बुधवार, ६ जानेवारी, २०१६

भाषणाविषयी...

टीवायला असतानाच प्रांजली दाऊदखाने, प्रसन्न रानडे आणि मी असे कोल्हापूरजवळच्या मुरगूडला स्पर्धेला गेलो होतो. राज्यस्तरावरची स्पर्धा होती. मी तिथे भाषण केले. माझा आवाज मोठा आहे पण त्यात कंटेटची जी एक जोड लागते, ती सतत कमी पडली असे मला वाटते. मुद्दे नवे भाषणात सतत पाहिजे, त्याशिवाय मनन चिंतन असल्याशिवाय तुमचे भाषण श्रोत्यांपर्यंत पोहचत नाही. परीक्षक तुम्हाला नंबर देत नसतात. या स्पर्धेत वाद केला. पुण्याचा आख्खा ग्रुप स्पर्धा अर्ध्यावर टाकून तिथून परत पुण्याला आला. त्यावेळी एसपी, फर्ग्युसनसह विविध कॉलेजातले विद्यार्थी आमच्याबरोबर होते.
चांगले बोलता येण्यासाठी चांगली भाषणे ऐकली पाहिजे. मी अनेकांची भाषणे ऐकली. शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर अशी जी सगळ्यांना माहित आहेत, अशी अनेक नावे सांगता येतील. मला आवडले ते जर्नालिझमला असताना ऐकलेले आजचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे भाषण. या भाषणातले मुद्दे माझ्या लक्षातूनच जात नाहीत. त्यांनी पहिला मुद्दा असा सांगिताल होता की महात्मा फुले यांच्या निधनाची बातमी त्यावेळी केसरीने दिली नव्हती. बातमीमुल्यांच्या सगळ्या कसोट्या मला कळतात. ही बातमी का आली नाही. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर पत्रकारितेची खोच त्यांनी सांगितली. बोलण्यातसुद्धा तशी गोची आहे, असे अनेकदा मला वाटते. तुम्ही प्रस्थापित वर्गातले असाल, परंपरेने आपल्याकडे माणसाला बघण्याची जी एक समाजाची दृष्टी तयार झाली आहे, त्यातल्या वरच्या थरातले जर तुम्ही असाल तर तुम्ही अनेकदा काहीही नसून कुणीतरी होता. समाजाचा आपोआप सॉफ्ट कॉर्नर तुम्हाला मिळतो. हे बोलण्याचे, लोकांना शहाणपणा शिकविण्याचे काम परंपरेने उच्चवर्णीयांनी केले. त्यामुळे त्यांच्याकडेच त्याची मक्तेदारी आहे. शेतकरी कुटुंबात लहानपणापासून मुलांना ते वातावरण मिळत असल्यामुळे तसे घडते. त्यामुळे माझ्यावेळी कॉलेजात स्पर्धा गाजविणाऱ्या पोरांचा सामाजिक स्तर कोणता होता, असे बघितले, अनेक गोष्टी लक्षात येतात. पण शिक्षणाची दारे जशी सगळ्यांना खुली झाली तसा त्यात फरक पडत गेला, हेही खरे आहे.
नुसत्या भाषणाने अनेकजणांची करिअर घडल्याची उदाहरणे आपल्याकडे आहेत, तशी ती देताही येतील. पण याबाबत मी लहानपणापासून चर्चा एकली ती लक्ष्मणराव ढोबळे यांच्या संदर्भातील. आमच्या गावातले बाबजी नाना (कै.) तुकाराम राऊत) आणि पोपट नाना कै. पोपट येडे) यांनी ढोंबळेंच्या भाषणाची कॅसेट आणली होती. फार मस्त बोलतात ढोबळे. त्या जोरावर राजकारणात त्यांनी अनेक पदे मिळविली. ते प्राध्यापक होते. शिक्षकांचे शिकवणे हे सुद्धा एकप्रकारे बोलणेच असते. ज्या शिक्षकांना मुलांपर्यंत आपला विषय पोहचविता येतो, ते लक्षात राहतात. मला बारावीत अशताना चांगले ऐकण्याची संधी मिळाली ती कोल्हापुरात. शाहू कॉलेजच्याजवळ पी. बी. पाटील यांचे प्रबोधन क्‍लासेस चालवायचे. ते सर इतके जबरदस्त ते बोलायचे. एक प्रचंड हजरजबाबीपणा त्यांच्यात होता. इंग्रजी शिकवायचे पण मराठी, वाक्‍य, कविता, आणि त्यांचे एकूण बोलणे सतत ऐकत रहावे, असे असायचे. "सोने पांघरुन चिंढ्या विकायला बसला तर गिऱ्हाईक सरता सरेना आणि चिंढ्या पांघरुन सोने विकायला बसला तरे कुणी पुसेना' अशी वाक्‍ये ते सांगायचे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या फुल्ल बॅचेस असायच्या. त्यांच्याकडे मला कसेबसे ऍडमिशन मिळाले होते. त्यावेळी 1991 मध्ये वर्षाची एका विषयाची फी अडीचशे रुपये अशी होती. त्यांनी पैसाही तुफान कमावला. पण मला त्यांच्याविषयी नंतर कळाले की त्यांना घशाचा कॅन्सर झाला. ही गोष्ट वांगीचा फौजदार झालेला पुणे विद्यापीठातला मगन यादव याने सांगितली. तेव्हा मी दिवसभर प्रचंड अस्वस्थ होतो. तसे माझे आणि त्यांचे व्यक्तीगत संबंध अजिबात नव्हते. तरीही त्यांच्या बोलण्याचे गारुड माझ्या मनावर प्रचंड होते. बोलणाऱ्यांचे अनेक ठिकाणी चालते, एवढे मात्र खरे. ही म्हण तशी काही प्रमाणात खरी आहे. बोलणार हुशार असतो का तर त्याचे ढोबळ उत्तर हो किंवा नाही असे देता येत नाही. हुशार माणसं मात्र अनेकदा स्वतःला शब्दातून व्यक्त होता नाही आले तर मागे राहतात, हे मात्र नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा