शनिवार, २ जानेवारी, २०१६

आतला आवाज मारला


आतला आवाज मारला
भाषण करण्याचा, व्यासपीठावर बोलण्याची अनेकांना उर्मी असते. मी पहिले भाषण चौथीत असताना केले. ते मला लिहून दिले होते. त्यावेळी शाळेत भाषण लिहून दिली जात. ते भाषण केल्यावर पुढे मला पुढे प्राथमिक शाळेत भाषण करण्याची संधी मिळाली नाही. ते स्वातंत्र्यदिनाचे भाषण होते. त्यानंतर हायस्कुलमध्ये गेल्यावर स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी होत होत्या. त्यात मी एकदा भाग घेतला. हायस्कूलमध्ये भाषण करायचे म्हणजे सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे भाषण लिहून घेणे हा असतो. दहावीत आल्यानंतर म्हणजे हायस्कूलच्या शेवटच्या वर्षाला असतानाच विभागीय पातळीपर्यंत मला भाषण करण्यासाठी जाण्याची संधी मिळाली होती. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने आयोजिलेल्या स्पर्धेसाठी मी विभागीय पातळीपर्यंत जाऊन आलो. उस्मानाबादला स्पर्धा होत्या. त्यावेळी माझ्याबरोबर एकही शिक्षक नव्हता. मी एकटाच गेलो. तिथे माझे भाषण चांगले झाले. पण नंबर काही आला नव्हता. त्याठिकाणी माझ्या ओळखीचे तसे कुणीच नव्हते. आमच्या शाळेतून बदलून गेलेले कांबळे सर मला फक्त तिथे दिसले होते. माझे भाषण झाल्यावर त्यांनी मला तुझे भाषण चांगले झाले, असे सांगितले होते. माझा नंबर का आला नाही, असा प्रश्‍न मला त्यावेळी पडला होता. त्याचा शोध माझा मीच घेतला, त्यावेळी भाषण पाच ते सात मिनीटे करायचे होते. मी ते साधारण तीन चार मिनीटातच उरकले होते. भाषणात मुद्दे होते. आवाज, आवेश, न घाबरता सगळ्यांना सामोरे जाण्याची तयारी या गोष्टी होत्याच पण तरीही आपल्याबरोबर कुणीच नसणे, आपल्याला दिलेल्या वेळेआधी आपण ते पूर्ण करणे यामुळे आपण स्पर्धेतून बाहेर पडत असतो, असे मला वाटले.
या स्पर्धेला जाण्यासाठी मी एकटाच घरातून बाहेर पडलो होतो. मी पहिल्यांदा बार्शीला आलो. तिथे रात्रभर राहिलो. त्यावेळी गावातील अनेकजण बार्शीत शिक्षणासाठी रहात होते. त्यांच्याकडे एक दिवस राहून उस्मानाबादला गेलो आणि तिथून थेट गावाकडे असा एकट्यानेच प्रवास केला होता. हा प्रवास माझ्या कायम स्मरणात राहिला आहे.
आठवीत मला असे वाटायले लागले की आपण कीर्तन करायला शिकावे. हा माझा त्या वयातला आतला आवाज होता. तो मला गावात येणाऱ्या किर्तनकारांची किर्तन ऐकून एकू आला होता. पंढरपूरचे नामानंद महाराज यांचे चिरंजीव दयाघन महाराज आणि सुदर्शन महाराज गावात किर्तन करण्यासाठी येत असत. त्यांचा पहाडी आवाज मनाला भुरळ घालायचा. आपल्यालाही लोकांच्या अंगावर असे शहारे उभे करता आले पाहिजेत, असे वाटायचे. आईचे ह्रदय मुलाने काढल्यानंतर ते प्रियेशीकडे घेऊन जाताना तो ठेचकाळून पडतो, त्यावेळी ते ह्द्य विचारते बाळ तुला लागले का? ही गोष्ट ते खूप रंगवून सांगायचे. काहीवेळा मध्ये एकाद्या पोवाडा सादर करायचे. टिमडी अतिशय दमदार पद्धतीने वाजविली जायची.
एका रात्री असे किर्तन ऐकून मी घरी आलो. जेवण केले. मी आईला म्हणालो, "मला किर्तन शिकायचे आहे.' ती मला नेमके काय म्हटली हे मला आज आठवत नाही, मात्र ती त्या बाजूची नव्हती एवढे मात्र लक्षात आहे. कॉलेजात गेल्यावर माझ्या या बोलण्याच्या हौसेला आणखी गती काही मिळाली नाही. आपण काहीतरी करावे, असे मात्र सतत वाटत रहायचे. हायस्कुलमध्ये असतानाच मी आठवी, नववीत कधीतरी गॅदरिंगमध्ये नाना पाटील यांचा पोवाडाही सादर केला होता. शाहीर बाबासाहेब देशमुख यांची त्या पोवाड्याची कॅसेट होती. ती कॅसेट कितीतरी वेळा ऐकली. ती पाठ झाली. त्यावेळी काळे सर पेटी वाजवायचे. ढोलकीवरही कुणीतरी असायचे. सूर, ताल असल्या गोष्टी त्यावेळीही काही कळत नव्हत्या. त्यावेळसारखाच त्याबाबत आजही मी तितकाच ढ आहे. उलटपक्षी त्यावेळी जी समजून घेण्याची उर्जा होती ती आज कमी झाली आहे. माझा आतला आवाज मी मारला असे मला अनेकदा वाटते. 

हा आपला आतला आवाज आपल्याला अनेकदा ऐकू येतो, मात्र त्याबाबत आपण तितके सजग नसतो. त्यामुळे काळ नेईल तिकडे भरकटत जावे लागते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा