोर्चा याची माहिती दिली. अकलूज, राशीन, असे बरेच ते काही सांगितले. खरे तर मला प्रश्न कसे विचारावेत, याचे कदाचित ज्ञान नसावे, किंवा माझ्या बाळबोध पद्धतीने मी तो विचारला असावा. पण हि घटना माझ्या मनावर खूप ठसली. त्यानंतर मी सत्याग्रही विचारधारा वाचत राहिलो. सप्तर्षी यांची लिहण्याची शैली मला आवडत गेली. हे वेगळे काहीतरी आपल्या जवळचे आहे, असे मला वाटायला लागले. पुढे तुरूंगांतील त्याच्या अनुभवावरचे पुस्तक वाचले. त्यांनी हिमालयात केलेल्या भ्रमतीचे अनुभव वाचले. या सगळ्याने माझ्यात वैचारिक बदल होत राहिला.
गुरुवार, ७ जानेवारी, २०१६
त्या तिघी
आपल्या शिक्षणाचा उपयोग थेट व्यवहारी आयुष्यात होत नाही म्हणून नाराज झालेले अनेक जण भेटतात. मात्र, शिक्षणाकडे सकारात्मक अंगाने बघणे, संधी मिळेल तिथे घुसणे आणि चिकाटी न सोडणे या बाबी केल्या तर आपण बरेच काही करू शकतो. आपल्याबरोबरच समाजसुद्धा बदलू शकतो, हे त्या तिघींचे काम बघितले, की लक्षात येते. वालचंद कॉलेज ऑफ आर्टस् ऍण्ड सायन्सच्या समाजकार्य विभागात त्या तिघी शिकत आहेत. सरस्वती पाटील, उषा पंडित आणि उमा घेरडे अशी त्यांची नावे आहेत.
सोलापुरातील रुपाभवानी मंदिराजवळ मड्डीवस्ती हा झोपडपट्टीचा दुर्लक्षित भाग आहे. या ठिकाणी अगोदर घनदाट झाडे होती. आता आठ समाजाचे लोक या वस्तीत राहात आहेत. या वस्तीतील लोकांची आर्थिक स्थिती बिकट आहे. लोक व्यसनाधीन आहेत. आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या या वस्तीतील्या लोकांना भेडसावतात. महिलांच्या समस्यांना तर पारावार नाही. या तिघींनी या वस्तीचा आपल्या "फिल्ड वर्क' अंतर्गत "फॅक्ट फायडिंग' अभ्यास केला. कॉलेजकडूनच त्यांना अभ्यासातंर्गत या वस्तीत समाज संघटन करायचे होते. एरवी कॉलेज आणि घर सोडून समाजात फारसे न मिसळलेल्या या तिघींसाठी ही तारेवरची कसरत होती. ही वस्ती बदलायला सुरवात करायची असेल तर इथल्या महिलांकडे आर्थिक ताकद आली पाहिजे. त्यांनी स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला शिकले पाहिजे, हे त्यांनी जाणले. त्यासाठी या तिघींनी या वस्तीतला आपला वावर वाढविला. लहान मुलांना खेळ, गाण्याच्या माध्यमातून आरोग्याची माहिती देऊ लागल्या. सुरवातीला अविश्वासाने बघणाऱ्या नजरा लहानग्यांशी केलेल्या सलगीमुळे थोड्या विश्वासाकडे कलल्या. बैठका घेऊन या वस्तीतल्या महिलांशी संवाद सुरू केला. त्यांना सरकारी योजनांची माहिती दिली. पण, त्यात अनेक अडथळे येतच होते. मग महिलांचे बचतगट करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला या ठिकाणच्या महिला विश्वास ठेवायला तयार नव्हत्या. पण, हे सगळे काम तुमचे तुम्हाला करायचे आहे. यातून होणारे फायदे समजून दिल्यानंतर या ठिकाणी बचत गटाची चळवळ सुरू झाली. महिलांचे संघटन या माध्यमातून होत आहे.
सुरवातीला रेणुकादेवी, रुपाभवानी आणि शिवगंगा असे तीन महिला बचत गट स्थापन झाले. रेणुकादेवी बचतगटाची स्थापना 11 एप्रिल 2005 रोजी झाली आहे. गटाच्या अध्यक्षा पार्वतीबाई शिवप्पा भोसले, उपाध्यक्षा जगदेवी कोळी तर सचिव सुनीता गायकवाड आहेत. श्री रुपाभवानी बचतगटाच्या अध्यक्षा सौ. जयवंती पवार, उपाध्यक्षा मंगल चौधरी तर सचिव महानंदा पवार आहेत. शिवगंगा बचतगटाच्या अध्यक्षा संगीता त्रुंडमाळी, सचिव सुरेखा जानगवळी तर उपाध्यक्षा निर्मला कोळी आहेत. या तीनही गटातील महिला महिन्याला 50 रुपये बचत करत आहेत.
आता या वस्तीत महिला आणि युवकांचे दहा बचतगट कार्यरत आहेत. या ठिकाणी हे बचतगट महिलांना सुप्तपणे आत्मभान देत असल्याचे दिसून येते. महिला दहा ते पंधरा टक्के व्याज महिन्याला देऊन खासगी सावकारांकडून अगदी थोडे का असेना पण कर्ज काढायच्या. आता त्याला काही प्रमाणात आळा बसला आहे. सर्व जातीधर्माच्या महिला एकत्र आलेल्या असून गटाचे आर्थिक व्यवहार सगळ्यांना कळले. सगळ्यांनी पैसे जमवून ते टिळक चौकातील सिंडीकेट बॅंकेत टाकण्यास शिकले पाहिजे, हे महिलांच्या मनावर बिंबविण्यात आले. समाजात वावरण्याचा अनुभव नसणाऱ्या बचतगटातील महिलांसाठी हे एक दिव्य होते. पण, हळूहळू सगळ्याच जणींनी या गोष्टी शिकल्या आहेत. याशिवाय या वस्तीत अनेक कार्यक्रम झाले आणि होत आहेत. त्यात पथनाट्य, एड्स जनजागृती, आरोग्य जागृती अशा काही कार्यक्रमांचा उल्लेख करता येईल.
यासंबंधात सरस्वती पाटील म्हणाली, ""आम्ही जे काम सुरू केले ते केवळ अर्थकारणाशी संबंधित नाही. त्यातला समाजकार्य हा पैलू महत्त्वाचा आहे. सुरवातीला टिंगलटवाळी करू पाहणारी पोरंही या मुली आपल्यासाठी काही काम करीत आहे, हे समजून आता गट करू लागले आहेत. कॉलेजचे डॉ. चन्नवीर, विभागप्रमुख प्रा. विलास बेत, प्रा. जगदीश जाधव यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे.''
या मुलींच्या कामाबाबत डॉ. आर. एम. चन्नवीर म्हणाले, ""या वस्तीत आठवड्याला बैठका होतात. त्यातून त्यांचा प्रगतीचा मनोभाव तयार होत आहे. आणखी काही काम करायचे आहे. या महिलांना काही छोटा-मोठा उद्योग करून देता येईल का, यासंबंधी विचार सुरू आहे. दारिद्य्र रेषेखालील लोकांना त्यांच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यायचा आहे. आगामी काळात सोलापुरातील आणखी काही ठिकाणी अशाच प्रकारचा प्रकल्प राबविण्याचा विचार आहे.''
(हा लेख 26 नोव्हेंबर 2005 रोजी प्रसिद्ध झाला होता.)
बुधवार, ६ जानेवारी, २०१६
भाषणाविषयी...
टीवायला असतानाच प्रांजली दाऊदखाने, प्रसन्न रानडे आणि मी असे कोल्हापूरजवळच्या मुरगूडला स्पर्धेला गेलो होतो. राज्यस्तरावरची स्पर्धा होती. मी तिथे भाषण केले. माझा आवाज मोठा आहे पण त्यात कंटेटची जी एक जोड लागते, ती सतत कमी पडली असे मला वाटते. मुद्दे नवे भाषणात सतत पाहिजे, त्याशिवाय मनन चिंतन असल्याशिवाय तुमचे भाषण श्रोत्यांपर्यंत पोहचत नाही. परीक्षक तुम्हाला नंबर देत नसतात. या स्पर्धेत वाद केला. पुण्याचा आख्खा ग्रुप स्पर्धा अर्ध्यावर टाकून तिथून परत पुण्याला आला. त्यावेळी एसपी, फर्ग्युसनसह विविध कॉलेजातले विद्यार्थी आमच्याबरोबर होते.
चांगले बोलता येण्यासाठी चांगली भाषणे ऐकली पाहिजे. मी अनेकांची भाषणे ऐकली. शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर अशी जी सगळ्यांना माहित आहेत, अशी अनेक नावे सांगता येतील. मला आवडले ते जर्नालिझमला असताना ऐकलेले आजचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे भाषण. या भाषणातले मुद्दे माझ्या लक्षातूनच जात नाहीत. त्यांनी पहिला मुद्दा असा सांगिताल होता की महात्मा फुले यांच्या निधनाची बातमी त्यावेळी केसरीने दिली नव्हती. बातमीमुल्यांच्या सगळ्या कसोट्या मला कळतात. ही बातमी का आली नाही. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर पत्रकारितेची खोच त्यांनी सांगितली. बोलण्यातसुद्धा तशी गोची आहे, असे अनेकदा मला वाटते. तुम्ही प्रस्थापित वर्गातले असाल, परंपरेने आपल्याकडे माणसाला बघण्याची जी एक समाजाची दृष्टी तयार झाली आहे, त्यातल्या वरच्या थरातले जर तुम्ही असाल तर तुम्ही अनेकदा काहीही नसून कुणीतरी होता. समाजाचा आपोआप सॉफ्ट कॉर्नर तुम्हाला मिळतो. हे बोलण्याचे, लोकांना शहाणपणा शिकविण्याचे काम परंपरेने उच्चवर्णीयांनी केले. त्यामुळे त्यांच्याकडेच त्याची मक्तेदारी आहे. शेतकरी कुटुंबात लहानपणापासून मुलांना ते वातावरण मिळत असल्यामुळे तसे घडते. त्यामुळे माझ्यावेळी कॉलेजात स्पर्धा गाजविणाऱ्या पोरांचा सामाजिक स्तर कोणता होता, असे बघितले, अनेक गोष्टी लक्षात येतात. पण शिक्षणाची दारे जशी सगळ्यांना खुली झाली तसा त्यात फरक पडत गेला, हेही खरे आहे.
नुसत्या भाषणाने अनेकजणांची करिअर घडल्याची उदाहरणे आपल्याकडे आहेत, तशी ती देताही येतील. पण याबाबत मी लहानपणापासून चर्चा एकली ती लक्ष्मणराव ढोबळे यांच्या संदर्भातील. आमच्या गावातले बाबजी नाना (कै.) तुकाराम राऊत) आणि पोपट नाना कै. पोपट येडे) यांनी ढोंबळेंच्या भाषणाची कॅसेट आणली होती. फार मस्त बोलतात ढोबळे. त्या जोरावर राजकारणात त्यांनी अनेक पदे मिळविली. ते प्राध्यापक होते. शिक्षकांचे शिकवणे हे सुद्धा एकप्रकारे बोलणेच असते. ज्या शिक्षकांना मुलांपर्यंत आपला विषय पोहचविता येतो, ते लक्षात राहतात. मला बारावीत अशताना चांगले ऐकण्याची संधी मिळाली ती कोल्हापुरात. शाहू कॉलेजच्याजवळ पी. बी. पाटील यांचे प्रबोधन क्लासेस चालवायचे. ते सर इतके जबरदस्त ते बोलायचे. एक प्रचंड हजरजबाबीपणा त्यांच्यात होता. इंग्रजी शिकवायचे पण मराठी, वाक्य, कविता, आणि त्यांचे एकूण बोलणे सतत ऐकत रहावे, असे असायचे. "सोने पांघरुन चिंढ्या विकायला बसला तर गिऱ्हाईक सरता सरेना आणि चिंढ्या पांघरुन सोने विकायला बसला तरे कुणी पुसेना' अशी वाक्ये ते सांगायचे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या फुल्ल बॅचेस असायच्या. त्यांच्याकडे मला कसेबसे ऍडमिशन मिळाले होते. त्यावेळी 1991 मध्ये वर्षाची एका विषयाची फी अडीचशे रुपये अशी होती. त्यांनी पैसाही तुफान कमावला. पण मला त्यांच्याविषयी नंतर कळाले की त्यांना घशाचा कॅन्सर झाला. ही गोष्ट वांगीचा फौजदार झालेला पुणे विद्यापीठातला मगन यादव याने सांगितली. तेव्हा मी दिवसभर प्रचंड अस्वस्थ होतो. तसे माझे आणि त्यांचे व्यक्तीगत संबंध अजिबात नव्हते. तरीही त्यांच्या बोलण्याचे गारुड माझ्या मनावर प्रचंड होते. बोलणाऱ्यांचे अनेक ठिकाणी चालते, एवढे मात्र खरे. ही म्हण तशी काही प्रमाणात खरी आहे. बोलणार हुशार असतो का तर त्याचे ढोबळ उत्तर हो किंवा नाही असे देता येत नाही. हुशार माणसं मात्र अनेकदा स्वतःला शब्दातून व्यक्त होता नाही आले तर मागे राहतात, हे मात्र नक्की.
मंगळवार, ५ जानेवारी, २०१६
रामायण
आनंद देणारे व्यासपीठावर मी काहीदा बोललो ते गावात रामायण लागले त्या काळात. मी एसवायला होतो. उन्हाळ्याच्या सुट्टी लागली होती. अंबादास खाटमोडे आप्पा, संभाजी खाटमोडे, तानाजी खाटमोडे हे तिघे बापलेक याशिवाय सुनिल कोकणे, दासू राऊत, शिवाजी पाटील आदी मंडळी संत एकनाथांनी लिहलेल्या भावार्थ रामायणाचे वाचन करणे आणि अर्थ सांगणे असे बोलण्याचे काम करायची. मारुतीच्या मंदिरासमोर भाविकांचा जमाव जमलेला असायचा. मी रामायणातील ओव्यांचे अर्थ अगदी बोटावर मोजता येतील इतक्या दिवस सांगितले. अर्थ सांगणे हे तसे म्हटले तर अवघड काम. हे अगदी एखाद्या नवखा पोरगा गेला आणि त्याला ते लगेच जमले असे होत नाही. मी दुपारी मारुतीच्या देवळात जायचो. ग्रंथ वाचन कुठपर्यंत आलेय, हे पहायचो. मग पुढच्या अध्यायाच्या अगदी सुरवातीच्या ओव्या वाचायच्या. त्याचा अर्थ दिलेला असायचा. तोही दोनदा तीनदा वाचायचा. मग संध्याकाळी अर्थ सांगायला बसायचे. काहीदा चुकाही व्हायच्या, पण हे सगळे अगदी नम्रपणे शिकायची तयारी असल्यामुले शक्य व्हायचे. सकाळी तयारी केल्यामुळे नेमके कुठे काय बोलायचे, याचे गणित ठरलेले असायचे. लोकांना बरे वाटायचे. त्यांना कसेही वाटत असले तरी मला फारच बरे वाटायचे. त्यामुळे माझी कॉलर ताईट व्हायची. त्याच काळात बालकिर्तनकार म्हणून एक मुलगा गाजत होता. मी असे म्हणायचो की आपणही असेच आपल्या मुलाला लहानपणी किर्तन करायला शिकविले पाहिजे. पण ते काही जमले नाही. आयुष्य कुठल्या कुटे भरकट आले. पण व्यक्त होण्याची जिथे जिथे संधी मिळेल तिथे मी प्रयत्न केला. ते चांगले असते असे आज वाटते तरी मला वक्ता म्हणून मान्यता मिळावी, असे काही फार मी केलेले नाही.मी मागे म्हटले तसे सभा गाजवल्या. काही भाषणेही चांगली केली. त्यातली अगदी निवडक भाषणे सांगायची म्हटले तर कॉलेजात असतानाच गावात केलेले स्वातंत्र्यदिनादिवशीचे भाषण, टीवायचा सेंडऑप होताना केलेले भाषण आणि अशी आणखी काही भाषणे सांगता येतील. मला माझी जी भाषणे चांगली झाली, असे वाटते. त्या प्रत्येक भाषणाची मी तयारी केलेली असायची. कॉलेजात असताना माझ्या डोक्यात असे एक आले की आपण कार्यक्रम सादर करुन काही पैसे मिळवू. मला कविता आवडायच्या मी त्या काळात खूप कवितांची पुस्तके वाचली. गरवारे कॉलेजात होस्टेल डेला प्रत्येकवेळी काहीना काही कविता सादर केली. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. कवितांबरोबरच त्या काळात व. पु. काले हा लेखक वाचला. त्यांची पुस्तके वाचल्यावर त्यातले काही उतारे परत परत वाचून पाठ झाले. खरे तर त्यांची सगळी पुस्तके वाचल्यानंतर वाचल्यावर मध्यमवर्गीय अनुभविश्वाच्या पलीकडे हा लेखक काही फार जात नाही, असे माझ्या लक्षात आले किंवा त्यांची काही पुस्तके वाचल्यावर त्याच त्या पद्धतीच्या भाषणशैलीने एक तोच तोच पण जाणवत राहतो. तरीही हा लेखक अनेकांना पागल करतो. याच काळात माझ्या काही कविता पाठ झाल्या. त्याची जुळवणी मनातल्या मनात चालायची. तसा एक कार्यक्रम मी केला. नेताजी सुभाष विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर हा कार्यक्र विद्यार्थ्यांना आवडला. पण रामायणात अर्थ सांगण्याची मजा काही औरच असते. ग्रामीण भागात रामायणामुळे अनेक वक्ते तयार झाल्याचे दिसते.
सोमवार, ४ जानेवारी, २०१६
सरांची घेतली मुलाखत
आमच्या नेताजी सुभाष विद्यालयात मराठी शिकविणारे काळे सर फार मस्त होते. ते कधीही कुणालाही टाकून बोलत नसायचे. त्यांचा स्वभाव अतिशय हळवा होता. ते पेटी वाजवायचे. शाळेत कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असला तरी ते मार्गदर्शनासाठी असायचेच. त्यांचे गाव कुठले हे मलाही माहित नव्हते. दहावीत असताना मी नाना पाटील यांचा पोवाडा हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात सादर केला होता. त्याला सरांनी मार्गदर्शन केले होते. त्यांना मी साधारण वीस - पंचवीस वर्षानंतर पुन्हा गेल्या पाच वर्षांपूर्वी भेटलो. एका वेगळ्या प्रसंगात आमची भेट झाली. मी कुर्डुवाडीत बातमीदारांच्या मुलाखती घेण्यासाठी गेलो होतो. कुर्डुवाडी, करमाळा, बार्शी या शहरांबरोबरच काही छोट्या गावांत सकाळसाठी बातमीदार नेमायचे होते. ज्येष्ठ बातमीदार सुरेश शहा, बार्शीचे विजय निलाखे आणि मी मुलाखती घेत होतो. कुर्डुवाडी जनता बॅंकेच्या सभागृहात हा मुलाखतींचा कार्यक्रम होता. तिथे मोठी रांग होती. तीन तालुक्यातून तरुण मुलांपासून साधारण साठ पासष्ट वयापर्यंत 40 ते 50 जण मुलाखतीसाठी आलेले होते. त्या रांगेत मी काळे सरांना बघितले. त्यांनी कुर्डुवाडीजवळच्या भोसरे गावाचा बातमीदार होण्यासाठी अर्ज केला होता. मी त्यांना आत बोलावले. ""मी तुमचा विद्यार्थी, तुम्ही आम्हाला दहावीला मराठी शिकविले आहे. तुम्हाला कशाला हवी बातमीदारी ?'' असे काहीतरी मी त्यांना विचारले. मी म्हटले तुम्ही पाठवा बातम्या. तुमच्या नियमात बसणाऱ्या सगळ्या बातम्या प्रसिद्ध करु. त्यानंतर मी त्यांच्याशी काहीदा बोललो. त्यांची बातमीदारी काही फार दिवस चालली नाही. कारण हे काम वेगळ्या प्रकारचे काम असते. पण मला या कलावंत माणसाला अशा छोट्या गावचे बातमीदार का व्हावेसे वाटले, हे मात्र काही मला कळाले नाही. मुलाखतीतले बोलणे समोरच्याला इम्प्रेस करणे आपला अभ्यास मांडणे हे सुद्धा एक कसब असते. ते ज्याला जमते, ते समोरच्यावर छाप पाडून स्वतःचे काम करुन घेतात. ते न जमणारे ढ असतात, अशातला अजिबात भाग नाही. मी या मुलाखतीत ज्यांना निवडले, ज्यांची माझ्यावर छाप पडली, त्यातले निम्मेच किंबहुना त्यापेक्षाही कमीचजण पुढे बातमीदारीत टिकले, त्याची कारणे अजून वेगळी असतील. पण चांगले बोलता येणे हे महत्वाचेच असते असे मला वाटते.
अकरावीत राजाराम कॉलेजात काही जमले नाही, मग बारावीत असताना एम टी कोथळीला म्हणालो मला गॅदरिंगमध्ये कार्यक्रम सादर करायचा आहे. त्यांनी त्यावेळी एक नाटुकली बसविली होती. ती पाच सहा मिनीटींची असेल त्यात त्यांनी मला एक छोटासा रोल दिला होता. मला आजही असे वाटते की आपण भाषण करायला उभे रहावे. लोकांना तासोतास आपल्या बोलण्यात गुंतवून ठेवावे. नवी माहिती नवा विचार लोकांना सांगावा. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काही नवे बदल घडावेत. आता असे कुणी काही सांगितल्याने लोकांच्या आयुष्यात बदल घडतात का, यावर चर्चा होऊ शकते. काहीजण असेही म्हणू शकतात की कुणी कुणाला काही सांगितले म्हणून लगेच कुणी काही बदलत नसतो. ते काही प्रमाणात बरोबरही असते. पण आपण जर नवी गोष्ट ऐकली, नवा विचार समजून घेतला तर त्यातून आपल्या नकळत आपल्यातही काही फरक पडत असतो. त्याशिवाय मला काही सांगायचे आहे, हे तर प्रत्येकाला वाटत असते. हे सांगण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. व्यक्त होण हे त्यामागे असते. त्यातून लोकांनी आपले कौतुक करावे. तशी ही बहुसंख्य कलाकारांची भूक असते. वक्तृत्व ही सुद्धा एक कला आहे. ही भाषणाची कला नेमकी कशी अवगत करावी, कुठे कसे भाषण करावे, याविषयी मी काही वाचले. तसा काही प्रयत्नही केला मात्र त्यात जे एक सातत्या लागते ते मला जमले नाही. संधी हाही भाग असतो. त्यामुळे माझी याबाबतची अनेक स्वप्न अपुरी आहेत. पण तरीही मी अनेकदा व्यासपीठावर केलेली भाषणे गाजली. माझी ओळख त्यामुळे अनेकांशी झाली. मी अनेक वक्तेही ऐकले.
शनिवार, २ जानेवारी, २०१६
आतला आवाज मारला
आतला आवाज मारला
भाषण करण्याचा, व्यासपीठावर बोलण्याची अनेकांना उर्मी असते. मी पहिले भाषण चौथीत असताना केले. ते मला लिहून दिले होते. त्यावेळी शाळेत भाषण लिहून दिली जात. ते भाषण केल्यावर पुढे मला पुढे प्राथमिक शाळेत भाषण करण्याची संधी मिळाली नाही. ते स्वातंत्र्यदिनाचे भाषण होते. त्यानंतर हायस्कुलमध्ये गेल्यावर स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी होत होत्या. त्यात मी एकदा भाग घेतला. हायस्कूलमध्ये भाषण करायचे म्हणजे सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे भाषण लिहून घेणे हा असतो. दहावीत आल्यानंतर म्हणजे हायस्कूलच्या शेवटच्या वर्षाला असतानाच विभागीय पातळीपर्यंत मला भाषण करण्यासाठी जाण्याची संधी मिळाली होती. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने आयोजिलेल्या स्पर्धेसाठी मी विभागीय पातळीपर्यंत जाऊन आलो. उस्मानाबादला स्पर्धा होत्या. त्यावेळी माझ्याबरोबर एकही शिक्षक नव्हता. मी एकटाच गेलो. तिथे माझे भाषण चांगले झाले. पण नंबर काही आला नव्हता. त्याठिकाणी माझ्या ओळखीचे तसे कुणीच नव्हते. आमच्या शाळेतून बदलून गेलेले कांबळे सर मला फक्त तिथे दिसले होते. माझे भाषण झाल्यावर त्यांनी मला तुझे भाषण चांगले झाले, असे सांगितले होते. माझा नंबर का आला नाही, असा प्रश्न मला त्यावेळी पडला होता. त्याचा शोध माझा मीच घेतला, त्यावेळी भाषण पाच ते सात मिनीटे करायचे होते. मी ते साधारण तीन चार मिनीटातच उरकले होते. भाषणात मुद्दे होते. आवाज, आवेश, न घाबरता सगळ्यांना सामोरे जाण्याची तयारी या गोष्टी होत्याच पण तरीही आपल्याबरोबर कुणीच नसणे, आपल्याला दिलेल्या वेळेआधी आपण ते पूर्ण करणे यामुळे आपण स्पर्धेतून बाहेर पडत असतो, असे मला वाटले.
या स्पर्धेला जाण्यासाठी मी एकटाच घरातून बाहेर पडलो होतो. मी पहिल्यांदा बार्शीला आलो. तिथे रात्रभर राहिलो. त्यावेळी गावातील अनेकजण बार्शीत शिक्षणासाठी रहात होते. त्यांच्याकडे एक दिवस राहून उस्मानाबादला गेलो आणि तिथून थेट गावाकडे असा एकट्यानेच प्रवास केला होता. हा प्रवास माझ्या कायम स्मरणात राहिला आहे.
आठवीत मला असे वाटायले लागले की आपण कीर्तन करायला शिकावे. हा माझा त्या वयातला आतला आवाज होता. तो मला गावात येणाऱ्या किर्तनकारांची किर्तन ऐकून एकू आला होता. पंढरपूरचे नामानंद महाराज यांचे चिरंजीव दयाघन महाराज आणि सुदर्शन महाराज गावात किर्तन करण्यासाठी येत असत. त्यांचा पहाडी आवाज मनाला भुरळ घालायचा. आपल्यालाही लोकांच्या अंगावर असे शहारे उभे करता आले पाहिजेत, असे वाटायचे. आईचे ह्रदय मुलाने काढल्यानंतर ते प्रियेशीकडे घेऊन जाताना तो ठेचकाळून पडतो, त्यावेळी ते ह्द्य विचारते बाळ तुला लागले का? ही गोष्ट ते खूप रंगवून सांगायचे. काहीवेळा मध्ये एकाद्या पोवाडा सादर करायचे. टिमडी अतिशय दमदार पद्धतीने वाजविली जायची.
एका रात्री असे किर्तन ऐकून मी घरी आलो. जेवण केले. मी आईला म्हणालो, "मला किर्तन शिकायचे आहे.' ती मला नेमके काय म्हटली हे मला आज आठवत नाही, मात्र ती त्या बाजूची नव्हती एवढे मात्र लक्षात आहे. कॉलेजात गेल्यावर माझ्या या बोलण्याच्या हौसेला आणखी गती काही मिळाली नाही. आपण काहीतरी करावे, असे मात्र सतत वाटत रहायचे. हायस्कुलमध्ये असतानाच मी आठवी, नववीत कधीतरी गॅदरिंगमध्ये नाना पाटील यांचा पोवाडाही सादर केला होता. शाहीर बाबासाहेब देशमुख यांची त्या पोवाड्याची कॅसेट होती. ती कॅसेट कितीतरी वेळा ऐकली. ती पाठ झाली. त्यावेळी काळे सर पेटी वाजवायचे. ढोलकीवरही कुणीतरी असायचे. सूर, ताल असल्या गोष्टी त्यावेळीही काही कळत नव्हत्या. त्यावेळसारखाच त्याबाबत आजही मी तितकाच ढ आहे. उलटपक्षी त्यावेळी जी समजून घेण्याची उर्जा होती ती आज कमी झाली आहे. माझा आतला आवाज मी मारला असे मला अनेकदा वाटते.
हा आपला आतला आवाज आपल्याला अनेकदा ऐकू येतो, मात्र त्याबाबत आपण तितके सजग नसतो. त्यामुळे काळ नेईल तिकडे भरकटत जावे लागते.
शुक्रवार, १ जानेवारी, २०१६
शब्दप्रभू ः 25 वर्षांपूर्वीचे
गेल्या 25 वर्षांपूर्वी विद्यार्थिदशेत वक्तृत्व हा प्रांत गाजविणारे, राज्यभरातील अनेक स्पर्धांत बक्षिसे मिळवणारे वक्ते आता काय करतात? वक्तृत्व स्पर्धांविषयी त्यांना काय वाटते? काही जणांशी साधलेला हा संवाद...
---------------
आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, असे कॉलेजात पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी स्वतःला व्यक्त करण्याचे मार्ग प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने, अनुभवानुसार निवडत असतो. कुणाला एनसीसी जवळची वाटते, कुणी कविता करतो. नाटक, गाण्यात कुणाचा जीव रमतो. कुणी खेळात प्रावीण्य मिळवून गाजत असतो, तर कुणी आपल्या वक्तृत्वाने अनेकांना पागल करून सोडतात. अभ्यासाव्यतिरिक्तच्या या गोष्टी आयुष्य घडवायला मदत करतात, असे नेहमीच सांगितले जाते; पण खरी फॅक्ट काय आहे? गेल्या 25 वर्षांपूर्वी विद्यार्थिदशेत वक्तृत्व हा प्रांत गाजविणारे, राज्यभरातील अनेक स्पर्धांत बक्षिसे मिळवणारे वक्ते आता काय करतात? वक्तृत्व स्पर्धांविषयी त्यांना काय वाटते? काही जणांशी साधलेला हा संवाद...
महिलांसाठी अक्षरयात्री संमेलन
------------------------------
महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धांत चमकणाऱ्या बहुतांश मुली लग्न झाले, की वक्त्या म्हणून संपल्या, असे सर्वसाधारण चित्र दिसते. करिअरच्या अंगाने आपली धडपड चालू ठेवणाऱ्यांत स्वाती शिंदे यांचे नाव घ्यावे लागेल. सांगली जिल्ह्यातील विटा येथे त्या महिलांसाठी अक्षरयात्री संमेलन भरवितात. त्यांचा "स्त्रीकोश' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्या म्हणाल्या, ""वक्तृत्व स्पर्धा गाजविणारी मुले वक्ते म्हणून पुढे आलीत, असे दिसत नाही, ही गोष्ट खरी आहे. परंतु तरुण पिढीतील अनेक लेखक, कवी, पत्रकार आणि वकील हे विद्यार्थी जीवनात चांगले वक्ते होते, हे लक्षात घेतले पाहिजे. स्पर्धांमध्ये आलेले व्यावसायीकरण आणि केवळ बक्षिसांवर ठेवली जाणारी नजर, यामुळे अनेक जण विरून जातात. तरीही दैनंदिन जीवनातील संघर्ष सोडविण्यासाठीचे बळ या स्पर्धा देतात.''
समाजाला दिशा देण्यासाठी ...
----------------------------
"समाजाला दिशा देण्यासाठी कर्तृत्वाला वक्तृत्वाची जोड देणे गरजेचे आहे,' असे सांगणारे अभिजित नामदे सध्या उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकिली करीत आहेत. परभणी म्हटले, की वक्तृत्व स्पर्धेला जाणाऱ्या मुलांना अभिजित नामदे हे नाव आठवायचेच. स्पर्धक म्हणून महाविद्यालयीन जीवनात राज्यभर बक्षीस जिंकत फिरल्यामुळे त्यांनी अनेक मित्र जोडले आहेत. स्पर्धांच्या गमतीजमतींविषयी त्यांच्याशी गप्पा मारणे, हा आनंदाचा भाग असतो. ते म्हणाले, ""चांगला वक्ता राजकारणातच असला पाहिजे, असा गैरसमज काही जण करून घेतात. आपण चांगले बोलायला लागलो की नेता होऊ, असे काही जणांना वाटते; परंतु राजकारणात त्याच्याशिवाय अनेक गोष्टी कराव्या लागतात, हे लक्षात घेतले तर "डिप्रेशन' येणार नाही. मला स्पर्धांमुळे वाचनाची सवय लागली. त्याचा फायदा आता वकिली करताना होत आहे.''
---------------------------
विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा
--------------------------
प्राथमिक शिक्षक असलेले सुरेश पवार मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा भरवितात. ते म्हणाले, ""या स्पर्धांत काही ठराविक तिघा-चौघांची बक्षिसे मिळविण्याची मक्तेदारी तयार होते. महाविद्यालय फक्त एका बाजूचा प्रवासखर्च देते. मग अनेक जण स्पर्धेपर्यंत पोचू शकत नाही आणि त्यामुळेही अनेक जण वक्तृत्वापासून दूर जातात; परंतु या स्पर्धांचा आणि वक्तृत्वाचा आयुष्यभरासाठी फायदा होतो.'' कोल्हापूर जिल्ह्यातील घाळी वक्तृत्व स्पर्धेत उत्स्फूर्त विषयावर प्रथम क्रमांक मिळाल्याची आठवण सांगताना त्यांच्या आवाजातला फरक लपून राहत नाही. सोलापुरात डी.एड.ला असताना त्यांनी काडादी वक्तृत्व स्पर्धेत डोक्यावर गांधी टोपी असलेल्या गणवेशात भाग घेतला होता. "हा बावळा मुलगा नेमके काय बोलणार,' हा भाव परीक्षक आणि स्पर्धकांच्या चेहऱ्यावर होता; परंतु ते भाषण संपवून खाली उतरत असताना आख्खे सभागृह टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांच्या भाषणाला दाद देण्यासाठी उभे होते.
डॉक्टर लेखक
आपण काय बोलतो आणि काय वागतो, याचा ताळमेळ अनेकांना बसत नाही; परंतु मी बोललो तेच वागणार, ही ऊर्मी सांभाळणारे काही जण भेटतात. त्यांतले एक म्हणजे डॉ. प्रदीपकुमार आवटे. सोलापुरातून एम.बी.बी.एस. झाल्यावर बालरुग्णतज्ज्ञ होऊनही जाणीवपूर्वक ठरवून त्यांनी करमाळा तालुक्यातील कोर्टीसारख्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा केली. कविता करणे, एकांकिका लिहिणे आणि वक्तृत्व स्पर्धांत भाग घेणे, हे त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील आवडते उद्योग होते. ते मुलांसाठी निघणाऱ्या "पाखरांची शाळा' नावाच्या मासिकाचे काही दिवस मानद संपादक आहेत. ""सभोवताली घडणाऱ्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींशी आपले काही नाते आहे, ही जाणीव वक्तृत्व स्पर्धांमुळे येते. लोकांसमोर बोलल्यामुळे आत्मविश्वास निर्माण होतो. कॉलेजमध्ये मुलांचा ग्रुप मिळतो. आपण कुणीतरी आहोत, हे आत्मभान या स्पर्धा देतात. तरीही स्पर्धा गाजविणारी मुले पुढे वक्ते म्हणून उमटत नाहीत. हा आपल्या शिक्षण पद्धतीचा दोष आहे. मूलभूत विचार करण्याऐवजी तात्पुरत्या अभिव्यक्तीकडे मुले लक्ष देतात, असे अनेकदा जाणवते,'' असे त्यांनी नमूद केले. वैद्यकीय क्षेत्रात काम करताना लेखक म्हणूनही त्यांनी ओळख मिळविली आहे.
"डोक्यात हवा जाणे घातक'
बिकट आर्थिक स्थितीमुळे सोलापुरातील शिवाजी नाईट कॉलेजमध्ये शिक्षण घ्यावे लागलेल्या किसन तुकाराम दाडगे यांनी सांगितले, की एमएसडब्ल्यूला असताना वक्तृत्वामुळेच 1999 मध्ये बंगळूरला राष्ट्रीय एकात्मता शिबिरात टीमलीडर होण्याची संधी मिळाली. देशभरातील वेगवेगळ्या मुलांशी त्यामुळे मैत्रीचे नाते जोडता आले; परंतु कॉलेजमध्ये गाजत असताना प्रसिद्धीची हवा डोक्यात गेल्यामुळे लयाला गेलेले काही जण आता दिसतात. मी म्हणतो तेच झाले पाहिजे, ही वृत्ती तयार होते. त्यातून प्राध्यापकांशी उर्मटपणे बोलतात. अभ्यासाकडे दुर्लक्ष होते आणि करिअरचा ऱ्हास सुरू होतो. ही गोष्ट सांभाळली तर या स्पर्धा बरेच काही देऊन जातात, असे त्यांनी नमूद केले.
या प्रातिनिधिक नावांशिवाय चंद्रकांत पाटील, श्रीकांत माळखांबे, महेश खरात, विष्णू मस्के, दत्ता थोरे, औदुंबर चव्हाण, फारुख नायकवाडी असे अनेक जण सध्या वेगवेगळ्या आघाड्यांवर कार्यरत आहेत. स्पर्धांनी वक्ते निर्माण केले नसले तरी अनेकांना बिकट परिस्थितीतून उभे राहण्यासाठी हात दिला आहे. नुसती तात्पुरती पोपटपंची करणारे, कुणाकडून तरी भाषण लिहून घेणारे संपतात. ज्यांना वाचनाची आवड निर्माण झाली, नवे समजूत घेण्याची ऊर्मी जागृत झाली ते "शब्दप्रभू' आजही केवळ शब्दांची पूजा न करता जिथे अंधार आहे, तिथे लोकांसाठी प्रकाश वाटत फिरण्याचे काम करीत आहेत, असे दिसते.
(हा लेख 2005 मध्ये युवा सकाळमध्ये प्रसिद्ध झाला होता)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)

