केत्तूरची दखल विविध वाहिन्यांनी घेण्यासाठी एक बातमी कारणीभूत ठरली. "शिक्षणाची वाट जाते, मरणाच्या दारातून,' ही केत्तूरची बातमी 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली. त्याला फोटो जबरदस्त प्रसिद्ध झाला होता. रेल्वे पुलावरून मुले शाळेला जातायत आणि समोरुन रेल्वे आली, असा तो फोटो होता. राजाराम माने यांनी दिलेल्या फोटो बातमीने हा विषय एकदम क्लीक झाला. त्यानंतर अनेक वाहिन्या तिकडे धावल्या. मराठी वाहिन्यांबरोबरच हिंदी वाहिन्यांचाही त्यात समावेश होता. वेगवेगळ्या पातळ्यांवर या बातमीची दखल घेतली गेली. त्यात त्यावेळचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा विषय आपण सोडवू, एक पायवाट होईल एवढा पूल तयार करून देऊ. अशी घोषणा केली. एक शिष्टमंडळ तेव्हाचे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना भेटायला गेले. त्यांनी हा विषयात लक्ष घालून राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री छगन भुजबळ यांना फोन करून प्रश्न मार्गी लावा, असे सांगितले. पुन्हा जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनीही या पुलासाठी निधी मंजूर झाल्याची घोषणा केली. त्यावेळच्या स्थानिक आमदार श्यामल बागल यांनीही त्याबाबत निधी मंजूर झाल्याचे सांगितले. प्रत्यक्षात या गावची तरुण मंडळी सरकारी कार्यालयांत फेऱ्या मारायची तेव्हा लक्षात यायचे की कुठेच काही सरकारी पातळीवर काही हलायला तयार नाही. हे काही खरे नाही, असेही खासगीत काही मंडळी गावकऱ्यांना सांगायची. त्यामुळे गावकरी निराश झाले. आता आपणच काहीतरी केले पाहिजे, हा विडा त्यांनी उचलला.
पार्श्वभूमी
खरे तर या विषयाला तसा फार जुना संदर्भ आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आता समोर आली आहे. नगर आणि कोल्हापूरला मागे टाकत गेल्या हंगामात 28 तर या हंगामात 34 साखर कारखाने उसाचे गाळप करत आहेत. ही ताकद या जिल्ह्यात कुठून आली, याचा शोध घेतला उजनी धरण हीच एक बाब समोर येते. या धरणाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी सात मार्च 1966 मध्ये केले. या धरणासाठी एकूण 51 गावे उठवावी लागली. त्यात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील 19, माढा तालुक्यातील चार, पुणे जिल्ह्यातील 25 तर नगर जिल्ह्यातील एका गावाचा समावेश होता. या 51 गावांपैकी एक म्हणजे करमाळा तालुक्यातील केत्तूर. या पुनर्वसित गावांचे अनेक प्रश्न होते आणि आहेत. मुलभूत सुविधांपासून अगदी स्मशानभूमीपर्यंत अनेक प्रश्नांची यादी करता येईल. केत्तूरसह काही गावांची गत तर वेगळीच झाली होती. एका गावाची दोन गावे झाली. केत्तूर नंबर एकच्या तीन बाजूंनी पाणी आली. रस्त्याने केत्तूर एकहून दोनला जायचे म्हटले तर किमान 13 किलोमीटर अंतर कापावे लागत होते. दोन्ही गावांना जोडणारा मधला मार्ग होडी. त्यातून लोक प्रवास करीत होते. हा कायम जिवावरचा प्रवास होता. या ठिकाणी पूल झाला पाहिजे, यासाठी गावकऱ्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. मात्र अशी कामे होण्यासाठी जो एक राजकीय आवाज लागतो, तो गावांत नव्हता. त्यामुळे हा प्रश्न राजकारणाच्या दृष्टीने ऐरणीवर आला नाही. जागतिक बॅंकेच्या मदतीतून प्रकल्पग्रस्त भागात काही कामे झाली. त्यावेळी देवराव नवले, नवनाथ राऊत यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी निविदा निघण्याअगोदरच काही काम केले. पण पुढे या कामाकडे कुणी सरकारी यंत्रणेतल्या कुणी ढुंकूनही बघितले नाही. पुढे बातम्या येत गेल्या. कधी लोकवर्गणीतून काम होणार अशा तर कधी सरकारने काम मंजूर केले असे छापून येऊ लागले. बोलले जाऊ लागले. त्यातून एक गोष्ट होत राहिली. गावकऱ्यांच्या मनात या कामाविषयी एक धगधगती भावना कायम राहिली. हे काम झाले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे प्रत्येकाने या कामात आपला खारीचा वाटा उचलला.
आपणच काम करावे, हि कल्पना कशी सुचली, यावर गावकरी सांगतात, "एक दिवसात गावाला सुचलेली ही कल्पना नाही. गेली तीस चाळीस वर्ष केत्तूर नंबर एक हे गाव बेटासारखे जगत होते. उजनी धरण झाले, गावात पाणी आले. नव्या गावात, शिवारात गावकरी येऊन विसावलो. तिथेही पाण्याने त्यांची पाठ सोडली नाही. केत्तूर एकच्या लोकांना रोज तळहातावर जीव घेऊन होडीतून प्रवास करावा लागायचा. गावची पोर शाळेसाठी रोजच मृत्युच्या दारातून प्रवास करायची. आम्हाला रस्ता हवा, छोटासा पूल हवा म्हणून गावकरी गाऱ्हाणी घेऊन फिरायचे. निर्दयी, थंड शासन त्यांच्यासाठी हलत नव्हते, फक्त पुढारी बातम्या आल्यावर बोलत होते. लोक इथे -तिथे धावत होते. आमच्या लक्षात आले व्यवस्थेपुढे कितीही डोके आपटले तरी आपलेच डोके फुटायची शक्यता आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. सगळ्या गावाचा हा निर्णय आहे.'
मंगळवार, १९ जानेवारी, २०१६
सारेच पुढारी कुचकामी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा