मंगळवार, १२ जानेवारी, २०१६

धरणग्रस्तांचा मेळावा

पुणे विद्यापीठात असताना 1996-97 मध्ये राजा कांदळकर यांच्याबरोबर चांगली ओळख झाली. मग पुना हॉस्पीटलजवळ एका बैठकीला गेलो होतो. तो त्यावेळी समाजवादी जन परिषदेचे काम करीत होता. भाई वैद्य आणि अन्य समाजवादी मंडळीनी काढलेला या पक्षाची युवा शाखा सुरू करायची होती. या बैठकीला सुगंध देशमुख आणि अन्य बरीच मंडळी आली होती. यावेळी विविध पदांवर नेमणुका झाल्या, मात्र या युवा शाखेने आणि या पक्षानेही काही फार बाळसे धरले नाही. पण यानिमित्ताने काही वाचन झाले. वेगवेगळ्या भेटीगाठी होत राहिल्या.
याचा कालखंडात माझ्या गावात एक धरणग्रस्तांचा मेळावा झाला होता. माझं केत्तूर गाव. त्यावेळी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, नेते आणि आयुष्यभर ज्यांनी दिनदुबळ्यांसाठी काही करुन ठेवले आहे, ते बाबा आढाव आमच्या गावात आले होते. बाबांचे एक गाव एक पाणवठा हे पुस्तक मी वाटले होते. त्यांचे पुण्यातील हमालांसाठी केलेले काम, पुण्यात काढलेली झुणका भाकर केंद्र मला माहिती होती. अनेक दिनदुबळ्यांचा ही झुणका भाकर केंद्र आधार आहे. बाबा आढाव यांच्याबरोबर विभागीय आयुक्त जोशी होते. लोकांनी समास्या मांडाव्यत यासाठी धरणग्रस्तांना बोलण्याची संधी दिली जात होती. कुणी शेती मिळाली नाही. कुणी प्लॉट मिळाला नाही. कुणी विनाकारणच आमच्या जमिनीच्या सातबारावर प्रकल्पग्रस्तांसाठी संपादीत म्हणून नोंद झाल्याचे सांगत होते. प्रश्‍न खूप होते. लोक बोलत होते. सरकारी यंत्रणा जशी ढिम्म असते तसे अधिकारी होते. मी उठलो. एकजण बोलत असताना मध्ये बोलायला लागलो. काही प्रश्‍न मांडले. शेवटी आयुक्तांना म्हणालो, "तुम्ही सरकारने आतापर्यंत धरणग्रस्तांसाठी काय केले आहे, ते सांगा. माझ्या बोलण्यात शेवटी मी "एक्‍सलेनेशन द्या' हा शब्द वापरला. ते सुपर क्‍लासवन अधिकारी. वैतागले आणि माझ्यावर भडकले. मला इंग्रजीत "शट्‌ अप' असे म्हणाले. त्यावेळी आता गोंधळ उडणार की काय अशी परिस्थीती निर्माण झाली. बाबा आढाव त्यानंतर बोलायला उभे राहिले. ते आयुक्तांना म्हणाले, तो मुलगा काय म्हणतोय, याकडे शब्दशः लक्ष न देता. या भागातल्या तरुणांची मानसिकता तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर त्यांनी मला जवळ बोलवून असे इतके आक्रमक व्हायचे नसते. आपली भाषाही तोलून मापून वापरली पाहिजे, असे सांगितले होते.
त्यावेळी एक तरुण पोरगा एक अधिकाऱ्याला वैतागायला लावतोय. त्यांचे संतुलन त्याने ढळतंय, याचे फक्त एकाच माणसाला कौतुक वाटले. ते म्हणजे जेऊरचे आनंद कोठडिया. पण माझ्या घरचे या गोष्टींनी इतके वैतागले की हा कोण शहाणा गेला, मोठ्या अधिकाऱ्याला असे बोलणारा, असा त्यांचा भाव होता. मी त्यावेळी म्हणजे 1994 मध्ये जो प्रश्‍न मांडत होतो तो अजूनही सुटलेला नाही. ते प्रश्‍न असा की आमच्या आण्णांनी तीन एकर जमीन विकत घेतलेली आहे. ती माझ्या भावाच्या नावावर केली. ती जमीन उजनी धरणाच्या बॅकवॉटरपासून साधारण तीन चार किलोमीटर लांब आणि उंचावर आहे. त्या जमीनीत उजनीचे पाणी कधीच येऊ शकत नाही. त्या जमीनीवर उजनीसाठी संपादित म्हणून नोंद झाली आहे. अनेक प्रयत्न करुनही ती नोंद काही निघाली नाही. आमच्याबरोबर अनेक दोघाचौघांचे असेच झाले आहे. त्या जमीनीचा मोबदला मिळालेला नाही. तिच्यावर पिक कर्ज अथवा अन्य कुठले कर्ज निघत नाही. सातबाराला झालेली नोंद मोठी अडचणीत टाकणारी आहे. पुढे मी प्रकल्पग्रस्तांच्या जमीन नोंदीचे प्रश्‍न अशी एक वृत्तमालिकाच "सकाळ'मध्ये लिहली. इतर काही प्रश्‍न मार्गी लागले पण हा प्रश्‍न काही सुटला नाही. मला धरणग्रस्तांसाठीही आपण काहीतरी करावे, असे मला नेहमी वाटायचे. यासंबंधातील चळवळीच्या किंवा अन्य काही बातम्या आल्या की त्या प्राधान्याने लावून घ्याव्यात, अशी माझी भूमिका असायची.
या भागातले अनेक प्रश्‍न अजूनही तसेच आहेत, पण लोकांनी काही गोष्टींवर मार्ग शोधले आहेत. त्यासंबंधी पुढे बघू. पण माझे सिंहावलोकन करताना मला हा धरणग्रस्तांचा मेळावा नेहमीच आठवत राहतो. सरकारी यंत्रणेतील चूक तुम्ही काढली तर अनेकदा कुणी लक्ष देत नाही. वरिष्ठातील वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर जरी तुम्ही खरंखुरं गाऱ्हाणं मांडल तरी त्यांची अनेकदा भूमिका तुम्हाला गप करण्याची असते, हा धडा यानिमित्ताने मला मिळाला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा