शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

राजाराम कॉलेजचे सवंगडी...

राजाराम कॉलेजचे सवंगडी... 
चांगले असणारे अनेकजण राजाराम कॉलेजच्या होस्टेलमध्ये मला सिनिअर म्हणून भेटले. कुंभारगाव (ता. करमाळा)चे राजकुमार लोटके, कोळेगाव (माळशिरस)चे धनंजय दुपडे, पवारवाडी (ता. फलटण)चे संजय पवार, भाऊसाहेब चव्हाण, आसूचे अनिल पवार, एम. टी. कोथळी अशी कितीतरी नावे घेता येतील. एमटी कोथळीकडे गाडी असायची. मला त्याच्या मागे बसायला मिळायचे हेच फार भारी वाटायचे. माझा मोठा भाऊ माझ्याकडे एकदा आला. त्यावेळी गोकुळ प्रकल्प बघायला शिरगावला आम्ही तिघे त्याच्या गाडीवर गेलो होतो. दादा कोंडकेचा पिक्‍चर बघितला होता. वर्गात आमचा सहा-सातजणांचा ग्रुप फार घट्ट होता. त्यात शांतराज मारुडा, जे. जे. शिंदे. विजय मोहिते, शरद मुळीक, प्रशांत शेंडे आणि मी असे आम्ही रोजच एकमेकांना भेटायचो. त्यात शांतराजसह सगळ्यांचा अजून संपर्क आहे मात्र एकमेकांना वेळ देणे होत नाही. सगळ्यांनी आयुष्यात अनेक धक्के पचविले. त्यावेळी आम्ही तसे एकमेकांच्या मदतीला जाऊ शकलो नाही. सुरवातीला प्रशांत शेंडेची दोनतीन वर्ष दिवाळी शुभेच्छांची पत्रे आली. पण परत जसेच्या तसे सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले. शांतराज मला जबरदस्त वाटायचा. गॅदरिंगच्यावेळी त्याने माझ्याशी एक पैज लावली. कार्यक्रम सुरू होणार होते, तो म्हणाला, "टेबलवर जो तांब्या ठेवला आहे, त्याच्यातले पाणी पिऊन यायचे. मी सगळ्यांना नास्ता देणार. सभागृह तुंबाड भरले होते. मी थेट व्यासपीठावर गेलो. पाणी पिण्याचे माझे धाडस झाले नाही मात्र तिथे उभ्या असलेल्या सरांना म्हणालो, "सर पाणी प्यायचे.' ते म्हणाले, "जा की बाहेर. इथे कुठे आहे पाणी?'' मी आलो उतरून खाली. त्याने नाश्‍ता नाही मात्र चहा दिला. शांतराजने मला एक शर्टचे कापड दिले होते. इतके भारी होते ते की त्याचा पांढरा रंग शर्ट जसाजसा धुतला जाईल तसातसा आणखी शुभ्र होत जाई. आता तो माझ्यावर नेहमी वैतागतो. एकदा तर "का रे, लय शहाणा झालास का?' म्हणून मला दमही टाकला. पण खरेच मला कामाच्या या सगळ्या धबडग्यातून वेळच होत नाही. काय करणार? 
माझा होस्टेवरचा रुमपार्टनर मनोहर चव्हाणविषयी माझे मन अजूनही भरून येते. माणसाने सज्जन असावे, पण इतके? परिस्थीती थोडी बेताचीच होती पण कधी बाबा कुणापुढे कशालाच हात पसरत नव्हता. बहिणीकडे जाऊन जेवण करायचा. तिला काही व्यवसायात मदत करायचा. त्यातून आपल्या सगळ्या फिया भागवायचा. बारावी संपल्यावर माझी जुनी घेतलेली सायकल मी त्याला शंभर दीडशेला विकली. सहाजिकच त्याच्याकडे मला द्यायला पैसे नव्हते मग त्याने ते पैसे मनिऑर्डर करून पाठविले. मला ते पुण्यातल्या गरवारे कॉलेज होस्टेलमध्ये उपयोगाला आले. त्याची आर्थिक स्थिती नव्हती पण त्याला सलाम करावा, असा प्रामाणिकपणा त्याच्याकडे होता. 
या होस्टेवर हिंदीतला आर. माधवन हा सध्याचा आघाडीचा नटसुद्धा त्याच दरम्यानच होता. तोही विश्‍वास नांगरे पाटील यांच्या बॅचचा होता. इंग्लिश स्पोकनचा क्‍लास घेण्याचा प्रयोग त्याने होस्टेलवर एकदा केला. मी एक दिवस त्याचा विद्यार्थी होतो. एकदा मी तोंड धुतले आणि लुंगी गुंडाळून थेट तो क्‍लास घ्यायचा त्या रीडिंग रुमध्ये जाऊन बसलो. त्याने मला उठवले. पॅंट घालूनच क्‍लासमध्ये यायचे, असे सांगितले. त्यानंतर मी काही क्‍लासला गेलो नाही आणि त्यानेही काही दिवसांनी तो गुंडाळला. तो एनसीसीत होता. त्याने आरडी परेड केली. त्यामुळे त्याची एकूण बॉडीलेग्वेज आजही एकदम सावधान अशी दिसते. 
या लेखाविषयी अनेक प्रतिक्रिया आल्याच. त्या कुणी दिल्या, काय दिल्या, ही मोठी जंत्री होईल. त्यातल्या दोन सांगतो. एक म्हणजे त्याच वेळी एका रविवारी संजय आवटे याने फोन करुन मैत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मी म्हणालो, आज मैत्र दिन आहे काय? तो म्हणाला तुम्ही लेख लिहिणार आणि मैत्र दिन आम्हाला विचारणार. मला खरेच त्यावेळी मैत्र दिन त्याच दरम्यान असल्याचे कळले. लेख लिहिताना हा संदर्भ माझ्या डोक्‍यात अजिबातच नव्हता. आवटे माझे आणि मी त्याचे कायम चांगले चिंतणारा जवळचा मित्र आहे. तरीही आमच्यात एक अंतर आहे. पाचवी ते दहावी आम्ही एका वर्गात होतो. पुढे आमचे मार्ग वेगळे झाले. पुणे विद्यापीठात पुन्हा आम्ही होस्टेवर एकाच वेळी एक वर्षभर होतो. विद्यापीठात आम्ही तशा अनेक रात्री गप्पा मारत जागवत काढल्या. आम्ही गप्पा मारायचो, रात्रीचे दोन, तीन, चार, पाच वाजायचे. रुम पार्टनरच्या झोपेचे खोबरे झालेले असायचे. तो वैतागयचा. आमच्या गप्पांचा विषय कायम राजकारण, समाजकारण हाच असायचा. आपल्याला काय करता येईल, याचे आराखडे आम्ही बांधत रहायचो. पण पुढे त्याचे काहीच झाले नाही. पण त्याने पत्रकारितेत जी धडक मारली तिचा मला कायम अभिमान वाटत आला आहे. मी पत्रकारितेचा कोर्स त्याच्याआधी एक वर्ष केला मात्र तो "सकाळ'मध्ये माझ्याआधी साधारण सहा महिने लागला. कायम होण्याच्यादिवशीच त्याने सकाळ सोडला. सोलापूरला संचारमध्ये वृत्तसंपादक म्हणून रुजू झाला. त्यावेळी त्याचे वय जेमतेम 23-24 असेल. इतक्‍या कमी वयात त्याने सोलापूरलासुद्धा ज्या पद्धतीने काम केले, एक त्याचा चाहता वर्ग इथे तयार झाला आहे. खरे तर पत्रकारितेत वरच्या पदावर काम करणे म्हणजे तसे अवघड असते कारण इथे सगळेच हुशार असतात. तुम्हाला तुम्ही कायम त्यांच्या चार पावले पुढे आहे, हे दाखवता आले नाही तर गडबड होते. सोलापूर, अकोला, पुणे, नवी मुंबई, आता अलिबाग, पुणे आणि मुंबई असे प्रत्येक ठिकाणी त्याने संपादक, वृत्तसंपादक अशा प्रमुख पदांवरच काम केले. आता साम वाहिनीवर आवाज महाराष्ट्राचा गाजवतोय. कार्यक्रम सगळीकडे मालकांनी, व्यवस्थापनाने संपादकांना, संपादकीय विभागातील वरिष्ठांना काढून टाकण्याच्या दिवसांच्या कालखंडात त्यांना घुमवणारा, तुमच्याशी जमत नाही, मीच आता सोडतो, असे म्हणणारा एखाद्या तरुण पोरगा असावा, याला तोडच नाही. काही पुस्तकेही त्याच्या नावार आहेत. पण त्याची एक गोष्ट मला कायम भुरळ घालत आली आहे त्याला जे म्हणायचे आहे त्याच्याशी तो कधीच तडजोड करीत नाहीत. तो हुशार आहे का तर मी म्हणेन हुशार अनेकजण असतात, पण स्वतःला प्रेझेंट करण्याचे, स्वतःच्या मतावर ठाम राहण्याचे आणि हे सगळे कटूता न येऊ देता, समोरच्याला न दुखवता करण्याचे त्याचे स्कील वादातीत आहे. त्यामुळे त्याने लेखावर दिलेली प्रतिक्रीया मला महत्वाचीच वाटते. 
दुसरी प्रतिक्रिया अगदी नुकतीच मिळाली. ती ऐकल्यामुळेच आपण हा लेखामागचा लेख लिहला पाहिजे, असे मला वाटले. केंद्र सरकारकडे प्रादेशिक माहिती अधिकारी अंकुश चव्हाणबरोबर मी सोलापूरचे सहायक पोलिस आयुक्त पी. आर. पाटील यांच्याकडे गेलो होतो. त्यांची आणि अंकुशची कोल्हापूरची ओळख होती. अंकुशने माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. ते घडीभर थांबले. मी तुम्हाला ओळखतो. मला कळेना आमची ओळख कुठे झाली. मी कोल्हापुरात होतो. पण माझी त्यांच्याशी कधी थेट ओळख झाल्याचे मला आठवत नव्हते. ते म्हणाले, "तुमचा युवा सकाळचा लेख माझ्या अजून लक्षात आहे. तुम्ही त्या तीन मित्रांची नावे का लिहिली नव्हती हो.' मला घडीभर काय बोलावे हे कळेना. मी काहीतरी म्हणून वेळ मारुन नेली आणि पुढे आपण या तिघांबरोबच कोल्हापुरात संपर्कात आलेल्या काही मित्रांविषयी लिहायचे, असा मी ठरविले. 
(अपूर्ण)

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०१५

असे का वागतो आपण?

असे का वागतो आपण?

सकाळमध्ये सर्व आवृत्त्यांत युवा सकाळ या आठ पानी टॅबलाईड आकाराच्या पुरवणीत पहिल्या पानावर जिवाचे मैतर हा मुख्य लेख होता. त्यावेळी सुहास यादव आणि संतोष देशपांडे दोघे युवा "सकाळ'चे काम पहात होते. पुणे "सकाळ'चे संपादक यमाजी मालकर होते. या लेखाच्या मजकुराचे संपादन आणि विशेषतः जिवाचे मैतर हे "हेडिंग' मला आवडले होते. उपसंपादकाचे काम हे तसे "थॅंकलेस' काम असते, असे म्हणतात, पण ते किती महत्वाचे असते हे मी अनेक वर्ष बघत आलो आहे. हा लेख माझा अत्यंत छोटेखानी आहे. पण मी पुन्हा पुन्हा आठवणींसाठी वाचतो, त्या प्रत्येक वेली मला सुहास आणि संतोषची आठवण होते. त्याला टाकलेला फोटो बघूनही मी इतका हरखून गेलो होतो. यात लेखकाचे त्याच्या कल्पनेला क्रेडिट आहेच पण त्यापेक्षा माझ्या मनात या उपसंपादक जमातीप्रती असलेली कृतज्ञता वेगळीच आहे. सुहासही मला सिनिअर त्याने सकाळमधून व्हीआरएस घेतली. त्यानंतर लोकमत आणि पुढे पुण्यात प्रभात दैनिकाचा तो संपादक झाला.
लेखात उल्लेखिलेले तिघे माझे सिनिअर मला आवडणारे, तसे यांचेही काही दुर्गुण असतील, माणूस म्हटल्यावर ते शक्‍य आहे पण त्यांचे दुर्गुण माझ्या कधी नजरेला पडले नाहीत. मला ते माहित नाहीत. राजाराम कॉलेजातच काही दुर्गुणी मुले मी बघितली. दोन उदाहरणे सांगतो.
एका माझ्याबरोबरच्याच मुलाचे. अकरावीतच मी आर्टला, तो सायन्सला होता. तोही होस्टेललाच रहात होता. पहिले सत्र संपले होते. दिवाळीची सुटी लागली होती. सगळ्यांनाच घराकडे जाण्याचे वेध लागले होते. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी असायच्या. त्यावेळी पैसे हा मोठा फॅक्‍टर होता. जवळजवळ होस्टेल खाली झाले होते. आम्ही पाचसहा जण शेवटी उरलो होतो. मी दुसऱ्या मजल्यावर रहायला होतो. माझे वर्गमित्र विजय मोहिते, शरद मुळीक आणि पुढच्या वर्गातला भाऊसाहेब चव्हाण ही फलटण तालुक्‍यातील पवारवाडीची गॅंग खालच्या फ्लोअरवर रहात होती. जेवण झाली. मी खाली येऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसलो होतो. साधारण साडेदहा पावणे अकराचा सुमार असेल, विजय मोहिते मेसवरुन जेवण करुन आला. तोही गप्पांत सामील झाला.
थोड्या वेळाने तो म्हणाला, "अरे तू इथे आहेस, तुझ्या रुममध्ये कोण आहे? लाईट चालू आहे.'
मी म्हणालो, "मी लाईट बंद करुन आलोय.'
"जा बघ जा,' त्याने मला फर्मान सोडले.
मी गेलो. खरेच लाईट चालू होती. बाहेरुन दरवाजा वाजविला. दरवाजाच उघडला जाईना. पुन्हापुन्हा दरवाजा वाजविला. तीन-चार मिनीटे मी तसाच उभा होतो. त्याने दरवाजा उघडला. आत तो एकटाच होता. तो आमच्या रुममध्ये रहात नव्हता.
मी त्याला विचारले, "काय करतो?'
तो म्हणाला, "मराठीचे पुस्तक वाचण्यासाठी घेतोय.'
मी म्हणालो, "इतका वेळ?'
तो काहीबाही बोलत राहिला. घाबरलेला होता. मला समजेना नक्की हा इथे काय करत असावा. मी त्याच्याबरोबर त्याच्या रुममध्ये गेलो. तो माझ्याबरोबरच. पुन्हा मी माझ्या रुममध्ये आलो. तो माझ्याबरोबरच होता. मी माझी बॅग खोलली. त्याला घाम सुटला. माझ्याकडे शेवटचे 80-90 रुपये राहिलेले होते. ते मी तिच्यात ठेवलेले होते. गावाकडून एक दोन दिवसात तीनशे रुपये मनीऑर्डर येणार होती. त्यातून मेसचे आणि अन्य देणी भागवून गावाकडे पळायचे होते. खरे तर आम्ही शेवटपर्यंत थांबलो त्याला कारण आमच्याकडे पैसे नसणे हेच होते. मी बॅग खोलली आणि काय गंमत. त्यातले साठ रुपये गायब झाले होते. मी त्याला तसे सांगितले. तुझ्याशिवाय हे कुणाचे कामच नाही, असे मी म्हणालो. त्याने ते साठ रुपये काढून दिले. दहाच्या सहा नोटा होत्या त्या. तो चांगल्या घरातला होता. वडील, मोठा भाऊ नोकरीला होते. तो माझ्या पाया पडला. ही गोष्ट कुणालाच सांगू नको, असे तो पुन्हा पुन्हा गयावया करून सांगत होता. माझी एमओ येणार आहे. हवे तर मी तुला अजून पैसे देतो, असे तो म्हणाला. मी त्याला तसे कुणालाही न सांगण्याचे वचन दिले. पण तिथे एक संधीसाधूपणा मी केला. त्याने मला पैसे देण्याचे कबूल केले. तसे मी त्याच्याकडून काही तरी उसने पैसे घेतले. मला माझ्या या संधिसाधूपणाच आजही लाज वाटते. आपण साले किती हरामीवरचे हरामी आहोत, असे वाटते. अशा प्रकारे अडचणीत आलेल्या माणसाच्या हतबदलतेचा फायदा घेणे बरोबर नाही. ज्यावेळी अशी अडचणीत आलेली माणसं मी गयावया करताना बघतो, त्यावेळी मला हा प्रसंग अनेकदा आठवतो.
माझ्या मनात एक प्रश्‍न असा उरतो की इतक्‍या चांगल्या घरातला मुलगा असे काही का करत असेल? खरेच त्याला पैशाची कमतरता आहे, असे मला कधीही जाणवले नाही. टकाटक तो रहायचा. कपडे, सगळ्या वस्तू यात त्याचे एक स्टॅडर्डड असायचे. त्यामुळे मला आजही या घटनेची मोठी गंमत वाटते. तसा तो मित्रच. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यात त्याचे गाव होते. मी अजूनही ही घटना कुणाला सांगितली नाही पण असे का असा प्रश्‍न माझ्या मनात उरतोच.
दुसरी घटना दुसऱ्या एका वरच्या वर्गातल्या पोराची. त्याला अगोदर होस्टेलवरुन हाकलले होते पण पुन्हा तो आला होता. मी सगळीकडे कॉलेजमध्ये होस्टेलला राहिलो, मला कधी रॅगिंगला सामोरे जावे लागले नाही पण सिनीअरशी आपपल्या ओळखी असाव्यात, असा एक माझा प्रयत्न असायचा. त्याच वर्षी उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यावर एकाशी जवळीक झाली. तो फार गोड बोलायला लागला. त्याने माझ्याकडून पिश्‍चर बघितला. मटण खाल्ले. तुला जाण्यासाठी उसने पैसे देतो, असे म्हणाला. माझे सगळे पैसे संपले. काहीच बोलायला तयार नाही बाबा. मला मोठा पेचच पडला. आता काय करायचे. मी तेवढ्यापुरती त्याच्याशी जवळीक तोडली. इतरांकडून पैसे जमवून गावाकडे निघालो. बाहेर रस्त्यावर मी आलो. पट्ट्याने माझा चमचा तुझ्याकडे आहे, मला बघायचा म्हणून माझी बॅगच खोलली. तसा तो मोठा असल्यामुळे मी काही करु शकलो नाही. मी कशाला त्याचा चमचा आणू. बॅग खोलून तो काहीच सिद्ध करु शकला नाही. त्याला कशाचा राग आला होता माहित नाही. पण मला तो इतका इन्सल्ट वाटला. तसा तो चांगल्या घरातला होता. पुढे मी त्या पोराचे करिअर बघितले. पुणे विद्यापीठात काही दिवस तो होता. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत होता. पण तो काहीच करु शकला नाही. कुठलीतरी एजन्सी घेतली. गावोगाव फिरत रहायचा. आता कुठे आहे? माहित नाही मात्र सांगायचा मुद्दा इतकाच की तुमचे मन जर चांगले नसेल तर तुम्ही काही करु शकत नाही.
मला प्रश्‍न पडतो आपण असे का वागलो आणि ज्यांना आपण मित्र म्हटले तेही असे का वागले असावेत? न सुटणारे गुंते आयुष्यभर तसेच वागववत फिरावे लागते...........
....(अपूर्ण) 

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

कोण आहेत ते तिघे?

जो उग्या सो अन्तबै !
फुल्या सो कुमलाहीं !!
चिनीया सो ढही पेड् !
जो आया सो जाहीं !!

जीवाचे मैतर हा लेख "युवा सकाळ'मध्ये 5 ऑगस्ट 2005 मध्ये प्रसिद्ध झाला. या लेखाची कल्पना मला सुचली ती युवा सकाळमध्येच येत असलेल्या एका सदरावरुन. ते सदर नातेसंबंधावर होते. एकाद्या प्रसिद्ध आईविषयी तिचा मुलगा लिहायची. बापाविषयी मुलगी काहीतरी मांडायची. बहिणीविषयी भाऊ काहीतरी लिहायचा. वडिलांविषयी मुलगा, आजोबाविषयी नातू असे काहीतरी नातेसंबंधांचा चांगल्या अर्थाने उलगडा करणारे हे सदर होते. मला एकदा असा प्रश्‍न पडला की केवळ रक्ताच्या नात्यापलीकडे आपली काही नाती नसतात का? रक्ताच्या नात्यातील माणसंच आपले सगळे काही लागतात, असे काही आहे का? मग मला सुचले की आपण आपल्यावर प्रभाव टाकणाऱ्या माणसंविषयी लिहावे. मी युवा सकाळमध्ये त्यावेळी फोन केला. या सदरात लिहणारे जे होते ते मुंबईचे. म्हटले तसे जर काही ठरले असले तर उगाच आपण काहीतरी पाठवायचो आणि ते तसे पडून रहायचे त्यापेक्षा अगोदर विचारलेले बरे. त्यांनी मजकूर पाठवायला सांगितला. मी पाठवून दिला. महाराष्ट्रभर हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रीया कळविल्या. सोलापूर "सकाळ'मध्ये त्यावेळी पानांच्या मर्यादेमुळे स्वतंत्र आठ पाने प्रसिद्ध होत नव्हती मात्र पान आठला रंगीत पानावर खालचच्या बाजूला हा लेख मीच लावला. त्यावेळी निवासी संपादक अरुण खोरे होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी आवर्जून हा लेख चांगला झाल्याचे नुसते सांगितले नाही तर ती तीन माणसं कोण याचीही माहिती घेतली.
या लेखात त्या तिघांचीही नावे नव्हती. मला ते तिघे कुठे आहेत, सगळेच आहेत का नाहीत, याची एकतर कल्पना नव्हती. दुसरी बाब एकाद्याचे नाव आपल्या लेखात आपण वापरतो, त्याची त्याला कल्पना असायला हवी, असे काहीदा मला वाटायचे. दुसरे मुक्‍यामुक्‍याने लिहायची एक पद्धत असते. कुणाचातरी चांगला उल्लेख करुन पत्रकार म्हणून हा काही उकळत तर नाही ना, असे आपल्याला कुणी म्हणू नये याची एक धास्ती त्यावेळी माझ्या मनात असायची. त्याचा एक परिणाम कदाचित माझ्यावर झालेला असावा. त्यामुळे या लेखात त्या तिघांची नावे नव्हती, मात्र हा लेख काल्पनिक नक्कीच नव्हता.
लेख प्रसिद्ध झाल्यावर अनेकांनी फोन केले. त्यात पुण्यातून सकाळ ऑफिसमधून श्रीधर लोणी आणि मुकुंद पोतरदार यांनी एकाचवेली लेख चांगला झाल्याचे कळविले. श्रीधरने त्यातल्या पहिल्या "कॅरेक्‍टर'ला ओळखले होते. त्याला नाव मात्र आठवत नव्हते. तो दोन वर्ष कोल्हापुरात होता. विद्यापीठात त्याने एमएस्सी केले. मी 91-92 मध्ये राजाराम कॉलेजला अकरावीत होतो. श्रीधर लोणीची पावती मला आजही खूप महत्वाची वाटते. कारण बहुतेक पत्रकार सहसा कधी एकमेकांच्या लेखाला चांगले म्हणत नाहीत. दुसरी बाब महाराष्ट्रात स्वतःच्या हिमतीवर, हुशारीवर, कामाने स्वतःचे पत्राकारीतेत नाव कमविणारी मला वाटतात अशी नावे मी मनात मानतो त्यात लोणीचा नंबर वरचा आहे, असे मला नेहमी वाटते. मी त्याच्या कष्ट करण्याच्या तयारीने अनेकदा दबून जातो. ओळखी तर त्याच्या प्रचंड आहेत. शिवाय वागण्याबोलण्यात कुठही कधीही कटूता नसते. पत्रकारितेसारख्या सडफडिंग व्यवसायात त्याने जपलेला शालीनपणा मला भारावून टाकतो. ही मी त्याची तारीफ करणे असा भाग नाही. एक वर्ष आम्ही बीसीजेला रानडे इन्स्टियुटमध्ये एकत्र होतो, मात्र तरी कधी माझा त्याच्याशी फार संबंध आला नाही किंवा घट्ट दोस्ती म्हणावे, असे काही घडले नाही. पण का कुणास ठाऊक हा माणूस मला नेहमी आवडत आला आहे. "सकाळ'मध्ये माझ्या आधी तो चार-पाच वर्ष लागला. माझ्या प्रशिक्षणाच्या काळात मला एनडीएमध्ये पासआऊट परेडचे कव्हरेज करण्याची असाईमेंट दिली होती. मी तो अनुभव घेऊन आलो. मात्र तिथले भाषण संपल्यावर ती बातमी पूर्ण करायला मला वेळ लागला. त्यावेळी श्रीधर इतकेच म्हणाला होता की "राजाराम गोष्टी झटपट शिकायला पाहिजे.' मला अजून वाटते की दुसरा कुणी एखादा असता तर त्याने उभे आडवे सोलून काढले असते.'
असो. पुन्हा मूळ विषयाकडे येतो.
""तो उंच मुलगा. पांढरी शुभ्र कपडे घालायचा. त्याच्यामागे सातारा जिल्ह्यातील पोरांचा ग्रुप असायचा. कोल्हापूर विद्यापीठाच्या हिरवळीवर तो बैठका घ्यायचा. राजाराम त्याचे काय नाव?'' श्रीधर लोणीने मला विचारले. त्याच्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या.
लेखात वर्णन आलेला पहिला माझा सिनीअर दत्ता केंजळे. सातारा जिल्यातील खटाव तालुक्‍यातील ललगुण हे त्याचे गाव. मी आतापर्यंत अनेक माणसं बघितली. कोल्हापुरातील दोन वर्षांच्या काळातही अनेक जणांशी ओळखी झाल्या, पण दत्ताजींच्या व्यक्तिमत्वाचा माझ्यावर त्या काळात वेगळा प्रभाव पडला होता. पोरांचे नेतृत्व करणे, नवेनवे वाचन आणि मुख्य म्हणजे ग्रामीण भागाशी असलेली नाळ या गोष्टी मला मोहित करायच्या. मला ते फार भारी वाटायचे. झाले तर कलेक्‍टरच व्हायचे, असे ते म्हणायचे. त्यांनी इंजिनीअरिंग केले होते. बरोबरच्यांना मदत करण्याची वृत्ती त्यांच्यात होती. पण स्वतःच्या विचारांवर ते एकदम ठाम असायचे. मी तसा त्यांच्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी लहान तरीही काय मित्रा काय म्हणतोस, नव्या जुन्या अनेक गोष्टींची चौकशी करत रहायचे. काही गोष्टी समजून घ्यायचे काही नव्याने सांगायचे. ती दोन वर्ष झाल्यावर पुढे साधारण पाच वर्षांचा गॅप पडला. त्यांचा आणि माझा संपर्क होईल, असे काही घडले नाही. मी बारावीनंतर कोल्हापूर सोडले ते सोडले. नंतर मी एमए करीत असताना पुणे विद्यापीठात त्यांची माझी भेट झाली. ती काही क्षणापूर्ती. परंतु नंतरही पूर्णच संपर्क तुटला. त्यानंतर माझा हा लेख प्रसिद्ध झाला. त्यानंतरही पाच-सहा वर्ष संपर्क नव्हता मात्र, त्यानंतरही या माणसाविषयीच्या ओढीतून मी त्यांना शोधायचा प्रयत्न केला. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची जी क्रांती झाली त्याने ज्या अनेक गोष्टी साध्य झाल्या, त्यात माणसं एकमेकांना भेटणे निदान ती कुठे आहेत, याची तरी माहिती मिळू लागली. मी सोशल नेटवर्किंच्या "ऑरकुट' साईटवर दत्ता केंजळे हे नाव जाम धुंडाळले. त्या नावाचे चारपाच लोक यायचे. त्यांचे फोटो मात्र नव्हते. दोघांकडे मी तिथेच चौकशीही केली मात्र त्यांनी आम्ही ललगुणमधून आलेलो नाही, असे स्पष्ट केले. नंतर फेसबुकवरही त्यांना शोधले. पण मला काही ते सापडले नाहीत. मग त्यानंतर एक दिवस गुगलवर मी दत्ता केंजळे हे नाव "सर्च' केले. त्यातून त्यांचा मला मोबाईल नंबर मिळाला. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू इन्ट्टिुयुटमधून त्यांनी एमबीए केले आहे. तिथे मला माजी विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये त्यांचे नाव सापडले. त्यांचा मला मोबाईल नंबर मिळाला. मला काय आनंद झाला.
आता पुढचा प्रश्‍न होता, या माणसाशी आपण बोलायचे कसे? पत्रकारितेत अनेक मोठ्या लोकांशी संबंध येतो. विशेषतः पत्रकार परिषदांमध्ये तर कित्येकांना पत्रकार आडवे तिडवे करीत असतात. पण दत्ताजींना संपर्क करायचा म्हणजे माझ्यावर दडपण आल्यासारखे झाले. पहिली 90 ते 92 ही दोन वर्ष. त्यानंतर 98 ला झालेली धावती भेट. त्यानंतर थेट 2011 ला मी त्यांना फोन केला. राजाराम कानतोडे हे नाव सांगितले. ते म्हणाले, नुसते राजाराम नाही, राजाराम लक्ष्मण कानतोडे. केत्तूर. ता. करमाळा. होय ना? मी हो म्हणालो. ते म्हणाले मी एका बैठकीत आहे. त्यामुळे मी तुला फोन करतो. त्यानंतर त्यांनी संध्याकाली फोन केला. आमचे तुटके बोलणे झाले. पण मला लय भारी वाटले. आता ते कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांच्यात काय बदल झालेत मला माहित नाही मात्र आपल्याला जी माणसं आवडतात, आपल्यावर प्रभाव टाकतात, त्यांच्याशी संवाद हा आनंदाचाच भाग असतो.
आता किर्लोस्कर आहेत. मधल्या काळात ते सोलापूरला आले होते, पण माझी कामाची वेळ आणि त्यांची कामाची वेळ जुळली नाही. त्यामुळे आमची भेट काही झाली नाही.

लेखातला विकास म्हणजे विकास धस. सध्याचे सिनीअर पोलिस निरीक्षक. फौजदार होणे हेच त्याचे स्वप्न होते. त्यावेळी शरीरयष्टी फार भरभक्कम नव्हती. चष्मा असायचा. मला साधारण दोन वर्ष सिनीअर. त्याचे मूळ गाव अजूनही माहित नाही मात्र त्याचा एक भाऊ पोलिस खात्यातच अधिकारी होते. एक भाऊ पैलवानकी करीत होता. तो त्यावेळी स्पर्धा चांगल्याच गाजवित होता. विकासनेही फौजदार होण्यासाठी बरीच धडपड केली. ती बऱ्याच प्रयत्नानंतर फळाला आली. आपल्याला पोलिस खात्यातच जायचे, असे त्याचे ठरलेले होते. आपल्याला निदान हवालदार तर होता येईल, असे तो म्हणायचा. त्याचा स्वभाव प्रचंड धाडसी होता. त्यात अधूनमधून इतरांची टर उडविण्याचा एक रंग दिसायचा. त्याने काहीजण नाराज व्हायचे. पण एकाद्याच्या जीवाला जीव दिला की त्यासाठी कशाचीही पर्वा न करता सतत पुढे राहण्याची त्याची सवय होती. एकदा कोल्हापुरातच अकरावीला असताना आमच्याच वर्गातल्या हुपरीच्या एका पोराने मला दमदाटी केली. ही गोष्ट तो ऐकत होता. त्याने त्या पोराला इतकेच सांगितले. "आता तू जा. एकटा आहेस, उद्या येताना मात्र तुझी कोण पोर आणणार आहेस ती घेऊन ये. बघतो तुला कॉलेजवर.' त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या पोराची कॉलेजवर पोरांच्या गर्दीत त्याने जोरदारच धुलाई केली. मी काय करीत असेल? त्यांची भांडण सोडवित होतो. माझ्यामुळे तो त्याला धुत होता आणि मी माझ्याच बाजूने उभा नव्हतो. मला आजही या गोष्टीची मोठी गंमत वाटते. आपण इतके असे कसे असा प्रश्‍न पडतो. त्यानंतर विकासची आणि माझी भेट पुणे विद्यापीठातच 1999 च्या आगेमागी कधीतरी झाली. तो स्पर्धा परीक्षेसाठी झगडत होता. त्यावेळी त्याने मला माहिती दिली राजाराम तुमच्यासाठी आपण ज्या पोराशी भांडण केली त्याची पुढे काही माहिती आहे का तुम्हाला? सहाजिक मला माहित असणे शक्‍य नव्हते. त्याने सांगितले, खून प्रकरणात तो तुरुंगाची हवा खात आहे. मी चाटच पडलो. नंतरही आमची काही भेट झाली नाही. मात्र कुणाकडूनतरी कळले, तो फौजदार झाला. मला फार आनंद झाला पण संपर्काचे कुठलेही साधन नव्हते. रोजच्या धबडग्यात त्यासाठी प्रयत्न करणेही शक्‍य नव्हते. मात्र त्याच्यावर 2012 मध्ये "लोकमत'मध्ये लेख आला. माणसं वाचाविण्यासाठी कऱ्हाडला असताना बिबट्यावर त्याने गोळीबार केला. हे प्रकरण बरेच गाजले. त्यानंतर प्रशांत शेडेंकडून मला त्याचा नंबर मिळाला. मी त्याला फोन केला. मला फार बरे वाटले.

लेखात उल्लेखलेला तिसरा त्या काळातला मित्र म्हणजे विश्‍वास नांगरे पाटील. त्यांच्याविषयी मी काय लिहावे. सगळ्या महाराष्ट्राला त्याची कारकिर्द माहित आहे. जळगावात असताना त्याने सेक्‍स कॅंडल, लातूरात असताना चंदनाचा कारखाना, पुण्यात असताना रेव्ह पार्टी, मुंबईत दहशतवादी हल्ला या प्रकरणांमध्ये विघातक प्रवृत्ती ठेचण्यासाठी ते सतत "फ्रंट'ला असल्याचे सगळ्यांना माहित आहे. मीही त्याच्या बातम्या वाचल्या आहेत. यापेक्षा अजून त्यांच्याविषयी खूप काही लिहता येईल. आता तर अनेकदा वृत्तवाहिन्यांवर विविध चर्चांमध्ये ज्या दमदारपणे ते सहभागी होतात, त्यांचा खच्चून भरलेला कॉन्फिडन्स मी बघतो त्यावेळी लक्षात येते, या माणसाने स्वतःचा कॉलेजमध्ये असलेला चार्म उतरुच दिलेला नाही. मी त्यांना 1998 नंतर कधीच भेटलो नाही. मला त्यांना भेटावे, अशी जरुरीही वाटली नाही. अशा मोट्या पदांवरच्या माणसांना जवळीक घेऊन भेटायचे म्हणजे माझ्या मनावर एक दडपण येते. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी, राजकारणी किंवा मोट्या पदांवरल्या व्यक्तीपासून मी सतत दूर पळतो. दुसरे त्यातले काही नग जवळीक करतात पण तात्पुरती. याची वर्तमानपत्राची उर्जा संपली की सगळीकडे हडहड होते. त्यामुळे आपण भले, आपली माणसं भली असे मला वाटते. त्यामुळे मी प्रसिद्धीत असलेल्या माणसांपासून सतत दूर राहण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो. दुसरी गोष्ट अशी मोठ्या पदांवरील माणसं सतत व्यस्त असतात. आपण त्यांना उगाचच व्यत्यय करणे मला कधी पटत नाही.
या तिघांविषयी मला फार आपुलकी वाटण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यात ती गावाच्या मातीतून आलेली असणे हा एक भाग आहे. दुसरी बाब ही तिघेही माणसं आपपल्या पद्धतीने समाजासाठी चांगले काहीतरी योगदान देतायत ही माझी धारणा आहे. तिसरी बाब त्यांची कॉलेज जीवनात जी हुंबाडी होती ती तशीच आहे. नाहीतर अनेकदा पोर कॉलेज संपले की जगण्याच्या लढाईत चोळामोळा होऊन जातात. आपल्याला काय करायचेय ते विसरुनच जातात. त्यामुळे कॉलजेमध्ये मला जी माणसं भारी वाटली ती पुढे तशीच राहिली, हि गोष्ट त्यातली माझी मला भावते.

----------------------------------- 

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०१५

जिवाचे मैतर...

मी कोण आहे? माझे नातेवाईक कोणकोण आहेत? ते कुठे राहतात? नातेवाईक म्हणजे केवळ रक्तातल्या नात्याचीच माणसं का? त्यापलीकडे आपण कुणाकुणाचे असतो? आपल्याला आपले कोण वाटतं? जिवाभावाच्या गुजगोष्टी आपण कुणाकुणाशी करतो? आपला सूर नेमका कुणाशी जुळतो? कोण भंपक वाटतो? कुणाबरोबर तासन्‌ तास नुसतं बोलत राहावं, असं वाटतं?
---------------
नातेवाईक घासातल्या घासाचा
-------------------------
कोल्हापूर आठवलं, की मला तो आठवतोच. 1992 साल होतं. तो एमबीएच्या दुसऱ्या वर्षाला होता. त्या वेळी यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणाविषयी एवढे सुंदर बोलायचा. आपण आयएएस होणार. जर ते जमलं नाही तर राजकारणात उतरणारं, असं सांगायचा. सातारा जिल्ह्यातील मित्रमंडळीची बैठक तो घ्यायचा. तो बोलायला लागला म्हणजे नुसतं ऐकत राहावं, असं वाटायचं. पुणे विद्यापीठाच्या रिफ्रेक्‍टरीजवळ 1998 ला पाच वर्षानंतर त्याची माझी भेट झाली. पहिल्यांदाच तो निराश झाल्याचे बघितले. यूपीएससीचे सगळे ऍटेम्ट संपले होते. मुलाखतीपर्यंत घडक मारून माघारी परतावे लागले होते. कोणत्या तरी खासगी कंपनीत नोकरी सुरू केली होती. काय बोलला तो त्या वेळी माझ्याशी. ""जे आपल्या लहानपणी मिळाले नाही, ते आपण पुढच्या पिढीला द्यायचा प्रयत्न करू. काही लागलं तर सांगत जा. मी आता पैसे कमावतोय. महिन्याला किमान पाचशेची तरी पुस्तक विकत घेत असतो. हे तुला का सांगतोय तर आपण एकत्र घासातला घास खाल्लाय म्हणून...''
हा घासातला घास म्हणजे नेमके काय, हे समजून घ्यायचे म्हटले तर हॉस्टेलवर राहावं लागतं. त्याशिवाय कळत नाही. रविवारी संध्याकाळी मेसला सुटी असल्यावर कोण घराकडून येतंय. कुणाचे आईबाबा नुकतेच येऊन गेलेत. कुणाकडे चिवडा आहे आणि गरमगरम खिचडीसाठी कॉन्ट्रिब्युशनमध्ये नेमके कोण असणार आणि त्यासाठी ज्याला मनापासून बोलवावं असं वाटतं, ते आपल्या घासातल्या घासाचे नातेवाईक.
-----------------------------------------------------------------
विक्‍या हॉस्टेलवरचा
अकरावीत शिक्षणासाठी घरापासून बाहेर पडायचे म्हणजे कसंसंच होतं. उर भरून येतो. त्यात कॉलेजमधील रॅंगिंगच्या आणि हाणामारीच्या अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात. कोल्हापुरातच अकरावीच्या दुसऱ्या टर्ममध्ये असताना एकाने आमच्या होस्टेलवर येऊन दम दिला. आमच्या सिनियरने ते ऐकले. त्याला समजून सांगितले. पण तो दमात घ्यायला लागला. त्यावर याने सांगितले "तू आता जा आणि सोमवारी कॉलेजला येताना तुझी कोणकोण पोरं घेऊन येणार आहेस ती आण.' सोमवारी काय होणार याचीच उत्सुकता होती. आपलं कुठं इथं जवळ घर आहे, असा विचार काही जण करायचे. पण असले पुळचट विचार टाकून देणारे अनेक "वीर' होते. तो आला सोमवारी एकटाच. त्याची अशी धुलाई केली. अनेकांना बरे वाटले; पण मी हातच उगारला नाही, हे बघून विक्‍या वैतागला होता. माझी घाबरून गाळण उडाली होती. त्यानंतरच्या पुढच्या वर्षी विक्‍या यूआर होणार होता. तसा त्याला शब्दही दिला होता. पण याचं प्रस्थ वाढेल म्हणून गावातल्या पोरांनी अखेरीला डावपेच केले. त्यानंतर गावातली पोर आणि होस्टेलची पोर अशी धुसफूस सुरू झाली. आमच्या एकाला गावात नेऊन मारहाण झाल्यावर आम्ही कॉलेज बंद पाडले. हातात काठ्या, हॉकीच्या स्टीक घेऊन आम्ही कॉलेजवरून फेरफटका मारला. आमचा नेता होता विक्‍या. कुणावर अन्याय करणार नाही तसा कुणाचा सहनही करून घेणार नाही, असे या वेळी प्राध्यापकांना ठणकावून सांगणाऱ्या विक्‍याचं खरंच कोणतं नातं होतं आमच्या होस्टेलच्या पोरांशी?
पदापेक्षा......
बारावीनंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत असूनही त्याने जाणीवपूर्वक कला शाखा निवडली. त्याला यूपीएससी करायची होती. आमच्या शेजारीच त्याची रूम होती. रात्री बरेच काहीबाही वाचत बसलेला दिसायचा. पण पुस्तकी किडा नव्हता. पिक्‍चरला निघायचे म्हटले, तर एका पायावर तयार असायचा. अनेक पिक्‍चर त्याच्याबरोबर बघितले. विशेषतः रात्री नऊचा शो बघून ग्रुपने चालत होस्टेलवर येणे ही मौजेची गोष्ट वाटायची. त्यामुळे जाताना सायकली नेल्या तरी येताना त्या हातात धरूनच यायचो. एम. ए. झाल्यावर दोन चान्स झाले, तरी काही सिलेक्‍शन होत नाही, हे बघून त्याला राजकारणाची खुमखुमी आली. घरी, गावाकडे आला. सहा महिन्यांत काही जुळवाजुळव जमते काय, याचा प्रयत्न करून बघितला. पण राजकारणापेक्षा अभ्यास करणे आणि परीक्षा पास होणे सोपे, हे त्याला उमगले. पुन्हा मुंबईत अभ्यासासाठी गेला. तिसऱ्या प्रयत्नात एमपीएससीमधून उपजिल्हाधिकारी आणि यूपीएससीमधून जिल्हा पोलिस अधीक्षक दर्जाच्या जागेसाठी निवड झाली. त्यानंतर लगेचच त्याची माझी भेट झाली. तब्बल पाच-सहा वर्षांनी. हा आपल्याला ओळख दाखवेल की नाही, अशी शंका माझ्या मनात आली. मी बघून न बघितल्यासारखे केले. स्वतःच मोठ्याने त्याने हाका मारल्या. गप्पांमध्ये जागवलेल्या रात्री विसरलास की बदललास, या त्याच्या वाक्‍याने ओशाळलो. त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या पदापेक्षाही आमचे हे मिठीचे नाते मोठे होते.
घट्ट रुतून बसलेली ही मित्रमंडळी आता कुठे असतील? काय करत असतील? त्यांना आपली आठवण येत असेल का? ज्या तिघांविषयी मी लिहिले. ते माझे सिनियर. बरोबरीच्या दोस्तांशी केलेली दंगामस्करी तर आणखीच वेगळी. काय तुमच्या मनात आहेत असे कुणी सीनियर? 

आपल्या प्रत्येकाला रक्ताच्या नात्यापलीकडं नातं निर्माण करणारे अनेक दोस्त भेटतात. काळाच्या ओघात त्यांच्याशी संपर्क राहतोच असे नाही. मग जुने फोटो, डायऱ्या, पुस्तके काढली, की ही मंडळी आपोआप आपल्या भोवती गोळा होतात. कुणी एखादा भेटलाच रस्त्यात तर जुन्या आठवणी बहरतात. चहा, कॉफीबरोबर त्याची-तिची आठवण निघते. कॉलेजच्या ऊर्जेचे दिवस आठवतात. मनावर ठसलेले प्रत्येक मनाच्या कुपीत हे नाते घट्ट झालेले असते. असं प्रत्येकाच्या मनात कुणीतरी असतंच.