शनिवार, २४ ऑक्टोबर, २०१५

जिवाचे मैतर...

मी कोण आहे? माझे नातेवाईक कोणकोण आहेत? ते कुठे राहतात? नातेवाईक म्हणजे केवळ रक्तातल्या नात्याचीच माणसं का? त्यापलीकडे आपण कुणाकुणाचे असतो? आपल्याला आपले कोण वाटतं? जिवाभावाच्या गुजगोष्टी आपण कुणाकुणाशी करतो? आपला सूर नेमका कुणाशी जुळतो? कोण भंपक वाटतो? कुणाबरोबर तासन्‌ तास नुसतं बोलत राहावं, असं वाटतं?
---------------
नातेवाईक घासातल्या घासाचा
-------------------------
कोल्हापूर आठवलं, की मला तो आठवतोच. 1992 साल होतं. तो एमबीएच्या दुसऱ्या वर्षाला होता. त्या वेळी यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणाविषयी एवढे सुंदर बोलायचा. आपण आयएएस होणार. जर ते जमलं नाही तर राजकारणात उतरणारं, असं सांगायचा. सातारा जिल्ह्यातील मित्रमंडळीची बैठक तो घ्यायचा. तो बोलायला लागला म्हणजे नुसतं ऐकत राहावं, असं वाटायचं. पुणे विद्यापीठाच्या रिफ्रेक्‍टरीजवळ 1998 ला पाच वर्षानंतर त्याची माझी भेट झाली. पहिल्यांदाच तो निराश झाल्याचे बघितले. यूपीएससीचे सगळे ऍटेम्ट संपले होते. मुलाखतीपर्यंत घडक मारून माघारी परतावे लागले होते. कोणत्या तरी खासगी कंपनीत नोकरी सुरू केली होती. काय बोलला तो त्या वेळी माझ्याशी. ""जे आपल्या लहानपणी मिळाले नाही, ते आपण पुढच्या पिढीला द्यायचा प्रयत्न करू. काही लागलं तर सांगत जा. मी आता पैसे कमावतोय. महिन्याला किमान पाचशेची तरी पुस्तक विकत घेत असतो. हे तुला का सांगतोय तर आपण एकत्र घासातला घास खाल्लाय म्हणून...''
हा घासातला घास म्हणजे नेमके काय, हे समजून घ्यायचे म्हटले तर हॉस्टेलवर राहावं लागतं. त्याशिवाय कळत नाही. रविवारी संध्याकाळी मेसला सुटी असल्यावर कोण घराकडून येतंय. कुणाचे आईबाबा नुकतेच येऊन गेलेत. कुणाकडे चिवडा आहे आणि गरमगरम खिचडीसाठी कॉन्ट्रिब्युशनमध्ये नेमके कोण असणार आणि त्यासाठी ज्याला मनापासून बोलवावं असं वाटतं, ते आपल्या घासातल्या घासाचे नातेवाईक.
-----------------------------------------------------------------
विक्‍या हॉस्टेलवरचा
अकरावीत शिक्षणासाठी घरापासून बाहेर पडायचे म्हणजे कसंसंच होतं. उर भरून येतो. त्यात कॉलेजमधील रॅंगिंगच्या आणि हाणामारीच्या अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात. कोल्हापुरातच अकरावीच्या दुसऱ्या टर्ममध्ये असताना एकाने आमच्या होस्टेलवर येऊन दम दिला. आमच्या सिनियरने ते ऐकले. त्याला समजून सांगितले. पण तो दमात घ्यायला लागला. त्यावर याने सांगितले "तू आता जा आणि सोमवारी कॉलेजला येताना तुझी कोणकोण पोरं घेऊन येणार आहेस ती आण.' सोमवारी काय होणार याचीच उत्सुकता होती. आपलं कुठं इथं जवळ घर आहे, असा विचार काही जण करायचे. पण असले पुळचट विचार टाकून देणारे अनेक "वीर' होते. तो आला सोमवारी एकटाच. त्याची अशी धुलाई केली. अनेकांना बरे वाटले; पण मी हातच उगारला नाही, हे बघून विक्‍या वैतागला होता. माझी घाबरून गाळण उडाली होती. त्यानंतरच्या पुढच्या वर्षी विक्‍या यूआर होणार होता. तसा त्याला शब्दही दिला होता. पण याचं प्रस्थ वाढेल म्हणून गावातल्या पोरांनी अखेरीला डावपेच केले. त्यानंतर गावातली पोर आणि होस्टेलची पोर अशी धुसफूस सुरू झाली. आमच्या एकाला गावात नेऊन मारहाण झाल्यावर आम्ही कॉलेज बंद पाडले. हातात काठ्या, हॉकीच्या स्टीक घेऊन आम्ही कॉलेजवरून फेरफटका मारला. आमचा नेता होता विक्‍या. कुणावर अन्याय करणार नाही तसा कुणाचा सहनही करून घेणार नाही, असे या वेळी प्राध्यापकांना ठणकावून सांगणाऱ्या विक्‍याचं खरंच कोणतं नातं होतं आमच्या होस्टेलच्या पोरांशी?
पदापेक्षा......
बारावीनंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत असूनही त्याने जाणीवपूर्वक कला शाखा निवडली. त्याला यूपीएससी करायची होती. आमच्या शेजारीच त्याची रूम होती. रात्री बरेच काहीबाही वाचत बसलेला दिसायचा. पण पुस्तकी किडा नव्हता. पिक्‍चरला निघायचे म्हटले, तर एका पायावर तयार असायचा. अनेक पिक्‍चर त्याच्याबरोबर बघितले. विशेषतः रात्री नऊचा शो बघून ग्रुपने चालत होस्टेलवर येणे ही मौजेची गोष्ट वाटायची. त्यामुळे जाताना सायकली नेल्या तरी येताना त्या हातात धरूनच यायचो. एम. ए. झाल्यावर दोन चान्स झाले, तरी काही सिलेक्‍शन होत नाही, हे बघून त्याला राजकारणाची खुमखुमी आली. घरी, गावाकडे आला. सहा महिन्यांत काही जुळवाजुळव जमते काय, याचा प्रयत्न करून बघितला. पण राजकारणापेक्षा अभ्यास करणे आणि परीक्षा पास होणे सोपे, हे त्याला उमगले. पुन्हा मुंबईत अभ्यासासाठी गेला. तिसऱ्या प्रयत्नात एमपीएससीमधून उपजिल्हाधिकारी आणि यूपीएससीमधून जिल्हा पोलिस अधीक्षक दर्जाच्या जागेसाठी निवड झाली. त्यानंतर लगेचच त्याची माझी भेट झाली. तब्बल पाच-सहा वर्षांनी. हा आपल्याला ओळख दाखवेल की नाही, अशी शंका माझ्या मनात आली. मी बघून न बघितल्यासारखे केले. स्वतःच मोठ्याने त्याने हाका मारल्या. गप्पांमध्ये जागवलेल्या रात्री विसरलास की बदललास, या त्याच्या वाक्‍याने ओशाळलो. त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या पदापेक्षाही आमचे हे मिठीचे नाते मोठे होते.
घट्ट रुतून बसलेली ही मित्रमंडळी आता कुठे असतील? काय करत असतील? त्यांना आपली आठवण येत असेल का? ज्या तिघांविषयी मी लिहिले. ते माझे सिनियर. बरोबरीच्या दोस्तांशी केलेली दंगामस्करी तर आणखीच वेगळी. काय तुमच्या मनात आहेत असे कुणी सीनियर? 

आपल्या प्रत्येकाला रक्ताच्या नात्यापलीकडं नातं निर्माण करणारे अनेक दोस्त भेटतात. काळाच्या ओघात त्यांच्याशी संपर्क राहतोच असे नाही. मग जुने फोटो, डायऱ्या, पुस्तके काढली, की ही मंडळी आपोआप आपल्या भोवती गोळा होतात. कुणी एखादा भेटलाच रस्त्यात तर जुन्या आठवणी बहरतात. चहा, कॉफीबरोबर त्याची-तिची आठवण निघते. कॉलेजच्या ऊर्जेचे दिवस आठवतात. मनावर ठसलेले प्रत्येक मनाच्या कुपीत हे नाते घट्ट झालेले असते. असं प्रत्येकाच्या मनात कुणीतरी असतंच.

२ टिप्पण्या: