सोमवार, ४ जानेवारी, २०१६

सरांची घेतली मुलाखत

आमच्या नेताजी सुभाष विद्यालयात मराठी शिकविणारे काळे सर फार मस्त होते. ते कधीही कुणालाही टाकून बोलत नसायचे. त्यांचा स्वभाव अतिशय हळवा होता. ते पेटी वाजवायचे. शाळेत कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असला तरी ते मार्गदर्शनासाठी असायचेच. त्यांचे गाव कुठले हे मलाही माहित नव्हते. दहावीत असताना मी नाना पाटील यांचा पोवाडा हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात सादर केला होता. त्याला सरांनी मार्गदर्शन केले होते. त्यांना मी साधारण वीस - पंचवीस वर्षानंतर पुन्हा गेल्या पाच वर्षांपूर्वी भेटलो. एका वेगळ्या प्रसंगात आमची भेट झाली. मी कुर्डुवाडीत बातमीदारांच्या मुलाखती घेण्यासाठी गेलो होतो. कुर्डुवाडी, करमाळा, बार्शी या शहरांबरोबरच काही छोट्या गावांत सकाळसाठी बातमीदार नेमायचे होते. ज्येष्ठ बातमीदार सुरेश शहा, बार्शीचे विजय निलाखे आणि मी मुलाखती घेत होतो. कुर्डुवाडी जनता बॅंकेच्या सभागृहात हा मुलाखतींचा कार्यक्रम होता. तिथे मोठी रांग होती. तीन तालुक्‍यातून तरुण मुलांपासून साधारण साठ पासष्ट वयापर्यंत 40 ते 50 जण मुलाखतीसाठी आलेले होते. त्या रांगेत मी काळे सरांना बघितले. त्यांनी कुर्डुवाडीजवळच्या भोसरे गावाचा बातमीदार होण्यासाठी अर्ज केला होता. मी त्यांना आत बोलावले. ""मी तुमचा विद्यार्थी, तुम्ही आम्हाला दहावीला मराठी शिकविले आहे. तुम्हाला कशाला हवी बातमीदारी ?'' असे काहीतरी मी त्यांना विचारले. मी म्हटले तुम्ही पाठवा बातम्या. तुमच्या नियमात बसणाऱ्या सगळ्या बातम्या प्रसिद्ध करु. त्यानंतर मी त्यांच्याशी काहीदा बोललो. त्यांची बातमीदारी काही फार दिवस चालली नाही. कारण हे काम वेगळ्या प्रकारचे काम असते. पण मला या कलावंत माणसाला अशा छोट्या गावचे बातमीदार का व्हावेसे वाटले, हे मात्र काही मला कळाले नाही. मुलाखतीतले बोलणे समोरच्याला इम्प्रेस करणे आपला अभ्यास मांडणे हे सुद्धा एक कसब असते. ते ज्याला जमते, ते समोरच्यावर छाप पाडून स्वतःचे काम करुन घेतात. ते न जमणारे ढ असतात, अशातला अजिबात भाग नाही. मी या मुलाखतीत ज्यांना निवडले, ज्यांची माझ्यावर छाप पडली, त्यातले निम्मेच किंबहुना त्यापेक्षाही कमीचजण पुढे बातमीदारीत टिकले, त्याची कारणे अजून वेगळी असतील. पण चांगले बोलता येणे हे महत्वाचेच असते असे मला वाटते.
अकरावीत राजाराम कॉलेजात काही जमले नाही, मग बारावीत असताना एम टी कोथळीला म्हणालो मला गॅदरिंगमध्ये कार्यक्रम सादर करायचा आहे. त्यांनी त्यावेळी एक नाटुकली बसविली होती. ती पाच सहा मिनीटींची असेल त्यात त्यांनी मला एक छोटासा रोल दिला होता. मला आजही असे वाटते की आपण भाषण करायला उभे रहावे. लोकांना तासोतास आपल्या बोलण्यात गुंतवून ठेवावे. नवी माहिती नवा विचार लोकांना सांगावा. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काही नवे बदल घडावेत. आता असे कुणी काही सांगितल्याने लोकांच्या आयुष्यात बदल घडतात का, यावर चर्चा होऊ शकते. काहीजण असेही म्हणू शकतात की कुणी कुणाला काही सांगितले म्हणून लगेच कुणी काही बदलत नसतो. ते काही प्रमाणात बरोबरही असते. पण आपण जर नवी गोष्ट ऐकली, नवा विचार समजून घेतला तर त्यातून आपल्या नकळत आपल्यातही काही फरक पडत असतो. त्याशिवाय मला काही सांगायचे आहे, हे तर प्रत्येकाला वाटत असते. हे सांगण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. व्यक्त होण हे त्यामागे असते. त्यातून लोकांनी आपले कौतुक करावे. तशी ही बहुसंख्य कलाकारांची भूक असते. वक्तृत्व ही सुद्धा एक कला आहे. ही भाषणाची कला नेमकी कशी अवगत करावी, कुठे कसे भाषण करावे, याविषयी मी काही वाचले. तसा काही प्रयत्नही केला मात्र त्यात जे एक सातत्या लागते ते मला जमले नाही. संधी हाही भाग असतो. त्यामुळे माझी याबाबतची अनेक स्वप्न अपुरी आहेत. पण तरीही मी अनेकदा व्यासपीठावर केलेली भाषणे गाजली. माझी ओळख त्यामुळे अनेकांशी झाली. मी अनेक वक्तेही ऐकले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा