मनात रुतलेले वाक्य
आपला विचार, आपण, समाजतील विषमता, देवधर्म, आपले महापुरुष आणि व्यवस्थेवर वर्चस्व गाजविणाऱ्या माणसांचे गरीबांना गांजणे, व्यवस्था घट्ट व्हावी म्हणून पेरला जाणारा विचार अशा बारीक सारीक गोष्टींवर गप्पा मारण्यात एक वैचारिक आनंद मिळतो. त्यातून आपल्याला आपलेपण अनेकदा सापडते. अशा गप्पा मारताना भरत यादवने एक दिवस अक्षर मानव संमेलनाच्या पत्रकाची माहिती दिली. महाबळेश्वरजवळ खिंगरला होणारे संमेलनाविषयीची भूमिका भारी होती. आपण जाऊ तिकडे अशी आम्ही चर्चा केली. पुढे बरेच दिवस त्या विषयावर काही चर्चा झाली नाही, मग संमेलन अगदी तोडांवर आल्यावर मी पुण्यात विचारून त्यांचा आजीव सभासद झालो. माझ्याअगोदरच भरतने त्याच्यासह हयातमहंमद पठाण, सिद्धाराम वाघ, राकेश कदमला आजीव सभासद करुन घेत आपली जागा फिक्स केली. त्यानंतर मात्र मग प्रत्यक्ष खिंगरला सिद्धाराम, मी आणि भरत पुढे गेलो होतो. तीन दिवस आणि चार रात्री तिथे राहिलो. पाऊस छपाछपा कोसळत होता. जेवणाची सोय उत्तम पद्धतीने केलेली होती. महाराष्ट्रातून आलेली निवडक माणसं व्यासपीठावर बोलत होती. कोण बोलणार हे काही ठरलेले नसते, असे निदान सांगितले जाते. वैचारिक वादात भांडणे करायची नाहीत आणि दारु पिणाऱ्यास हाकलून दिले जाईल, असा तिथला नियमच होता. बोलणाऱ्याचे बोलणे संपल्यावर त्याला प्रश्न विचारणे, त्याच्या माहितीत काही भर घालणे अशी प्रत्येकाला व्यासपीठावर नाही निदान प्रेक्षकांतून तरी बोलायला संधी तिथे असते. तीन दिवसात अनेक चांगले वक्ते ऐकले. सकाळी दहानंतर चहा नास्ता झाल्यावर चर्चेला सुरवात होते. ती संध्याकाळपर्यंत चालायची. त्यानंतर रात्री शेकोटी पेटवायची, त्याच्यासमोर गप्पा मारत बसायचे. तीन रात्री आम्ही इतक्या तुफान गप्पा मारल्या की त्याने रात्री झोप न येणे किंवा आपल्यात काहीतरी बदल होतोय, याची जाणिव करुन देणारी ती प्रक्रिया होती. समाज हा 2012 च्या संमेलनाचा विषय होता. त्यात महिलांच्या प्रश्नावर चर्चा झाली. त्यातले एक वाक्य मला अजूनही काही केल्या मनातून जात नाही. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरहून ज्येष्ठ कवियत्री सुमती लांडे संमेलनाला आल्या होत्या. त्या बोलल्या. त्यांचे भाषण झाले चांगले मात्र नंतर चर्चेत त्या पुढे आल्या. बायकांच्या प्रश्नावर चर्चा होती. बायका आपल्यावर घरातून आणि बाहेरही अन्यायवर झाल्यावर बोलत नाही. त्यांनी बोलायला हवे, असे कुणीतरी सांगत होते. सुमतीबाई पुढे गेल्या त्यांनी सविस्तर मांडणी केली, मात्र त्या म्हणाल्या, "बायका बोलत नाहीत, हे तसे बरे आहे. त्या जर बोलायला लागल्या आणि खरे बोलायला लागल्या तर आपल्याकडील कुटुंबव्यवस्थाच मोडखळीस येईल. सगळ्याच गोष्टी त्यांना कुठे सांगायची संधी असते.' हे वाक्य माझ्या मनात रुतून बसले आहे. या संमेलनासाठी अनेक मान्यवर आले होते मात्र संमेलन गाजविले ते हरी नरके यांनी. त्यांनी मराठी अभिजात भाषा असल्याचे खूप जोरदारपणे मांडले होते. यवतमाळचे डॉ, अशोक राणा, कवियित्री नीरजा, विद्या बाळ, अश्विनी धोंगडे, रंगनाथ पाठारे अशा एक ना अनेकांशी यानिमित्ताने गप्पा मारण्याची संधी मिळाली. पुण्याच्या अक्षरमानवच्या टीममधील अभिजीत सोनवणे, कविता दातीर, प्रशांत कांबळे, कोल्हापूरच्या सुषमा शितोळे यांच्यासह अनेकांशी गप्पा झाल्या. कविता दातीर आणि अमृता देसरडा यांनी मांडलेली भूमिकाही नव्या पिढीच्या मुलींच्या ठाव घेणारी होती. (अपूर्ण....)
बुधवार, १३ जानेवारी, २०१६
मनात रुतलेले वाक्य
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा