शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

मैत्र जीवाचे.... : पोमलवाडीकरांनीही केले मोठे काम

मैत्र जीवाचे.... : पोमलवाडीकरांनीही केले मोठे काम: मी साधारण 1999 मध्ये प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नावर वृत्तमालिका लिहिली. ती सोलापूर सकाळमध्ये प्रसिद्ध झाली. त्यावेळी मी पुण्यात होतो. ...

पोमलवाडीकरांनीही केले मोठे काम

मी साधारण 1999 मध्ये प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नावर वृत्तमालिका लिहिली. ती सोलापूर सकाळमध्ये प्रसिद्ध झाली. त्यावेळी मी पुण्यात होतो. विजय साळुंखे सर त्यावेळी सोलापूर आवृत्तीचे पुण्यातून काम पहात होते. या मालिकेत प्रामुख्याने मी दळवळणासाठी रस्त्यांचा अभाव, इतकी वर्ष झाली तरी प्लॉट न मिळणे, रखडलेले प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न अशी तीन भागांची हि मालिका होती. त्या काळात होडी बुडाल्याची घटना कळाली की अंगावर थरकाप उडायचा. अशा काही घटना या भागात झाल्या पण या गावात अशी दुर्घटना कधी घडली नाही. होडी एकदा बुडाली, पण वेगळ्या ठिकाणी. पैलवान पोर होडी घेऊन आगोतीला गेली होती. तिथे फड होता. या होडीत पाणी येत होते. तिकडून यायला अंधार झाला. बुडालेली होडी गांजीवळण येथे सापडली. तशी होडी बुडाली तरी तिचा घोडा वरच राहतो. होडी कधी तळाला जात नाही. तिच्यात जर काही वजन असेल तर मात्र ती वर रहात नाही. पाणी आले की बुडायला लागते. त्यानंतर 2001 मध्ये मी सोलापुरात आल्यावर अनेकदा हे विषय येत गेले. सकाळमध्ये साधारण 2008 च्या दरम्यान लोक लोकवर्गणीतून काम करणार असेही छापून आले होते. बातम्या येत गेल्या. पुण्यात असताना दोनदा मी रात्री एकटाच होडी घेऊन केत्तूर दोनवरुन केत्तूर एकला आलो होतो. एकदा नदीच्या काठालाच रात्रभर बसलो होतो. आता जशी मोटारींची गर्दी आणि सतत नदीच्या काठाने लोकांचा वावर असतो, तितका त्या काळात नसायचा. त्यामुळे एकट्यादुखट्याने जाणे म्हणजे अंगावर काटा यायचा. तसे पारेवाडी रेल्वे स्टेशन हे चोऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण केत्तूर एकच्या लोकांना फार कधी अशा चोऱ्यांचा खूप त्रास झालेला मला आठवत नाही.
केत्तूरच्या गावकऱ्यांनी केलेल्या या कामानंतर पुढच्या उन्हाळ्यात म्हणजे 2013 मध्ये केत्तूर पोमलवाडी जोडणाऱ्या रस्त्याचे काम केत्तूर दोन आणि पोमलवाडी ग्रामस्थांनी सुरू केले. त्याला विरोध हिंगणी ग्रामस्थांनी केला. त्याला पारेवाडी ग्रामस्थांचा पाठिंबा होता. विरोधाचे कारण असे होते की आमचे पाणी तुम्ही अडवत आहात. त्याला मग पुढे राजकारणाचे स्वरुप आले. त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. याबाबत पाहणी करुन पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल द्यावा, असा आदेश न्यायालयाने केला. त्याची मग एक अशी आवई उटली की काम बंद करायला सांगितले आहे. त्यावेळी मी अशोक पाटील, सूर्यकांत पाटील, अजित विघ्ने या मंडळींशी बोलून प्रतिक्रियांची एक बातमी दिली. आम्ही एक छोटा पूल बांधत आहोत, कुणाचे पाणी अडवत नाही. न्यायालयाची याचिकार्त्यांनी दिशाभूल केल्याची चर्चा असा बातमीचा पोटमथळा होता. त्यानंतर मग दोन सुनावण्या न्यायालयापुढे झाल्या. याचिका डिसमीस झाली. ही बातमी मला आवडण्याचे कारण आपण एखादी बाजू घेऊन काही लिहिणे हा भाग जरी त्यात असला तरी लोक आपल्या दळणवळणाच्या सुविधेसाठी काहीतरी बघत असताना त्याला खोडा घालून ते सगळे तसेच पडू देणे हे काही बरोबर नाही, असे माझे मत होते.
याचिका निकालात निघाल्यानंतर पोमलवाडीकर नेटाने कामाला लागले. त्यांनी तर खूपच मोठे काम केले आहे. आता या दोन्ही ठिकाणची गरज अशी आहे की पक्का डांबरी रस्ता होऊन ही गाव भिगवणशी जोडली जाणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा परिषद, राज्य सरकार हे काम करणे गरजेचे आहे. एका पिढी समस्याग्रस्त जगत गेली आता प्रकल्पग्रस्तांच्या दुसऱ्या पिढीसाठी झालेल्या कामांचे मोल मोठे आहे.

बुधवार, २० जानेवारी, २०१६

दात्यांची कमतरता नाही

केत्तूरच्या पुलासाठी इतके पैसे कसे जमविले? असा प्रश्‍न अनेकजण विचारतात. खरे तर आज जमाना घ्यायचा आहे. द्यायला तयार असणाऱ्यांचे प्रमाण कमीच दिसते. पण गावात देणाऱ्यांची कमतरता नाही, हे यावेळी दिसून आले. त्यात "उजनी धरणाने गावाला काही दुःख जरूर दिली. अनेक मूलभुत सुविधा अजून प्रकल्पग्रस्त भागात नाहीत पण तरीही एक गोष्ट मात्र नक्की दिली. पाणी. त्याच्या जिवावर या भागात सगळा ऊस पिकतो. शेतकरी कर्जात असले तरी त्यांच्या हातात पैसा खेळतो आहे. या आर्थिक ताकदीच्या बळावर हे काम झाले. जिराईत भागात असे काम करायचे म्हटले तरी ते ज्यांच्या हातात पैसाच नाही, त्यांना जमणार कसे? दुसरी गोष्ट दानतही लागते. एखाद्या कुठल्याही सार्वजनिक उत्सवाला गावात हाक दिली तर लाखदोन लाख सहज गोळा होतात. त्यामुळे एक बैठक घेतली आणि ठरविले प्रत्येकाने वर्गणी द्यायची. ज्यांना ऊस जात नाही, त्यांनी आपल्या ऐपतीप्रमाणे जितका वाटा उचलता येईल तितका उचलायचा. गावातल्या लोकांत स्वाभिमान जागा झाला. शेजारपाजारच्या गावांनीही मदत केली. केत्तूरची दोन्ही गावातील गावकरी मदतीला धावले. गोयेगावकरांना वाटले, त्यांनी काही मदत दिली. पारेवाडीसह परिसरातील अन्य गावातील काही माणस मदत केली. दात्यांची कमतरता या भूमीत कधीच नव्हती आणि नाहीसुद्धा, फक्त विश्‍वाहार्य माणस लागतात. या कामासाठी सगळेच पुढे आले. त्यांच्यातल्या चांगुलपणाविषयी लोकांना विश्‍वास वाटला म्हणून काम झाले आहे. पन्नास हजार देऊ शकतील अशीच एक यादी झाली. मग कामाला सुरवात झाली.
जागा झाला स्वाभिमान
गावाच्या मनात कोणत्याही नेत्याविषयी अथवा पुढाऱ्याविषयी कटुतेची भावना नाही. आश्‍वासने देणे पुढाऱ्यांचे काम आहे, असे ते मानतात. त्यामुळे त्यांनी काम सुरू केले. गावकऱ्यांची मदत मिळत गेली. बघता बघता काम उरकत आले. सुरवातीला अगदी बातम्या येण्याअगोदर हे काम नेमके काय हे बघण्यासाठी आसपासच्या परिसरातील दोन चारशे लोक रोजच काम बघायला यायचे. लोकांत जागा झालेला स्वाभिमान पाहून लोकांना खूप बरे वाटायचे. आपणही काहीतरी करू शकू, अशी भावना लोकांत जागी व्हायची. हे काहीतरी वेगळे आहे. लोकांना व्यक्त होण्याचे हे माध्यम आहे, असे लोकाना वाटायचे. मग जेव्हा पुन्हा वर्तमानपत्रात त्याच्या बातम्या येऊ लागल्या. पुन्हा दूरचित्रवाणी वाहिन्यांचे लोक यायला लागले. कामाची प्रसिद्धी सर्वदूर होत गेली. लोकांना बरे वाटायला लागले.
यांनी घेतला पुढाकार
या पुलाच्या बापूसाहेब पाटील यांच्याबरोबरच बंडू पाटील, माधवराव खाटमोडे, शंकर कानतोडे, डिगांबर नाझरकर, आबा ठोंबरे, रामा कोकणे, लालासाहेब कोकणे, हनुमंत राऊत, नवनाथ राऊत, भीमराव येडे यांच्याबरोबरच केत्तूर दोनमध्ये राहणारे माजी सरपंच अशोक पाटील, उदयसिंह मोरे पाटील, दादासाहेब निकम, पंडित माने, राजाराम माने, अजित विघ्ने यांच्यासह गावातल्या प्रत्येकाचाच पुढाकार घेतला. इथे नाव राहिल तरी मुळात नावासाठी कुणी कामच करत नव्हते. यातल्या अनेकांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून अगदी मुंबई, दिल्लीपर्यंत भेटीगाठी घेतल्या. मग स्वतःच कामाला सुरवात केली. ते पूर्णत्वास नेले. रामराव पाटील यांनी मागदर्शकाची भूमिका निभावली. आमच्या काळात काही होऊ शकले नाही आता तुम्ही करत रहा, असा त्यांचा सल्ला असायचा, असे गावातील तरुण मंडळी सांगतात.
या कामाबाबत करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती बापूसाहेब पाटील म्हणतात, ""राजकीय व्यवस्थेवरचा लोकांचा उडत चाललेला विश्‍वास ही चिंतेची बाब आहे. पूर्णवेळ राजकारण करणाऱ्या सगळ्याच पक्षातल्या लोकांनी याचा विचार करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट आम्ही केलेले काम हा एक प्रयोग आहे. त्याची लोकचळवळ होणे ही आजची, काळाची गरज आहे. सरकार तुमच्या सगळ्याच गोष्टीला पुरे पडू शकत नाही. त्यामुळे लोकांनी एकत्र येऊन आपली कामे मार्गी लावणे हा संदेश यातून सर्वदूर जायला हवा.'' (क्रमशः) 

मंगळवार, १९ जानेवारी, २०१६

सारेच पुढारी कुचकामी

केत्तूरची दखल विविध वाहिन्यांनी घेण्यासाठी एक बातमी कारणीभूत ठरली. "शिक्षणाची वाट जाते, मरणाच्या दारातून,' ही केत्तूरची बातमी 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली. त्याला फोटो जबरदस्त प्रसिद्ध झाला होता. रेल्वे पुलावरून मुले शाळेला जातायत आणि समोरुन रेल्वे आली, असा तो फोटो होता. राजाराम माने यांनी दिलेल्या फोटो बातमीने हा विषय एकदम क्‍लीक झाला. त्यानंतर अनेक वाहिन्या तिकडे धावल्या. मराठी वाहिन्यांबरोबरच हिंदी वाहिन्यांचाही त्यात समावेश होता. वेगवेगळ्या पातळ्यांवर या बातमीची दखल घेतली गेली. त्यात त्यावेळचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा विषय आपण सोडवू, एक पायवाट होईल एवढा पूल तयार करून देऊ. अशी घोषणा केली. एक शिष्टमंडळ तेव्हाचे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना भेटायला गेले. त्यांनी हा विषयात लक्ष घालून राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री छगन भुजबळ यांना फोन करून प्रश्‍न मार्गी लावा, असे सांगितले. पुन्हा जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनीही या पुलासाठी निधी मंजूर झाल्याची घोषणा केली. त्यावेळच्या स्थानिक आमदार श्‍यामल बागल यांनीही त्याबाबत निधी मंजूर झाल्याचे सांगितले. प्रत्यक्षात या गावची तरुण मंडळी सरकारी कार्यालयांत फेऱ्या मारायची तेव्हा लक्षात यायचे की कुठेच काही सरकारी पातळीवर काही हलायला तयार नाही. हे काही खरे नाही, असेही खासगीत काही मंडळी गावकऱ्यांना सांगायची. त्यामुळे गावकरी निराश झाले. आता आपणच काहीतरी केले पाहिजे, हा विडा त्यांनी उचलला.
पार्श्‍वभूमी
खरे तर या विषयाला तसा फार जुना संदर्भ आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आता समोर आली आहे. नगर आणि कोल्हापूरला मागे टाकत गेल्या हंगामात 28 तर या हंगामात 34 साखर कारखाने उसाचे गाळप करत आहेत. ही ताकद या जिल्ह्यात कुठून आली, याचा शोध घेतला उजनी धरण हीच एक बाब समोर येते. या धरणाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी सात मार्च 1966 मध्ये केले. या धरणासाठी एकूण 51 गावे उठवावी लागली. त्यात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यातील 19, माढा तालुक्‍यातील चार, पुणे जिल्ह्यातील 25 तर नगर जिल्ह्यातील एका गावाचा समावेश होता. या 51 गावांपैकी एक म्हणजे करमाळा तालुक्‍यातील केत्तूर. या पुनर्वसित गावांचे अनेक प्रश्‍न होते आणि आहेत. मुलभूत सुविधांपासून अगदी स्मशानभूमीपर्यंत अनेक प्रश्‍नांची यादी करता येईल. केत्तूरसह काही गावांची गत तर वेगळीच झाली होती. एका गावाची दोन गावे झाली. केत्तूर नंबर एकच्या तीन बाजूंनी पाणी आली. रस्त्याने केत्तूर एकहून दोनला जायचे म्हटले तर किमान 13 किलोमीटर अंतर कापावे लागत होते. दोन्ही गावांना जोडणारा मधला मार्ग होडी. त्यातून लोक प्रवास करीत होते. हा कायम जिवावरचा प्रवास होता. या ठिकाणी पूल झाला पाहिजे, यासाठी गावकऱ्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. मात्र अशी कामे होण्यासाठी जो एक राजकीय आवाज लागतो, तो गावांत नव्हता. त्यामुळे हा प्रश्‍न राजकारणाच्या दृष्टीने ऐरणीवर आला नाही. जागतिक बॅंकेच्या मदतीतून प्रकल्पग्रस्त भागात काही कामे झाली. त्यावेळी देवराव नवले, नवनाथ राऊत यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी निविदा निघण्याअगोदरच काही काम केले. पण पुढे या कामाकडे कुणी सरकारी यंत्रणेतल्या कुणी ढुंकूनही बघितले नाही. पुढे बातम्या येत गेल्या. कधी लोकवर्गणीतून काम होणार अशा तर कधी सरकारने काम मंजूर केले असे छापून येऊ लागले. बोलले जाऊ लागले. त्यातून एक गोष्ट होत राहिली. गावकऱ्यांच्या मनात या कामाविषयी एक धगधगती भावना कायम राहिली. हे काम झाले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे प्रत्येकाने या कामात आपला खारीचा वाटा उचलला.
आपणच काम करावे, हि कल्पना कशी सुचली, यावर गावकरी सांगतात, "एक दिवसात गावाला सुचलेली ही कल्पना नाही. गेली तीस चाळीस वर्ष केत्तूर नंबर एक हे गाव बेटासारखे जगत होते. उजनी धरण झाले, गावात पाणी आले. नव्या गावात, शिवारात गावकरी येऊन विसावलो. तिथेही पाण्याने त्यांची पाठ सोडली नाही. केत्तूर एकच्या लोकांना रोज तळहातावर जीव घेऊन होडीतून प्रवास करावा लागायचा. गावची पोर शाळेसाठी रोजच मृत्युच्या दारातून प्रवास करायची. आम्हाला रस्ता हवा, छोटासा पूल हवा म्हणून गावकरी गाऱ्हाणी घेऊन फिरायचे. निर्दयी, थंड शासन त्यांच्यासाठी हलत नव्हते, फक्त पुढारी बातम्या आल्यावर बोलत होते. लोक इथे -तिथे धावत होते. आमच्या लक्षात आले व्यवस्थेपुढे कितीही डोके आपटले तरी आपलेच डोके फुटायची शक्‍यता आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. सगळ्या गावाचा हा निर्णय आहे.' 

सोमवार, १८ जानेवारी, २०१६

चिमूटभर गावाची मूठभर ऊर्जा

करमाळा तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्त केत्तूरमध्ये लोकवर्गणी आणि ग्रामस्थांचे श्रमदान यातून रस्ता आणि पुलाचे काम झाले. दीडशे पावणेदोनशेचा उंबरा असलेल्या चिमुटभर गावाने उभारलेले हे काम अनेकांना थक्क करते. तरुण मुलांत, शेतकऱ्यांत ही ऊर्जा कुठून आली? त्यांनी पैसे कसे जमविले? या सगळ्याची नेमकी पार्श्‍वभूमी काय?
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यात प्रकल्पग्रस्त केत्तूर एक ते दोनला जोडणाऱ्या पुलाचे लोकवर्गणीतून झालेले काम ही तशी एक छोटी तरीही क्रांतिकारक घटना आहे. शेती करणाऱ्या तरुण पोरांनी, शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून, श्रमदानातून विकासकामे या संकल्पनेचा केलेला हा एक छोटासा प्रयोग आहे. व्यवस्थेने कायम ज्यांची लुबाडणूक केली त्या शेतकऱ्यांच्या आणि गावात राहणाऱ्या तरुण पोरांच्या हातात काही रक्कम आली तर ते किती उदार होऊन आपल्या सोईसाठी खर्च शकतात, याचे हे उदाहरण आहे. दीड-दोनशे उंबरा असणाऱ्या चिमूटभर गावाने निर्माण केलेली ही मूठभर ऊर्जा व्यवस्थेला विचार करायला लावणारी आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना विधायक बळ देणारी आहे. शहरी, स्वकेंद्रीत सरकारच्या नावाने कायम खडे फोडणाऱ्यांना मार्ग दाखविणारी आहे. सरकार नावाच्या डोळे झाकून बसलेल्या यंत्रणेला जागे करणारी आहे. आपण लोकांना कायम भुलवू शकत नाही. गाव छोटे असले तरी आपली लक्तरे वेशीवर टांगू शकते, असा संदेश पुढाऱ्यांना देणारी ही घटना आहे. अशी कामे जिथे होतात तिथे एक गोष्ट दिसते, ती अशी की त्याठिकाणचे नेतृत्व नेतेगिरी करणारे नसते. लोकांच्या आशाआकांक्षांना विधायक वळण देताना त्यांना विश्‍वास वाटेल अशा म्होरक्‍यांची गरज असते. तसा जो कुणी म्होरक्‍या असतो तो म्हणजे आपणच आहोत, इतका विश्‍वास निर्माण झाला की लोक त्याच्या खांद्यावर मान टाकायला तयार होतात. या कामातही तेच झाले, जे पाच सहाजण पहिल्यापासून या कामासाठी धडपडत होते, त्यांनीच पुढेही पुढाकार घेऊन हे काम तडीला नेले. काम किती चांगले झाले? किती दिवस टिकेल? नियोजनाने प्लॅनइस्टीमेट तयार केले होते का? अशा प्रश्‍नांना उत्तर देण्याची गरज नाही. कारण हे या कामात गावकऱ्यांचा जीव एकवटला होतो. जिथे जीव ऐकवटतो, ते काम चांगले होतेच. जिथे जीव एकवटतो तिथे नवनिर्माणाची प्रक्रिया घडते. साधी जेवणासाठी भाजी करायची म्हटले तर ती जर मनापासून केलेली असेल तर तिला फार मसाला नसला अगदी चटणी, मीठ टाकूनच केली तर तिला भुकेल्यापोटासाठी चव येते. तसे या कामाचे आहे. हे गाव या कामासाठी साधारण 30-35 वर्ष धडपडत होते. आख्खे गाव या कामासाठी एक झाले होते. त्यामुळे त्याला निर्माण झालेली नवनिर्मीती ही अनेकांना थक्क करायला लावणारी आहे. त्यामुळे नुसतीच मुद्रीत माध्यमे नव्हे तर विविध मराठी, हिंदी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी या कामाची दखल घेतली. देशभर हा विषय गेला. (अपूर्ण) 

गुरुवार, १४ जानेवारी, २०१६

आरक्षण

महाबळेश्‍वरच्या अक्षर मानव संमेलनानंतर सोलापुरात आल्यावर हयात पठाण, भरत यादवच्या पुढाकारने आम्ही चौघांनी प्रत्येकी काही रक्कम घालत हत्तरसंग कुडलला सोलापुरातील दहा कॉलेजांमधील साठ तरुण मुलामुलींचे संमेलन घेतले. ते सुद्धा खुल्या चर्चेचे. तिथेही झालेली आरक्षणावर चर्चा तरुणांच्या मनात खदखदत असलेल्या असंतोषावर प्रकाश टाकत गेली. आरक्षण कशासाठी याची समाजात खोलवर जाणीव करुन देण्यात आपली व्यवस्था समाजकारण करणारी मंडळी किती तोकडी पडतात, याचे दर्शन झाले. या संमेलनात कॉम्रेड तानाजी ठोंबरे, दत्ता गायकवाड, चित्रकार धोत्रे यांची भाषणे खूप चांगली झाली होती. दत्ता गायकवाड यांनी आरक्षणासंबंधी मांडलेली भूमिका अनेकांना नव्यानेच दृष्टी देऊन जाणारी होती. ते म्हणाले, "आरक्षण कुणाला मिळते. ते फक्त शिक्षण घेणाऱ्या गरीब मुलांना मिळते, असा आपला समज आहे. पण तसे नाही. सहकारी साखर कारखाने उभारणारे साखर सम्राट, शैक्षणिक संस्था काढून सरकारी फायदे लाटणारे शिक्षणसम्राट यांना ज्या मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्या जातात, त्यांना आपण आरक्षण म्हणणार नाही का? आरक्षण पहिले कुणी दिले. मनु नावाच्या ऋषीने. समाजातील प्रबळांना शंभर टक्के. शेती आणि संपत्तीत. आरक्षण हा काही दारिद्रय निमुर्लनाचा कार्यक्रम नाही. हजारो वर्ष पिचलेल्या पिचलेल्या वर्गाला सगळ्यांच्याबरोबर आणण्यासाठीचा तो सामाजिक विषय आहे. नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण घेणारी आणि आरक्षण न घेणारी मुले ज्यावेळी समान पातळीवर येतील, तेव्हा आरक्षण आपोआप संपेल. आपण गोष्टी खोलवर समजून घेतल्या पाहिजे.'
सगळ्या मुली-मुलांना बोलते केल्यानंतर तिथून निघताना आपण नवे काहीतरी शिकलोय, या जाणिवेबरोबरच मुलांना व्यक्त होऊ दिल्यानंतर त्यांचे फुलून जाणे पुन्हा पुन्हा आपण भेटत राहू असे म्हणणे हे सगळे तसे आनंददायक होते. त्याच रात्री रात्रभर राजन खान यांच्याबरोबर मारलेल्या गप्पा म्हणजे खूप वेगळा अनुभव होता. रात्री साधारण आम्ही आठला सोलापुरात आलो. पुढे मी व्यक्तीगतरित्या या मुलांशी संबंध ठेवला नाही. पुढे वेळ मिळेल तशा विविध गोष्टी करत राहिलो.
पाचगणीला 2013 लाही पुन्हा जाऊन आलो. संमेलनाचा विषय माणूस होता. या संमेलनातून आपल्याला फार काही मिळाले नाही, असे वाटत राहिले. या संमेलनात खरे तर मला बोलायला मिळाले. मी मला भेटलेल्या, माझ्यावर ठसा उमटविणाऱ्या माणसांविषयी बोललो. लोकांनी दाद दिली. या संघटेकडून आपण काय मागतो तर काहीच नाही. पण तरीही तसा या संघटनेशी संपर्क राहिला नाही.
माणूस केंद्रस्थानी ठेऊन आपण जसा विचार करतो, तसा विचार समाजात रुजणे हे कितीही महत्वाचे असले तरी सगळीच माणसं तसा विचार करतात, असे नाही. कट्टरपणा सगळीकडेच आहे. कट्टरपणाला कट्टरपणा हे काही उत्तर नाही, असे मला नेहमी वाटते. त्यामुळे जिथे माणसाच्या मनात माणसांप्रती दुजाभाव दिसतो, तिथे आपले जमत नाही. मन रमत नाही. एखादा चुकत असेल, चुकला असेल तर त्याला आईच्या ममतेने दोन रट्टे देणे वेगळे आणि त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करुन शत्रू मानणे वेगळे. माणसाने माणसाचा शत्रू कधी होऊ नये असे मला वाटते. आयुष्याच्या अगदी चाळीशीत मला ही गोष्ट निदान वाचेच्या पातळीवर कळाली आणि आकलनाच्या पातळीवर मांडता येऊ लागली, असे मला वाटते.
गावात आपण काहीतरी करावे, ही उमीसुद्धा एके काळी माझ्या मनात फार उफाळून आली होती. अनेक पोरांशी त्याविषयी गप्पा मारायचो. पण त्या अनुभवातून मी इतकेच शिकलो की आपण आपल्या गावात काही करण्यापेक्षा बाहेर बरेच काही करु शकतो. बाहेर काही हातपाय मारायचे प्रयत्न करायला जमले नाही. खरे तर हे सगळे अनुभव या मुलींच्या सामाजिक कार्याच्या अनुभवाच्या निमित्ताने मांडणे एवढेच त्याचे प्रयोजन आहे. या मुलींबरोबर आम्ही पुढे एक नोहार्ड नावाची सेवाभावी संस्था धर्मदाय आयुक्तांकडे रजिस्टर केली. नोकरीत असल्या कामाला कधीच वेळ देता येत नाही. त्या संस्थेचे पुढे काय झाले, मला माहित नाही मात्र दोन तीन बैठकांनंतर मी या संस्थेच्या कामात काही लक्ष घातले नाही. आता या टप्प्यावरसुद्धा मला असे वाटते की आपण सामाजिक कामात उतरावे. काहीतरी वेगळे करता आले तर पहावे. मला आता समाजातील वृद्धांचे प्रश्‍न फार भीषण झाल्याचे दिसते. त्यांच्यासाठी आपल्या काय करता येईल याची मी खरेच मनोमन चाचपणी करीत आहे. काही गोष्टींचे आराखडे मनात बांधले जात आहेत. आणखीही काही मनात आहे. ते आकाराला येईल तेव्हा त्यातले अनुभव खरेपणाने शेअर करता आले तर बरे होईल. पण त्यासाठी जुने काही पाश तोडावे लागतील. ते कधी तुटणार असा मी मला प्रश्‍न विचारतोय?

बुधवार, १३ जानेवारी, २०१६

मनात रुतलेले वाक्‍य

मनात रुतलेले वाक्‍य
आपला विचार, आपण, समाजतील विषमता, देवधर्म, आपले महापुरुष आणि व्यवस्थेवर वर्चस्व गाजविणाऱ्या माणसांचे गरीबांना गांजणे, व्यवस्था घट्ट व्हावी म्हणून पेरला जाणारा विचार अशा बारीक सारीक गोष्टींवर गप्पा मारण्यात एक वैचारिक आनंद मिळतो. त्यातून आपल्याला आपलेपण अनेकदा सापडते. अशा गप्पा मारताना भरत यादवने एक दिवस अक्षर मानव संमेलनाच्या पत्रकाची माहिती दिली. महाबळेश्‍वरजवळ खिंगरला होणारे संमेलनाविषयीची भूमिका भारी होती. आपण जाऊ तिकडे अशी आम्ही चर्चा केली. पुढे बरेच दिवस त्या विषयावर काही चर्चा झाली नाही, मग संमेलन अगदी तोडांवर आल्यावर मी पुण्यात विचारून त्यांचा आजीव सभासद झालो. माझ्याअगोदरच भरतने त्याच्यासह हयातमहंमद पठाण, सिद्धाराम वाघ, राकेश कदमला आजीव सभासद करुन घेत आपली जागा फिक्‍स केली. त्यानंतर मात्र मग प्रत्यक्ष खिंगरला सिद्धाराम, मी आणि भरत पुढे गेलो होतो. तीन दिवस आणि चार रात्री तिथे राहिलो. पाऊस छपाछपा कोसळत होता. जेवणाची सोय उत्तम पद्धतीने केलेली होती. महाराष्ट्रातून आलेली निवडक माणसं व्यासपीठावर बोलत होती. कोण बोलणार हे काही ठरलेले नसते, असे निदान सांगितले जाते. वैचारिक वादात भांडणे करायची नाहीत आणि दारु पिणाऱ्यास हाकलून दिले जाईल, असा तिथला नियमच होता. बोलणाऱ्याचे बोलणे संपल्यावर त्याला प्रश्‍न विचारणे, त्याच्या माहितीत काही भर घालणे अशी प्रत्येकाला व्यासपीठावर नाही निदान प्रेक्षकांतून तरी बोलायला संधी तिथे असते. तीन दिवसात अनेक चांगले वक्ते ऐकले. सकाळी दहानंतर चहा नास्ता झाल्यावर चर्चेला सुरवात होते. ती संध्याकाळपर्यंत चालायची. त्यानंतर रात्री शेकोटी पेटवायची, त्याच्यासमोर गप्पा मारत बसायचे. तीन रात्री आम्ही इतक्‍या तुफान गप्पा मारल्या की त्याने रात्री झोप न येणे किंवा आपल्यात काहीतरी बदल होतोय, याची जाणिव करुन देणारी ती प्रक्रिया होती. समाज हा 2012 च्या संमेलनाचा विषय होता. त्यात महिलांच्या प्रश्‍नावर चर्चा झाली. त्यातले एक वाक्‍य मला अजूनही काही केल्या मनातून जात नाही. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरहून ज्येष्ठ कवियत्री सुमती लांडे संमेलनाला आल्या होत्या. त्या बोलल्या. त्यांचे भाषण झाले चांगले मात्र नंतर चर्चेत त्या पुढे आल्या. बायकांच्या प्रश्‍नावर चर्चा होती. बायका आपल्यावर घरातून आणि बाहेरही अन्यायवर झाल्यावर बोलत नाही. त्यांनी बोलायला हवे, असे कुणीतरी सांगत होते. सुमतीबाई पुढे गेल्या त्यांनी सविस्तर मांडणी केली, मात्र त्या म्हणाल्या, "बायका बोलत नाहीत, हे तसे बरे आहे. त्या जर बोलायला लागल्या आणि खरे बोलायला लागल्या तर आपल्याकडील कुटुंबव्यवस्थाच मोडखळीस येईल. सगळ्याच गोष्टी त्यांना कुठे सांगायची संधी असते.' हे वाक्‍य माझ्या मनात रुतून बसले आहे. या संमेलनासाठी अनेक मान्यवर आले होते मात्र संमेलन गाजविले ते हरी नरके यांनी. त्यांनी मराठी अभिजात भाषा असल्याचे खूप जोरदारपणे मांडले होते. यवतमाळचे डॉ, अशोक राणा, कवियित्री नीरजा, विद्या बाळ, अश्‍विनी धोंगडे, रंगनाथ पाठारे अशा एक ना अनेकांशी यानिमित्ताने गप्पा मारण्याची संधी मिळाली. पुण्याच्या अक्षरमानवच्या टीममधील अभिजीत सोनवणे, कविता दातीर, प्रशांत कांबळे, कोल्हापूरच्या सुषमा शितोळे यांच्यासह अनेकांशी गप्पा झाल्या. कविता दातीर आणि अमृता देसरडा यांनी मांडलेली भूमिकाही नव्या पिढीच्या मुलींच्या ठाव घेणारी होती. (अपूर्ण....
)