आपल्या शिक्षणाचा उपयोग थेट व्यवहारी आयुष्यात होत नाही म्हणून नाराज झालेले अनेक जण भेटतात. मात्र, शिक्षणाकडे सकारात्मक अंगाने बघणे, संधी मिळेल तिथे घुसणे आणि चिकाटी न सोडणे या बाबी केल्या तर आपण बरेच काही करू शकतो. आपल्याबरोबरच समाजसुद्धा बदलू शकतो, हे त्या तिघींचे काम बघितले, की लक्षात येते. वालचंद कॉलेज ऑफ आर्टस् ऍण्ड सायन्सच्या समाजकार्य विभागात त्या तिघी शिकत आहेत. सरस्वती पाटील, उषा पंडित आणि उमा घेरडे अशी त्यांची नावे आहेत.
सोलापुरातील रुपाभवानी मंदिराजवळ मड्डीवस्ती हा झोपडपट्टीचा दुर्लक्षित भाग आहे. या ठिकाणी अगोदर घनदाट झाडे होती. आता आठ समाजाचे लोक या वस्तीत राहात आहेत. या वस्तीतील लोकांची आर्थिक स्थिती बिकट आहे. लोक व्यसनाधीन आहेत. आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या या वस्तीतील्या लोकांना भेडसावतात. महिलांच्या समस्यांना तर पारावार नाही. या तिघींनी या वस्तीचा आपल्या "फिल्ड वर्क' अंतर्गत "फॅक्ट फायडिंग' अभ्यास केला. कॉलेजकडूनच त्यांना अभ्यासातंर्गत या वस्तीत समाज संघटन करायचे होते. एरवी कॉलेज आणि घर सोडून समाजात फारसे न मिसळलेल्या या तिघींसाठी ही तारेवरची कसरत होती. ही वस्ती बदलायला सुरवात करायची असेल तर इथल्या महिलांकडे आर्थिक ताकद आली पाहिजे. त्यांनी स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला शिकले पाहिजे, हे त्यांनी जाणले. त्यासाठी या तिघींनी या वस्तीतला आपला वावर वाढविला. लहान मुलांना खेळ, गाण्याच्या माध्यमातून आरोग्याची माहिती देऊ लागल्या. सुरवातीला अविश्वासाने बघणाऱ्या नजरा लहानग्यांशी केलेल्या सलगीमुळे थोड्या विश्वासाकडे कलल्या. बैठका घेऊन या वस्तीतल्या महिलांशी संवाद सुरू केला. त्यांना सरकारी योजनांची माहिती दिली. पण, त्यात अनेक अडथळे येतच होते. मग महिलांचे बचतगट करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला या ठिकाणच्या महिला विश्वास ठेवायला तयार नव्हत्या. पण, हे सगळे काम तुमचे तुम्हाला करायचे आहे. यातून होणारे फायदे समजून दिल्यानंतर या ठिकाणी बचत गटाची चळवळ सुरू झाली. महिलांचे संघटन या माध्यमातून होत आहे.
सुरवातीला रेणुकादेवी, रुपाभवानी आणि शिवगंगा असे तीन महिला बचत गट स्थापन झाले. रेणुकादेवी बचतगटाची स्थापना 11 एप्रिल 2005 रोजी झाली आहे. गटाच्या अध्यक्षा पार्वतीबाई शिवप्पा भोसले, उपाध्यक्षा जगदेवी कोळी तर सचिव सुनीता गायकवाड आहेत. श्री रुपाभवानी बचतगटाच्या अध्यक्षा सौ. जयवंती पवार, उपाध्यक्षा मंगल चौधरी तर सचिव महानंदा पवार आहेत. शिवगंगा बचतगटाच्या अध्यक्षा संगीता त्रुंडमाळी, सचिव सुरेखा जानगवळी तर उपाध्यक्षा निर्मला कोळी आहेत. या तीनही गटातील महिला महिन्याला 50 रुपये बचत करत आहेत.
आता या वस्तीत महिला आणि युवकांचे दहा बचतगट कार्यरत आहेत. या ठिकाणी हे बचतगट महिलांना सुप्तपणे आत्मभान देत असल्याचे दिसून येते. महिला दहा ते पंधरा टक्के व्याज महिन्याला देऊन खासगी सावकारांकडून अगदी थोडे का असेना पण कर्ज काढायच्या. आता त्याला काही प्रमाणात आळा बसला आहे. सर्व जातीधर्माच्या महिला एकत्र आलेल्या असून गटाचे आर्थिक व्यवहार सगळ्यांना कळले. सगळ्यांनी पैसे जमवून ते टिळक चौकातील सिंडीकेट बॅंकेत टाकण्यास शिकले पाहिजे, हे महिलांच्या मनावर बिंबविण्यात आले. समाजात वावरण्याचा अनुभव नसणाऱ्या बचतगटातील महिलांसाठी हे एक दिव्य होते. पण, हळूहळू सगळ्याच जणींनी या गोष्टी शिकल्या आहेत. याशिवाय या वस्तीत अनेक कार्यक्रम झाले आणि होत आहेत. त्यात पथनाट्य, एड्स जनजागृती, आरोग्य जागृती अशा काही कार्यक्रमांचा उल्लेख करता येईल.
यासंबंधात सरस्वती पाटील म्हणाली, ""आम्ही जे काम सुरू केले ते केवळ अर्थकारणाशी संबंधित नाही. त्यातला समाजकार्य हा पैलू महत्त्वाचा आहे. सुरवातीला टिंगलटवाळी करू पाहणारी पोरंही या मुली आपल्यासाठी काही काम करीत आहे, हे समजून आता गट करू लागले आहेत. कॉलेजचे डॉ. चन्नवीर, विभागप्रमुख प्रा. विलास बेत, प्रा. जगदीश जाधव यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे.''
या मुलींच्या कामाबाबत डॉ. आर. एम. चन्नवीर म्हणाले, ""या वस्तीत आठवड्याला बैठका होतात. त्यातून त्यांचा प्रगतीचा मनोभाव तयार होत आहे. आणखी काही काम करायचे आहे. या महिलांना काही छोटा-मोठा उद्योग करून देता येईल का, यासंबंधी विचार सुरू आहे. दारिद्य्र रेषेखालील लोकांना त्यांच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यायचा आहे. आगामी काळात सोलापुरातील आणखी काही ठिकाणी अशाच प्रकारचा प्रकल्प राबविण्याचा विचार आहे.''
(हा लेख 26 नोव्हेंबर 2005 रोजी प्रसिद्ध झाला होता.)
गुरुवार, ७ जानेवारी, २०१६
त्या तिघी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा