शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

वीजेचे लोळ

समाजासाठी काहीतरी काम करायला हवे, असे प्रत्येकाला वाटत आहे. या मुलींसारखे कुणी काही करत असले की त्याचे कौतुक वाटते. तसे सामाजिक कामांत आता कुठे व्यक्तीगत बाबी आहेत, कुठे नुसते निधी मिळविण्यासाठीची धडपड आहे, कुठे निखळ आनंदाचा शोध घेण्यासाठीची तळमळ आहे, कुठे खरोखरचा निरागसपणा आहे आणि कुठे बनेलपणा आहे, याचा अंदाज अनेकदा आपल्याला येतो. या तीन मुली जे काम करीत होत्या, त्यात त्यावेळी निरागपण, खरेपणा होता. मी माझ्यासंबंधीच्या बाबींचा विचार करतो, शोध घ्यायला लागतो, त्यावेळी जरा खोलवर विचार केला तर लक्षात येते की आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग ज्यात आपल्याला असे वाटायचे की आपण काहीतरी करावे, पण आपली धाव वेगळी होती. पण कुठे काही जमत नाही. अनेकांचे असे होते. ते आपले क्षेत्र नाही, असे कुणी सांगत नसले तरी सगळ्यांचे वागणे तसेच असते. आपण आपले शिकावे, एखादी नोकरी पकडावी, त्यानंतर बायको करावी, दोन अपत्यांना जन्म द्यावा. त्यात शक्‍यतो एक पोरगा असावा. त्यानंतर घरच्यांना मदत करावी, जमेल तसा चिक्कार पैसा कमवावा, अशी एक मध्यमवर्गीय माणसाचे जगण्याची सर्वसाधारण धारणा असते. त्यामुळे मोठ्या झेप घेण्याच्या गोष्टी होत नाहीत. त्या तशा पद्धतीने झाल्या तर नक्की काहीतरी कधीतरी हातात पडतेच.
आपल्याकडे आपण नुसतेच हेलपाडत जातो. जे समोर येईल ते जगत राहतो. त्याने बायको, पोरबाळ, एकाद्या दुसरे घर यापलिकडे फार काही हातात रहात नाही. परंतु मला असे वाटते की प्रत्येक माणसाला कुठल्यातरी टप्प्यावर वीजसारखे लोळ खुणावत राहतात. तो त्याच्याकडे लक्ष देत नाही. ते हातातून निसते. माझा काही चळवळींशी अगदी किरकोळ संबंध आला. पहिला कोल्हापुरात असताना एबीव्हीपीशी संबंध आला. ती विद्यार्थी चळवळ त्यावेळी जोरात होती. त्यानंतर पुण्यात आल्यावर हिंदुत्ववादी वातावरणातील एका मित्राच्या सहवासाने मी विद्यार्थ्यांच्या संघटनेचा नावाला पदाधिकारी झालो. पुढे गरवारे कॉलेज सुटल्यावर माझ्यात वैचारिक अंगाने खरे परिवर्तन झाले, असे मला वाटते. पत्रकारितेच्या कोर्सला मी प्रवेश घेतला. तिथे मला अनेक चांगले वक्ते ऐकायला मिळाले.
काही आठवणी त्यावेळच्या सांगायलाच हव्या. एक ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांची. त्यांचे एक व्याख्यान त्यावेळचे विभागप्रमुख अरुण साधू यांनी आयोजित केले होते. मी त्यांना व्याख्यानंतर एक प्रश्‍न विचारला, "तुम्ही 1985 मध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघातून उभे होतात. त्यापूर्वी तुम्ही त्या भागासाठी कोणते काम केले होते?' या माझ्या प्रश्‍नाने तसे ते थोडेसे वैतागले. कारण त्यांनी उत्तर दिले होते, "महाराष्ट्रातील अत्यंत वाईट अशा तालुक्‍यांची एक यादी काढली तर त्यात करमाळ्याचा उल्लेख येईल. तुला किशोर शांताबाई काळे माहित आहे का? तो कुणाचा आहे. अशा तालुक्‍यासाठी मी काय काम करावे, असे तुला वाटते?' त्यानंतर मग त्यांनी करमाळ्यात झालेला खून आणि काढलेला मोर्चा याची माहिती दिली. अकलूज, राशीन, असे बरेच ते काही सांगितले. खरे तर मला प्रश्‍न कसे विचारावेत, याचे कदाचित ज्ञान नसावे, किंवा माझ्या बाळबोध पद्धतीने मी तो विचारला असावा. पण हि घटना माझ्या मनावर खूप ठसली. त्यानंतर मी सत्याग्रही विचारधारा वाचत राहिलो. सप्तर्षी यांची लिहण्याची शैली मला आवडत गेली. हे वेगळे काहीतरी आपल्या जवळचे आहे, असे मला वाटायला लागले. पुढे तुरूंगांतील त्याच्या अनुभवावरचे पुस्तक वाचले. त्यांनी हिमालयात केलेल्या भ्रमतीचे अनुभव वाचले. या सगळ्याने माझ्यात वैचारिक बदल होत राहिला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा