आपण काहीतरी प्रश्न विचारुन उगाच लोकांना भंडावून सोडावे, आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधून घ्यावे, असे अनेकजण आपण करत असतो. कॉलेजात माझ्याही स्वभावाचा तो भाग बनला होता. मी एसवायला असताना छात्रभारतीचे संस्थापक ना. य. डोळे सर एकदा केत्तूरला आले होते. छात्रभारतीचे शिबिर संजय आवटे, डॉक्टर प्रदीप आवटे मंडळींनी केत्तूरमध्ये घेतले होते. याला जिल्हाभरातून विद्यार्थी आले होते. डोळे सरांचे व्याख्यान संपले. त्यानंतर त्यांनी प्रश्न विचारा, असे सांगितले. त्यांनी भारताची राज्यघटना या विषयावर मुलांना माहिती सांगितली होती. मी एफवायला राज्यशास्त्र विषय शिकलो होतो. आम्हाला शिकविणारे गरवारेचे वझे सर छान शिकवायचे. त्यांची शिकविण्याची पद्धत विषय लक्षात राहिल अशी होती. ते हळू शिकवायचे आणि त्यासोबत विद्यार्थ्यांना नोट्स लिहून घ्यायला सांगायचे. त्यामुळे विषय पटकन लक्षात रहायचा. ते आरएसएसचे समर्थक असावेत, असे त्यांच्या शिकविण्यावरुन आत्ता वाटते.त्यांनी आणिबाणीचे प्रकरण खूप मस्त शिकविले होते. जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन, इंदिरा गांधी यांनी त्यांची अलाहाबाद न्यायालयाने निवड रद्द केल्यानंतर तातडीने रात्रीच आणिबाणी जाहीक करणे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरूंगात टाकणे. दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्याला अनुमती घेणे. त्यानंतर त्यांनी आपला विजय होणार असा गुप्तचर विभागाचा अहवाल आल्यावर पुन्हा निवडणुका जाहीर करणे, आणिबाणीच्या काळातला वीस कलमी कार्यक्रम, कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी तरुणांच्याही शस्त्रक्रिया करणे अशा अनेक बाबी त्यावेळी लक्षात आल्या होत्या. त्याने कॉंग्रेसविषयी मनात एक विरोधाची भावना निर्माण होत होती.
शिबीरात मी डोळे सरांना प्रश्न विचारला, "भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता हा शब्द 1977 मध्ये इंदिरा गांधी यांनी जी 42 वी घटना दुरूस्ती केली, त्यावेळी घातला. तो घालणे योग्य होते का? आपण आपले हिंदु राष्ट म्हणतो मग तो शब्द कशाला घालायचा होता.' त्यांनी त्यावेळी मला खूप समजून सांगितले पण भडक, भावनिक असे काहीतरी त्या वयात आवडत असते. त्यामुळे मोठ्या लोकांना असे प्रश्न विचारुन आपण त्यांना अडचणीत आणतो, असा काहीतरी समज मनात व्हायचा.
आणिबाणीविषयी पुढे मी माहित घेत गेलो, तेव्हा देशाच्या लष्काराला सत्ताधाऱ्यांचे आदेश पाळू नका, असे विरोधकांनी आवाहन केल्याचे वाचनात आले. त्यावेळची जागतिक स्थिती आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी घडवून आणलेला रेल्वेचा संप आणि देशाला शिस्त लावण्यासाठी आणिबाणी महत्वाची होती, असेही माझ्या वाचनात आले. आणिबाणीच्या इतिहासाचे पुनर्रलेखन अशी एक लेखमालाच कुमार केतकर यांनी लिहिली होती. त्यामुळे आपण कुठलाही विषय घेतला तरी त्याला दोन बाजू असतात. हे आता लक्षात येते. पण त्यावेळी तीर मारल्यासारखे आपण काही फार भारी केले, अशे वाटत राहते. गोरबगरीब मुलांसाठी लढणारी हीच छात्रभारती संघटना मला पुढे जवळची वाटू लागली. एकदा छात्रभारतीच्या मोर्चासाठी मी मुंबईलाही गेलो होतो. उस्मानाबादचे जाधव सर, पुढे आमदार झालेले कपिल पाटील अशी मंडळी त्यावेळी नेतृत्व करीत होती. पुढे दिलीप वाघमारे छात्रभारतीचा प्रदेशाध्यक्ष झाला. त्यानंतर तो आणि मी दोन वर्ष पुण्यात एका खोलीत रहात होते. त्याचे वैशिष्ट असे की त्याने "सकाळ'ची नोकरी सोडली आणि संघटनेचे पूर्णवेळ काम करायला लागला. आपल्याकडे असे फार कमी वेळा कुणीतरी सगळे उत्तम चाललेले असताना अशी वेगळी उडी घेतो. त्याने दोन वर्ष संघटनेचे काम केले. त्यानंतर मग तो औरंगाबादमध्ये कुठल्यातरी दैनिकात कमा करायला लागला. पुढे चॅनेलचे काम सुरू केले. हा फापटपसारा मी सांगतोय, त्याचे कारण असे अशा चळवळी चालविणे आता अवघड झाले असले तरी त्यात चळवळीत असण्याची एक झिंग असते. ती चढली की मग आपण काहीतरी केले पाहिजे, असे वाटते. या उर्मीतूनच या तिघींनी काही काम केले. त्यामुळे मला हा लेख अनेकदा आपल्या आयुष्यातल्या घटना आठवत राहतात आणि मी स्वतःला भूतकाळात ढकलून देतो.
शनिवार, ९ जानेवारी, २०१६
आणीबाणी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा