मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

रामायण

आनंद देणारे व्यासपीठावर मी काहीदा बोललो ते गावात रामायण लागले त्या काळात. मी एसवायला होतो. उन्हाळ्याच्या सुट्टी लागली होती. अंबादास खाटमोडे आप्पा, संभाजी खाटमोडे, तानाजी खाटमोडे हे तिघे बापलेक याशिवाय सुनिल कोकणे, दासू राऊत, शिवाजी पाटील आदी मंडळी संत एकनाथांनी लिहलेल्या भावार्थ रामायणाचे वाचन करणे आणि अर्थ सांगणे असे बोलण्याचे काम करायची. मारुतीच्या मंदिरासमोर भाविकांचा जमाव जमलेला असायचा. मी रामायणातील ओव्यांचे अर्थ अगदी बोटावर मोजता येतील इतक्‍या दिवस सांगितले. अर्थ सांगणे हे तसे म्हटले तर अवघड काम. हे अगदी एखाद्या नवखा पोरगा गेला आणि त्याला ते लगेच जमले असे होत नाही. मी दुपारी मारुतीच्या देवळात जायचो. ग्रंथ वाचन कुठपर्यंत आलेय, हे पहायचो. मग पुढच्या अध्यायाच्या अगदी सुरवातीच्या ओव्या वाचायच्या. त्याचा अर्थ दिलेला असायचा. तोही दोनदा तीनदा वाचायचा. मग संध्याकाळी अर्थ सांगायला बसायचे. काहीदा चुकाही व्हायच्या, पण हे सगळे अगदी नम्रपणे शिकायची तयारी असल्यामुले शक्‍य व्हायचे. सकाळी तयारी केल्यामुळे नेमके कुठे काय बोलायचे, याचे गणित ठरलेले असायचे. लोकांना बरे वाटायचे. त्यांना कसेही वाटत असले तरी मला फारच बरे वाटायचे. त्यामुळे माझी कॉलर ताईट व्हायची. त्याच काळात बालकिर्तनकार म्हणून एक मुलगा गाजत होता. मी असे म्हणायचो की आपणही असेच आपल्या मुलाला लहानपणी किर्तन करायला शिकविले पाहिजे. पण ते काही जमले नाही. आयुष्य कुठल्या कुटे भरकट आले. पण व्यक्त होण्याची जिथे जिथे संधी मिळेल तिथे मी प्रयत्न केला. ते चांगले असते असे आज वाटते तरी मला वक्ता म्हणून मान्यता मिळावी, असे काही फार मी केलेले नाही.
मी मागे म्हटले तसे सभा गाजवल्या. काही भाषणेही चांगली केली. त्यातली अगदी निवडक भाषणे सांगायची म्हटले तर कॉलेजात असतानाच गावात केलेले स्वातंत्र्यदिनादिवशीचे भाषण, टीवायचा सेंडऑप होताना केलेले भाषण आणि अशी आणखी काही भाषणे सांगता येतील. मला माझी जी भाषणे चांगली झाली, असे वाटते. त्या प्रत्येक भाषणाची मी तयारी केलेली असायची. कॉलेजात असताना माझ्या डोक्‍यात असे एक आले की आपण कार्यक्रम सादर करुन काही पैसे मिळवू. मला कविता आवडायच्या मी त्या काळात खूप कवितांची पुस्तके वाचली. गरवारे कॉलेजात होस्टेल डेला प्रत्येकवेळी काहीना काही कविता सादर केली. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. कवितांबरोबरच त्या काळात व. पु. काले हा लेखक वाचला. त्यांची पुस्तके वाचल्यावर त्यातले काही उतारे परत परत वाचून पाठ झाले. खरे तर त्यांची सगळी पुस्तके वाचल्यानंतर वाचल्यावर मध्यमवर्गीय अनुभविश्‍वाच्या पलीकडे हा लेखक काही फार जात नाही, असे माझ्या लक्षात आले किंवा त्यांची काही पुस्तके वाचल्यावर त्याच त्या पद्धतीच्या भाषणशैलीने एक तोच तोच पण जाणवत राहतो. तरीही हा लेखक अनेकांना पागल करतो. याच काळात माझ्या काही कविता पाठ झाल्या. त्याची जुळवणी मनातल्या मनात चालायची. तसा एक कार्यक्रम मी केला. नेताजी सुभाष विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर हा कार्यक्र विद्यार्थ्यांना आवडला. पण रामायणात अर्थ सांगण्याची मजा काही औरच असते. ग्रामीण भागात रामायणामुळे अनेक वक्ते तयार झाल्याचे दिसते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा